बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८ goo.gl/pEKUE4 कामिल पारखे
पु. ल. देशपांडे काळाच्या पडद्याआड जाऊन १८ वर्षे लोटली तरीही रसिकांच्या मनावरील त्यांचे राज्य कायम आहे. एक वाचक म्हणून आणि नंतर बातमीदार म्हणून अनुभवलेल्या पुलंविषयी थोडेसे.
पुलंची पुस्तके आणि त्यांच्याविषयीचे साहित्य मी प्रथम वाचायला सुरुवात केली ते इचलकरंजी येथील १९७४ सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजायला लागले तेव्हा. ते पन्नासावे मराठी साहित्य संमेलन होते आणि पुल स्वतः संमेलनाध्यक्ष होते. वृत्तपत्रे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यानंतर पुल हे सर्वांत पहिलेच सेलेब्रिटी संमेलनाध्यक्ष असावेत. पुल त्यावेळी आपल्या साहित्यिक कारकिर्दीच्या आणि लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर होते, त्यावेळचे ते महाराष्ट्रातील सर्वांत लोकप्रिय साहित्यिक आणि लाडके व्यक्तीमत्व होते. त्यावेळी श्रीरामपूरला मी नववीला होतो. याकाळात संमेलनाआधी पुलंविषयी आणि त्या संमेलनाविषयी सर्वच मराठी वृत्तपत्रात कितीतरी दिवस रकानेच्या रकाने मजकूर छापून येत होता आणि आम्ही वाचक ते सर्व अधाशासारखे वाचत होतो.
मात्र त्यानंतरच्या वर्षी कराड येथे झालेले मराठी साहित्य संमेलन त्याहूनही अधिक गाजले, वादग्रस्त ठरले आणि ऐतिहासिकही ठरले. आजवरच्या इतिहासात हे सर्वात अधिक गाजलेले मराठी साहित्य संमेलन ठरले. त्याचे कारण म्हणजे हे संमेलन आणिबाणीच्या काळात म्हणजे १९७५ साली भरत होते आणि संमेलनाध्यक्षा होत्या विदुषी दुर्गा भागवत. मावळते अध्यक्ष म्हणून नव्या संमेलनाध्यक्षांकडे सूत्रे सोपविण्यासाठी पुलदेखील संमेलनाच्या व्यासपीठावर असणार होते. यानिमित्ताने दोन ज्येष्ठ, दिग्गज साहित्यिक एकाच व्यासपीठावर असणार होते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि यजमान होते कराडचेच रहिवासी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण.
मात्र त्यानंतरच्या वर्षी कराड येथे झालेले मराठी साहित्य संमेलन त्याहूनही अधिक गाजले, वादग्रस्त ठरले आणि ऐतिहासिकही ठरले. आजवरच्या इतिहासात हे सर्वात अधिक गाजलेले मराठी साहित्य संमेलन ठरले. त्याचे कारण म्हणजे हे संमेलन आणिबाणीच्या काळात म्हणजे १९७५ साली भरत होते आणि संमेलनाध्यक्षा होत्या विदुषी दुर्गा भागवत. मावळते अध्यक्ष म्हणून नव्या संमेलनाध्यक्षांकडे सूत्रे सोपविण्यासाठी पुलदेखील संमेलनाच्या व्यासपीठावर असणार होते. यानिमित्ताने दोन ज्येष्ठ, दिग्गज साहित्यिक एकाच व्यासपीठावर असणार होते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि यजमान होते कराडचेच रहिवासी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण.
राजकारणी लोकांनी मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असू नये अशा त्यावेळच्या मागणीमुळे स्वतः साहित्यिकही असलेले यशवंतराव संमेलनात श्रोत्यांमध्ये बसले होते. त्यावेळी ''फारच तुडवले गेले तर मेलेल्या जनावराच्या कातडीपासून बनवलेली वहाणही कुरकुरू लागते''' अशा आशयाचा उल्लेख आणिबाणीत लागू केलेल्या निर्बंधाबाबत पुलंनी आपल्या भाषणात केला असे वाचल्याचे अजुनही आठवते. त्याकाळात आजारी असलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीस आराम मिळावा म्हणून काही वेळ उभे राहण्याची सूचना करून त्यावेळी दुर्गाबाईंनी भर सभेत बॉम्बगोळाच टाकला होता. त्यावेळी दुर्गाबाईंच्या सूचनेस मान देऊन यशवंतरावांना उभे राहणे भाग पडले होते. त्यानंतर दुर्गाबाईंना झालेली अटक आणि पुलंनी आणिबाणीस जाहीर सभांमधून केलेला विरोध वगैर घटनाक्रम हा तर इतिहासच आहे.
मला आठवते इचलकरंजी आणि कराड या दोन्हीही शहरांतील संमेलनांच्या अध्यक्षांची आणि प्रमुख्य पाहुण्यांची भाषणे वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर पहिली बातमी म्हणून वापरली होती. त्या दोन्हीही संमेलनाला केवळ काही हजार साहित्य रसिक मंडळी आली असणार, मात्र वृत्तपत्रांच्या विस्तृत वार्तांकनांमुळे, लक्षवेधी क्षणचित्रांमुळे आणि फोटोंमुळे तेथे प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्यासारख्या लाखो वाचकांनी ती दोन्ही संमेलने अनुभवली असणार.
गोव्यात पणजीला धेम्पे कॉलेजात एफवायबीएला मला पुलंचे 'तुझे आहे तुझ्यापाशी' हे नाटक होते. संपूर्ण वर्गात केवळ तीनच विद्यार्थी - मी आणि इतर दोन मुली- असतानासुद्धा आमच्या शिक्षकांनी हे नाटक अगदी समरसून शिकवले. त्यांतील काकांचे आणि आचार्यांचे जीवनविषयक परस्परविरोधी तत्त्वज्ञान मनात खोलवर रुतून बसले. (पुढे काही वर्षांनंतर पुण्यात स्थायिक झालो तेव्हा या नाटकाच्या बहुधा शेवटच्या काळात होणाऱ्या एका प्रयोगाला हजर राहण्याची संधीही मला मिळाली होती.) याचकाळात मग पुलंचे इतरही साहित्य मी वाचून काढले. लहानपणी शाळेत पाठ्यपुस्तकांतून त्यांच्या 'बटाटयाची चाळ'मधील अनेक व्यक्तिमत्त्वांची ओळख झाली होतीच मराठी भाषेतील पी. जी. वूडहाऊस असे त्यांच्याविषयी म्हटले जात असे पण पुल म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले निव्वळ पुलच होते.
या खूप वाचलेल्या आणि मनात साठलेल्या पुलंना प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग अचानक आला तो एक व्यावसायिक भाग म्हणून. महाराष्ट्र सरकारच्या गोव्यातील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालिका असलेल्या अनुराधा आठवले यांनी पु. ल. देशपांडे यांची पणजीत तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली होती याकाळात नारायण आठवले पणजीतील दैनिक 'गोमंतक'चे संपादक होते. ते बहुधा १९८२-८३ साल असावे. पणजीतील महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी असलेल्या सभागृहात पुलंचे व्याख्यान होते. नवहिंद टाइम्स या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून त्या व्याख्यानाची बातमी देण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले होते. त्यासाठी मी तेथे वेळेत गेलो. मात्र बातमीदाराचे ओळखपत्र असूनही मला बसण्यासाठी जागा मिळाली नाही इतकी. चिक्कार गर्दी तेथे होती.
पुलंचे भाषण सुरू झाले आणि त्यापाठोपाठ सभागृहात हास्यकल्लोळ. चार दशकांपूर्वी झालेल्या त्या भाषणातील मुद्दे मला आठवत नसले तरी एक संवाद अजूनही मला आठवतो. "तू उगी राव, हांव कितें सांगता ते ऐक!" नवरोजींनी आपल्या बायकोला उद्देशून म्हटलेला कोकणीतील तो संवाद ऐकून सभागृहात हशा पिकला होता. त्या हशाच्या काळात पुलंनी समोर ठेवलेल्या तांब्यातील पाणी फुलपात्रांत ओतून त्यातील एक घोटभर पाणी पिले होते.
दुसऱ्या दिवशी गोमंतक आणि नवप्रभा या मराठी दैनिकांत पान एकवर अँकरला पुलंच्या भाषणाचे फोटो आणि क्षणचित्रांसह विस्तृत बातम्या छापून आल्या होत्या.. आमच्या इंग्रजी नवहिंद टाइम्समध्ये मात्र मी एक छोटीशी बातमी आणि फोटोओळ यावर वेळ निभावून नेली होती.
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या वेळेच्या आधी खूप लवकर जाऊनही सभागृहाच्या दारापाशी उभे राहण्यासाठी मला कशीबशी जागा मिळाली. पुलंच्या भाषणांच्या त्या दिवशी छापून आलेल्या बातम्यांमुळे श्रोत्यांची संख्या वाढली होती. व्याख्यानाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाच्या गर्दीबद्दल तर बोलायलाच नको. मला वाटते त्या दिवशी मला हॉलमध्ये प्रवेश मिळालाच नव्हता. पुलंचे व्यक्तिमत्व, वक्तृत्व आणि लोकप्रियता याचा प्रत्यक्ष अनुभव या तीन दिवसांत मी घेतला
त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने पणजीत राम शेवाळकर यांची रामायणावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. कवि नारायण सुर्वेची भाषणे ठेवली, या व्याख्यानमालांना बातमीदार म्हणून मी हजर होतो, त्या व्याख्यानांवर आधारित मी आमच्या इंग्रजी दैनिकात 'नवहिंद टाइम्स'मध्ये बातम्या आणि विस्तृत लेखही लिहिले होते. मात्र पुलंच्या विनोदी व्याख्यानाचा इंग्रजीत अनुवाद करणे मला शक्य झाले नव्हते. त्यांच्या भाषणाला, विनोदाला भाषेचा आणि स्थानिक संस्कृतीचा संदर्भ होता. पुलंच्या साहित्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता. साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेल्या साहित्याचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद केला जातो. मात्र पुलंचे साहित्य अत्यंत उकृष्ट दर्जाचे असूनही त्यांचे इतर भारतीय भाषांत, इंग्रजीत किंवा इतर परदेशी भाषांत अनुवाद झाले नाही ते यामुळेच.
No comments:
Post a Comment