Wednesday, February 23, 2022

'थँक यू व्हेरी मच !    `थँक्स गिव्हिंगमॅनर्स 

सातारा जिल्ह्यात कराडला टिळक हायस्कुलात अकरावीला शिकत असताना तिथले तीन शिक्षक मला आजही आठवतात. इंग्रजी अगदी समरसून शिकवणारे धोतर आणि टोपीतले मुख्याध्यापक  पागनीस, मराठीचे शिक्षक प्रभुणे आणि अर्थशास्त्र शिकवणारे द्रविड सर. यापैकी द्रविड सरांनी एकदा सांगितलेली  रेल्वेप्रवासातली ती घटना मी आजही विसरलेलो नाही.

रेल्वेगाडी कुठल्यातरी स्टेशनावर थांबली होती आणि मूळचे  गोवन कॅथोलिक असलेले एक कुटुंब आपले सामान खाली  उतरवत होते, त्या दाम्पत्यापाशी एकदोन मुलेही होती. रेल्वेडब्यातल्या द्रविड सरांनी कि दुसऱ्या कुणी प्रवाशाने  त्या जोडप्याला त्यांचे सामान खाली उतरवण्यात मदत केली आणि नंतर ते लहान मुलसुद्धा उचलून त्या माणसाच्या हातात दिले. त्यावेळी त्या माणसाने अगदी मनापासून  'थँक यू व्हेरी मच ! ' असे म्हणत धन्यवाद दिले.

 द्रविड सर म्हणाले कि त्या माणसाचे ते `थँक यू'  शब्द अगदी मनापासून होते हे त्याच्या चेहेऱ्यावरच्या हावभावातून स्पष्ट दिसत होते.  त्याच्या त्या धन्यवादातून  त्या माणसाचा सुसंस्कृतपणा दिसून येत होता. कुणी तरी आपल्याला काही तरी मदत केली तर त्याबद्दल  आपण धन्यवाद दिलेच पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे द्रविड सर म्हणत होते.

विशेष म्हणजे आपल्याला सेवा किंवा मदत पुरवणाऱ्या व्यक्तीला आपण थँक्स म्हटले पाहिजे हा त्या गोवन कॅथोलिक व्यक्तीचा स्थायीभावच होता, असे सरांचे म्हणणे होते. मदत करणाऱ्या किंवा सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीला आपण सहसा धन्यवाद देत नाही, कारण आपण त्या व्यक्तीला किंवा अशाप्रकारच्या सेवेला गृहीत धरत असतो असे द्रविड सरांचे म्हणणे होते.

त्यानंतर काही महिन्यांतच अकरावीनंतर जेसुईट धर्मगुरु म्हणजे फादर  होण्यासाठी गोव्यात मिरामारला प्री-नोव्हिशिएट  किंवा पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो आणि माझ्या आयुष्यातला  तो ऐन  उमेदीचा काळ गोव्यात घालवताना द्रविड सरांच्या त्या `थँक्स गिव्हिंग' मॅनर्सचा मला सातत्याने अनुभव येत राहिला.

गोव्यात इंग्रजी बोलण्याचे शिक्षण घेताना पहिला धडा होता तो म्हणजे प्रत्येक वेळी बोलताना दोन शब्दांचा आवर्जून वापर करायचा...हे दोन शब्द होते 'प्लिज' आणि  'थँक यू कुणाही व्यक्तीशी बोलताना त्याच्याकडून काही मागताना किंवा विनंती करताना 'प्लिज' हा शब्द अत्यावश्यक होता आणि ही मागणी किंवा विनंती मान्य झाल्यावर 'थँक यू ' किंवा 'थँक्स' म्हणायचे असे इंग्रजी शिकताना दोन अगदी प्राथमिक धडे होते.

उदाहरणार्थ, जेवणाच्या टेबलावर  शिष्टाचाराचे  काही अगदी प्राथमिक नियम होते ते म्हणजे तोंड वासून, तोंड उघडे ठेवून जेवायचे नाही किंवा जेवताना मचमच आवाज करायचा नाही आणि  जेवण झाल्यावर तृप्तीचा ढेकर तर  मुळी द्यायचाच नाही.. त्याशिवाय दुसऱ्याच्या ताटासमोर असलेले बिफ किंवा फिशच्या करीचे किंवा शिताचे (भाताचे ) भांडे पाहिजे असल्यास 'प्लिज पास ऑन करी ऑर राईस' अशी विनंती करायची आणि नंतर त्याबद्दल  विसरता  'थँक्स' म्हणायचे.

तर असा ' प्लिज ' आणि 'थॅन्क्स'चा सिलसिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपायला जाईपर्यंत चालू ठेवायचा असा इंग्रजी भाषेतला नियम अंगवळणी पडला तरच या फिरंगी भाषेचे इतर धडे शिकता येणार होते असे आमचे  प्री-नोव्हिस मास्टर असलेल्या फादर इनोसंट पिंटो यांनी मला बजावले होते

पणजीला एखाद्या  दुकानात एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर दुकानदाराला थँक्स म्हणायचे असाही नियम ही भाषा बोलताना पाळणे जरुर होते.

 गंमत म्हणजे दुकानदाराचे उत्तर सुरुवातीला मला अचंबित करायचे. कारण हे उत्तर असायचे थँक्स.. वेलकम किंवा ओके असे दुकानदाराचे प्रत्युत्तर नसायचे याचे कारणसुद्धा मला समजावून सांगण्यात आले.

कुठलीही सेवा, वस्तू आणि मदत  स्वीकारणाऱ्या व्यक्तीने त्याबद्दल कृतज्ञ असलेच पाहिजे आणि त्याचबरोबर ज्याच्याकडून या सेवा, वस्तू विकत घेतल्या जातात त्यांनीही त्याबद्दल समोरच्या व्यक्तीशी कृतज्ञ राहून त्याबद्दल 'थँक्स' म्हटले पाहिजे. थँक्स गिव्हिंग एकतर्फी नसते, दोन्हीं बाजूच्या लोकांनी हे ओळखून परस्परांना थँक्स म्हणायला हवे.

मिळालेल्या प्रत्येक सेवेला, मदतीला किंवा वस्तूबद्दल समोरच्या व्यक्तीला धन्यवाद दिले पाहिजे, त्यामुळे आपण एखादी वस्तू वा सेवा दुकानदाराकडून घेतली तर आपण त्यास ' थँक्स' म्हटले पाहिजे तसेंच त्यानेंसुद्धा आपणास 'थँक्स' म्हटलेच पाहिजे हे अगदी साहजिकच आहे हे हळूहळू माझ्या अंगावळणी पडायला लागले.

एखाद्याने दुसऱ्याकडून उसने घेतलेले पैसे किंवा वस्तू परत केली तर अशावेळी आभार नक्की  कुणी मानले पाहिजे? अर्थातच दोघांनीही, पहिल्याने गरज असताना उसने पैसे वा वस्तू दिल्याबद्दल आणि दुसऱ्याने हे पैसे वा वस्तू इमानेइतबारे परत दिल्याबद्दल.

हाच  नियम एखादी सेवा किंवा वस्तू खरेदी केल्यानंतर त्या सेवेबद्दल किंवा वस्तू दिल्याबद्दल वापरता येईल. येथे दोन्ही व्यक्तींनी म्हणजे दुकानदाराने आणि ग्राहकाने आभार मानायला हवेत. ही सेवा किंवा वस्तू कुठल्याही पक्षाने गृहित धरता कामा नये

'प्लिज' आणि 'थँक्स'  या दोन शब्दांच्या डोलाऱ्यावर इंग्रजी भाषेचा इमला उभारलेला आहे याची जाणीव झाल्यानंतरच ही भाषा आणि या भाषेची संस्कृती आत्मसात करणे शक्य आहे. गोव्यात कुठल्याही दुकानात किंवा इतरत्र कुठेही गेले कि मला हा अनुभव यायचा आणि आता हे दोन शब्द माझ्या केवळ इंग्रजी भाषेतल्या शब्दाकोशाचेच नव्हे तर मी संभाषणासाठी वापरणाऱ्या मराठी, कोकणी आणि हिंदी भाषेतल्या शब्दाकोशातले अविभाज्य घटक बनले आहेत.

 गोव्यात कोंकणीत 'देव बरें करो' हा शब्द कायम ओठांवर असतोच. 'ओब्रिगाद' हा पोर्तुगीज शब्द यासाठी आम्ही शाळा -कॉलेजात असताना सत्तरच्या  दशकात वापरत असायचो.

युरोपच्या सहलीवर असताना विशेषतः पॅरिस आणि फ्रान्सच्या इतर परिसरात असताना आणि इतकेच नव्हे तर इटलीत रोम आणि व्हेनिस येथेसुद्धा  'मर्सी' हा शब्द कायम तोंडात असायचा.


येशू  ख्रिस्ताने दहा कुष्टरोग्यांना  बरे केले अशी बायबलमध्ये एक कथा आहे.

येशू जेरुसलेमला जात असताना हे दहा कुष्टरोगी दूर अंतरावर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले 'येशू, स्वामी, आमच्यावर दया करा.'  येशूने त्यांना म्हटले,, “जा, आणि याजकांना आपले अंग दाखवा.' ते याजकाकडे जात असतानाच बरे झाले. आपण बरे झालो आहोत, हे पाहून त्यांच्यापैकी एक जण मोठ्याने ओरडून देवाची स्तुती  करीत मागे फिरला. तो  येशूच्या पायाजवळ खाली पडला त्याने  येशूचे  उपकार मानले.

येशू त्याला म्हणाला, 'दहाजण बरे झाले नाहीत काय? बाकीचे नऊ जण कुठे आहेत? या एका माणसाशिवाय दुसरा कुणीही देवाचे आभार मानण्यासाठी परत आला नाही ना?''

पुष्कळदा आपण या नऊ जणांसारखे वागत असतो असे मला वाटते.

'सॉरी' हा इंग्रजी संभाषणातला आणखी एक टाळता येणारा शब्द. त्याची आवश्यकता आणि वापर कधी आणि कसा करायचा याचेही प्रात्यक्षिक गोव्यातल्या कॉलेजजीवनात विपुल प्रमाणात मिळाले.

काही शब्द हे विशिष्ट  भाषांच्या संस्कृतीशी आणि  शिष्टांचारांतर्गत अंतर्भुत असतात, प्लिज. थँक्स आणि सॉरी हे इंग्रजी भाषांचा वापर करणाऱ्यांसाठी अत्यावश्यक आहेत, नाहीतर हे शब्द वापरणारे लोक एकतर गावंढळ किंवा असंस्कृत आहेत असे समजले जाईल.  मात्र दुसऱ्या भाषांच्या संस्कृतीत हे शब्द आणि वाक्यप्रचार नसले तरी ते लोक असंस्कृत आहेत असा नित्कर्ष काढण्याची गरज नाही. आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची किंवा आभारप्रदर्शन करण्याची रीत प्रत्येक भाषासंस्कृतीत वेगळी असते एव्हढेच.

उदाहरणार्थ, एखाद्या खरोखरीच  गरजू असलेल्या वृद्ध व्यक्तीला कुणी एखाद्याने पैशाची वा इतर स्वरूपात मदत केली तर अशा प्रसंगी त्या म्हाताऱ्या व्यक्ती मदतकर्त्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवून 'देव तुझे आणि तुझ्या मुलाबाळांचं भलं करील असा  तोंडभरुन  आशिर्वाद देतात.  तो आशिर्वाद एक कारची थँक्सगिव्हिंग  असते  हे कोण नाकारील?

माझे वडील कुणा लहानग्याने त्यांना मदत केली तर 'शाब्बास, बाळा' असे म्हणून किंवा त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवत  कृतज्ञता व्यक्त करत असायचे. अशावेळी 'धन्यवाद' 'किंवा 'आभारी आहे' असे शब्द कृत्रिम वाटतात.

विशेष म्हणजे बहुतेक वेळेस 'थँक्स' म्हटल्यावर समोरची व्यक्ती खुश होते आणि त्यापैकी अनेक जण 'वेलकम ' म्हणून दाद देतात यांमध्ये रिक्षाड्रायव्हर, आणि अगदी चप्पल बूट दुरुस्त करणारे चांभारसुद्धा असतात.

उन्हापावसात प्रवास करत, दोनतीन मजले पायी चढून तुमच्या दारात पार्सल किंवा किंवा गरमागरम खाद्यपदार्थ घेऊन आल्यावर त्या कुरियरवाल्याला हसून "थँक्स ' म्हटल्यावर त्यांना किती आनंद होतो ते अनुभवायलाच हवे.

आणि गेल्याच आठवड्यात घडलेली ही घटना.  कुठेतरी नोकरीवर असलेल्या एका पोरसवदा मुलाने मला अशीच काही तरी  सेवा पुरवली. एकदमच मामुली सेवा होती  आता नक्की आठवत नाही पण नेहेमीप्रमाणे त्या सेवेबद्दल  मी 'थँक्स' बोलून  गेलो आणि एकदम गरीब गावंढळ दिसणारा तो मुलगा पटकन म्हणाला, 'वेलकम, सर !'   

त्याचे ते अनपेक्षित उत्तर ऐकून मी गप्प झालो आणि त्याच्या सेवेबद्दल आभार मानल्याबद्दल स्वतःला धन्यवादही दिले.   

याचा अर्थ आपण दुसऱ्याला सेवा पुरवली आहे आणि त्याबद्दल धन्यवाद दिले जात आहे हे योग्यच आहे याचीही त्यांना जाणीव आहे.

हॉटेलमध्येसुद्धा वेटरने आपल्याला खाऊपिऊ घातले त्याबद्दल आपण टिप देतो तसेच ' थँकस' पण म्हटले पाहिजेच ना? अशाप्रकारे कुठल्याही सेवा आणि मदतीसाठी 'थँक्स' म्हटले म्हणजे त्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीला गृहित धरत नाही, अगदी त्यासाठी आपण पैसे मोजत असलो तरीही!

आणि हे धन्यवाद विशिष्ट शब्दांनीच व्यक्त केले  पाहिजे असे मुळीच नाही. धन्यवाद एखाद्या कृतीतून, केवळ स्मितहास्याने किंवा भाषेची समस्या असल्यास हातवाऱ्यातून सुद्धा व्यक्त केले जाऊ शकतात. धन्यवादासाठी भाषेचा अडसर कधीही नसतो, आणि हिच खरी संस्कृती, हाच खरा सुसंस्कृतपणा म्हणता येईल.

First published in Christayan Christmas 2921 online issue editor Christopher Rebello Pereira 




No comments:

Post a Comment