Friday, February 11, 2022

अण्णा हजारे आणि मी


फोटोत अण्णा आणि मी ... साल १९९१ च्या आसपास ,, फोटोक्रेडीट अभय वैद्य

 कोणे एकेकाळी अण्णांशी माझी खूप घसरट होती. अण्णा पुण्यात येत असल्याचे किंवा आल्याचे इतर पत्रकारांपेक्षा मला आधीच कळायचे आणि मग मी त्यांना नारायण पेठेतल्या हिंदी राष्ट्रभाषा भवनात भेटायला जायचो.

राष्ट्रभाषा मंडळाचे पदाधिकारी असलेले मोहन धारिया ( हेही अण्णा म्हणून ओळखले जायचे ) त्यावेळी हजारे यांचे जवळचे म्हणून पुण्यात येथे ते त्यावेळी राहायचे.
लक्ष्मी रोडवरच्या सुगावा प्रकाशनाकडे जाताना नारायण पेठेतल्या मोदी गणपतीपाशी असलेल्या या राष्ट्रभाषा भवनाकडे आजही माझी नजर हमखास जाते याचे हे कारण.
पुण्यातल्या मराठी दैनिकांतल्या बातमीदारांना त्याकाळात अण्णांना भेटण्यास मुळी इंटरेस्टही नसायचा.
पुण्यात डेक्कनला रानडे इन्स्टिट्यूटसमोर मंथली कॉट बेसिसवर इंडियन एक्सप्रेसच्या अव्हर्तीन्हो मिरांडा, विश्वास कोठारी आणि विश्वनाथ हिरेमठ वगैरे सड्याफटिंग बातमीदारांसह मी राहायचो. प्रिया लॉजच्या त्या पत्त्यावर अण्णा मला पोस्टाने निळ्या आंतरदेशीय पत्राने बातम्या पाठवायाचे . ती पत्रे आजही माझ्याकडे आहेत.
गोव्यातले नवहिंद टाइम्स सोडल्यानंतर औरंगाबादच्या लोकमत टाइम्स मार्गे पुण्यातल्या इंडियन एक्स्प्रेसला मी १९८९ ला रुजू झालो होतो.
एके दिवशी कळाले कि पुणे अहमदनगर हमरस्त्यावर पारनेर फाट्याजवळ वाडेगव्हाण येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोलीस गोळीबारात पाचजण ठार झाले होते. अहमदनगरला अण्णा हजारे यांचे त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राणांतिक उपोषण चालू होते. अण्णांचे हे पहिलेच आमरण उपोषण.
एक्सप्रेस समूहाच्या ऑफिस वाहनाने लोकसत्ताचे बातमीदार सुनिल कडुस्कर आणि फोटोग्राफरसह मी लगेच वाडेगव्हाण येथे गेलो. पुण्यात ऑफिसात परतेपर्यंत अण्णांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेतले होते असे कळाले.
अण्णा हजारे या व्यक्तिमत्वाशी माझा यावेळी असा पहिल्यांदाच संबंध आला.
त्यानंतर सवडीने एकदा राळेगण सिद्धीला (त्यावेळी शिंदी ) जाऊन आलो. लवकरच राळेणसिद्धी हा माझ्या वहिवाटीचा रस्ता बनला.
पत्रकाराने कुठल्याही व्यक्तिमत्वाशी, घटनेशी, चळवळीशी स्वतःस गुंतून घेऊ नये त्यामुळे त्यांच्या निःपक्षीपणात तडजोड होऊ शकतो, हा पत्रकारितेतील एक सर्वमान्य, बेसिक नियम आहे. माझ्या स्वतःच्या गोव्यातल्या कॉलेज जीवनातल्या पार्श्वभूमीमुळे मात्र मला या नियमाचे पालन करता येणे शक्य झाले नाही.
गोव्यात मिरामारच्या धेम्पे कॉलेजात मी आर्ट सर्कलचा संपादक होतो, स्टुडंट्स युनियनच्या निवडणुका मी लढवल्या होत्या. नवहिंद टाइम्सचा रिपोर्टर असताना मी गोवा युनियन ऑफ जर्नालीस्टचा (GUJ) सरचिटणीस होतो. वृत्तपत्र उद्योगातील लेबर युनियन लीडर म्हणून गोव्यात, औरंगाबादला आणि पुण्यातही दशकभर सक्रिय काम केलेले, त्यावेळीं जॉर्ज फर्नांडिस आमचे दैवत असायचे. गोव्याला फिलॉसॉफी असोसिएशनचा सरचिटणीस म्हणून अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या श्याम मानव यांचे व्याख्यान मी पणजीला आयोजित केले होते.
असे चळवळ्ये व्यक्तीमत्व असल्याने मी स्वतःला असे अलिप्त ठेवणे शक्य नव्हते.
आणि शेवटी व्हायचे तेच झाले.
राळेगणच्या माझ्या भेटी वाढत गेल्या, एकदा तर मी तेथे दोनतीन दिवस मुक्काम केला. त्यावेळी अण्णांचे चरित्र आणि कार्य यावर असलेले एक पुस्तक त्यांच्या कार्यालयात दिसले. त्यांच्पा सचिवाने पुस्तकाची किंमत मला सांगितली. काही क्षणातच अण्णांनी ते पुस्तक माझ्या शबनम बॅगेत हळूच टाकून दिले होते.
अण्णांची ती कृती मी पाहिली आणि ते पक्के मिडिया सॅव्ही आहेत हे त्याच वेळी माझ्या लक्षात आले.
नंतर त्यांच्या पुढील प्रवासात अगदी काही वर्षांपूर्वीच्या अरविंद केजरीवाल, किरण बेदी प्रभुतींसह झालेल्या दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनात अण्णांची ती कृती मला वेळोवेळी आठवायची.
त्या काळातला टाइम्स ऑफ इंडियाच्या अभय वैद्यने अण्णांबरोबरचा माझा टिपलेला हा कृष्णधवल फोटो. . नरेन करुणाकरन या एक्सप्रेसच्या बातमीदाराने राळेगण येथेच माझा अण्णांबरोबर काढलेला दुसरा रंगीत फोटो आता सापडत नाही. आणि नरेन याचा अण्णांबरोबर यावेळी मी काढलेला रंगीत फोटो मात्र माझ्याकडे आहे !
त्याकाळात अण्णा हजारे यांना राष्ट्रीय पातळीवर आणण्यास इंडियन एक्सप्रेसचे बातमीदार म्हणून नरेन करुणाकरन आणि मी , टाइम्स ऑफ इंडियाचे अभय वैद्य आणि इंडिपेंडेंटचे आनंद आगाशे यांचा हातभार लागला. हे आम्ही सर्व पत्रकार इंग्रजी आणि राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकांतले. साहजिकच आमच्या बातम्यांमुळे पहिल्यांदाच अण्णा राज्य आणि राष्ट्र पातळीवर पोहोचले...
अहमदनगर जिल्ह्यातील मॉफुसील बातमीदार अण्णा हजारेंकडे ढुंकूनही पाहत नसत, पुण्या-मुंबईच्या मुख्यालयातून विचारणा झाल्यास वा बाहेरचे पत्रकार अण्णांच्या बातम्या देऊ लागल्यास मगच या बातम्या त्यांच्याकडून यायच्या.
हल्ली अनेकदा गोव्यात सुट्टीला आणि या दिवसांत निवडणुकीसाठी पुण्यातले मित्र आणि पत्रकार मंडळी जातात तेव्हा मला हमखास काही टिप्स मागतात. नव्वदच्या दशकात राळेगणला जाणारे पत्रकार मला अशीच वाट पुसत असत.
१९९३ साली संजय सोनवणी यांनी `उत्तुंग' हे माझे व्यक्तिचित्रसंग्रह प्रसिध्द केले त्यात अण्णा हजारे यांचेही चरित्र होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचेही या पुस्तकात चरित्र होते. बाबा आढाव, शंतनुराव किर्लोस्कर , मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई वगैरेंची चरित्रे होती.
मी त्यावेळी तिशी पार केलेली नव्हती, पत्रकार असलो तरी पटकन भारावले जाण्याचा तो युवा काळ होता. भ्रमनिरास त्यानंतर खूप कालावधीनंतर होत गेला..
गोव्यात १९८३ साली कॉमनवेल्थ कॉन्फरनसच्या निमित्ताने ३९ राष्ट्रप्रमुख अगदी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर, ऑस्ट्रियाचे पंतप्रधान बॉब हॉक, झिम्बाब्वे पंतप्रधान रॉबर्ट मुगाबेसह आले होते. गोव्यात वाहतूक उपाधिक्षक असलेल्या किरण बेदी यांच्याशी त्यावेळी क्राईम रिपोर्टर असलेल्या माझा नियमितपणे संबंध यायचा. किरण बेदींबरोबर वाहतूक पोलिसांच्या नव्याकोऱ्या जिप्सी जीपमध्ये वॉकीटॉकी यंत्रासह रेकी करण्यासाठी किरण बेदी निघायच्या त्यावेळी दाबोळी विमानतळ ते आग्वाद फोर्ट या प्रवासात मी त्यांच्या बरोबर असायचो. बेदी यांच्याविषयी मला तेव्हा खरंच काहीच माहिती नव्हती, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी भारावून जाण्याचा सवालच नव्हता.
`बदलती पत्रकारिता' हे माझे पुस्तक सुगावा प्रकाशनाने २०१८ साली प्रसिध्द केले त्यात मी अण्णा हजारेंवर एक प्रकरण लिहिले आहे. याच पुस्तकात किरण बेदी यांच्यावर सुध्दा वेगळे प्रकरण आहे.
गेली अनेक वर्षे किरण बेदी यांच्याशी माझा काहीही संपर्क नाही.. पुण्यात असूनही अण्णा हजारे यांच्याशी माझा गेली कित्येक वर्षे काहीही संपर्क नाही. बेदी आणि अण्णांच्या विस्मृतीत मी केव्हाच गेलेलो असणार ..
राष्ट्रीय पातळीवरच्या बातम्यांत किरण बेदी आणि अण्णा हजारे अजूनमधून झळकतात तेव्हा त्या बातम्या विस्तृतपणे वाचण्यात मला अजिबात इंटरेस्ट नसतो.
------

No comments:

Post a Comment