आमच्या इमारतीत राहणाऱ्या एका मित्रानं वर्षभरापूर्वी या इमारतीतून जवळच्याच आलिशान कॉलनीतील मोठ्या, ऐसपैस घरात स्थलांतर केलं. नव्या घराच्या वास्तुशांतीला आमच्या इमारतीतील अनेक जण गेले होते. त्या नव्या घरातील प्रशस्त गॅलऱ्या आणि स्वतंत्र गच्ची, कॉलनीतील सीसीटीव्ही वगैरे सुरक्षा व्यवस्था, बाग, वाहनांसाठी पार्किंग, व्यायामशाळा, पोहण्याचा तलाव वगैरे सोयी-सुविधा निश्चितच हेवा वाटण्यासारख्या होत्या. अलीकडंच या मित्राकडे परत जाणं झालं. त्याच्याशी, त्याच्या कुटुंबीयांशी बोलल्यावर माझा हिरमोडच झाला. या मित्राने भरपूर पैसे मोजून त्या सुखसंपन्न वसाहतीत स्थलांतर केलं खरं, पण तिथल्या अनेक सुविधांचा तो किंवा त्याच्या कुटुंबातले बहुतेक कुणी लाभ घेतच नसल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.
माझा ऐन उमेदीचा काळ गोव्यात गेलेला आणि त्यात मिरामारसारख्या समुद्रकिनारी मी राहत असल्याने समुद्रात पोहणे हा माझा खूप आवडीचा छंद. कोरोनाकाळात पालिकेच्या मालकीचे पोहण्याचे तलाव बंद झाले, ते आता कडक उन्हाळा सुरू झाला तरी पुन्हा उघडले नाहीत. त्यामुळे त्या मित्राला माझा पहिला प्रश्न पोहण्याविषयीच होता. पण, या कॉलनीत राहायला आल्यापासून तो आपल्या मुलांसह तिथल्या तलावात एकदाही पोहायला गेला नव्हता. ‘अरे, आमचा पोहण्याचा तलाव रोज सकाळी - संध्याकाळी उघडा असला, तरी पोहण्यासाठी इथं वेळ कुणालाय? आठवड्यात शनिवार-रविवार दोन दिवस सुटीचे असतात. ते घरची कामं, बाजारहाट अन् आराम करण्यात कशी संपतात, हे समजतही नाही..’ तो सांगत होता.
बोलता - बोलता आम्ही गॅलरीत गेलो. पाहतो तो काय, गॅलरीचा निम्म्याहून अधिक भाग अडगळीच्या सामानाने भरला होता. तिथून दिसणाऱ्या दुसऱ्या गॅलरीत ओळीने कुंड्या ठेवलेल्या होत्या आणि दोन्ही गॅलरींमध्ये गप्पा मारण्यासाठी बसायला किंवा उभे राहायला जागा अशी नव्हतीच. त्या मित्राला विचारण्यासाठी माझ्याकडं इतरही काही प्रश्न होते, पण आता त्यानं काही सांगण्याआधीच त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती.
लहान मुलांसाठी खेळण्याच्या, इतरांसाठी मनोरंजनाच्या विविध सुविधा असलेल्या समोरच्या बागेत आपल्या मुलांबरोबर खेळण्यासाठी वा सकाळ-संध्याकाळी किंवा सुटीच्या दिवशी फिरायला जाण्यासाठी तो वेळ काढू शकत नव्हता, हे माझ्या लक्षात आले होतं.
खरं सांगायचं तर तो त्याच्या घरात आणि कॉलनीत असलेल्या कितीतरी सोयी-सुविधांचा उपभोग घेत नाही, याबद्दल मला वाईट वाटलं, पण आश्चर्य अजिबात वाटलं नाही.
आमच्या कॉलनीत आमची इमारत सर्वात शेवटी बांधण्यात आली आणि त्यामुळं अधिक मजले असलेल्या या इमारतीत लिफ्टची सोय आहे. शिवाय, खूप प्रशस्त आणि हवेशीर अशी गच्चीही आहे. या सामायिक गच्चीवर मी स्वतः बगिचा फुलवला आहे. कोरोनाकाळातील संचारबंदीच्या काही दिवसांचा अपवाद वगळता आमच्या इमारतीच्या विविध मजल्यांवर राहणारे बहुतेक जण या गच्चीवर कधीही फिरकलेही नाहीत.
आमच्या कॉलनीत पालिकेनं एक छोटीशी बाग विकसित केली आहे. त्याचप्रमाणं पाचशे मीटर अंतरावर पालिकेचीच एक खूप मोठी आणि घनदाट झाडी असलेली बाग आहे. तिथं लहान मुलांसाठी आणि इतर सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांसाठी ओपन जिमसुद्धा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आमच्या कॉलनीतले अगदी तुरळक लोक आपल्या मुलां-नातवंडासह या छोट्या आणि मोठ्या बागेत फिरताना, तिथल्या विविध सोयी-सुविधांचा उपभोग घेताना मला दिसले. बहुतेक लोकांना या सुविधा अस्तित्वात आहेत, याचा पत्ताही नाही किंवा आपल्याकडं त्यासाठी मुळी वेळच नाही, असं त्यांचं म्हणणं असतं.
अशा सगळ्यांना पिकनिक आणि लग्नकार्यासाठी कुटुंबीयांसह जाण्यासाठी वेळ असतो, मॉलमध्येही भरपूर वेळ खर्च केला जातो, पण स्वतःच्या घराच्या गॅलरीत आरामात बसण्यासाठी, बागेत फिरण्यासाठी वा तलावात पोहण्यासाठी वा साधं बॅडमिंटन खेळण्यासाठीही वेळ नसतो.
हौसेनं आणलेल्या विविध वस्तूंचा, मिळवलेल्या सुविधांचा नंतर कसा वापर होतो, यावर काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक मजेशीर पण मार्मिक टिप्पणी वाचली.. ‘गॅलरीत कपडे वाळवण्यासाठी ट्रेड मिल किंवा सायकल आणण्याऐवजी मी चक्क एक दोरीच आणली!’ गमतीचा भाग सोडला, तरी यातील वास्तव विचार करायला लावणारे आहे.
काही वर्षांपूर्वी शाळेत असलेल्या माझ्या मुलीसाठी आम्ही मोठा की-बोर्ड विकत घेतला होता. (अनेक जण की-बोर्ड या वाद्याचा चुकीने पियानो असा उल्लेख करतात). मग मुलीबरोबर की-बोर्ड वाजवायला शिकण्यासाठी मीसुद्धा क्लास लावला. त्यासाठी नोट्स घेतल्या, काही इंग्रजी आणि मराठी गाणी वाजवायला शिकलोही. त्यावर रियाज करायला आणि ‘ट्विंकल ट्विंकल लिट्ल स्टार..’, ‘जन गण मन..’ , ‘हॅपी बर्थ डे टू यू..’ अशी काही मोजकीच गाणी वाजवायला मी शिकलो. पण, आता गेली दोन-तीन वर्षे हा की-बोर्ड कपाटावर धूळ खात पडून आहे. ज्या ज्या वेळी तिकडं नजर जाते, तेव्हा मला नेहमी अपराधी वाटत आलंय.
माझ्या एका मित्राकडे तीन कुत्री आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांना फिरवून आणणे, वेळच्या वेळी खाऊ घालणे, अंगावरचे फर कापण्यासाठी तसंच उपचारांसाठी डॉक्टरांकडं नेणे वगैरे कामे कुटुंबातील व्यक्ती आळीपाळीनं, नियमितपणे करतात. घरातली ही माणसं फाटकापाशी आली की ही कुत्री जोरजोराने शेपट्या हलवून, उड्या मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. दुर्दैवानं घरातील एकाही माणसाला या कुत्र्यांना मायेनं जवळ घेऊन बसण्यासाठी, त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी वेळच नाही. मला त्या कुत्र्यांची आणि त्या घरातील सगळ्यांचीच कीव वाटते.
असंच आपल्या कुटुंबीयांबाबतही होऊ शकतं. आपल्या घरातील लोकांबरोबर – आई-वडील, नवरा-बायको, दिवसागणिक मोठी होणारी छोटी, गोड लहान बाळं, मोठी मुलं आणि इतर नातेवाईक - त्यांच्यासोबत काही काळ घालवण्यासाठी आपल्याला वेळच नसतो. नंतर यदा कदाचित भरपूर वेळ मिळाला, तर तोपर्यंत बहुधा खूप उशीर झालेला असतो. तेव्हा इतरांना तुमच्यासाठी वेळ नसतो.
घराभोवती, रस्त्याच्या कडेला आपणच लावलेल्या झाडांकडं लक्ष द्यायला मला अनेकदा वेळ मिळत नाही. अनेक दिवस, काही आठवडे तिकडं पाहण्याचाही कंटाळा केला जातो. मग कधीतरी निवांत असताना त्या झाडांकडं लक्ष जातं. आता उंच वाढलेल्या पारिजातकाची पानं सुकलेली असतात, फुलांची संख्याही रोडावलेली असते, छोट्याशा, पण आता ऐन बहरात आलेल्या एखाद्या आंब्याच्या झाडाला नियमितपणे पाणी देण्याची गरज आहे, हे अंमळ उशिराच कळतं. जेव्हा कधी हे लक्षात येतं तेव्हा पुन्हा बागकामाला वेळ दिला जातो. मग कुठं त्या झाडांची अन् आपल्याही मनाची मरगळ नाहीशी होते.
आपल्या अवतीभोवती अनेक सोयी-सुविधा उभ्या असतात. काहींसाठी आपण पैसे मोजतो, काही विनामूल्य उपलब्ध असतात. पण, त्यासाठी वेळ देण्याची किंबहुना वेळ काढण्याची आपली तयारी नसते. रोजच्या दुनियादारीमध्ये अशा साऱ्या सुख-सुविधा केवळ नावापुरत्या उरतात, त्यातील ‘सुख’ काही केल्या गवसत नाही.
दिवसांमागून दिवस सरत जातात आणि आपण स्वत:च्या ‘सोयी’कडं बघत पुढं पुढं चालत राहतो. भौतिक साधनांपासून ते भावनिक नात्यांपर्यंतच्या अनेक ‘सुख’कारक गोष्टींना आपण पारखं होत जातो. आर्थिक ताण सहन करून कितीही अत्याधुनिक सुविधा मिळवल्या तरी त्यांच्या उपयोगासाठी अन् नात्यांतील सहयोगासाठी वेळच नसेल तर आनंदाचा शोध लागणार कसा..?
No comments:
Post a Comment