Showing posts with label Divya Marathi. Show all posts
Showing posts with label Divya Marathi. Show all posts

Tuesday, November 22, 2022

श्रावण,  अगदी जुलै महिन्यासारखं एकदम आभाळ अंधारून येऊन श्रावण सरतानाचा तो पाऊस कोसळत होता. पाऊस असल्याने बायकोला तिच्या शाळेत सोडण्यासाठी मी कारनं गेलो होतो. तिला शाळेत सोडून परत पुणे-मुंबई हमरस्त्यावर आलो, तर पावसाचा जोर कमी होऊ लागला आणि नंतर चक्क बंद झाला.


सकाळची कोवळी, अगदी सोन्यासारखी चमकदार सूर्यकिरणं रस्त्यावरच्या इमारतींवर, समोरच्या वाहनांवर आणि रस्त्यावर सगळीकडंच दिसू लागली. पाच-दहा मिनिटांपूर्वी असलेलं उदासवाणं वातावरण एकदम बदलून गेलं. त्या लख्ख रविकिरणांनी ही किमया केली
होती. अब्जावधी प्रकाशवर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या निसर्गाची आणि त्या भास्कराची ही लीला होती. काही क्षणांत आपल्या कुंचल्याच्या कसबी फटकाऱ्यानं निसर्ग जसजसे आसपासचे रंग सफाईनं बदलत होता, तसतसे मानवी मूडसुद्धा बदलत होते. मीही त्याला अपवाद नव्हतो.

`श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीमधारा, उलगडला झाडांतून अवचित मोरपिसारा..’ हे लता मंगेशकरांनी गायलेलं गाणं नुसतं आठवूनच अंगावरून नाजूकसा मोरपिसारा फिरवल्याचा अनुभव आला. त्याशिवाय, ऊन अन् पावसाचा तो लपंडाव पाहताना बालकवींच्या ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे..’ या पंक्ती आठवल्या नसत्या तरच नवल!
कॉलनीत गाडी घेऊन परतलो आणि मी थक्कच झालो. ही माझी दररोजची पायवाट. या कॉलनीत मी तब्बल तीस वर्षे राहतो आहे. इथं राहायला आलो तेव्हा नुकतंच माझं लग्न झालं होतं. त्या वेळी या भागात केवळ चार-पाच इमारती उभ्या राहत होत्या आणि जेमतेम शंभर एक लोक राहायला आले असावेत. आता जवळपास वीस इमारती आहेत आणि दोन-तीन हजार लोक वास्तव्याला असतील. पण, कॉलनीतलं आजचं हे रूप मला खूपच आनंदित करून गेलं.
कॉलनीतील रस्त्यांवर, इमारतींवर आणि उंच झाडांवर कोवळी, चमकदार सूर्यकिरणं पडली होती. आसपासचा परिसर अन् माझा मूडसुद्धा अगदी प्रसन्न भासत होता. आमच्या इमारतीसमोरच्या रस्त्यापाशी मीच लावलेल्या पारिजातकाच्या झाडापाशी गाडी लावली. घाईघाईनं खाली उतरलो. मोबाइल घेतला अन् आसपासच्या त्या झाडांची विविध अंगांनी, वेगवेगळ्या कोपऱ्यातून फोटो खेचत सुटलो.
ही मोहक सूर्यकिरणं आणि त्यामुळं उजळलेला परिसर काही क्षणांत बदलू शकतो नि आकाश पुन्हा काळंकभिन्न होऊ शकतं, हे मी जाणून होतो.
इथल्या एकूणएक झाडांचा, अगदी त्यांच्या जन्मापासूनचा इतिहास मला माहीत आहे. इथल्या काही चौकांत आणि काही बंगल्यांसमोर वटवृक्षांच्या भ्रूणहत्या घडल्या, त्याचाही मी साक्षीदार आहे. कारण त्यापैकी काहींना मी स्वतः बादलीनं पाणी आणून जगवले होते. अशा कितीतरी झाडांना मी जीवदान दिले. त्यांना यदाकदाचित वाचा फुटली तर त्यांची कहाणी ते नक्की सांगतील तुम्हाला अन् इतर कुणालाही...
सध्या इथं महापालिकेच्या शहाणपणानं आणि खरं पाहिलं तर वरच्या अति उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीमुळे खूप मोठी जागा बांधकामापासून वाचली आहे आणि महापालिकेनं तिथं सुंदर बगीचा आणि मुलांसाठी पार्क केला आहे.
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या आमच्या सदनिकेच्या गॅलरीतून मी तीस वर्षांपूर्वी बोरीबाभळींच्या दाट झाडांनी भरलेली ही जागा पाहत असे. त्या साऱ्या परिसरात पाय ठेवण्याची कुणी हिंमत करू शकत नसे किंवा तशी गरजही नसायची. या दाट बोरीबाभळींच्या जंगलात प्रत्येक झाडावर सुगरणीची कितीतरी घरटी आकाराला येत असत. चिमण्या अन् इतर पक्ष्यांची किलबिल नव्हे, किलकिलाट वर्षभर चालू असायचा. त्या झाडांखाली जमिनीवर आणि जमिनीखाली किती नाग-साप होते, याची कल्पनाही करता येणार नाही. आणि हे सगळं याच इमारतीला लागून होतं, हे आता सांगितलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही.
आमच्या इमारतीशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीपाशी असलेल्या मोकळ्या जागेत मी पहिल्यांदा बागकामाला सुरुवात केली, तेव्हा तिथे मला चक्क एक मुंगसाचं बीळ आणि त्याचं छोटं कुटुंब आढळलं होतं. कितीतरी वनचरांचा हा हक्काचा नि नैसर्गिक अधिवास होता. पूर्वी शेतजमीन असलेल्या या जागेत हळूहळू एकापाठोपाठ एक इमारती उभ्या राहत गेल्या अन् त्या साऱ्यांचा हा नैसर्गिक अधिवास आक्रसत गेला. या मुक्या प्राण्यांचे दर्शनही बंद झाले. पण, त्याबद्दल ना कुणाला खेद ना खंत होती.
हा पाऊस थांबल्यानंतर नि समोरचा परिसर सूर्यकिरणांनी उजळल्यावरही आणि कारची काच साफ करण्यासाठी वायपरची गरज संपल्यावरसुद्धा समोरचे अंधुक दिसत होते. गाडीच्या काचांवरचे पाणी वायपरच्या काड्यांनी दूर केले होते,.. डोळ्यासमोरचं दृश्य धूसर होत होतं...
‘क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे..’ अशी स्थिती असली, तरी आता माझ्या कॉलनीतल्या घनदाट झाडांबाबत असं म्हणता येणार नाही, याची मला मनोमन जाणीव होऊ लागली आहे. आणि त्याला कारण आहे, परवा घडलेली एक घटना.
त्या दिवशी एक भली मोठी क्रेन आणून तिच्या मदतीने आमच्या इमारतीसमोरची पंधरा-वीस वर्षे जुनी असलेली कडुनिंबाची, वडापिंपळांची आणि इतर काही मोठी झाडं जमीनदोस्त करण्यात आली. अशा वेळी मी लांब कुठं तरी, शून्यात नजर फिरवून अश्रू लपवत राहतो. दिवसाढवळ्या झाडांची होत असलेली ही कत्तल कुणीही रोखू शकत नव्हते.
काहींनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या कत्तलीसाठी संबंधित विभागांकडून रीतसर परवानगी मिळवली आहे, असं सांगण्यात आलं होतं. रस्त्यावरच्या कत्तल झालेल्या झाडांच्या बदल्यात समोरच्या जागेत दुप्पट झाडी लावण्यात येतील, अशीही दिलासा देणारी पुस्ती जोडण्यात आली होती.
अशा घटना गावागावांत आणि शहरांत सगळीकडंच सर्रास होतात आणि याबाबत आपण काहीच करू शकत नाही. माझे डोळे भरून येतात तसे इतरांचेही येत असतील अन् तेसुद्धा अशीच हतबलता अनुभवत असतील, हे मी समजू शकतो. त्यामुळे सध्या आहे त्या वृक्षराजींसोबत निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्यायचा, न जाणो उद्या-परवा माझ्या नजरेसमोर किंवा अपरोक्ष तीसुद्धा नाहीशी व्हायची !
आणि याच भीतीने मी लागोपाठ या झाडांचे आणि हिरवाईचे फोटो खेचत सुटलो होतो. या निसर्गरम्य दृश्यांना निदान फोटोंमध्ये सुरक्षित ठेवण्याचा हा माझा केविलवाणा प्रयत्न होता.
असाच अनुभव मी काही वर्षांपूर्वी माझ्या आधी राहत असलेल्या इमारतीत घेतला होता. तिथं मागच्या बाजूला मी लावलेलं शेवग्याचं झाड अशुभ असतं म्हणून, रातराणीच्या दाट झुडपांमुळे नाग-साप येतात म्हणून आणि अशाच काहीबाही कारणांनी अनेक झाडं, रोपटी तोडली गेली होती. नंतर कितीतरी दिवस तिकडं फिरकण्याची माझी हिंमत झाली नव्हती, इतका त्या वृक्षतोडीने मी अस्वस्थ झालो होतो.
ही अस्वस्थता फार काळ राहिली नाही, कारण मी तिथल्याच समोरच्या इमारतीत राहायला आलो, तेव्हा नवी फुलबाग आणि नवी झाडं लावण्यासाठी मला आधीपेक्षाही कितीतरी मोठी जागा खुणावत होती. आणि या संधीचा मी पुरेपूर फायदा घेतला.
आता आमच्या इमारतीसमोर डोलत असलेली हिरवीजर्द वृक्षराई हे माझ्या मेहनतीचं फळ... हे सगळं एकदम आठवलं अन् मनातली मरगळ लगेच दूर झाली.
अगदीच निराश होण्याचं कारण नव्हतं. सगळं काही संपलंय, असं काही नव्हतं. खूप झाडं लावता येतील, अशा कितीतरी जागा आपल्या इमारतींच्या समोर आणि आसपास आजही आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि वृक्षप्रेमी शेजारपाजाऱ्यांच्या मदतीने आजही पुन्हा नवी हिरवाई फुलवता येईल, असा विश्वास आहे.
या नुसत्या विचारानेच ती उदासीनता अन् मनात दाटलेलं मळभ जाऊन ‘आत’ही लख्ख, उबदार ऊन पडल्याच्या आनंद मी अनुभवतो आहे. आणि या उत्कट जाणिवेनंच पुन्हा एकदा ही कोवळी रविकिरणं मन प्रसन्न करताहेत.
‘शुभस्य शीघ्रम्’ अन् ‘पुनश्च हरिओम!’ ही दोन्ही वचने एकाच वेळी मनातल्या मनात घोळवत मीसुद्धा मग लगेचच कुठून नव्या वृक्षारोपणाची सुरुवात करता येईल, याचा विचार करू लागलो.

दिव्यमराठी मधला लेख

Camil Parkhe


Monday, May 2, 2022

भवताल:सोयी - सुविधा अन् शोध सुखाचा...

 आमच्या इमारतीत राहणाऱ्या एका मित्रानं वर्षभरापूर्वी या इमारतीतून जवळच्याच आलिशान कॉलनीतील मोठ्या, ऐसपैस घरात स्थलांतर केलं. नव्या घराच्या वास्तुशांतीला आमच्या इमारतीतील अनेक जण गेले होते. त्या नव्या घरातील प्रशस्त गॅलऱ्या आणि स्वतंत्र गच्ची, कॉलनीतील सीसीटीव्ही वगैरे सुरक्षा व्यवस्था, बाग, वाहनांसाठी पार्किंग, व्यायामशाळा, पोहण्याचा तलाव वगैरे सोयी-सुविधा निश्चितच हेवा वाटण्यासारख्या होत्या. अलीकडंच या मित्राकडे परत जाणं झालं. त्याच्याशी, त्याच्या कुटुंबीयांशी बोलल्यावर माझा हिरमोडच झाला. या मित्राने भरपूर पैसे मोजून त्या सुखसंपन्न वसाहतीत स्थलांतर केलं खरं, पण तिथल्या अनेक सुविधांचा तो किंवा त्याच्या कुटुंबातले बहुतेक कुणी लाभ घेतच नसल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.

माझा ऐन उमेदीचा काळ गोव्यात गेलेला आणि त्यात मिरामारसारख्या समुद्रकिनारी मी राहत असल्याने समुद्रात पोहणे हा माझा खूप आवडीचा छंद. कोरोनाकाळात पालिकेच्या मालकीचे पोहण्याचे तलाव बंद झाले, ते आता कडक उन्हाळा सुरू झाला तरी पुन्हा उघडले नाहीत. त्यामुळे त्या मित्राला माझा पहिला प्रश्न पोहण्याविषयीच होता. पण, या कॉलनीत राहायला आल्यापासून तो आपल्या मुलांसह तिथल्या तलावात एकदाही पोहायला गेला नव्हता. ‘अरे, आमचा पोहण्याचा तलाव रोज सकाळी - संध्याकाळी उघडा असला, तरी पोहण्यासाठी इथं वे‌ळ कुणालाय? आठवड्यात शनिवार-रविवार दोन दिवस सुटीचे असतात. ते घरची कामं, बाजारहाट अन् आराम करण्यात कशी संपतात, हे समजतही नाही..’ तो सांगत होता. 

बोलता - बोलता आम्ही गॅलरीत गेलो. पाहतो तो काय, गॅलरीचा निम्म्याहून अधिक भाग अडगळीच्या सामानाने भरला होता. तिथून दिसणाऱ्या दुसऱ्या गॅलरीत ओळीने कुंड्या ठेवलेल्या होत्या आणि दोन्ही गॅलरींमध्ये गप्पा मारण्यासाठी बसायला किंवा उभे राहायला जागा अशी नव्हतीच. त्या मित्राला विचारण्यासाठी माझ्याकडं इतरही काही प्रश्न होते, पण आता त्यानं काही सांगण्याआधीच त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती. 

लहान मुलांसाठी खेळण्याच्या, इतरांसाठी मनोरंजनाच्या विविध सुविधा असलेल्या समोरच्या बागेत आपल्या मुलांबरोबर खेळण्यासाठी वा सकाळ-संध्याकाळी किंवा सुटीच्या दिवशी फिरायला जाण्यासाठी तो वेळ काढू शकत नव्हता, हे माझ्या लक्षात आले होतं. 

खरं सांगायचं तर तो त्याच्या घरात आणि कॉलनीत असलेल्या कितीतरी सोयी-सुविधांचा उपभोग घेत नाही, याबद्दल मला वाईट वाटलं, पण आश्चर्य अजिबात वाटलं नाही. 

आमच्या कॉलनीत आमची इमारत सर्वात शेवटी बांधण्यात आली आणि त्यामुळं अधिक मजले असलेल्या या इमारतीत लिफ्टची सोय आहे. शिवाय, खूप प्रशस्त आणि हवेशीर अशी गच्चीही आहे. या सामायिक गच्चीवर मी स्वतः बगिचा फुलवला आहे. कोरोनाकाळातील संचारबंदीच्या काही दिवसांचा अपवाद वगळता आमच्या इमारतीच्या विविध मजल्यांवर राहणारे बहुतेक जण या गच्चीवर कधीही फिरकलेही नाहीत. 

आमच्या कॉलनीत पालिकेनं एक छोटीशी बाग विकसित केली आहे. त्याचप्रमाणं पाचशे मीटर अंतरावर पालिकेचीच एक खूप मोठी आणि घनदाट झाडी असलेली बाग आहे. तिथं लहान मुलांसाठी आणि इतर सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांसाठी ओपन जिमसुद्धा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आमच्या कॉलनीतले अगदी तुरळक लोक आपल्या मुलां-नातवंडासह या छोट्या आणि मोठ्या बागेत फिरताना, तिथल्या विविध सोयी-सुविधांचा उपभोग घेताना मला दिसले. बहुतेक लोकांना या सुविधा अस्तित्वात आहेत, याचा पत्ताही नाही किंवा आपल्याकडं त्यासाठी मुळी वेळच नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. 

अशा सगळ्यांना पिकनिक आणि लग्नकार्यासाठी कुटुंबीयांसह जाण्यासाठी वेळ असतो, मॉलमध्येही भरपूर वेळ खर्च केला जातो, पण स्वतःच्या घराच्या गॅलरीत आरामात बसण्यासाठी, बागेत फिरण्यासाठी वा तलावात पोहण्यासाठी वा साधं बॅडमिंटन खेळण्यासाठीही वेळ नसतो.

हौसेनं आणलेल्या विविध वस्तूंचा, मिळवलेल्या सुविधांचा नंतर कसा वापर होतो, यावर काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक मजेशीर पण मार्मिक टिप्पणी वाचली.. ‘गॅलरीत कपडे वाळवण्यासाठी ट्रेड मिल किंवा सायकल आणण्याऐवजी मी चक्क एक दोरीच आणली!’ गमतीचा भाग सोडला, तरी यातील वास्तव विचार करायला लावणारे आहे. 

काही वर्षांपूर्वी शाळेत असलेल्या माझ्या मुलीसाठी आम्ही मोठा की-बोर्ड विकत घेतला होता. (अनेक जण की-बोर्ड या वाद्याचा चुकीने पियानो असा उल्लेख करतात). मग मुलीबरोबर की-बोर्ड वाजवायला शिकण्यासाठी मीसुद्धा क्लास लावला. त्यासाठी नोट्स घेतल्या, काही इंग्रजी आणि मराठी गाणी वाजवायला शिकलोही. त्यावर रियाज करायला आणि ‘ट्विंकल ट्विंकल लिट्ल स्टार..’, ‘जन गण मन..’ , ‘हॅपी बर्थ डे टू यू..’ अशी काही मोजकीच गाणी वाजवायला मी शिकलो. पण, आता गेली दोन-तीन वर्षे हा की-बोर्ड कपाटावर धूळ खात पडून आहे. ज्या ज्या वेळी तिकडं नजर जाते, तेव्हा मला नेहमी अपराधी वाटत आलंय. 

माझ्या एका मित्राकडे तीन कुत्री आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांना फिरवून आणणे, वेळच्या वेळी खाऊ घालणे, अंगावरचे फर कापण्यासाठी तसंच उपचारांसाठी डॉक्टरांकडं नेणे वगैरे कामे कुटुंबातील व्यक्ती आळीपाळीनं, नियमितपणे करतात. घरातली ही माणसं फाटकापाशी आली की ही कुत्री जोरजोराने शेपट्या हलवून, उड्या मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. दुर्दैवानं घरातील एकाही माणसाला या कुत्र्यांना मायेनं जवळ घेऊन बसण्यासाठी, त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी वेळच नाही. मला त्या कुत्र्यांची आणि त्या घरातील सगळ्यांचीच कीव वाटते. 

असंच आपल्या कुटुंबीयांबाबतही होऊ शकतं. आपल्या घरातील लोकांबरोबर – आई-वडील, नवरा-बायको, दिवसागणिक मोठी होणारी छोटी, गोड लहान बाळं, मोठी मुलं आणि इतर नातेवाईक - त्यांच्यासोबत काही काळ घालवण्यासाठी आपल्याला वेळच नसतो. नंतर यदा कदाचित भरपूर वेळ मिळाला, तर तोपर्यंत बहुधा खूप उशीर झालेला असतो. तेव्हा इतरांना तुमच्यासाठी वेळ नसतो. 

घराभोवती, रस्त्याच्या कडेला आपणच लावलेल्या झाडांकडं लक्ष द्यायला मला अनेकदा वेळ मिळत नाही. अनेक दिवस, काही आठवडे तिकडं पाहण्याचाही कंटाळा केला जातो. मग कधीतरी निवांत असताना त्या झाडांकडं लक्ष जातं. आता उंच वाढलेल्या पारिजातकाची पानं सुकलेली असतात, फुलांची संख्याही रोडावलेली असते, छोट्याशा, पण आता ऐन बहरात आलेल्या एखाद्या आंब्याच्या झाडाला नियमितपणे पाणी देण्याची गरज आहे, हे अंमळ उशिराच कळतं. जेव्हा कधी हे लक्षात येतं तेव्हा पुन्हा बागकामाला वेळ दिला जातो. मग कुठं त्या झाडांची अन् आपल्याही मनाची मरगळ नाहीशी होते. 

आपल्या अवतीभोवती अनेक सोयी-सुविधा उभ्या असतात. काहींसाठी आपण पैसे मोजतो, काही विनामूल्य उपलब्ध असतात. पण, त्यासाठी वेळ देण्याची किंबहुना वेळ काढण्याची आपली तयारी नसते. रोजच्या दुनियादारीमध्ये अशा साऱ्या सुख-सुविधा केवळ नावापुरत्या उरतात, त्यातील ‘सुख’ काही केल्या गवसत नाही. 

दिवसांमागून दिवस सरत जातात आणि आपण स्वत:च्या ‘सोयी’कडं बघत पुढं पुढं चालत राहतो. भौतिक साधनांपासून ते भावनिक नात्यांपर्यंतच्या अनेक ‘सुख’कारक गोष्टींना आपण पारखं होत जातो. आर्थिक ताण सहन करून कितीही अत्याधुनिक सुविधा मिळवल्या तरी त्यांच्या उपयोगासाठी अन् नात्यांतील सहयोगासाठी वेळच नसेल तर आनंदाचा शोध लागणार कसा..?