पाषाणात दडलेलं सौंदर्य
`ए वॉचमन, इधर आओ, यहाँ `डी’ बिल्डिंग किधर है ?''
एका मोठ्या कारने आलेल्या लोकांपैकी एकाने खिडकीची काच खाली करून तो प्रश्न विचारला आणि मी थबकलो.
आमच्या इमारतीसमोर रस्त्यावरच्या मोकळया जागेत मीच लावलेल्या झाडांना मी बादलीने पाणी घालताना मला ते लोक बोलावत होते. सकाळी फिरताना आणि बागकाम करताना मी नेहेमीच्या शॉर्ट पॅन्ट आणि टी-शर्टमध्ये होतो. भरपूर घामाघूम झालो असेल, त्यामुळे माझ्या एकूण पेहेरावाकडे पाहून त्यांनी बहुधा मला हा प्रश्न केला असावा.
तो प्रश्न ऐकताच मी हसलो, कारण मला त्याक्षणी शाळेत शिकलेल्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याविषयीच्या एका धड्याची आठवण झाली होती.
शाळेत असताना शिकलेले काही धडे आणि व्यक्ती आयुष्यभर आठवणीत असतात ते कशामुळे हे नक्की सांगता येणार नाहीत. कदाचित शिक्षकाने तो विषय अगदी मन लावून शिकवला असेल किंवा ती घटना काही कारणांमुळे मनावर खोलवर बिंबवली गेली असणार.
उदाहरणार्थ, संत एकनाथ म्हटले कि मला पैठणला गोदावरीच्या तिरावर तहानलेल्या गाढवाला पाणी पाजणारे हे संत आठवतात. लहानपणी गुरुकुलात जमाखर्च लिहित असताना एक पैशाच्या हिशोबाचा मेळ लागत नसल्याने रात्रभर दिव्याच्या प्रकाशात आकडेमोड करणारे आणि त्या एक पैशाचा हिशोब लागताच आनंदाने टाळी वाजवणारे एकनाथ महाराज त्या पाठ्यपुस्तकातील त्यांच्या आणि खिडकीतून त्यांना पाहणाऱ्या त्यांच्या गुरुंच्या चित्रासह आठवतात.
त्यामुळे मला ``ए वॉचमन' म्हणून हाक मारणारे ते गृहस्थ दिसताच ईश्वरचंद्र विद्यासागरांची शाळेत शिकलेली ती गोष्ट आठवणे साहजिकच होते.
ईश्वरचंद्र विद्यासागर एकदा कुठल्याशा रेल्वेस्टेशनावर आपल्या पाहुण्यांना आणण्यासाठी गेले होते. स्टेशनावर गाडी आली आणि प्रवाशी आपल्या सामानांसह उतरु लागले. त्या प्रवाश्यांपैकीच एकाने ईश्वरचंद्र विद्यासागर यांना हाक मारली, 'ए कुली, इकडे ये आणि हे सामान घेऊन माझ्याबरोबर चल. ''
मुकाट्याने ईश्वरचंद्रांनी ते सामान डोक्यावर घेतले आणि त्यांना सांगितलेल्या ठिकाणाकडे ते जाऊ लागले, त्यांच्यापाठोपाठ तो प्रवाशी होताच. सांगितलेल्या जागी आल्यावर ईश्वरचंद्रांनी डोक्यावरचे सामान खाली उतरवले आणि त्या प्रवाशाचे आपल्या घरी स्वागत केले.
तो प्रवाशी त्यांचाच पाहुणा होता, त्या व्यक्तीला आणण्यासाठीच ईश्वरचंद्र विद्यासागर रेल्वेस्टेशनवर गेले होते.
आपण ज्याला हमाल समजलो तो व्यक्तीच आपली यजमान आहे हे समजल्यावर त्या पाहुण्याची काय मनःस्थिती झाली असेल याची कल्पना करता येईल.
त्यामुळे `ए वॉचमन, इधर आओ, यहाँ `डी’ बिल्डिंग किधर है ?' असा तो प्रश्न ऐकताच मीच अवघडलो, शरमिंदा मुळीच झालो नाही. त्याऐवजी अगदी मनमोकळ्यापणे हसत मी पटकन म्हणालो.
''Yes, Mister Braganza, Good Morning and Welcome ! तुमचीच मी वाट पाहात होतो, या माझ्याबरोबर..''
माझे ते उत्तर ऐकताच गाडीतून उतरणारे ते चारपाच लोक जागीच थबकले आणि खूप शरमिंदा झाले.
वस्तुस्थिती अशी होती कि माझे खाते असलेल्या वसई सहकारी बँकेच्या स्थानिक शाखेचे नवे मॅनेजर आले होते आणि माझ्याशेजारीच असलेल्या माझ्या मित्राच्या मोकळ्या असलेल्या फ्लॅटमध्ये ते आणि त्या बँकांतील त्यांचे दोनतीन सहकारी काही दिवस राहणार होते.
त्या फ्लॅटची चावी माझ्याकडेच असल्याने यासंबंधात त्यांचे माझ्याशी आधी बोलणे झाले होते आणि या लोकांची मी आता वाटच पाहत होतो.
सलामीलाच झालेल्या त्या प्रश्नाने ते खूपच खजिल झाले होते आणि ते साहजिकच होते. मात्र माझा तेव्हाचा पेहराव आणि त्यावेळी मी करत असलेले काम पाहता अर्थात त्यांना दोष देण्यात अर्थ नव्हता.
तर अशा प्रकारे या पाहुण्यांचे मी स्वागत केले आणि त्यानंतर जवळजवळ एक महिना त्यांची मला खूप मदतही झाली.
त्यानंतर दोन दिवसांत जॅकलीन आणि आमची मुलगी आदिती तीन आठवड्यांच्या युरोपच्या सहलीवर गेलो आणि आमच्या अनुपस्थितीत या पाहुण्यांनी दारापाशी ठेवलेल्या माझ्या कुंड्यांतील झाडांना रोज पाणी घालून त्यांना जगवले. याकाळात मला कुरियरने येणारी पार्सले आणि पत्रे घेतली आम्ही परतलो त्यानंतर लगेचच हे पाहुणे दुसऱ्या जागी राहण्यासाठी गेलो, मात्र आमच्या पहिल्या मुलाखतीचा तो प्रसंग त्यांच्या आणि माझ्याही कायम आठवणीत राहिला.
नुसत्या बाह्य पेहेरावावरून काही समज करुन घेणे योग्य नसते. कशात आणि कुणामध्ये कसले रुप दडलेले असते याची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
`गुड सॅमॅरिटन' या नावाने इंग्रजीत एक संज्ञा आहे. या संज्ञेचे मूळ बायबलमध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या एका कथेत आहे.
एक मनुष्य जेरुसलेमहून जेरिकोकडे चालला होता. वाटेत त्याला लुटारुंनी गाठले. त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले, तटाला बेदम मार दिला आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत टाकून ते पसार झाले. एक धर्मगुरु (याजक ) त्या वाटेने चालला होता, परंतु कण्हत असलेल्या त्या माणसाला पाहून तो दुसऱ्या बाजूने निघून गेला. तसाच एक लेवी (वेदीसेवक) तिथे आला आणि त्याच्याकडे नजर टाकून तोही दुसऱ्या बाजूने निघून गेला.
एक सॅमॅरिटन त्या वाटेने चालला होता, तो त्या ठिकाणी येऊन पोहोचला. (ज्यु लोक सॅमॅरिटन लोकांना कमी लेखात असत, याजक आणि लेवी तर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असत ), रस्त्याला कडेला पडलॆल्या त्या माणसाची दारुण अवस्था पाहून हा सॅमॅरिटन गहिवरला. तो जवळ गेला. त्याने त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्षारस (वाईन !) लावून त्या बांधल्या. त्याने त्याला आपल्या जनावरावर बसवले आणि धर्मशाळेत आणले. तिथे त्याने त्याची शुश्रूषा केली.
दुसऱ्या दिवशी त्याने दोन दिनार काढून त्या धर्मशाळेच्या रक्षकाला दिलॆ आणि सांगितले, '' ह्याची काळजी घे, तुला अधिक खर्चावे लागले तर मी परत येईन तेंव्हा त्याची भरपाई करीन. ' तर आता या तिघा जणांपैकी लुटारुंच्या हाती सापडलेल्या त्या माणसाचा शेजारी कोण?'' असे येशूने विचारले.
उत्तर अर्थातच सोपे आहे
सॅमॅरिटन आणि ज्यु लोक एकमेकांचे पारंपारिक हाडवैरी असले तरी एक सॅमॅरिटन जखमी ज्यु व्यक्तीला मदत करतो, यामुळे `गुड सॅमॅरिटन’ किंवा `आपला चांगला शेजारी' ही संज्ञा रुढ झाली.
ऐन संकटाच्या किंवा गरजेच्या वेळी आपल्या मदतीसाठी जो कुणी धावून येईल तो खरा आपला मित्र वा शेजारी असे या कथेचे सार आहे.
कुणाही माणसाला केवळ जन्मामुळॆ, जातीमुळे किंवा धर्मगुरु, लेवी यासारख्या पदामुळे नव्हे तर सेवा केल्याने मोठेपण प्राप्त होते हे या कथेचे आणखी एक सार.
शेवटच्या न्यायाच्या वेळी म्हणजे `फायनल जजमेंट डे' च्या वेळी देव नितिमान लोकांना म्हणेल: तुमचे वतन किंवा बक्षीस घ्या, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, मी तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला दिले, मी परका व अनोळखी होतो, तेव्हा मला आश्रय दिलात. मी उघडावाघडा होतो तेव्हा मला वस्त्रे पुरवलीत. मी आजारी होतो तेव्हा माझी शुश्रूषा केलीत. मी तुरुंगात होतो, तेव्हा मला भेटण्यासाठी आला. ''
हे सगळे कधी झाले?
येशू म्हणतो: '' ज्याअर्थी या माझ्या सर्वात कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केलेत ते माझ्यासाठीच केलेत .''
अनाथांच्या नाथ असलेल्या मदर तेरेसा रस्त्यांवर टाकून दिलेल्या, बेवारस अर्भकांचा, वृद्धांचा, कुष्ठरोग्यांच्या, विविध रोगांनी शरीर सडलेल्या आजारी लोकांचा मायेने सांभाळ करायच्या, याचे कारण म्हणजे त्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा होता, गरजू, नडलेल्या लोकांचे धर्मांतर हे त्यांचे उद्दिष्ट्य होते असे त्यांचे विरोधक म्हणतात.
मदर तेरेसा या लोकांची सेवा आणि शुश्रुषा आनंदाने, प्रेमाने करायच्या करायच्या कारण त्यांची काळजी घ्यायच्या याचे कारण म्हणजे या लोकांमध्ये त्या साक्षात येशू ख्रिस्त पाहायच्या !'
आपल्या देशातल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यांतील अश्रू आपल्याला पुसून काढायचे आहेत या महात्मा गांधींच्या स्वप्नाचा उल्लेख पंडित नेहरुंनी आपल्या 'नियतीशी करार’ या १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ऐतिहासिक भाषणात केला होता.
देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता तेव्हा फाळणीमुळे झालेल्या दंगलीत होरपळलेल्या याच सर्वात शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी देशाच्या राजधानीपासून अनेक कोस लांब महात्मा गांधी धावून गेले होते.
पंधराव्या शतकात युरोपात इटलीत थोर व्यक्तींचे पुतळे तयार करण्याचे काम काही शिल्पकारांना दिले होते. ही शिल्पे बनवली जाताना महागड्या संगमरवरी दगडाचा उरलेला एक भाग अनेक वर्षे तसाच दुलर्क्षित राहिला होता. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला सव्वीस वर्षाच्या एका तरुणाला शिल्प बनवण्याचे काम देण्यात आले तेव्हा अनेक वर्षे दुर्लक्षित असलेला त्या संगमरवरी पाषाणाकडे त्याचे लक्ष गेले.
सलग तीन-साडेतीन वर्षे काम करुन त्या ओबडधोबड संगमरवरी दगडातून त्या तरुणाने एक सुंदर मूर्ती साकारली. जगातल्या उत्कृष्ठ शिल्पकारांमध्ये आज गणना होत असलेल्या त्या शिल्पकाराची ही अगदी पहिलीवहिली पण खूप वाखाणली गेलेली कलाकृती.
त्या शिल्पकाराचे नाव आहे मायकल अँजेलो आणि ती जगप्रसिद्ध कलाकृती आहे तरुण डेव्हिडचे सुडौल शिल्प.
शंभराहून अधिक वर्षे इतर शिल्पकारांनी लक्ष न दिलेल्या त्या संगमरवरी पाषाणात मायकल अँजेलोला काही वेगळेच दिसले होते !
मायकल अँजेलोने त्यानंतर अनेक जगप्रसिद्ध शिल्पे केली. युरोपच्या दौऱ्यावर मी असताना व्हॅटिकन सिटीमधल्या त्या जगप्रसिद्ध सिस्टाईन चॅपेलमध्ये त्याने तिथल्या छतावर आणि इतरत्र काढलेली चित्रे पाहिली तेव्हा या सर्वश्रेष्ठ कलाकाराला मी मनोमन दंडवत घातला होता.
मायकल अंजेलोला त्या पाषाणात दडलेला डेव्हिड गवसला त्याप्रमाणेच एखाद्या कसलेल्या चित्रकाराला एखाद्या लहान मुलामधला चित्रकार दिसतो आणि प्रख्यात गायकाला सुंदर गळ्याची देणगी लाभलेलं मुल लगेच लक्षात येते.
कित्येक वर्षे शिळा बनून राहिलेली अहिल्या एका क्षणात सजीव बनून उभी ठाकली होती ती केवळ श्रीरामाच्या अपघाती पदस्पर्शाने. असेच परीस स्पर्श म्हणा किंवा पाठीवरची उत्तेजनाची, कौतुकाची थाप कितीतरी जणांना पूर्णतः नवे रुप, संजीवनी, उभारी आणि नवजीवन देत असतात.
पोर्तुगीज राजवटीत गोव्यात मडगावला शाळेत शिकत असताना एका मुलाने त्या शाळेच्या चक्क हेडमास्तरांचेच चित्र रेखाटले. ते रेखाटन पाहून `हे चित्र तूच काढले काय ?' असा प्रश्न हेडमास्तरांनी त्या विद्यार्थ्याला विचारला.
त्या मुलाचे चित्रकलेतील कौशल्य पाहून कलाशिक्षणासाठी त्यास मुंबईत जे. जे. स्कुल ऑफ आर्टमध्ये पाठवावे असा आग्रह हेडमास्तरांनी त्या मुलाच्या वडिलांना केला.
तो मुलगा मुंबईत आला आणि अशा प्रकारे दीनानाथ दलाल या प्रगल्भ चित्रकाराच्या गौरवशाली कारकीर्दीची सुरूवात झाली.
अशाच तऱ्हेने मग नामवंत चित्रकार, गायक आणि शास्त्रज्ञ उदयाला आलेले आहेत.
एका लहानग्या बियात भल्यामोठ्या वृक्षाचे रुप दडलेले असते तसेच लहान मुलांत उद्याचा नागरिक सुप्त स्वरूपात असतो, तशी त्यांची वाढ आपण करायची असते.
उत्तम शिक्षकाला तर आपल्या विद्यार्थ्यांत दडलेल्या गुणांची अशीच जाणीव होते आणि मग ते अशा विद्यार्थ्यांना स्वतः घडवतात किंवा योग्य पद्धतीने मार्गदर्शन करुन त्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याची वाट दाखवतात.
असे म्हणतात कि प्रत्येक व्यक्तीत विविध गुण आणि कला सुप्त रूपांत असतात, मात्र आपल्याला त्याची जाणीवही नसते.
मायकल अँजेलोने जसे त्या ओबडधोबड पाषाणात एक सुंदर शिल्प पाहिले तसे आपल्यालाही आपल्यामध्ये अशीच सुंदर शिल्पे दिसू शकतील. मात्र त्यासाठी मायकल अँजेलोने शिल्पकाराच्या नजरेतून पाहिले तसे आपल्याला पाहायला हवे. तसे पाहिले तर मग आपल्यांत असलेले आणि आपल्याला आधी न दिसलेले कितीतरी सुप्त गुण आकार घेतील आणि त्यामुळे एक सुंदरसे शिल्प साकार होईल.
(`दिव्य मराठी' तला लेख)