जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या महान व्यक्तींची समग्र चरित्रे
उर्दू शिक्षक गफार बेग मुनशी आणि लिजिट साहेब ही दोन नावे कधी तरी वाचण्यात आली असतील. या दोघांच्या आग्रहाखातीर गोविंदराव फुले यांनी आपल्या मुलाची शाळा पुन्हा सुरु केली आणि लहानग्या जोतिबाने पुण्यात स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
सगुणाबाई क्षीरसागर, सदाशिवराव गोवंडे, भवाळकर अशी अनेक नावे घेता येतील.
गफार बेग मुनशी आणि लिजिट साहेब या दोन व्यक्तींबद्दल आज आपल्याला काहीही माहिती नसली तरी त्यांनी महात्मा जोतिबा फुले यांना घडवण्यात हातभार लावला याविषयी दुमत असणार नाही.
कुठल्याही महान व्यक्ती अवकाशातून अचानक अचानक टपकलेले नसतात. या महान व्यक्तींच्या आयुष्याचा आणि कार्याचा एकाकीपणे अभ्यास करता येत नाही, त्यासाठी त्यांच्या काळात असलेली परिस्थिती, आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींचाही अभ्यास करावा लागतो. महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांची सर्वसमावेशक किंवा समग्र चरित्रे लिहिताना त्यांच्या समकालीन व्यक्तींच्या कार्यांचा अभ्यास केला कि त्या कालखंडातील परिस्थितीचे खरेखुरे आकलन होते.
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या जीवनांत आलेल्या आणि त्यांच्या कार्याशी येनकेन प्रकारे निगडित असलेल्या कितीतरी व्यक्तींच्या चरित्रांवर आणि कार्यांवर आजही प्रकाश टाकला गेलेला नाही. त्यामुळे महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या दोन महान व्यक्तींची समग्र चरित्रे आजपर्यंत लिहिली गेलेली नाहीत हे जाणवते.
जोतिबा फुले यांच्या विविध चरित्रांत अहमदनगरच्या अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारबाई यांचे नाव हमखास येते.
त्याचबरोबर स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल, मिसेस मार्गारेट शॉ मिचेल, जॉन मरे मिचेल आणि त्यांच्या पत्नी मारिया मिचेल यांची नावे विविध संदर्भांत वारंवार येत असतात. मात्र या व्यक्ती कोण होत्या, त्यांनी पुण्यात काय कार्य केले, जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्याशी त्यांचे असलेले नेमके नाते याविषयी आजवर पुरेसा प्रकाश टाकला गेलेला नाही.
अहमदनगर येथे मुलींच्या शाळा चालवणाऱ्या सिंथिया फरारबाई यांच्या व्यतिरिक्त जोतिबांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळा चालवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचा उल्लेख करता येईल.
स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल यांच्या शाळेत जोतिबांनी १८४१ ते १८४७ या काळात माध्यमिक इंग्रजी शिक्षण पूर्ण केले.
यानंतरच्या उच्च शिक्षणाची म्हणजे मॅट्रिक्युलेशन पर्यंतच्या पुण्यात आणि इतरत्रही सोय नव्हती आणि मुंबई विद्यापीठ तोपर्यंत स्थापनही झालेले नव्हते. त्याकाळात त्या तुलनेने जोतिबा फुले खूप उच्चशिक्षित होते, तरीसुद्धा त्यांनी मोठ्या पगाराची सरकारी नोकरी स्वीकारणे टाळले. त्याऐवजी सामाजिक सुधारणा राबवण्याचा खडतर आयुष्याचा पर्याय निवडला हे त्यांचे खूप मोठेपण .
आपल्या वडलांनी घराबाहेर काढल्यानंतरसुद्धा जोतिबांनी सावित्रीबाईंच्या मदतीने आपल्या शाळा वेतन न घेता चालू ठेवल्या. त्याकाळात अर्थार्जनासाठी जोतिबा स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळांत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्य करत होते.
मेजर थॉमस कँडी काही काळासाठी मायदेशी गेल्यावर रेव्हरंड जॉन मरे मिचेल हे पुण्यातल्या १८२१ साली स्थापन झालेल्या संस्कृत कॉलेजचे - नंतरच्या पुना कॉलेजचे आणि आजच्या डेक्कन कॉलेजचे - प्राचार्य (व्हिजिटर) आणि संस्कृत-मराठी विभागांचे प्रमुख होते.
सावित्रीबाई यांनी शिक्षणाचे धडे जोतिबा यांच्याकडून घेतले. विशेष म्हणजे केवळ साक्षर होऊन नव्हे तर प्रशिक्षित शिक्षिका होऊन सावित्रीबाई आपल्या स्वतःच्या शाळेत शिक्षिका आणि स्कूल हेड मिस्ट्रेस झाल्या.
याचे कारण म्हणजे सावित्रीबाई यांनी अहमदनगर येथे सिंथिया फरारबाई यांच्याकडे आणि पुण्यात मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचे धडे घेतले होते असा उल्लेख हरी नरके आणि इतर संशोधक करतात.
महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण भारतात महिला शिक्षिकांसाठी पहिल्यांदाच अध्यापन अभ्यासक्रम सुरु करण्याचा मान अशाप्रकारे अहमदनगरच्या सिंथिया फरारबाईंकडे आणि पुण्यात नॉर्मल स्कुल चालवणाऱ्या मिसेस मिचेल यांच्याकडे जातो.
जोतिबांना शिक्षणकार्यात प्रभावित करणाऱ्या मात्र आतापर्यंत पुर्णतः दुर्लक्षित असलेल्या सिंथिया फरारबाईंचे पहिलेवहिले चरित्र लिहिताना मला खूप आनंद झाला. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांची चरित्रे आणि कार्य या विषयांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना हे छत्तीस पानांचे चरित्र निश्चितच उपयोगी ठरेल.
चाळीसगावच्या विमलकीर्ती प्रकाशनाचे प्रा. गौतम निकम यांनी हे छोटेखानी चरित्र प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या काही प्रती मला अलीकडेच मिळाल्या.
पुस्तकाची किंमत पोस्टेजसह (रु ४०-२५) फक्त ६५ रुपये आहे. .
No comments:
Post a Comment