श्रीरामपूरला शाळेत पाचवी-सहावीला असताना आमच्या पारखे टेलरिंग दुकानासमोर असलेल्या नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयात मी जाऊ लागलो. तिथे वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचण्याची सवय लागली. नंतर हे वाचनालय स्वतःच्या प्रशस्त जागेत स्थलांतरित झाले तेव्हा जरासे दूर अंतरावर असलेल्या या नव्या इमारतीत मी जाऊ लागलो. चारपाच वर्षांनी शिक्षणासाठी मीच श्रीरामपूर सोडले, गोव्यात कॉलेज शिक्षणासाठी आणि व्यवसायानिमित्त राहिलो, औरंगाबाद आणि पुण्यात इतकेच नव्हे तर युरोपात राहिलो पण माझे वाचन कायम राहिले. पुस्तकांची साथ मी सोडली नाही आणि ही पुस्तके कायम माझी साथीदार बनून राहिली आहेत.
माझ्या वाचनाच्या आवडीचा श्रीगणेशा झाला तो श्रीरामपुरच्या नगरपालिका लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बालविभागात. तिथे जगातल्या विविध नामवंतांची विविध भाषांतली मराठीत आणलेली पुस्तके होती. इथे मी संस्कृतमधल्या शाकुंतल, मेघदूत, मृच्छकटिक अशा साहित्यरचना वाचल्या तशीच इसापनीती, ग्रीक भाषेतली इलियड ही पुस्तके वाचली आणि भा. रा. भागवत यांची `फास्टर फेणे' हा नायक असलेली पुस्तके, रवींद्रनाथ टागोरांची साने गुरुजींनी मराठीत आणलेली कितीतरी पुस्तके आणि कादंबऱ्या वाचल्या.
विल्यम शेक्सपियरची अनेक नाटके मी या शालेय जीवनात वाचून काढली. या सर्वच पुस्तकांची कथानके आणि पात्रे आज आठवत नसली तरी त्या काळात या पुस्तकांनी मला भुरळ घातली होती हे नक्की. मराठीतलं ‘ऑल टाइम बेस्ट सेलर’ ठरलेलं साने गुरुजींचं 'श्यामची आई' पण वाचलं. नंतर आचार्य अत्रे यांचं तीन-चार खंडांत असलेलं 'कऱ्हेचे पाणी' हे आत्मचरित्र वाचलं. खूप वर्षांनंतर विस्टन चर्चिल यांनीही असंच खंडात्मक लिहिलेलं आत्मचरित्र सहज चाळलं.
माध्यमिक शाळेत आल्यावर मग वडिलांकडे हट्ट लावून या लोकमान्य टिळक वाचनालयाची वर्गणी भरली आणि मोठमोठ्या लेखकांची पुस्तके वाचायचा सपाटाच लावला. यापैकी काही लेखक आणि त्यांच्या नावाजलेल्या, आजही मनावर भूरळ असलेल्या साहित्यकृती आजही आठवतात.. मराठीतले पहिले ज्ञानपीठ वि. स. खांडेकरांच्या 'ययाती' कादंबरीला १९७४ साली मिळाले आणि लगेच ही कादंबरी वाचून काढली आणि मग खांडेकरांच्या 'दोन मेघ' सारख्या इतर पुस्तकांचा वाचून फडशा पाडला.
कुणा लेखकाचे एखादे पुस्तक आवडले कि मग लगेच त्याची इतरही पुस्तके वाचायला घ्यायची असा प्रकार असायचा. या पद्धतीने मी पु. ल. देशपांडे यांची 'बटाट्याची चाळ', असा मी असामी' वगैरे पुस्तके वाचली. शंकर पाटील, द, मा. मिरासदार, त्यावेळच्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत, रविंद्र गुर्जर यांनी मराठीत आणलेली 'पॉपिलॉन' `गॉडफादर’ सारखी पुस्तके वाचली. त्या सत्तरच्या दशकात गुरुनाथ नाईक यांच्या गुप्तहेरांच्या, रहस्यकथा असलेल्या पुस्तकांच्या मालिका इतर वाचकांप्रमाणे मलाही भुरळ घातली होती.
`ललित' या मासिकात `ठणठणपाळ' या सदरात हातात हातोडा घेऊन भारदस्त मिशी असलेल्या व्यक्तीच्या चित्रासह लिखाण प्रसिद्ध व्हायचे. नंतर ते सदर जयवंत दळवी लिहित असत असा यथाकाश गौप्यस्फोट झाला आणि मग जयवंत दळवी यांची खूप पुस्तके वाचली.
लहानपणी घरी `चांदोबा’ मासिक यायचे, त्यातले `विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही; या वाक्याने सुरु होणारे सदर आणि महाभारतातल्या विविध कथा रंगीत चित्रांसह देणारे सदर माझे अत्यंत आवडीचे. महाभारताच्या या कथामालिकेमुळे या महाकाव्याच्या कायमच्या प्रेमात पडलो. त्यामुळे महाभारतातील पात्रे आणि उपाख्याने मला अगदी दुष्यंत, भरतापासून तो थेट राजा परिक्षित आणि जन्मेजय आणि उषा -अनिरुद्ध या प्रेमी युगुलापर्यंत परिचित आहेत किंवा अधुंकसे आठवतात. `बायबल’मधली पात्रे आणि छोटीमोठी कथानके आठवतात अगदी तसेच.
पुढच्या काळात दुर्गा भागवत यांचे `व्यासपर्व’ आणि कॉम्रेड शरद पाटील यांचे महाभारतावरील विश्लेषण तर खूपच भावले. आजही महाभारतावर काहीही लिहिलेले दिसले की अधाशासारखे मी वाचतो. महाभारतावर नऊ तास चालणारे नाटक दिग्दर्शित करणारे पिटर ब्रुक यांचे या जुलै महिन्यात निधन झाले तेव्हा त्यांच्यावर इंग्रजी आणि मराठी दैनिकांतले आलेले लेखसुद्धा अशाच उत्सुकतेने वाचले.
गो. नि. दांडेकर यांच्या 'मृन्मयी', 'कुणा एकाची भ्रमणगाथा' या कादंबऱ्या वाचल्या. गोनिदांची आगळीवेगळी लेखनशैली खूप भावली आणि रणजित देसाई यांच्या `स्वामी’ आणि `श्रीमान योगी’ या कादंबऱ्याने मला पार इतिहासकाळात फिरवून आणले होते.
`स्वामी'मधला एक प्रसंग मी आजपर्यंत विसरलो नाही. पेशवे माधवरावांनी कोठडीत ठेवलेल्या राघोबा दादांना भेटायला साडेतिन शहाण्यातील एक असलेले सखाराम बापू बोकिल आल्यावर बुद्धीबळाचा खेळ होतो. तेव्हा या खेळादरम्यान 'तुमचा राजा दोन घरे मागे घ्या' असा सल्ला दिला जातो. या सल्ल्याची माधवरावांना कल्पना दिली जाते. पेशव्यांच्या मदतीसाठी नागपूरहून निघालेले भोसल्यांचे सैन्य परत जाते आणि मग पेशवे माधवराव भोसल्यांच्या वकिलांना तंबी देतात असा तो प्रसंग. त्याशिवाय पानिपतच्या रणभूमीवर गायब झालेल्या सदाशिवराव पेशव्यांचा तोतयाबद्दलचे `स्वामी’ कादंबरीतील प्रकरणही अंधुकसे आठवते.
यानंतर आठदहा वर्षांनी गोव्यात म्हापसा येथे कोकणी साहित्य संमेलनाचे रणजित देसाई स्वागताध्यक्ष होते तेव्हा त्यांचे भाषण ऐकताना या पेशवाकालीन बुध्दीबळाच्या डावाची आठवण झालीच.
खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या अशा अनेक पुस्तकांतील काही प्रसंगानी आजही मनात घर केलेले असते.
गोव्यात पणजीला शिक्षणासाठी गेलो आणि तिथे संभाषणाची भाषाच बदलली. इंग्रजी संभाषण आणि लिहिणे शिकायचे असेल तर मराठी, कोकणी आणि हिंदीत बोलायचे नाही असा आमच्या निवासस्थानी नियम होता. तो नियम पाळला, मात्र त्याने माझे वाचन थांबले नाही.
फरक एव्हढाच कि आता मी केवळ इंग्रजी पुस्तके वाचू लागलो आणि ज्ञानाचे केवढे मोठे दालन माझ्यासमोर खुले झाले आहे याचा मलाच अचंबा वाटला.
माझ्याबरोबर राहणारी आणि शिकणारी इंग्लिश माध्यमाची बेनेडिक्त फरीया, लेस्टर फर्नांडिस आणि जेम्स पैस अशी मुले 'द रुटस' सारख्या जाडजूड कादंबऱ्या तिनचार दिवसांत (आणि रात्रींत ) वाचून संपवत. मलाही तशीच सवय लागली. `फ्रिडम ऍट मिडनाईट' ही लॉरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांची गाजलेली साहित्यकृती हे मी इंग्रजीत वाचलेले पहिले पुस्तक.
एक मात्र खरे कि महाराष्ट्राबाहेर राहिल्याने, मराठी भाषेशी संपर्क खंडित झाल्याने या दिडदशकाच्या काळात मराठीत आलेले उत्तमोत्तम साहित्य माझ्या वाचनात आले नाही, त्यामुळे अनेक नामवंत लेखकांच्या साहित्यकृती माझ्या वाचनात आल्या नाहीत ही खंत आहेच. मात्र या काळात इंग्रजी साहित्याचा परिचय झाला ही एक जमेची बाजू.
दरम्यान काळाच्या ओघात वाचनाची आवड बदलत गेली आहे. लहानपणी सुरुवातीच्या काळात हातात पडेल ते पुस्तक वाचण्याचा छंद होता, प्रामुख्याने कादंबऱ्या, ललित साहित्य, ऐतिहासिक, रहस्यमय साहित्य, चरित्रे आणि आत्मचरित्रे वाचली जायची. नंतर ललित साहित्याऐवजी वैचारीक, गंभीर आणि समीक्षणात्मक साहित्य अधिक वाचले जाऊ लागले. बा. सी मर्ढेकर, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांच्या कविताही वाचल्या, आणि दलित आत्मकथनांची बाबुराव बागुल, लक्ष्मण माने, दया पवार यांची अनेक पुस्तके वाचली.
पुस्तक वाचनाच्या वेडापायी एक धडा मी काही फार कटू अनुभवातून शिकलो. आपल्याला फार आवडलेले पुस्तक आपल्या एखाद्या मित्राला वाचायला दिल्यावर काय होते याची मला आजही आठवण होते आणि मी अस्वस्थ होतो.
गोव्यात नोकरी करत असताना पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी मी युरोपात बल्गेरियात काही महिने गेलो होतो , या दरम्यान रशियाला भेट दिले. या काळात अनेक इंग्रजी पुस्तके आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या स्मरणिका मी गोळ्या केल्या. परत आल्यावर या पुस्तकांचा आणि स्मरणिकांचा अनेक लेख लिहिण्यासाठी वापर केला. यापैकी एक पुस्त्रक चक्क बल्गेरियातले खास विनोदासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरावर आधारित होते. पुण्यात आल्यावर एका मित्राला यापैकी आवडती पुस्तके मी वाचण्यासाठी दिली आणि आजतागायत ती पुस्तके मला परत मिळालेली नाहीत.
असेच पुणे शहराचे ऐतिहासिक संदर्भ असलेला पुणे महापालिकेने तयार केलेला डॉ मं. पा. मंगुडकर संपादित दुर्मिळ वर्धापन विशेषांक एका मित्राला वाचण्यासाठी दिला तोसुद्धा माझ्या संग्रहातून कायमचा नाहीसा झाला. या अनुभवातून कुणाला कधीही आपले आवडते पुस्तक देऊ नये असा कानाला खडा लावला आहे.
एक मात्र खरं कि अनेक पुस्तकं मी वाचत असलो तरी कितीतरी नामवंत नामवंत मराठी साहित्यिकांची एकही साहित्यकृती मी वाचलेली नाही आणि आता या नावाजलेली पुस्तकं वाचण्याची इच्छाही राहिलेली नाही, हा, मात्र या साहित्यिकांवर वेळोवेळी लिहिले जाणारे लेख आणि पुस्तके मी आवर्जून वाचतो, हे नक्की कशामुळे हे मात्र समजत नाही.
उदाहरणार्थ, जी. ए. कुलकर्णी यांचे मूळ साहित्य मी वाचलेले नाही, मात्र त्यांच्या गूढ कथांवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर लिहिले गेलेले भरपूर साहित्य मी वाचले आहे. उदाहरणार्थ, जी ए कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे यांचा पत्रव्यवहार आणि जीएंची पुण्यात राहणारी बहीण नंदा पैठणकर यांनी आपल्या भावाविषयी लिहिलेल्या गोष्टी.
गौरी देशपांडेंची पुस्तकेसुद्धा कशी कुणास ठाऊक माझ्या कधीच वाचनात आली नाहीत, मात्र त्यांच्या लिखाणावर आणि व्यक्तिमत्वावर असलेले लिखाण मला आजही आकर्षित करतात.
कपाटात कधी काळी विकत घेतलेली पण न वाचलेली कितीतरी पुस्तके आहेत, तरीही आणखी पुस्तके घेण्याचा घेण्याचा मोह टाळता येतच नाही. मागच्या आठवड्यात म्हणूनच मग 'महर्षी ते गौरी' हे पुस्तकसुद्धा `साधना' पुस्तकाच्या दुकानात विकत घेतले. या पुस्तकाचे मुख्य आकर्षण अर्थात `समाजस्वास्थ' र. धो. कर्वे यांच्यावरचा विस्तृत लेख होता. `रधों' सारख्या व्यक्तींची चरित्रे मला कायम आकर्षित करत असतात.
नवीन पुस्तके विकत न घेण्याचा माझा निर्धार मला कधीच पाळता येत नाही. सुगावा बुक स्टॉलमध्ये अनेकदा चाळलेले आणि विकत घ्यायचे नाही म्हणून पुन्हापुन्हा रॅकमध्ये ठेवलेले लोकवाड्मय गृहाचे अर्जुन डांगळे यांचे नवे पुस्तक 'दलित पँथर – अधोरेखित सत्य ' मागच्या आठवड्यात असेच मग माझ्या बॅगेत आले. लोकवाड्मय गृहाचे दुसरे पुस्तक, `ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे' असेच अगदी अनिच्छेनेच माझ्या बागेत आले.
या दोन्ही पुस्तकांबद्दल मी येथे लिहिणार आहेच
या वाचनाच्या वेडाचे अखेर फलीत काय? आयुष्यातल्या अनेक वर्षांच्या दिवसांचे आणि रात्रींचे तास असे वाचन करण्यात गेले. त्याचे नक्की फलित काय असे गणित मांडायला गेले तर कितीतरी सकारात्मक बाबी नजरेसमोर येतात. सर्वात प्रथम आणि महत्त्वाची बाब म्हणजे वाचनाने अनेक व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर नेत्यांनी ग्रंथांमुळे आणि वाचनामुळे त्यांच्या जीवनांत कसा आमूलाग्र बदल घडवला हे लिहिले आहे.
माझ्याच बाबतीत बोलायचे झाले तर केवळ भौतिक प्रगतीचाच विचार केला तर वाचनामुळे मला पुढे उच्च शिक्षण घेता आले आणि माझे काही भाऊ घरच्या शिंपी कामाकडे वळाले तसे माझ्या बाबतीत न घडता राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरच्या इंग्रजी दैनिकांत पत्रकार म्हणून माझी कारकीर्द झाली.
पुस्तक वाचनाचा छंद आणि आवड असणाऱ्या इतर अनेक लोकांचा अनुभव असाच असणार आहे. त्याशिवाय, वाचनसंस्कृतीच्या भौतिक लाभांपेक्षाही ग्रंथ वाचनामुळे समृद्ध होणारे जीवन अधिक मोलाचे महत्त्व असते.
आजच्या मोबाईलच्या युगात पुस्तकांचे वाचन झपाट्याने कमी होत चालले आहे. नव्या जमान्यात कदाचित छापील पुस्तकांऐवजी ई-पुस्तके अधिक वाचली जातील. नव्या पिढीला ही नव्या धर्तीची पुस्तके अधिक भावतील. मात्र पुस्तके छापील वा डिझिटल स्वरुपांत असोत, मुळात पुस्तके अथवा ग्रंथ वाचण्याचा आनंद आणि त्यापासून मिळणारे भौतिक आणि इतर लाभ नेहेमीच कालातीत असणार आहे,
Camil Parkhe, July 31, 2022