Sunday, January 25, 2026


सिन्नर-नाशिक मार्गावर दोडी दापूर हे गाव आहे. चारेक वर्षांपूर्वी या गावाचे नाव पहिल्यांदा एका ऐतिहासिक इंग्रजी दस्तऐवजात वाचले आणि एकदा या गावाला भेट ध्यायलाच हवी असे ठरवले.

दोडी दापूर या गावाला भेट देऊन तिथे एक स्मृतीफलक पाहायचा होता.
जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी तो स्मृतिफलक पाहण्याचा योग अगदी योगायोगाने आला.
गॉर्डन हॉल हे अमेरिकन मिशनरी ब्रिटिश भारतात येणारे एक पहिलेच मिशनरी.
१२ फेब्रुवारी १८१३ रोजी एक गलबत मुंबई बंदराला लागले आणि त्यातून चार अमेरिकन मिशनरी उतरले. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट, त्यांच्या पत्नी मिसेस नॉट आणि ल्युथर राईस हे ते चार मिशनरी.
त्यांच्या आगमनाने या देशात सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारीक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
धर्मप्रसार हेच त्यांचे मिशन, उद्दिष्ट्य होते. आणि या उद्दिष्ट्याला तत्कालीन राज्यकर्त्यांचा - ईस्ट इंडिया कंपनीचा - सक्त विरोध होता.
या मिशनरींच्या सुदैवाने त्याच वर्षी १८१३च्या जुलैत ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेचे नूतनीकरण केले आणि त्यानुसार मिशनरींना भारतात येण्याची आणि काम करण्याची मुभा देण्यात आली.
या अमेरिकन मिशनने मुलींची पहिली शाळा मुंबईत १८२४च्या मार्चमध्ये उघडली. गंगाबाई या नावाची एक स्थानिक तरुणी या शाळेत शिकवत असे. दुदैवाने त्यानंतर लगेचच मे महिन्यात प्राणघातक कॉलराची भीषण साथ पसरली.
या रोगाच्या साथीने मुंबईतील हजारो लोकांचा बळी घेतला. या लोकांमध्ये या मुलींच्या शाळेतील स्कुलमिस्ट्रेस असलेल्या गंगाबाई यांचाही समावेश होता. गंगाबाईंची जागा घेण्यासाठी इतर कुणीही नसल्याने मुलींची ही शाळा बंद करावी लागली.
गॉर्डन हॉल यांचा विवाह मुंबईतच १९ डिसेंबर १८१६ रोजी मार्गारेट लुईस यांच्याशी झाला. अमेरीकन मिशनच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत गेली.
१८१८ पर्यंत त्यांच्या अकरा शाळा होत्या, या शाळांत ६०० विद्यार्थी शिकत होते.
या परदेशी मिशनरी कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या मृत्यूंचे दुःख सहन करावे लागले. प्रत्येक घरात एकतरी अपत्याचे निधन झाले होते. १८३२ पर्यंत जन्मलेल्या ३० अपत्यांपैकी १८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली होती.
इथल्या आरोग्याच्या समस्येमुळे गॉर्डन हॉल यांच्या पत्नीने आपल्या मुलांसह अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या पतीलासुद्धा त्यांनी तसा आग्रह केला, मात्र मायदेशी जाण्यास हॉल यांनी नकार दिला.
गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज ए. हॉल अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त १९१३ साली मुंबईत मिशनरी म्हणून आले तेव्हा त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे वर्णन केले आहे.
ईस्ट इंडिया कंपनी सरकारने मिशनरींना मुंबईबाहेर घाटापलीकडे जाऊन मिशनकार्य करण्यास परवानगी दिली नव्हती. पुण्यातील पेशवाई नुकतीच संपली होती आणि दख्खनसारख्या संवेदनशील परिसरात कुठल्याही प्रकारची जोखीम घेण्यास कंपनी सरकार तयार नव्हते.
गॉर्डन हॉल यांनी नोव्हेंबर १८२४ मध्ये त्यांनी एक शोधयात्रा हाती घेतली.
आजारपणाच्या काळात मिशनरी कुटुंबांना स्थलांतर करता येईल, असे एखादे योग्य ठिकाण पर्वतरांगांमध्ये आहे का हे पाहण्यासाठी ते बोटीने कोकणात बाणकोट येथे गेले.
तिथे आधीच स्थायिक झालेल्या स्कॉटिश मिशनरींनी त्यांचे स्वागत केले. तेथून नदीमार्गे महाडला जाऊन त्यांनी एक घोडा मिळविला आणि त्या घोड्यावरून पोलादपूर गाठले, नंतर घाट चढून महाबळेश्वर येथे पोहोचले.
गॉर्डन हॉल हे नियमितपणे रोजनिशी लिहीत असत. हॉल यांनी आपल्या या रोजनिशीत महाबळेश्वर येथील मंदिरे आणि पाच नद्यांचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या झऱ्याविषयी नोंदी केल्या आहेत.
तेथील हवामान उत्कृष्ट असल्याचे त्यांना आढळले; मात्र अन्नसामग्री व इमारती महाग होत्या, तसेच तेथे पोहोचण्याचे अंतर व अडचणी पाहता, एखाद्या मिशनरी कुटुंबाचे तेथे स्थलांतर करणे खर्चिक ठरेल, असे त्यांना वाटले.
यानंतर काही वर्षे उलटल्यावरच आरोग्य सुधारण्यासाठी मिशनरी महाबळेश्वरला जाऊ लागले.
लवकरच मिशनरींच्या प्रवासांवरील सरकारी निर्बंध शिथिल झाले.
मार्च १८२६ मध्ये हॉल आपल्या दोन तरुण सहकाऱ्यांसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे जाण्यास निघाले. तेथे कॉलऱ्याची तीव्र साथ असल्याने ते काही दिवस तेथेच लोकांची सुश्रुषा करण्यासाठी थांबले; त्यांनी आजारी लोकांना औषधे दिली, पुस्तके वाटली आणि उपदेशसुद्धा केला.
मुंबईच्या परतीच्या प्रवासात, दोडी दापूर या गावात रात्री विश्रांती घेत असताना त्यांनाही कॉलऱ्याची लागण झाली आणि २० मार्च १८२६ रोजी त्यांचे निधन झाले.
ब्रिटिश अमदानीत सर्वप्रथम मुलांमुलींसाठी शाळा सुरु करणारे आद्य मिशनरी गॉर्डन हॉल यांचे निधन हा अमेरिकन मराठी मिशनला मोठा धक्का होता.
``तो आवडता शिष्य, उत्कृष्ट मिशनरी आणि एक आद्य कार्यकर्ता होता', अशा शब्दांत गॉर्डन हॉल यांचे वर्णन करण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी त्यांचे दफन करण्यात आले, तेथे काही वर्षांनी तेथे एक दगडी समाधी बांधण्यात आली. मिशनरी ऍलन ग्रेव्ह्ज यांनी या समाधीला भेट दिल्यानंतर तेथे एक संगमरवरी स्मृतीफलक उभारण्यात आला. त्यावर पुढील इंग्रजी आणि मराठी मजकूर कोरलेला होता :
``Rev. Gordon Hall, Miss'y
Died March 20, 1826, Aged 41
ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित गॉर्डन हॉल येथे पुरला आहे. हा एकट्याच देवाची भक्ती व त्याच्या एकल्या अवताराकडून तारण ही सांगायास येथे फिरत होता. या तारणाविषयी तुम्ही शोध करा. तुम्हासही पाहिजे. ''
सिन्नर तालुक्यातील दोडी दापूर इथला हाच स्मृतीफलक मला पाहायचा होता.

नाशिकमधील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन संपल्यानंतर पुण्याला कारने परतताना त्यासाठी वाटेत दोडी दापूर येथे थांबण्याचा माझा इरादा होता.
त्यावेळी मंडपात असलेल्या नाशिकचे रेव्हरंड गिरीश भालतिडक यांच्याकडे मी सहज त्या स्मृतीफलकाचा विषय काढला.
त्यावर त्यांचे उत्तर ऐकून मी उडालोच.
``दाखवतो तुम्हाला मी तो स्मृतीफलक. माझ्या घरीच आहे तो.''
त्यानंतर भालतिडक यांनी त्या आद्य मिशनरींच्या स्मृतीफलकाची कथा सांगितली.
दहा वर्षांपूर्वी दोडी दापूर येथील कबरस्थानातील तो संगमरवरी स्मृतीफलक उखडून टाकला आहे असे त्यांच्या कानावर आले होते. त्यानंतर या गावी जाऊन तो स्मृतीफलक शोधण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केले.
अखेरीस एका माणसाने त्या स्मृतीफलकाचे तुकडे जपून ठेवल्याचे त्यांना कळाले. त्या माणसाचा शोध घेऊन भालतिडक यांनी स्मृतीफलकाचे ते तीनचार तुकडे मिळवले होते. आणि ते जोडून आपल्या घरी ठेवले होते.
हे ऐकून तातडीने मी भालतिडक यांच्यासह त्यांच्या शरणपुरातील घरी पोहोचलो आणि तो स्मृतीफलक पाहिला.
त्यावरील वाक्ये पाहिली.
अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दीग्रंथात त्या स्मृतीफलकाविषयी लिहिलेले मी वाचले असल्याने आणि तसेच गॉर्डन हॉल यांच्या तिथल्या अखेरच्या क्षणाचे चित्र या ग्रंथात असल्याने मला मात्र त्या फलकावरील शब्दांची संगत लागली होती.
पुण्यात घरी आल्यावर लगेचच मी अमेरिकन मिशनचा तो शताब्दीग्रंथ पुन्हा चाळला आणि त्या स्मृतीफलकाविषयी लिहिलेले पुन्हा एकदा वाचून काढले.
गॉर्डन हॉल यांच्या त्या स्मृतीफलकाला योग्य ती जागा लाभो हिच इच्छा.

Camil Parkhe




No comments:

Post a Comment