Wednesday, December 9, 2020


 माझी पहिली राजकिय बातमी

''हं, तर मग, काय बोलल्या शशिकलाताई काकोडकर?''

पणजीत एका शाळेच्या कार्यक्रमावरुन मी परतल्यावर न्यूजरुममधील माझ्या टाइपरायटरवर बातमी टाईप करुन मी स्पेलिंग चेक करत होतो. तेव्हाच माझे ज्येष्ठ वार्ताहर सहकारी रवि प्रभुगावकर यांनी आपल्या खास शैलीत सिगारेटची राख अँश ट्रेमध्ये झटकीत मला हा प्रश्न विचारला.
आमच्या नवहिंद टाइम्सच्या खास गोवन शैलीच्या त्या जुन्या एकमजली कौलारीं ऑफिसात एका छोटयाशा रूममध्ये दोन ज्येष्ठ वार्ताहारांचे स्वतंत्र टेबल होती. तिथेच मोठ्या टेबलापाशी मुख्य उपसंपादक आणि त्याच्या समोर दोन उपसंपादक बसायचे आणि एका कोपऱ्यात सर्वांत ज्युनियर असलेल्या माझा टेबल आणि टाईपरायटर होता. माझा हा टेबल आणि टाईपरायटर तसे डेस्कवरचे इतर जणही वापरायचे. माझ्यासमोरच प्रभुगावकरांचा टेबल होता.
मी कॅम्पस, क्राईम आणि कोर्ट या बिट्सवर काम करत असल्याने साधारणतः मी काय बातमी देतो आहे याची आमचे मुख्य वार्ताहार प्रमोद खांडेपारकर किंवा प्रभुगावकर कधी विचारत नसत. पण आज रविवार असल्याने खांडेपारकर सुट्टीवर होते आणि गोवा, दमण आणि दीवच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर मुख्य पाहुण्या असलेल्या कार्यक्रमाची बातमी करण्यासाठी मी गेलो होतो. राजकारण हा त्या माझ्या दोन्ही वरीष्ठ वार्ताहारांचा खास प्रांत असल्याने प्रभुगावकर काकोडकरांच्या बातमीविषयी असा प्रश्न विचारणे साहजिकच होते.
यासंदर्भात ही घटना घडली त्याकाळच्या म्हणजे १९८२च्या दरम्यानच्या राजकिय संदर्भाची आणि घडामोडींची थोडी ओळख करून देणे आवश्यक ठरेल. डिसेंबर १९७९च्या राष्ट्रीय निवडणुकीबरोबरच गोव्यातही विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. देशात इंदिरा गांधीं पुन्हा सत्तेवर आल्या होत्या तर गोव्यात आणि संपूर्ण देशात फक्त गोव्यातच इंदिराजींच्या प्रतिस्पर्धी म्हणजे यशवंतराव चव्हाण, के ब्रह्मानंद रेड्डी यांच्या काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली होती. त्याआधी गोव्यात शशिकला काकोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची म्हणजे मगो पक्षाची अनेक वर्षे सत्ता होती. मात्र देशात इंदिरा गांधींची सत्ता आणि लाट आली आहे हे पाहून गोव्यातील रेड्डी काँग्रेस काँग्रेसच्या प्रतापसिंह राणे, बाबू नायक आणि डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी गोव्यात सत्तेवर आलेला आपला विधिमंडळ पक्ष इंदिराजींच्या पक्षात विलीन करून टाकला. (या पक्षाच्या प्रतापसिंह राणे यांनी मग सलग अकरा वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही केला.)
विधानसभा निवडणूक हरलेल्या आणि सत्ताभ्रष्ट झालेल्या शशिकला काकोडकर यांनीही काही महिन्यातच आपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीन केला होता. मात्र रमाकांत खलप आणि बाबुसो गावकर यांनी मगो पक्षाचे अस्तित्व राखले होते. काँग्रेस पक्षात सामिल झाल्यावर काकोडकर यांची गोव्यातील पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती.
आणि या काँग्रेस उपाध्यक्ष शशिकलाताई आज काय बोलल्या याविषयी प्रभुगावकरांना औत्सुक्य होते !
त्या दिवशी काकोडकर मराठी भाषेत बोलल्या होत्या. माझ्या नोटपॅडकडे आणि टाईप केलेल्या बातमीकडे एक नजर टाकत काकोडकर काय बोलल्या हे मी त्यांना सांगितले. ते ऐकताच प्रभुगावकरांनी माझ्या बातमीचे कागद आपल्याकडे घेतले आणि दुसरी एक फोर स्क्वेर सिगारेट शिलगावत काळजीपूर्वके ती बातमी वाचू लागले. त्यांच्या जाड चष्म्याच्या आड त्यांचे डोळे विलक्षण आनंदाने चमकत होते हे मला दिसत होते.
''कामिल, तू तुझ्या नोट्स चांगल्या घेतल्या आहेस ना? दुसरे कोण बातमीदार होते या कार्यक्रमाला ? ''
रविवारची सुट्टी असल्याने आणि त्याशिवाय शाळेचा कार्यक्रम असल्याने ड्युटीवर असलेले इतरही बातमीदार या कार्यक्रमाला आले नसणार असे मी सांगितले. इतर कुणी जोडीदार पत्रकार नसल्याने मीही पत्रकारांसाठी राखीव असलेल्या पहिल्या रांगेत बसलो नव्हतो हेही मी प्रभुगावकरांना सांगून टाकले.
''ओह, दॅट एक्सप्लेन्स इट !''
सिगारेटची बट अँश ट्रेमध्ये विझवून टाकत त्यांनी लगेचच वृत्त संपादक एम, एम. मुदलियार यांच्या घरी लॅण्डलाईनवरून फोन लावला. काकोडकरांच्या भाषणाची मी काय बातमी दिली आहे याची त्यांनी मुदलियार यांच्याशी चर्चा केली आणि पाच मिनिटातच फोन खाली ठेवला, तेव्हा ते खूष होते हे सांगण्याची गरज नव्हती.
''कामिल, युवर स्टोरी इज ऑन होल्ड ! उद्या सोमवारी संपादक बिक्रम व्होरा आणि मुदलियार तुझ्याशी बोलतील !'' असे त्यांनी मला सांगितले.
याबाबत वाद किंवा चर्चा करण्याचे काही कारण नव्हते. बातमीदारीत येऊन मला जेमतेम एकदोन वर्षे झाली होती. नवहिंद टाइम्स हे गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक असल्याने बातमीला जागा मिळण्याची नेहेमीच मारामार असायची. त्यामुळे बातमी राखून ठेवण्याचे प्रकार कायम असायचे.
दुसऱ्या दिवशी वृत्तसंपादक मुदलियार यांनी प्रभुगावकर यांच्या उपस्थितीत माझ्याशी काकोडकरांच्या भाषणाविषयी चर्चा केली.
काय वादग्रस्त मुद्दे होते काकोडकरांच्या भाषणात ?
शाळेच्या त्या कार्यक्रमात काँग्रेस उपाध्यक्षा शशिकला काकोडकरांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर तोंडसुख घेतले होते. कुणाचेही नाव न घेता मुख्यमंत्री राणे आणि इतर पक्षनेत्यांच्या कारभारावर आणि पक्षावरही सडकून टीका केली होती.
त्या चर्चेच्या अखेरीस माझ्या बातमीचे मुद्दे कायम ठेवत बातमीचे पुर्नलेखन करण्यात आले आणि कंपोझिंगसाठी बातमी पाठविण्यात आली .
मुदलियार आणि प्रभुगावकर यांच्यांशी झालेल्या बैठकीत मला तोपर्यंत ठाऊक नसलेल्या काही राजकिय संदर्भाचा उलघडा झाला. त्यांची सत्ता गेल्यानंतर शशिकलाताई काँग्रेसमध्ये आल्या होत्या तरी त्यांचे आणि काँग्रेसमधील इतर नेत्यांशी त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. शशिकलाताईंचे वडील दयानंद बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री. पोर्तुगीजांच्या सत्तेतून १९६१ साली मुक्त झालेला गोवा महाराष्ट्रात विलीन करणार अशी घोषणा देऊन महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोव्यात सत्तेवर आला होता. मात्र १९६७ साली देशात झालेल्या पहिल्यावहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव सार्वमतात गोमतकातील जनतेने महाराष्ट्रात विलीनीकरांच्या विरूद्ध कौल देऊनसुद्धा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षच सत्तेवर कायम राहिला होता. बांदोडकरांच्या अकस्मात निधनानंतर काकोडकर मुख्यमंत्री झाल्या होत्या.
खुद्द मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे हे मूळचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आणि मगोच्या राजवटीत काकोडकरांच्या मंत्रिमंडळात होते, शिक्षणमंत्री हरीष झांटये हे सुद्धा मूळचे मगोचे ! तात्कालीन सत्ताधारी काँग्रेसमधील डॉ. विली डिसोझा आणि बाबू नायक हे मूळचे युनायटेड गोवन पक्षाचे म्हणजे युगोचे. १९८०च्या आधीचे गोव्यातील राजकारण अशाप्रकारे मगो आणि युगो दोन्ही पक्षांतच चालायचे. गोव्यात काँग्रेसचे नामोनिशाणही नसायचे. बहुसंख्य हिंदू समाज आणि अल्पसंख्य ख्रिस्ती समाज असाही एक पदर या राजकारणाला तेव्हा असायचा, आजही तो आहेच. तर आता काँग्रेसमध्ये आपल्याला सन्मानाने वागवले जात नाही याची खंत शशिकलाताईंनी आपल्या भाषणात बोलून दाखविली होती. शशिकलाताई नव्या पक्षात खूष नव्हत्या हे माझ्या बातमीवरुन दिसत होते.
दुसऱ्या दिवशी आतल्या पानात पण ठळकपणे ती बातमी नवहिंद टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली. आणि छोटयाशा गोव्यात एक कमी रिश्टर स्केलचा पण जाणवण्याइतपत हलकासा राजकिय भूकंप झाला.
त्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवारी गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी आपण काँग्रेसला सोडचिट्ठी देत आहोत असे जाहीर केले.
पत्रकारितेच्या माझ्या चार दशकांच्या कारकिर्दीतील ही माझी पहिलीवहिली राजकिय बातमी !

No comments:

Post a Comment