Showing posts with label politics. Show all posts
Showing posts with label politics. Show all posts

Wednesday, December 9, 2020


 माझी पहिली राजकिय बातमी

''हं, तर मग, काय बोलल्या शशिकलाताई काकोडकर?''

पणजीत एका शाळेच्या कार्यक्रमावरुन मी परतल्यावर न्यूजरुममधील माझ्या टाइपरायटरवर बातमी टाईप करुन मी स्पेलिंग चेक करत होतो. तेव्हाच माझे ज्येष्ठ वार्ताहर सहकारी रवि प्रभुगावकर यांनी आपल्या खास शैलीत सिगारेटची राख अँश ट्रेमध्ये झटकीत मला हा प्रश्न विचारला.
आमच्या नवहिंद टाइम्सच्या खास गोवन शैलीच्या त्या जुन्या एकमजली कौलारीं ऑफिसात एका छोटयाशा रूममध्ये दोन ज्येष्ठ वार्ताहारांचे स्वतंत्र टेबल होती. तिथेच मोठ्या टेबलापाशी मुख्य उपसंपादक आणि त्याच्या समोर दोन उपसंपादक बसायचे आणि एका कोपऱ्यात सर्वांत ज्युनियर असलेल्या माझा टेबल आणि टाईपरायटर होता. माझा हा टेबल आणि टाईपरायटर तसे डेस्कवरचे इतर जणही वापरायचे. माझ्यासमोरच प्रभुगावकरांचा टेबल होता.
मी कॅम्पस, क्राईम आणि कोर्ट या बिट्सवर काम करत असल्याने साधारणतः मी काय बातमी देतो आहे याची आमचे मुख्य वार्ताहार प्रमोद खांडेपारकर किंवा प्रभुगावकर कधी विचारत नसत. पण आज रविवार असल्याने खांडेपारकर सुट्टीवर होते आणि गोवा, दमण आणि दीवच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर मुख्य पाहुण्या असलेल्या कार्यक्रमाची बातमी करण्यासाठी मी गेलो होतो. राजकारण हा त्या माझ्या दोन्ही वरीष्ठ वार्ताहारांचा खास प्रांत असल्याने प्रभुगावकर काकोडकरांच्या बातमीविषयी असा प्रश्न विचारणे साहजिकच होते.
यासंदर्भात ही घटना घडली त्याकाळच्या म्हणजे १९८२च्या दरम्यानच्या राजकिय संदर्भाची आणि घडामोडींची थोडी ओळख करून देणे आवश्यक ठरेल. डिसेंबर १९७९च्या राष्ट्रीय निवडणुकीबरोबरच गोव्यातही विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. देशात इंदिरा गांधीं पुन्हा सत्तेवर आल्या होत्या तर गोव्यात आणि संपूर्ण देशात फक्त गोव्यातच इंदिराजींच्या प्रतिस्पर्धी म्हणजे यशवंतराव चव्हाण, के ब्रह्मानंद रेड्डी यांच्या काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली होती. त्याआधी गोव्यात शशिकला काकोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची म्हणजे मगो पक्षाची अनेक वर्षे सत्ता होती. मात्र देशात इंदिरा गांधींची सत्ता आणि लाट आली आहे हे पाहून गोव्यातील रेड्डी काँग्रेस काँग्रेसच्या प्रतापसिंह राणे, बाबू नायक आणि डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी गोव्यात सत्तेवर आलेला आपला विधिमंडळ पक्ष इंदिराजींच्या पक्षात विलीन करून टाकला. (या पक्षाच्या प्रतापसिंह राणे यांनी मग सलग अकरा वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही केला.)
विधानसभा निवडणूक हरलेल्या आणि सत्ताभ्रष्ट झालेल्या शशिकला काकोडकर यांनीही काही महिन्यातच आपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे काँग्रेस पक्षात विलीन केला होता. मात्र रमाकांत खलप आणि बाबुसो गावकर यांनी मगो पक्षाचे अस्तित्व राखले होते. काँग्रेस पक्षात सामिल झाल्यावर काकोडकर यांची गोव्यातील पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती.
आणि या काँग्रेस उपाध्यक्ष शशिकलाताई आज काय बोलल्या याविषयी प्रभुगावकरांना औत्सुक्य होते !
त्या दिवशी काकोडकर मराठी भाषेत बोलल्या होत्या. माझ्या नोटपॅडकडे आणि टाईप केलेल्या बातमीकडे एक नजर टाकत काकोडकर काय बोलल्या हे मी त्यांना सांगितले. ते ऐकताच प्रभुगावकरांनी माझ्या बातमीचे कागद आपल्याकडे घेतले आणि दुसरी एक फोर स्क्वेर सिगारेट शिलगावत काळजीपूर्वके ती बातमी वाचू लागले. त्यांच्या जाड चष्म्याच्या आड त्यांचे डोळे विलक्षण आनंदाने चमकत होते हे मला दिसत होते.
''कामिल, तू तुझ्या नोट्स चांगल्या घेतल्या आहेस ना? दुसरे कोण बातमीदार होते या कार्यक्रमाला ? ''
रविवारची सुट्टी असल्याने आणि त्याशिवाय शाळेचा कार्यक्रम असल्याने ड्युटीवर असलेले इतरही बातमीदार या कार्यक्रमाला आले नसणार असे मी सांगितले. इतर कुणी जोडीदार पत्रकार नसल्याने मीही पत्रकारांसाठी राखीव असलेल्या पहिल्या रांगेत बसलो नव्हतो हेही मी प्रभुगावकरांना सांगून टाकले.
''ओह, दॅट एक्सप्लेन्स इट !''
सिगारेटची बट अँश ट्रेमध्ये विझवून टाकत त्यांनी लगेचच वृत्त संपादक एम, एम. मुदलियार यांच्या घरी लॅण्डलाईनवरून फोन लावला. काकोडकरांच्या भाषणाची मी काय बातमी दिली आहे याची त्यांनी मुदलियार यांच्याशी चर्चा केली आणि पाच मिनिटातच फोन खाली ठेवला, तेव्हा ते खूष होते हे सांगण्याची गरज नव्हती.
''कामिल, युवर स्टोरी इज ऑन होल्ड ! उद्या सोमवारी संपादक बिक्रम व्होरा आणि मुदलियार तुझ्याशी बोलतील !'' असे त्यांनी मला सांगितले.
याबाबत वाद किंवा चर्चा करण्याचे काही कारण नव्हते. बातमीदारीत येऊन मला जेमतेम एकदोन वर्षे झाली होती. नवहिंद टाइम्स हे गोव्यातील एकमेव इंग्रजी दैनिक असल्याने बातमीला जागा मिळण्याची नेहेमीच मारामार असायची. त्यामुळे बातमी राखून ठेवण्याचे प्रकार कायम असायचे.
दुसऱ्या दिवशी वृत्तसंपादक मुदलियार यांनी प्रभुगावकर यांच्या उपस्थितीत माझ्याशी काकोडकरांच्या भाषणाविषयी चर्चा केली.
काय वादग्रस्त मुद्दे होते काकोडकरांच्या भाषणात ?
शाळेच्या त्या कार्यक्रमात काँग्रेस उपाध्यक्षा शशिकला काकोडकरांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर तोंडसुख घेतले होते. कुणाचेही नाव न घेता मुख्यमंत्री राणे आणि इतर पक्षनेत्यांच्या कारभारावर आणि पक्षावरही सडकून टीका केली होती.
त्या चर्चेच्या अखेरीस माझ्या बातमीचे मुद्दे कायम ठेवत बातमीचे पुर्नलेखन करण्यात आले आणि कंपोझिंगसाठी बातमी पाठविण्यात आली .
मुदलियार आणि प्रभुगावकर यांच्यांशी झालेल्या बैठकीत मला तोपर्यंत ठाऊक नसलेल्या काही राजकिय संदर्भाचा उलघडा झाला. त्यांची सत्ता गेल्यानंतर शशिकलाताई काँग्रेसमध्ये आल्या होत्या तरी त्यांचे आणि काँग्रेसमधील इतर नेत्यांशी त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. शशिकलाताईंचे वडील दयानंद बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री. पोर्तुगीजांच्या सत्तेतून १९६१ साली मुक्त झालेला गोवा महाराष्ट्रात विलीन करणार अशी घोषणा देऊन महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोव्यात सत्तेवर आला होता. मात्र १९६७ साली देशात झालेल्या पहिल्यावहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव सार्वमतात गोमतकातील जनतेने महाराष्ट्रात विलीनीकरांच्या विरूद्ध कौल देऊनसुद्धा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षच सत्तेवर कायम राहिला होता. बांदोडकरांच्या अकस्मात निधनानंतर काकोडकर मुख्यमंत्री झाल्या होत्या.
खुद्द मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे हे मूळचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आणि मगोच्या राजवटीत काकोडकरांच्या मंत्रिमंडळात होते, शिक्षणमंत्री हरीष झांटये हे सुद्धा मूळचे मगोचे ! तात्कालीन सत्ताधारी काँग्रेसमधील डॉ. विली डिसोझा आणि बाबू नायक हे मूळचे युनायटेड गोवन पक्षाचे म्हणजे युगोचे. १९८०च्या आधीचे गोव्यातील राजकारण अशाप्रकारे मगो आणि युगो दोन्ही पक्षांतच चालायचे. गोव्यात काँग्रेसचे नामोनिशाणही नसायचे. बहुसंख्य हिंदू समाज आणि अल्पसंख्य ख्रिस्ती समाज असाही एक पदर या राजकारणाला तेव्हा असायचा, आजही तो आहेच. तर आता काँग्रेसमध्ये आपल्याला सन्मानाने वागवले जात नाही याची खंत शशिकलाताईंनी आपल्या भाषणात बोलून दाखविली होती. शशिकलाताई नव्या पक्षात खूष नव्हत्या हे माझ्या बातमीवरुन दिसत होते.
दुसऱ्या दिवशी आतल्या पानात पण ठळकपणे ती बातमी नवहिंद टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली. आणि छोटयाशा गोव्यात एक कमी रिश्टर स्केलचा पण जाणवण्याइतपत हलकासा राजकिय भूकंप झाला.
त्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवारी गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी आपण काँग्रेसला सोडचिट्ठी देत आहोत असे जाहीर केले.
पत्रकारितेच्या माझ्या चार दशकांच्या कारकिर्दीतील ही माझी पहिलीवहिली राजकिय बातमी !

Monday, January 28, 2019

प्रियंका गांधी : नेहरू-गांधी घराण्यातील नवा चेहरा रिंगणात






प्रियंका गांधी : नेहरू-गांधी घराण्यातील नवा चेहरा रिंगणात
पडघम - देशकारण 
कामिल पारखे
  • नेहरू-गांधी घराणं आणि प्रियंका गांधी
  • Thu , 24 January 2019
  • पडघमदेशकारणनेहरू-गांधी घराणंNehru-Gandhi Familyप्रियंका गांधीPriyanka Gandhiसोनिया गांधीSonia Gandhiराजीव गांधीRajeev Gandhiराहुल गांधीRahul Gandhiकाँग्रेसCongress
इंदिरा गांधी यांना प्रत्यक्ष आणि अगदी जवळून पाहण्याचा योग मला लाभला, तेव्हा एक सामान्य नागरीक म्हणून मी त्यांचा एका कट्टर विरोधक होतो. या कट्टर विरोधाला अर्थातच आणीबाणी-पर्वाची पार्श्वभूमी होती. आणीबाणीनंतर मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीचे सरकार आले होते. मोरारजींचे सरकार कोसळल्यानंतर आलेले चरणसिंग सरकारसुद्धा अल्पजीवी ठरले. चरणसिंगांनी राजीनामा देऊन निवडणुका जाहीर केल्या होत्या. या दरम्यान इत्तर सर्व पक्षांच्या विखारी टीकेचे लक्ष्य बनलेल्या इंदिरा गांधी स्वतः:चा नवीन इंदिरा काँग्रेस पक्ष स्थापून निवडणूक प्रचारदौऱ्यात उतरल्या होत्या. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना वाळीत टाकले होते, तरीही न डगमगता इंदिरा गांधींनी प्रचारासाठी देश पिंजून काढला होता. त्यांच्या त्या गाजलेल्या झंझावाती प्रचारदौऱ्याचा एक भाग म्हणून त्या गोव्यात आल्या होत्या आणि त्या वेळी मला अगदी जवळून, काही फुटांच्या अंतरावरून त्यांना पाहता आले होते. 
केंद्रातून सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर अगदी मोजके पक्षनेते बरोबर असताना इंदिरा गांधींनी जवळजवळ एकहाती प्रचाराची धुरा सांभाळली. या काळात त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हते. चार्टर्ड विमान पुरवणारे उद्योगपती त्यांच्याबरोबर नव्हते. त्यामुळे जमेल तेव्हा प्रवासी विमानाने जाऊन आणि अनेकदा मोटारीने अनेक तासांचा प्रवास करून त्यांनी निवडणूक सभा घेतल्या. अशाच प्रकारे बहुधा कर्नाटकातून गोव्यात आल्यानंतर पणजीला मांडवी नदीच्या तीरावर असलेल्या मांडवी हॉटेलात प्रवेश करताना मी त्यांना पाहिले. त्यानंतर एका तासाने पणजीतील कम्पाला ग्राऊंडवर पार पडलेल्या त्यांच्या सभेलाही मी हजर होतो.
जनता पक्षाच्या सरकारच्या अनागोंदी कारभारावर त्यांनी घणाघाती हल्ला केला. इंदिरा गांधींच्या त्या वीसेक मिनिटांच्या भाषणाने तोपर्यंत माझ्या मनात जनता पक्षाविषयी असलेले थोडेफार प्रेमही नाहीसे झाले. इंदिरा गांधींच्या त्या जोरदार देशभरातील प्रचारदौऱ्याने जनता पार्टीचा एकदम धुव्वाच उडाला आणि इंदिरा गांधी त्यांना तोपर्यंत कधीही न मिळालेल्या मताधिक्याने आणि लोकसभेच्या अधिक जागा मिळवून पुन्हा सत्तेवर आल्या. 
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधी पुन्हा गोव्यात आल्या, त्या कॉमनवेल्थ राष्ट्रांच्या प्रमुखांच्या १९८३ साली झालेल्या बैठकीचे यजमान म्हणून. त्यावेळी मी ‘द नवहिंद टाइम्स’ या पणजीतील इंग्लिश वृत्तपत्राचा बातमीदार होतो. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यासह चाळीस राष्ट्रांचे प्रमुख यावेळी गोव्यात आले होते. त्यानंतर पुढल्याच वर्षी १९८४च्या ऑक्टोबरात इंदिरा गांधींची दिल्लीत हत्या झाली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी १९८९ च्या अखेरीस प्रचार सुरू झाला, तेव्हा मी पुण्यात ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये बातमीदार होतो. पंतप्रधान राजीव गांधींची सर परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानावर प्रचारसभा होती. बोफोर्स तोफेने त्यावेळी गदारोळ उठवला होता. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधानांच्या दौऱ्यात कडक सुरक्षा असायची. व्यासपीठासमोरच असलेल्या पत्रकारांसाठी असलेल्या कक्षात मी पोहोचलो. पंतप्रधानांच्या भाषणाची बातमी लिहिण्याची जबाबदारी माझे सहकारी पत्रकार नरेन करुणाकरन यांची होती, तर सभेचे हायलाईट्स किंवा क्षणचित्रे मी लिहिणार होतो. त्यामुळे माझी नजर सगळीकडे फिरत होती. त्याच वेळी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला काही गडबड दिसली. त्या बाजूने व्यासपीठावर चढण्यासाठी जिना तयार केला होता. “राहुल गांधी आला आहे,” असे कुणी तरी म्हटले आणि पत्रकारांपैकी आम्ही काही जण त्यादिशेने धावलो. पांढरा कुर्ता आणि पायजमा घातलेला विशीतला एक तरुण झपझप चालत जिन्याची पावले उतरत होता. काही क्षणात राहुल आमच्या नजरेआड झाला आणि एकाही फोटोग्राफरला त्याची छबी घेता आली नाही.
१९८९च्या या निवडणुकीत राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव झाला. त्यानंतर अल्पकाळासाठी भारतीय जनता पक्ष आणि डाव्यांच्या पाठिब्यावर विश्वनाथ प्रताप सिंगांचे आणि नंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांचे सरकार आले. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर राजीव गांधी पुण्यात आले होते आणि टिळक रोडवरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सभागृहात त्यांची पत्रकार परिषद झाली, तेव्हा मी तेथे हजर होतो. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वतीने प्रश्न विचारण्याची मला संधी देण्यात आली होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर उपस्थित असलेल्या वीस-पंचवीस पत्रकारांपैकी प्रत्येकाशी राजीव गांधींनी हस्तांदोलन केले. अशा वेळी काय म्हणायचे, काय अभिवादन करायचे हे मला ऐनवेळी सुचलेच नाही. स्मित करीत राजीव गांधींनी हस्तांदोलन केले तेव्हा आपण इतरांशी स्वतःची ओळख करून देतो तसे मी म्हटले – ‘कामिल पारखे, इंडियन एक्सप्रेस’.. आज मागे वळून पाहताना मी त्यांना ‘गुड इव्हिनिंग, सर’ असे अभिवादन करायला हवे होते, असे वाटते.  
१९९१ ला काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर चंद्रशेखर सरकार कोसळले आणि निवडणुका जाहीर झाल्या. निवडणूक प्रचार दौऱ्यात राजीव गांधींची हत्या झाली. या हत्येमुळे लोकसभेच्या राहिलेल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. दुसऱ्या निवडणुकीच्या फेऱ्यात राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसविषयी सहानुभूती लाट निर्माण झाली. काँग्रेसला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्याने राजीव गांधींच्या हत्येनंतर अचानक काँग्रेसध्यक्ष बनलेले पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान बनले आणि त्यांनी पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा काळही पूर्ण केला. 
राजीव गांधींच्या हत्येनंतर म्हणजे १९९१ पासून तो १९९६ पर्यंत काँग्रेस पक्षात गांधी घराण्यातील कुणीही सक्रीय नव्हते. निवडणुकीत काँग्रेस पक्षाची पुरती धूळधाण उडाल्यानंतर सीताराम केसरी यांच्याकडून सोनियांनी पक्षाची सूत्रे  स्वतःकडे घेतली. १९९९च्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळाले. त्याच वेळी झालेल्या निवडणुकात महाराष्ट्रात मात्र शिवसेना-भाजप सरकारचा पराभव करून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आले आणि ते पंधरा वर्षे टिकले.
येथून पुढे सोनियांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा भरारी घेतली आणि काँग्रेस पक्षाची सरकारे अनेक राज्यांत पुन्हा आली. २००४च्या निवडणुकांपूर्वी भाजपासाठी सगळीकडे ‘शायनिंग इंडिया’ आणि ‘फिल गुड’ अशी परिस्थिती असतानाही काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली. सोनियांनी डॉ. मनमोहन सिंहांची पंतप्रधानपदी निवड केली. केंद्रात सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख या नात्याने त्या देशातील सर्वाधिक सत्ता त्यांच्याकडे आली.  काँग्रेस २००९ च्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आला.
नेहरू-गांधी घराणे हे देशातील एक प्रमुख घराणे आहे असे अनेकदा म्हटले जाते. गेले कित्येक वर्षे भाजपच्या वळचणीला असलेले मनेका गांधी आणि वरुण गांधी हेसुद्धा या घराण्याचाच भाग असले तरी सोनिया आणि राहुल यांनाच या घराण्याचे राजकीय वारसदार समजले जाते.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या पुणे आवृत्तीत  मी असताना संपादकीय विभागातील एका बैठकीत झालेली घटना मला आठवते. प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच अपत्यप्राप्ती झाली होती आणि या घटनेस न्यूज व्हॅल्यू आहे की नाही आणि असल्यास ही बातमी  कुठल्या पानावर छापावी यासंबंधी आम्हा पत्रकारांत मतभेद होते. बराच काळ वादावादी झाल्यानंतर निवासी संपादक रवी श्रीनिवासन यांनी आपला व्हेटो अधिकार वापराच्या जोरावर ही बातमी पहिल्या पानावर बॉक्स स्वरूपात छापली जाईल असे जाहीर केले. “आफ्टर ऑल, द चाईल्ड इज बॉर्न इन द नेहरू-गांधी फॅमिली!” असे त्यांचे स्पष्टीकरण होते. 
स्वतंत्र भारताच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात नेहरू-गांधी घराण्याने तीन पंतप्रधान दिले आहेत आणि त्यांच्या सत्तेचा एकूण कालावधी जवळजवळ चाळीस वर्षांचा होता. त्याशिवाय सोनिया गांधी यांच्या हातात देशाची सूत्रे दहा वर्षे होती.
प्रियंका गांधी यांची आता काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड झाल्याने भारतीय राजकारणाला निश्चितच नवे वळण मिळणार आहे. यावेळी पहिल्यांदाच नेहरू-गांधी घराण्यातील तीन व्यक्ती एकाच वेळी राजकारणात सक्रिय असताना दिसत आहेत. त्यांच्या आगमनामुळे केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशात राजकीय समीकरणे बदलू शकतात. प्रियंका यांच्या राजकीय क्षेत्रातील अधिकृत आगमनाने पुन्हा एकदा नेहरू-गांधी घराणेशाहीची काही काळ चर्चा सुरू राहिल.   
आपल्या देशात राज्यपातळीवर अनेक घराण्यांनी दीर्घकाळ सत्ता भोगली आहे. तामिळनाडूमध्ये एम. करुणानिधी यांचे कुटुंब आणि नातलग, पंजाबमध्ये सुरजित सिंग बर्नाला यांचे घराणे, ओडिशामध्ये आधी बिजू पटनाईक आणि आता नवीन पटनाईक, हरियाणा येथे देविलाल यांची तिसरी पिढी आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दोन्ही प्रमुख स्थानिक पक्ष दोन घराण्यांतील आहेत. आंध्र प्रदेशात एन. टी. रामा राव यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांच्या  हाती सत्ता आहे. बिहारने दीर्घकाळ लालू घराण्याच्या सत्तेस पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादवांची दुसरी पिढी आली आहे. महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची  तिसरी पिढी राजकारणात स्थिर झाली आहे, तर शरद पवार, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची दुसरी पिढी प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील दुसरे राजकीय वारसदार तर पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या कुटुंबातील तिसरे वारसदार आहेत. त्यामुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि भारतीय मतदारांनी घराणेशाही पूर्णतः स्वीकारली आहे, हे मान्यच करायला हवे. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांत आणि सत्तेत मात्र नेहरू-गांधी घराण्याचाच वरचष्मा राहिला आहे, हेच आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे असे फार तर म्हणता येईल. 
.............................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com