Thursday, October 28, 2021

 'लग्न करताय का तुम्ही दोघे? व्वा, अभिनंदन ! मग लग्नाच्या पूर्वतयारीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे? ‘’

असा प्रश्न ऐकला तर अनेक जण आश्चर्यचकित होण्याची शक्यता आहे. मात्र लग्नाच्या शपथा उच्चारण्यासाठी नवरदेवाने आणि नवरीने हा लग्नाच्या पूर्वतयारीचा अभ्यासक्रम पूर्ण करून तसा दाखला मिळवणे एका समाजघटकातील विवाहोच्छूक युवकां-युवतींसाठी गेली अनेक वर्षे अत्यावश्यक आहे.
लग्नाच्या ` येस, आय डू'' अशा लग्नाच्या आणाभाका घेण्यासाठी बोहोल्यावर पोहोचण्याआधी खरे म्हणजे चर्चच्या वेदीपाशी येण्याआधी लग्न म्हणजे काय, या विधीमुळे नवदाम्पत्यावर येणाऱ्या जबाबदारी वगैरेंचे भान असणे आवश्यक आहे या जाणिवेतून लग्नाच्या पूर्वतयारीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे कॅथॉलिक चर्चने गेली अनेक वर्षे बंधनकारक केले आहे.
असे विवाहाच्या पूर्वतयारीचे कोर्स किंवा मॅरेज प्रिपरेशन कोर्स किंवा कार्यशाळा कॅथॉलिक चर्चतर्फे दरवर्षी वर्षांतून दोनतीनदा जिल्हा किंवा तालुका पातळीवर आयोजित केले जातात आणि त्याबद्दलचे प्रमाणपत्र संबंधित विवाहोत्सुक युवकां-युवतींना सहीशिक्क्यांसह दिले जाते.
या प्रमाणपत्रांच्या आधारेच वधु-वर आणि त्यांचे नातेवाईक मग लग्नाच्या इतर तयारीला लागू शकतात, म्हणजे त्यानंतरच लग्नाची तारीख निश्चित करणे, हॉल, कॅटरिंग बुक करणे वगैरे करु शकतात.
विशेष म्हणजे लग्नाच्या आणाभाका घेण्यासाठी चर्चच्या वेदीपाशी येण्यापूर्वी नवरदेवाला आणि नवरीला अनेक बाबींची पूर्तता करावी लागते आणि त्यापैकी लग्नाच्या पूर्वतयारीचा अभ्यासक्रम हा एक ,महत्त्वाचा नियम आहे. कॅथॉलिक चर्चमध्ये हा नियम गेली अनेक वर्षांपासून लागू असून तो कॅथोलिक समाजाच्या आता अंगवळणी पडला आहे.
`यंदा कर्तव्य आहे’ असे लक्षात आले कि मुलाकडचे आणि मुलीकडचे लोक या लग्न पूर्वतयारीचा अत्यावश्यक कोर्ससाठी नवरदेव आणि नवरीला पाठवून देतात आणि मग लग्नपत्रिका छापणे, लग्नाचा बस्ता बांधणे, दागदागिने विकत घेणे वगैरे लगीनघाईशी संबंधित असलेले वेगवेगळे व्यवहार पूर्ण केले जातात.
पुण्या-मुंबईसारख्या शहरात ऐन लग्नसराईच्या दिवसांत लग्नाची तारीख ठरवायची असली तर मुहूर्त पाहून आणि लग्नासाठी हॉल बुक केल्यानंतरच या मंगलकार्याच्या उभय बाजूंचे लोक इतर तयारीसाठी लागतात. ख्रिस्ती धर्माचा एक प्रमुख पंथ असलेल्या कॅथोलिक समाजात याऐवजी लग्नाच्या पूर्वतयारीची ही कार्यशाळा महत्त्वाची ठरते.
ख्रिस्ती धर्मात लग्नासाठी विशिष्ट लग्नसराईचा हंगाम नसतो, मुहूर्त आणि तिथी पाहण्याचा प्रश्नच नसतो. आपल्याकडे लग्न शाळा-कॉलेजांच्या उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत होतात त्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मियांचीही या काळात तसेच नाताळाच्या दहा दिवसांच्या सुट्टीच्या काळात लग्ने पार पडतात.
ख्रिस्ती लग्नांत देवाणघेवाण, मानपान स्थानिक संस्कृतीनुसार असते. बहुसंख्य वेळेस उभय पक्षांनी आपापला लग्नाचा बस्ता पाहावा असा समझोता असतो. हुंडा घेण्याची प्रथा महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजात नाही हे विशेष. लग्नाचा खर्च - जेवण, हॉल, सजावट आणि संगीत वगैरे - दोन्ही बाजूंनीं निम्मानिम्मा उचलला जातो.
स्थळ पाहण्यास सुरु करण्याआधी किंवा लग्न जुळण्याआधीही काही तरुण-तरुणी हे मॅरेज प्रिपरेशन कोर्स करुन तसे प्रमाणपत्र मिळवतात आणि यथावकाश आपल्या जोडीदाराशी लग्नासाठी चर्चमधील वेदीपाशी पोहोचतात.
बिशप थॉमस डाबरे यांच्या अखत्यारीतील पुणे डायोसिस किंवा धर्मप्रांतातील विवाहोत्सुक तरुणतरुणींसाठी पुण्यातील ताडीवाला रोडजवळील नव साधना पास्टरल सेंटर येथे येथे वर्षांतून तीन किंवा चार वेळेस अशा प्रकारचे लग्न पूर्वतयारीचे अभ्यासक्रम किंवा कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
परगावातून येणाऱ्या तरुणतरुणींसाठी येथे या कार्यशाळानिमित्त राहण्याची सोयसुद्धा केली जाते. या कार्यशाळेचे आणि जेवण्याखाण्याचे शुल्क अर्थात अगदी नाममात्र असते.
या लग्नाच्या पूर्वतयारीच्या कार्यशाळेस उपस्थित राहाण्यासाठी उमेदवार व्यक्तीचा बाप्तिस्मा झाल्याचा दाखला आवश्यक असतो. बाप्तिस्मा हे कॅथोलिक चर्चच्या सप्त स्नानसंस्कारांपैकी म्हणजे सात सांक्रामेंतांपैकी सर्वांत पहिले आणि सर्वाधिक महत्त्वाचे सांक्रामेंत. मूल जन्माला आल्यावर काही आठवड्यातच तिचा/त्याचा चर्चमध्ये बाप्तिस्मा होऊन त्यावेळी नाव दिले जाते. नामकरण विधी असतो तो.
त्याशिवाय बाप्तिस्मा दाखला म्हणजे एक प्रकारचे ख्रिस्ती लोकांचे `आधारकार्ड’च असते, ते इतर सांक्रामेंतांसाठी म्हणजे कम्युनियन आणि लग्नविधी वगैरेंसाठी द्यावे लागते, त्याशिवाय चर्चच्या विविध संस्थांतर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळांत - कॉन्व्हेंट शाळांत - प्रवेश घेण्यासाठी मुलांमुलींचे बाप्तिस्मा दाखले गरजेचे असतात.
वैवाहिक जोडीदार, लग्न ठरण्याआधीच तरुण आणि तरुणी विवाहाच्या पूर्वतयारीचा अभ्यासक्रम पूर्ण करून तसा दाखला मिळवून ठेवू शकतात. लग्न ठरल्यावर नवरदेव आणि नवरी आपापल्या गावांत, शहरांत या कार्यशाळेत हजर राहू शकतात.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शक्य असल्यास विवाहोत्सुक मुले आणि आणि मुली यांनी दोघांनी एकत्रितरित्या हा अभ्यासक्रम पूर्ण करावा अशी कॅथोलिक चर्चची अपेक्षा असते. अनेकदा लग्न पूर्वतयारीच्या या कार्यशाळेच्या निमित्ताने पहिल्यांदाच नवरामुलगा आणि नवरी यांना परस्परांना भेटण्याची, एकमेकांशी मनमोकळेपणे संभाषण करण्याची संधी मिळत असते, हा या कार्यशाळेचा सर्वांत महत्त्वाचा फायदा असतो.
मागच्या वर्षाअखेरीस माझ्या मुलीचे लग्न ठरले तेव्हा पुण्यात कोविड साथीमुळे पुणे धर्मप्रांतातर्फे होणारे मॅरेज प्रिपरेशन कोर्स स्थगित ठेवण्यात आले होते. मुलाच्या गावी मात्र हे कोर्स आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे आदिती आणि तिच्या भावी पतीने तिकडेच हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तसा दाखला मिळवून नंतरच त्यांचे लग्न पार पडले.
पुणे कॅथोलिक धर्मप्रांतातर्फे दरवर्षी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून मॅरेज प्रिपरेशन कोर्सेस आयोजित केले जातात. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी तातडीचा उपाय म्हणून ऑनलाईन विवाहाच्या पूर्वतयारीची कार्यशाळा आयोजित करण्याची तयारी चालू आहे.
या लग्नाच्या पूर्वतयारीच्या कार्यशाळेत नेमके काय शिकवले जाते याविषयी संबंधित तरुण-तरुणीबरोबरच इतरांनाही उत्सुकता असणे साहजिकच आहे. या कार्यशाळेत लैगिक शिक्षण दिले जाते, लग्न टिकविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबींविषयी या तरुणांना माहिती दिली जाते.
उदाहरणार्थ, आपल्या वैवाहिक जोडीदारास समजवून घेणे, आपल्या जोडीदाराची बलस्थाने आणि कमकुवतपणा दोन्ही समजावून घेऊन त्यानुसार त्याचा' तिचा स्वीकार करणे, वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणण्याची तयारी ठेवणे, तडजोड करणे वगैरे बाबींविषयी ह्या अभ्यासक्रमात विवाहोत्सुक उमेदवारांत जागृती निर्माण केली जाते.
या दोन किंवा तीन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेत विवाहाशी संबंधित विविध क्षेत्रांतील तज्ज्ञमंडळींना व्याख्याते म्हणून बोलाविले जाते. या तज्ज्ञांमध्ये अर्थातच पुरुष आणि महिला प्रसूतीतज्ज्ञ डॉकटर असतात, वैवाहिक जीवन जगणारे म्हणजे प्रापंचिक, संसारी स्त्री-पुरुष समुपदेशक असतात.
कॅथोलिक चर्चतर्फे ही समुपदेशाची कार्यशाळा आयोजित केली असल्याने आदर्श ख्रिस्ती कुटुंबाची शिकवण देणारे फादर म्हणजे धर्मगुरु आणि सिस्टर म्हणजे नन्स सुद्धा या कार्यशाळेत व्याख्याने देतात.
यापैकी प्रत्येक तज्ज्ञ आपल्या खास विषयांना धरुन जमलेल्या तरुण- तरुणींना नींना वैवाहिक जीवनाची पूर्वतयारी करण्यास आपल्यापरीने मदत करत असतो.
या कार्यशाळेदरम्यान स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ञ पुरुष आणि महिला डॉकटर उपस्थित युवक-युवतींना मानवी शरीरशास्त्राची माहिती देतात. यात पुरुष आणि स्त्रियांची प्रजनन इंद्रिये, महिलांची मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता, स्त्री-पुरुषाच्या मिलनातून निर्माण होणार गर्भ वगैरे म्हणजे प्रजननप्रक्रियेची माहिती दिली जाते.
अनेकदा बऱ्याच युवक-युवतींमध्ये लैगिक ज्ञानाचा अभाव असतो, अनेक गैरसमज, भयगंड असतात, त्यामुळे लग्नाच्या सुरुवातीच्या काळात खूप समस्या निर्माण होऊ शकतात. अशा लग्नपूर्वतयारीच्या कार्यशाळेमुळे मानवी शरीराविषयी वैज्ञानिक ज्ञान मिळते आणि तरुणतरुणी आपले वैवाहिक जीवन आत्मविश्वास पूर्वक सुरु करू शकतात.
डॉक्टर्स आणि स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्याकडून प्रजनन विषयाची माहिती आणि फादर आणि सिस्टर्स यासारखे संन्यासी आणि धार्मिक जीवन जगणाऱ्यांकडून विवाहाविषयी धार्मिक आणि नैतिक बाबी ऐकून घेतल्यानंतर विवाह आणि लैगिक जीवन याविषयी खरेखुरे तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींकडून भावी दाम्पत्यांचे समुपदेशन केले जाते.
विवाहित आणि मातापिता असणारे स्त्रीपुरुष यापेक्षा वैवाहिक जीवनावर अधिकारवाणीने इतर कोण बोलू शकणार आहे? त्यामुळे या विवाहपूर्व कार्यशाळेत काही विवाहित स्त्री-पुरुष विवाहाच्या आणि लैगिक जीवनाच्या विविध बाबींविषयी जमलेल्या तरुण आणि तरुणींना मार्गदर्शन करतात.
या कार्यशाळेचे हे सत्र विशेष महत्त्वाचे असते, याचे कारण उपस्थित तरुणतरुणी या तज्ज्ञांना विविध प्रश्न विचारतात आणि त्यांनी दिलेली उत्तरे यदाकदाचित धार्मिक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या विचारांशी आणि मतांशी विसंगतही असू शकतात. उदाहरणार्थ, कुटुंब नियोजन आणि गर्भनियोजनाची साधने यांचा वापर, तसेच सुखी लैगिक जीवनाची गुरुकिल्ली वगैरे.
ग्रामीण भागातील आणि अल्पशिक्षित तरुण-तरुणींना तर याप्रकारच्या लैगिक शिक्षणाची आणि शरीरशास्त्र विषयाची माहितीची प्रचंड गरज असते. स्वप्नदोष, हस्तमैथुन, मासिक पाळी, गर्भधारणा प्रक्रिया याविषयी तज्ज्ञांकडून पहिल्यांदाच त्यांना विज्ञानाशी सुसंगत अशी माहिती मिळत असते. यांपैकी अनेक जणांना विशेषतः मुलींना लैगिक विषयांचे कुठल्याच पातळीवर कधी एक्सपोझर झालेले नसते. त्यामुळे या विषयांबद्दल खूप गैरसमज किंवा भितीही असते.
कॅथोलिक चर्च आजतागायत निरोध, गर्भधारणविरोधी गोळ्या वगैरे `कुत्रिम' गर्भनियोजनांची साधने यांचा अधिकृतरित्या पुरस्कर करत नाही. निरोध वगैरे साधने वापरण्याऐवजी विवाहित दाम्पत्यांनी नैसर्गिकरित्या म्हणजे स्त्रियांच्या मासिक पाळीचे चक्र लक्षात घेऊन शरीरसंबंधांसाठी काही विशिष्ट दिवस टाळून कुटुंब नियोजन करावे असे चर्चचे अधिकृत म्हणणे आहे.
असे असले तरी चर्चच्या या गर्भनियोजनाच्या निरोध वगैरे साधनांविरोधी मताकडे चर्चला नियमितपणे जाणारी भाविक मंडळीसुद्धा सर्रास कानाकोडा करतात आणि हल्ली चर्चसुद्धा याबाबत आग्रही भूमिका घेत नाही.
गर्भपाताविरोधी मात्र कॅथोलिक चर्चने अत्यंत कडवी भूमिका घेतली आहे. जगभर अगदी कॅथोलिक लोकसंख्या बहुमताने असलेल्या देशांत गर्भपातास कायदेशीर मान्यता दिलेली असली तरी याबाबत जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट सोळावे आणि सद्याचे पोप फ्रान्सिस यांनी चर्चची पारंपरिक गर्भपातविरोधी भूमिका चालू ठेवली आहे.
तीच गोष्ट समलिंगी संबंध आणि समलिंगी विवाह याबाबतीत आहे. काही प्रॉटेस्टंट चर्चेसमध्ये समलिंगी संबंध ठेवणाऱ्या धर्मगुरुंनी आणि काही बिशपांनीसुद्धा आपली लैगिक ओळख जगापुढे स्पष्ट केली आहे आणि त्यामुळे त्यांचे धर्मगुरुपद धोक्यात आलेले नाही.
लग्नाच्या पूर्वतयारीची ही कार्यशाळा संपल्यानंतर उपस्थितांना त्याबद्दल प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र संबंधित तरुणतरुणींनी आपापल्या स्थानिक परिसरातल्या चर्चच्या धर्मगुरुंकडे दिले कि मग चर्चमध्ये त्यांच्या लग्न लावण्याचा मार्ग मोकळा होतो.
त्यानंतर या लग्नाची तीन आठवडे चर्चमध्ये जाहिर घोषणा केली जाते, चर्चच्या सूचनाफलकांवर या नियोजित लग्नाची नवदाम्पत्याच्या फोटोसह माहिती दिली जाते आणि या लग्नाबाबत कुणाचे आक्षेप नसल्यास सुटाबुटातला नवरदेव आणि पांढरा गाऊन नेसलेली नवरी लग्नाच्या शपथा घेतात.
लग्नाच्या वेळी वेदीवर वधु आणि वर एकमेकांना ''मी तुला सुखदुःखात, आजारपणात मरेपर्यंत साथ देईल'' अशा शपथा घेत असतात, त्यावेळी धर्मगुरुच्या प्रश्नांवर . ``यस, आय विल !'' असे उत्तर द्यावे लागते. तुमचे कुणी मित्र वा सहकारी ख्रिस्ती धर्मीय असतील तर या शपथा ऐकण्यासाठी, ख्रिस्ती लग्नाचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबांतील व्यक्तींच्या लग्नास तुम्ही हजर राहिले पाहिजे.
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात अशी इंग्रजीतील एक म्हण आहे. त्याशिवाय `जे देवाने जोडले आहे ते मानवाने तोडू नये’ असे बायबलमधले एक वचन आहे. अगदी गेल्या काही दशकांपर्यंत कॅथोलिक चर्चमध्ये घटस्फोटाला मान्यता मिळणे अगदी दुरापास्त असायचे. कॅथोलिक चर्चचे कामकाज ज्या कायद्यानुसार चालते त्या कॅनन लॉमध्ये विवाहित दाम्पत्यांला अलिकडे काही ठराविक कारणांखाली घटस्फोट मिळणे शक्य झाले आहे.
कॅथोलिक चर्चतर्फे राबविल्या जाणाऱ्या या विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळेचा उद्देश वैवाहिक जीवन सफल व्हावे, वैवाहिक जोडीदारांमध्ये प्रेम असावे आणि त्यांनी परस्परांना आदराने वागवताना आपल्या अपत्यांचेही चांगले संगोपन करावे असा आहे. दुदैवाने महाराष्ट्रातील अनेक कॅथोलिक कुटुंबांमध्ये याच्या अगदी उलट चित्र दिसते. काही वर्षांपूर्वी पुणे धर्मप्रांतामार्फत हाती घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार घटस्फोटांचे प्रमाण कॅथोलिक कुटुंबांमध्ये इतरधर्मिय कुटुंबांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.
अर्थात या मोठया प्रमाणावरील घटस्फोटांची कारणे अनेक आहेत. ख्रिस्तीधर्मियांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे, त्याबरोबरच महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाचे प्रमाणही खूप आहे. त्यामुळे पटत नसलेल्या पतीपासून विभक्त राहंण्याचा या महिला निर्णय घेऊन शकतात.
या घटस्फोटांची कारणे काहीही असली तरी कॅथोलिक समाजात विवाहाच्या पूर्वतयारीसाठी असलेली ही कार्यशाळा प्रथा अत्यंत उल्लेखनीय आहे यात वादच नाही. इतर कुठल्याही समाजात, धर्मांत अशा प्रकारचे मॅरेज प्रिपरेशन कोर्सचे आयोजन वा अशाप्रकारचे समुपदेशन केले जात नाही. अशा प्रकारचे लैगिक शिक्षण आणि समुपदेशन खरे तर समाजाच्या सर्वच घटकांतील तरुण-तरुणींना मिळायला हवे.
मागील पंधरवड्यात मुंबईतील पत्रकारमित्र शेखर देशमुख याने आपल्या 'मुक्त संवाद' पाक्षिकासाठी ख्रिस्ती समाजाविषयी वेगळी माहिती देणाऱ्या लेखाची मागणी केली. तेव्हा या समाजपुरताच मर्यादित पण नाविन्यपूर्ण असलेल्या मॅरेज प्रिपरेशन कोर्सबाबत हा लेख लिहून झाला.
काल १ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात बोलताना केरळच्या माजी आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी अशाप्रकारचे लग्नापुर्वीच्या समुपदेशन सक्तीचे करण्यात यावे अशी सूचना केली आहे. नवदाम्पत्त्यामध्ये चांगले परस्परसंबंध निर्माण होण्यासाठी आणि घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी युवक-युवतींना असे मार्गदर्शन देण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या.
पोप जॉन तेविसावे यांनी १९६०च्या दशकात आयोजित केलेल्या आणि त्यांच्या निधनानंतर पोप पॉल सहावे यांनी समारोप केलेल्या ऐतिहासिक दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलने चर्चमध्ये प्रागतिकतेचे वारे सुरु केले. चर्चच्या विधींमध्ये आणि प्रार्थनांत लॅटिनऐवजी स्थानिक भाषांचा वापर हे त्यापैकी एक महत्त्वाचे पाऊल.
दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलने चर्चच्या खिडक्या पहिल्यांदाच खुल्या केल्या आणि त्यामुळे चर्चमध्ये सुधारणांचे मोकळे वारे वाहू लागले.
''Open the windows, Let the fresh air come in ! '' दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलच्या उदघाटनाच्या वेळी पोप जॉन तेविसावे यांचे हे ऐतिहासिक उद्गार.
या उद्गारामुळे आजही चर्चमध्ये शतकोनुशतके बंद असलेल्या एकएक खिडक्या उघडून नव्या ताजेपणा आणणाऱ्या, उत्साहित करणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकांचे स्वागत केले जाते. युवकांसाठी विवाहपूर्व लैगिक शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच कुटुंबसंस्था याबाबत समुपदेशन हा संपूर्ण जगभरचा कार्यक्रम चर्चमधील प्रागतिकतेच्या मोहिमेचाच एक भाग आहे.
-------



No comments:

Post a Comment