Thursday, October 28, 2021

 मराठी पत्रकारितेत मुसलमान

A celebration in Sakal Times

फार वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटांत वेगवेगळया रसांसाठी अनेक छोटेमोठे नटनटया लागायाच्या, विनोदासाठी मेहमूद, लठ्ठ टुणटुण, सुंदर, मुक्री, वगैरे नट असायचे करुण रसासाठी रडणाऱ्या कामिनी कौशल सारख्या आयाबहिणी असायच्या, वीररसासाठी नायकाची यथेच्छा पिटाई करणारा आणि नंतर मार खाणारा खलनायकाचा नोकर शेट्टी असायचा, कॅबरे डान्स करणारी हेलेनसारखी गोवन किंवा ईस्ट इंडियन ख्रिश्चन असायची. केश्तो मुखर्जी, शरद तलवळकर,ललिता पवार, बिंदू, अरुणा इराणी, रणजित, डेव्हीड, के एन सिंग, ओम प्रकाश, सुजित, जॉनी वॉकर वगैरेसाठी खास ठरलेल्या भूमिका विविध चित्रपटांत असायच्या. सर्व धर्माच्या, प्रांतांच्या, संस्कृतींना या चित्रपटांत थोड्याबहुत प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायचे. असा संच असला कि मगच चित्रपटाची भट्टी जमायची आणि प्रेक्षक व त्त्यांच्यासह निर्माते खूष व्हायचे.

मी गोव्यात 'नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात बातमीदार म्हणून 1981ला रुजू झालो, मांडवीच्या काठावर पणजी मार्केटशेजारी एकमजली कौलारी गोमंतकीय शैलीच्या बाल्कनी असलेल्या आमच्या ऑफिसच्या इमारतीत नवप्रभा हे मराठी जुळे दैनिक होते. आमच्या इंग्रजी दैनिकाचे खास कल्चर होते आणि नवप्रभा मराठी दैनिकाची वेगळी संस्कृती होती.
इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र दैनिकांची ही संस्कृती अखिल भारतीय पातळीवर समान स्वरुपाची होती, राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी आणि व्हर्नांक्युलर किंवा प्रादेशिक असे हे विभाजन असायचे हे मी वृत्तपत्र कामगार चळवळीच्या निमित्ताने आणि माझ्या परदेश दौऱ्यांच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर पोहोचलो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवले.
इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांतील दैनिकांतील आणि नियतकालिकांतील ही संस्कृती आणि विविध भूमिकांचा संच मला भारतीय किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध भुमिकांची आणि पात्रांची वेळोवेळी आठवण करुन द्यायचा.
उदाहरणार्थ, टाइम्स ऑफ इंडियाच्या (बेनेट कॉलेमान ) ग्रुपच्या मारिओ मिरांडाच्या व्यंगचित्रांत आणि हिंदी चित्रपटांत बॉसची पीए किंवा डिक्षेशन घेणारी टायपिस्ट नेहेमी फ्रॉकवाली गोवन तरुणी असायची, देशातल्या इंग्रजी दैनिकांत डिट्टो हिच स्थिती असायची. मराठी संपादकांच्या नशिबी हे नसायचे.
आमचे वृत्तपत्र गोव्यात असल्याने साहजिकच गोवन ख्रिस्ती आणि हिंदू कर्मचारी बहुसंख्येने होते. त्याशिवाय
इंग्रजी वृत्तपत्रांत त्याकाळात किमान एकदोन दाक्षिणात्य म्हणजे नायर, जोसेफ, मेनन, मॅत्थू या नावाचे संपादकीय आणि छपाई वगैरे विभागांत कर्मचारी असायचेच. मूळचा नागपूरचा असलेला प्रभाकर झाडये हा माझा सहकारी नेहेमी म्हणायचा... "कामिल, रिमेम्बर, नो इंग्लिश न्यूजपेपर कॅन बी कंप्लेंट अनलेस देर आर मेनन्स, नायर्स, रॉय ऑर जोसेफ्स....''
त्याच्या म्हणण्यात खूप तथ्य होते हे माझ्या लक्षात आले. नंतरच्या काळात इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांबरोबर बंगाली लोकांची हजेरी आवश्यक ठरली.
गोव्यात 1970 च्या दशकातील हे मी वर्णन करतो आहे. त्याकाळात गोमंतकात आजच्या इतका भायलोंचा म्हणजे बाहेरच्या लोकांचा भरणा झाला नव्हता, पर्यटक पाहुण्यांसारखे यायचे आणि तसेच लगेच परतायचे. स्थानिक लोक आपापसांत कोकणी, पोर्तुगीज, मराठी आणि इंग्रजी बोलायचे, बाहेरच्यांशी हिंदी आणि इंग्रजीचा वापर व्हायचा.
पणजीला 18th जून रोडवर पणजी चर्चच्या जवळ माझ्या एका शीख मित्राचे 'शेर-इ -पंजाब' हॉटेल होते आणि त्याच रस्त्यावर जुन्ता हाऊसशेजारी गुजरात हॉटेल होते ही दोन हॉटेल्स बाहेरच्यांच्या विशिष्ट चवीच्या जेवणाची काळजी घेत असत. आझाद मैदानापाशी 'कासा फर्नांडिस' या दुकानाशेजारी शानबाग हे पणजीतील तेव्हाचे एकमेव उडुपी हॉटेल होते.
आमचे नवहिंद टाइम्स हे गोवा मुक्तीनंतर सुरु झालेले आणि टिकलेले इंग्रजी दैनिक, गोमंतक हे असेच मराठी दैनिक. आमचे हे इंग्रजी दैनिक ख्रिस्ती आणि इंग्रजाळलेल्या वाचकांमध्ये लोकप्रिय आणि गोमंतक हे मराठी वाचणाऱ्या हिंदू वाचकांमध्ये लोकप्रिय.
आपापल्या वाचकांच्या कलानुसार आणि आवडीनुसार या मराठी आणि इंग्रजी दैनिकांच्या बातम्या आणि संपादकीय भूमिका असायचा. पोर्तुगीज भाधेतून प्रसिद्ध होणारे 'ओ हेराल्डो' या काळात इंग्रजीतून प्रसिद्ध होऊ लागले आणि आपल्या वाचकांना म्हणजे ख्रिश्चंनांना धार्जिन अशा बातम्या आणि धोरणे स्वीकारू लागले. उदाहरणार्थ, मराठी कोकणी वादात कोकणी भाषेला अनुकूल, तर गोमंतक दैनिक मराठीस अनुकूल अशी सरळसरळ विभागणी असायची.
अशीच गोष्ट फार पूर्वी म्हणजे गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याच्या मुद्द्यावर गोव्यात i(भारतातले आतापर्यतचे एकमेव सार्वमत ) झालेल्या 1967 सालच्या सार्वमतात झाली होती. त्यावेळी गोयेंकरांनी गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यास ठाम नकार दिला होता.
या दोन्ही इंग्रजी आणि मराठी दैनिकांमध्ये संस्कृतीचा एक समान धागा होता, तो म्हणजे या दोन्ही दैनिकांचे संपादक भायले म्हणजे बिगरगोमंतकीय असायचे. माधव गडकरी, नारायण आठवले हे गोमंतकचे नावाजलेले संपादक आणि त्र्यंबक पर्वते, मेनन, बिक्रम व्होरा, मुदालियार वगैरे 'नवहिंद टाइम्स'चे संपादक. तसेच राजन नारायण हे हेराल्डचे संपादक.
अगदी अलिकडे एकदोन महिन्यांपूर्वी गोमंतकीय पत्रकार राजू बी. नायक यांनी 'गोमंतक'चे संपादक म्हणून सूत्रे घेतली तेव्हा अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी ही जुनी अनिष्ट परंपरा खंडीत केल्याबद्दल त्यांचे
अभिनंदन
केले होते.
या मराठी वृत्तपत्रांत साहजिकच मराठी आणि कोकणी बोलणारे हिंदू पत्रकार आणि इतर कामगार असत आणि इंग्रजी वृत्तपत्रांत अर्थातच पोर्तुगिजचे जुजबी ज्ञान असलेले, कोकणी आणि इंग्रजी बोलणारे ख्रिश्चन असत. गोव्यात सरकारी पातळीवर मराठी आणि देवनागरी भाषा जाणणारे बातमीदार
केवळ हिंदू असायचे त्यामुळे आमच्या नवहिंद टाइम्समध्ये दोन्ही बातमीदार हिंदूच होते. (गोव्यात मराठी आणि कोकणी न समजता पत्रकारिता करणे अवघड आहे,)
गंमत म्हणजे इंग्रजी वृतपत्रे ख्रिस्ती वाचकांमध्ये वाचली जाणार आणि या ख्रिस्ती वाचकांच्या चालीरिती संस्कृतीचे चित्रण हिंदू बातमीदार किती प्रभावीपणे करणार? उदाहरणार्थ, ख्रिसमस, कार्निंव्हाल, लेंट म्हणजे उपवासकाळ, सान जाव फेस्त या पारंपरिक सणांची कॅथोलिक धर्मातील पार्श्वभूमी आणि महत्व आजही गोव्यात काम करणाऱ्या हिंदू बातमीदारांना माहित असेल असे मला वाटत नाही
मी नवहिंद टाइम्सला जॉईन झालो आणि पहिल्यांदा मी ही धार्मिक, सांस्कृतिक, प्रादेशिक आणि भाषिक कोंडी फोडली. मी मराठी भाषिक असलो तरी कॅथोलिक. मी मराठी, कोकणी आणि इंग्रजीत बोलायचो, हिंदुप्रमाणेच कोकणी देवनागरी लिपीत लिहायचो आणि वाचायचो आणि ख्रिस्ती लोकांप्रमाणे कोकणी रोमन लिपीत लिहायचो, वाचायचो.
या माझ्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचा गोव्यात बातमीदार म्हणून दोन्हीं समाजांतील विषयांच्या बातम्या देण्यास मदत झाली. माझ्यासारखे असे बहुधार्मिक, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक व्यक्तिमत्व गोव्यातील तेव्हाच्या पत्रकारांमध्ये फक्त जॉन आगियर यांचेच होते.
गोव्यातून औरंगाबादला लोकमत टाइम्सला जॉईन झालो तेव्हा तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणाची नव्याने ओळख झाली. इथे हिंदु बहुसंख्य असले तरी आंबेडकरी जनतेचे महत्व आणि अस्तित्व सातत्याने जाणवायचे, तीच बाब मुसलमान समाजाची. आणि याचे प्रतिबिंब आमच्या पत्रकारितेत दिसायचे.
आमच्या 'लोकमत टाईम्स'मध्ये मुस्तफा आलम या माझ्या मित्रासह तीन मुसलमान बातमीदार होते, संपादकांचा पीए मुसलमान होता, मराठी दैनिकांत दलित, बहुसंख्य समाजाला प्रतिनिधित्व होते, त्याशिवाय उर्दू दैनिके अनेक होती, त्यातून अल्पसंख्य समाजाच्या बातम्या यायच्या, त्या समाजाची अनेक पोरं पत्रकारितेच्या व्यवसायात आलेली मी पाहिली. आज इंग्रजी पत्रकारितेत ही मंडळी मोठ्या हुद्यावर आहेत. औरंगाबादचे आताचे खासदार आणि पूर्वीचे आमदार इम्तियाज जलील हेसुद्धा काही वर्षांपूर्वी पुण्यात न्यूज चॅनलमध्ये पत्रकार होतेच. आमच्या इंग्रजी दैनिकात आधी म्हटल्याप्रमाणे दाक्षिणात्य आणि गोवन ख्रिश्चन अर्थातच होतेच.
एक वर्षातच औरंगाबाद सोडून पुण्याला इंडियन एक्स्प्रेसला जॉईन झालो. इथल्या इंग्रजी दैनिकांत म्हणजे पूना हेराल्ड (नंतरचे महाराष्ट्र हेराल्ड ) येथे 'अमर अकबर और अँथनी ' या नावाने ओळखले जाणारे व्ही. कृष्णमूर्ती, ताहेर शेख आणि हॅरी डेव्हीड हे स्थानिक पत्रकारितेतले अत्यंत प्रस्थापित त्रिकुट होते.
पुण्यातल्या इंग्रजी वृत्तपत्र सृष्टीत राष्ट्रीय पातळीप्रमाणेच सर्वसमावेशक धार्मिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक समतोल राखला जायचा. इथे नावावरून किंवा आडनावावरून जातीविषयक काहीही बोध होत नसायचा, त्यामुळे जात चोरण्याची कुणाला गरज भासत नसायची. मुस्लीम समाजातील लोक बातमीदारीत आणि न्यूज डेस्कवर लक्षणीय प्रमाणात असायची आणि आजही आहेत. त्
या सर्वसमावेशकतेंमुळे दिवाळी, दसरा, पवित्र रमजान महिना, नवरात्री उत्सव, ख्रिसमस, गुड फ्रायडे, पोंगल, बैशाखी, ओणम वगैरे सर्व सणांना बातम्यांत व्यवस्थित स्थान, प्रतिनिधित्व मिळायचे आणि या सणांबाबत कुठलाही सावळा गोंधळं नसायचा.
उदाहरणार्थ, गुड फ्रायडे ला वाचकांना इतर सणांसारख्या 'हॅपी गुड फ्रायडे' च्या शुभेच्छा द्यायच्या नसतात! मात्र हॅपी ईस्टर म्हणता येईल, हे तारतम्य इथे पाळले जायचे.
गोव्यात, औरंगाबादला आणि पुण्यात नवहिंद टाइम्स, लोकमत टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि अलिकडे सकाळ ग्रुपच्या 'महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स' या सर्व इंग्रजी दैनिकांत कितीतरी मुस्लिम सहकाऱ्याबरोबर मी काम केले आहे, त्यापैकी काही बॉस तर इतर सहकारी वा ज्युनियर होते. त्याशिवाय दोन महिला बॉस पारशी होत्या.
या चार दशकांच्या कालावधीत मराठी पत्रकारितेत मुसलमान समाजातील तरुणांचे अस्तित्व मात्र मला फारसे जाणवले नाही हे आता प्रकर्षाने लक्षात येत आहे.
पुण्यातील इंग्रजी पत्रकारितेत स्थानिक म्हणजे मराठी मुस्लीम स दिसतात तसें मराठी वृत्तपत्र व्यवसायात मुस्लीम समाजातील पत्रकार दिसत नाहीत. मुंबईत वा राज्याच्या इतर शहरांत काय स्थिती आहे हे मला माहित नाही.
मुंबई आणि इतर शहरांत मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेत इथल्या म्हणजे मराठीभाषक वसई. पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद वगैरे ठिकाणच्या ख्रिस्ती समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे हे मात्र मला माहित आहे.
तर मग अल्पसंख्यांकामध्ये सर्वाधिक संख्येने असलेल्या या मुस्लीम समाजाच्या प्रश्नांचे, भावनांचे आणि संस्कृतीचे प्रतिबिंब मराठी वृत्तपत्र सृष्टीत उमटत असते कि नाही? मागे एकदा कुठल्या तरी लेखात "मुस्लिम मनाचा कानोसा '' अशा पद्धतीच्या शिर्षकाच्या सदरांचा कुणीतरी खरपूस समाचार घेतलेला आठवतो.
कानोसा??
धार्मिक पातळीवर कुठल्याही उद्योगक्षेत्राकडे वा व्यवसायाकडे पाहिले जाऊ नये हे योग्यच आहे. मात्र अशी काही स्थिती असेल तर त्याची कारणेही शोधली गेली पाहिजेत.
वृत्तपत्रे समाजाचा आरसे असतात, त्यात सर्वच समाजघटकांचे प्रतिबिंब पडायला हवे.


No comments:

Post a Comment