मुंबई -गोवा मार्गावरच्या आगबोटीची, स्टिमरची सेवा
साधारणतः याच काळात म्हणजे पावसाळा संपल्यानंतर दसरा सण झाल्यावर अणि दिवाळीच्या आधी गोव्यात मिरामार समुद्रकिनाऱ्यावर सकाळी नऊच्या दरम्यान त्या हंगामाचा आगबोटीचा पहिला भोंगा कानावर पडायचा. खुपदा दोन ऑकटोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त या मुंबई -गोवा मार्गावरच्या आगबोटीची म्हणजे स्टिमरची सेवा सुरुवात करण्यासाठी असायचा. मिरामारला धेम्पे कॉलेजला त्याकाळात म्हणजे 1970च्या दशकात आमचे हायर सेकंडरीचे क्लासेस सकाळीच असायचे, त्यामुळे आगबोटीचा हा भोंगा हमखास कानावर यायचा.
मुंबईतून बहुधा त्या प्रसिद्ध भाऊच्या धक्क्यातून आदल्या दिवशी सकाळी धूर सोडीत निघणारी ही आगबोट बरोबर चोवीस तासांनंतर मिरामारला आम्हा कॉलेज विद्यार्थ्यांच्या नजरेस पडायची. मिरामार बिचपासून पणजीतल्या ऐतिहासिक आदिलशाह पॅलेसापाशी म्हणजे तेव्हाच्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय आणि मंत्रालयापाशी असलेल्या पणजी जेटी किंवा धक्का केवळ एकदिड किलोमीटर अंतराचा. मात्र अरबी समुद्राची हद्द संपवून मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी मांडवीच्या मुखात प्रवेश करण्याआधी या आगबोटीचा भोंगा वाजायचा तो आपल्या आगमनाची केवळ सूचना देण्यासाठी.
याचे कारण म्हणजे मुंबई सोडल्यापासून भर समुद्रात वेगाने आगेकूच करणाऱ्या या स्टिमरची पुढची मार्गक्रमणा मिरामारपाशी एकदम टप्प व्हायची. मिरामार येथे मांडवी नदी अरबी समुद्रात विलीन होते, त्यामुळे या ठिकाणी अरबी समुद्रासारखे खोल पाणी नसते.
दर चोवीस तासांत समुद्राच्या दोन भरती अन दोन ओहोटी असतात, म्हणजे दर सहा तासांनंतर एकतर भरतीला किंवा ओहोटीला सुरुवात होत असते. समुद्रकाठी अनेक वर्षे काढलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला समुद्राच्या लाटांकडे पाहूनच किंवा समुद्राच्या पाण्यात शिरताक्षणी त्यावेळी भरती कि ओहोटीची सुरुवात आहे हे कळत असते.
अनेकदा ओहोटीच्या काळात मांडवी समुद्रात विलीन होते त्या जागी म्हणजे मिरामार आणि नदीच्या पलिकडच्या बाजूच्या ऐन मध्यभागी वाळूचे मोठे बेट तयार होऊन तेथे जमीन वर आल्याचा भास निर्माण व्हायचा. त्या वाळूच्या बेटावर जाण्याचा मूर्खपणा करायचा नसतो हे मी कधीच शिकलो होतो.
तर मुंबईहून ही आगबोट निघाल्यावर आपल्या त्या दिवसाच्या शेवटच्या धक्क्यावर पोहोचण्याआधी पणजीचा तो धक्का अगदी जवळ असूनही या बोटीला नांगर टाकणे भाग पडायचे. याचे कारण म्हणजे या काळात ओहोटीची सुरुवात झालेली असायची वा ओहोटी अजून संपलेली नसायची. कारण काहीही असले तरी खोल समुद्रातून मिरामार बिचवर आल्यावर वेळ न दवडता लगेच पणजी धक्क्याकडे ही बोट आली असा अनुभव मला कधीच आला नाही.
मुंबई ते गोवा व्हाया वेंगुर्ला वगैरे बंदरांवरून येणारी ही स्टीमर किंवा आगबोट सेवा 1970च्या दशकात आणि त्याआधी खूप लोकप्रिय होती. कोकणात तोपर्यंत रेल्वे पोहोचली नव्हती आणि मुंबई -गोवा रोडने प्रवास करण्यासाठी त्याकाळात फारशा एसटी आणि खासगी बसेस नसायच्या. त्या काळच्या रस्त्यांच्या स्थितीबद्दल तर न बोललेलेच बरे. आजच्यासारखी लोकांकडे स्वतःची कारसारखी वाहने नसायची. त्यामुळे मुंबईहून गोव्याला आणि गोव्याहून मुंबईला कुटुंबासह आणि पोते आणि जाडजूड लोखंडी पेट्यांसह प्रवास करणाऱ्यांसाठी ही आगबोट सेवा स्वस्त आणि सोयिस्कर असायची.
पावसाळा सुरु होण्याआधी काही दिवस म्हणजे मे महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात या बोटसेवेचा त्या हंगामातला शेवटचा भोंगा वाजायचा.
मी मूळचा मराठवाड्यातला, औरंगाबाद जिल्ह्यातला, बालपण अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथे घालवले असल्याने दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीचे पात्र मी कधी पाहिले नव्हते. आता तर मिरामारला समुद्रकाठीच राहायला आलो होतो. दररॊज सकाळी समुद्राच्या खोल पाण्यात हेलकावे खात असूनमधून भोंगा वाजवणाऱ्या ओहोटी संपून पाण्यातून पुढे जाण्यासाठी वाट पाहणाऱ्या त्या आगबोटीकडे मी नवलाने पाहत असायचो.
मात्र आगबोटीची ही प्रतिक्षा फार तर एकदोन तासांची असायची, सकाळी अकराच्या आसपास ही बोट पणजीला धक्क्याला लागायची आणि पाहुणे मुंबईकरांची आणि मुंबईहून परतणाऱ्या गोयेंकारांची सामनासह पाण्यातला प्रवास संपवून जमिनीवर पाय ठेवण्यासाठी अक्षरशः झुंबड उडायची. टायटॅनिक सिनेमा पाहिलेल्या लोकांसमोर मी वर्णन करतो तें चित्र आतापर्यंत उभे राहिले असेलच.
याकाळात उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या सीमेवर असलेल्या आगाशी आणि कोर्ताली येथे झुआरी नदीवर पूल नव्हता. त्यामुळे दोना पावला येथून मोर्मुगांव येथे लाँचने जाऊन तेथून वोस्को शहरात जाणे सोयिस्कर असायचे. या सततच्या प्रवासाने खोल समुद्रातून लाँचने म्हणजे बोटीने प्रवास करणे म्हणजे काय याची थोड्याफार प्रमाणात मला कल्पना होती. तरीसुद्धा एकदा तरी बोटीच्या डेकचा अनुभव घ्यावा, काही तास तरी खोल समुद्रात बोटीने जाऊन यावे असे वाटायचेच.
काही वर्षांनी नवहिंद टाइम्सचा डिफेन्स बिटचा बातमीदार या नात्याने भारतीय नौदलाने पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत एका युद्धानौकेवर राहून कारवारपासून दूर असलेल्या खोल अरेबियन समुद्रात दहा दिवस राहण्याची संधी मिळाली. त्यावेळी बोटीने खोल समुद्रात फेरफटका मारण्याची हौस अगदी पुरेपूर मिटली!
मुंबई गोवा या समुद्रमार्गावर दोन बोटी असायच्या, एक मुंबईतून निघणार, त्याचदरम्यान दुसरी पणजीतून. कोकण सेवक असे एका आगबोटीचे नाव होते. दुसरी बोट होती कोकण शक्ती. ही मुंबई गोवा प्रवाशी बोट सेवा मोगल लाईन्स या खासगी कंपनीतर्फे चालवली जायची. आणि या कंपनीचे मालक होता धेम्पो उद्योगसमूह, म्हणजे मी नोकरीला असलेल्या नवहिंद टाइम्स आणि नवप्रभा या दैनिकांचे मालकच. त्यामुळे दर हंगामाला ही आगबोट पहिल्यांदा यायची आणि मे महिन्यात शेवटच्या फेरीत फटाक्यांच्या गजरात पणजी जेटी सोडायवी त्यावेळी या दैनिकांत फोटो हमखास असायचा.
मुंबईत चेंबूरला घर असलेल्या माझ्या एका कॉलेजातील मित्राचे ओव्हिड परेरा याचे कुटुंबिय गोव्याला गावच्या चर्चच्या फेस्ताला किंवा इतर कामांसाठी आल्यावर मुंबईला परतताना या बोटीने जात असत आणि त्यावेळी गोव्यातून बरोबर भरपूर नारळ आणि घरचा उकडलेला तांदूळ म्हणजे बॉईल्ड राईस नेत असत. या बोटीची एकूण प्रवाशीक्षमता होती इनमिन हजार लोक. तिकीट न मिळाल्याने बोटप्रवास चुकला असे कधी होत नसे. प्रवासाचे तिकीट त्याकाळात सुद्धा फार नसायचे.
1980च्या दशकाच्या अखेरीस या आगबोटीच्या सेवेला घरघर लागली आणि दरवर्षी ऑकटोबरात ही सेवा सुरु होईल कि नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचे. 1991 ला या मुंबई गोवा प्रवाशी बोटसेवेने अखेरीस कायमचा नांगर टाकला आणि नंतर सुरु झालेल्या कोकण रेल्वेने या अत्यंत धिम्या वेगाच्या प्रवाशी सेवेची गरजच नाहीशी केली.
अलिकडेच अभिनेता शाह रुख खान यांचा मुलगा आर्यन खान गोवा- मुंबई मार्गावरील अत्यंत अत्याधुनिक क्रूझवरील कारवाईत पकडला गेला. या बातम्या वाचताना आता लोकांच्या आठवणीतून गेलेल्या या खूप जुन्या मुंबई -गोवा स्टिमरची सेवा नजरेसमोर उभी राहिली.
गोव्यात पणजीला मांडवीच्या काठी फिरताना हल्ली रंगीबेरंगी प्रकाशात चमचमणाऱ्या अधिक ताकदीच्या आणि विविध सुविधा असलेल्या कॅसिनोच्या आलिशान बोटी दिसतात, तेव्हा मला त्या जुन्या काळातल्या स्टिमर आगबो्टींची हमखास आठवण येते.
या मांडवीच्या काठाने इतिहासाच्या कितीतरी पाऊलखुणा आपल्या उराशी जपलेल्या आहेत, काही आनंददायी आणि काही कटू आणि काही अगदी गौरवास्पद. पणजी जेटी परिसरात यातल्या इतिहासाच्या काही खुणा कुणालाही दिसतात,
उदाहरणार्थ, हे मध्ययुगीन एकमजली, कौलारीं आदिलशाह पॅलेस किंवा जुने सचिवालय, त्याच्या एका बाजूला गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद किंवा भाऊसाहेब बांदोडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक संमोहनशास्त्राचा जनक असलेल्या आणि युरोपात नाव कमावलेल्या गोव्याचा सुपुत्र असलेल्या ऍबे डी फरिया यांचा तो भव्य पुतळा.
मांडवीच्या तिरात नांगर टाकून अस्वस्थतेने ठराविक वेळाने सारखी भोंगा वाजवत राहणारी ती मुंबई-गोवा आगबोट मात्र माझ्यासारख्या काही मोजक्या लोकांनाच आजही दिसत असते.
********
No comments:
Post a Comment