Monday, March 28, 2022

 कुठल्याही प्रसंगांचे, घटनांचे वार्तांकन करताना तो विषय नीट समजावून घ्यावा


सभापती दयानंद नार्वेकरांने आपयले तुका, बेगिन व्होस,'' त्या दिवशी सकाळी साडेनऊच्या आसपास मांडवीच्या काठावर असलेल्या गोवा सचिवयातल्या प्रेसरुमध्ये मी आलो आणि 'राष्ट्रमत' या मडगावहून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकाचे मुख्य वार्ताहर बालाजी गावणेकर यांनी हा बॉम्बगोळा माझ्यावर टाकला.

हो, वरकरणी या वाक्यात काही भीतिदायक दिसत नसले तरी गावणेकरांना मला आणि त्यावेळी त्या प्रेसरूमध्ये असलेल्या हजर असणाऱ्या इतर बातमीदारांना त्या वाक्यातील दाहकता कळण्यासारखी होती.

त्याकाळात म्हणजे १९८५च्या आसपास पणजीत आदिलशाहाच्या मध्ययुगीन राजवाड्यात त्याकाळच्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय, मंत्रालय आणि विधानसभा हॉलसुद्धा होते. पणजी जेटीजवळचा आजही भक्कम असलेला हा राजवाडा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो, मात्र गोव्याच्या पाचसहा शतकांच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असलेलया या इमारतीची बहुतेकांना फारशी माहिती नसते. गुजरातजवळ असलेल्या दमण आणि दीवच्या प्रत्येकी एक आमदारासह या केंद्रशासित प्रदेशाचे एकूण २८ आमदार असत आणि मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यासह पाचसहा मंत्री असत.

त्या दिवसांत गोवा, दमण आणि दीवच्या विधानसभेचे अधिवेशन या हवेलीवजा इमारतीत चालू होते आणि प्रेसरुमध्ये आज सकाळी मी आल्याआल्या 'मला सभापती नार्वेकरांनी बोलावले आहे' असा निरोप मला मिळाला होता.

तो निरोप ऐकून प्रेसरुममधल्या इतर बातमीदारांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरांनी पाहिले होते. विधानसभा अधिवेशनाच्या बातम्या देतांना आजच्या आमच्या इंग्रजी दैनिकात नवहिंद टाइम्समध्ये मी काय गडबड करुन ठेवली आहे याची ना त्यांना ना मला काही कल्पना होती. पण प्रेसरुमध्ये वावरणाऱ्या आणि दररोज विविध प्रकारच्या बातम्या देणाऱ्या त्या पत्रकारांना असे कुणाकडून भेटण्यासाठी समन्स यावे यात फार काही वावगे दिसले नाही. गोवा विधानसभेच्या सभापतींनी बोलावले आहे असे कळल्यावर मी मात्र गर्भगळीत झालो होतो. त्याला कारणही तसेच होते.

नवहिंद टाइम्समध्ये कॅम्पस रिपोर्टर आणि क्राईम-कोर्ट रिपोर्टर म्हणून तीनचार वर्षे काम केल्यानंतर गोवा, दमण आणि दीव सरकारचा अक्रेडीटेड जर्नालिस्ट म्हणून अलिकडेच मला कार्ड मिळाले होते. त्यामुळे या केंद्रशासित प्रदेशाच्या सचिवालयातून विविध बातम्या देण्याची आणि विधानसभेच्या अधिवेशनाचे वृत्तांकन करण्याची मला आता मुभा मिळाली होती. त्याकाळात पत्रकाराच्या कारकिर्दीत असे कार्ड मिळणे, विधानसभेच्या वा संसदेच्या अधिवेशनांचे वृत्तांकन करण्याची संधी मिळणे हा काहींच्या दृष्टीने परमोच्च बिंदू असायचा. पणजी, मुंबई किंवा राजधानी दिल्लीत राजकिय बिट् सांभाळणाऱ्या पत्रकारांमध्ये आताही बहुधा अशीच परिस्थिती असावी.

गेली काही दिवस मी गोवा, दमण आणि दीव विधानसभेच्या अधिवेशनाला हजेरी लावत होतो. त्या दुमजली इमारतीची शान काही औरच होती. लाकडी जिन्यावर अंतरलेला लाल गालिचा, मजबूत लाकडी फळ्यांचा मजला, तेथून गॅलरीत उभे राहिल्यास खाली रस्त्यालगत संथ वाहणाऱ्या मांडवी नदीचा दिसणारा प्रवाह, इमारतीच्या एका बाजूला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा पूर्णाकुर्ती पुतळा आणि दुसऱ्या बाजूला एका महिलेला संमोहित करणाऱ्या ऍबे डी फरीया याचा पुतळा.

या इमारतीच्या अगदी मध्यवर्ती भागात विधानसभा हॉल होता. हॉलच्या दोन्ही बाजूला समोरासमोर बसणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार, अगदी पुढे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री आणि सर्वांत पुढे विधानसभा सभापती आणि त्यांचा अधिकारी वर्ग. सभापतींच्या आसनाच्या समोर अगदी विरुद्ध टोकाला आम्हा पत्रकारांची गॅलरी.


विधानसभेच्या आमदारांना जी काही कागदपत्रे, ठराव दिले जात त्याच्या प्रती आम्हा बातमीदारांनाही मिळायच्या.

विधानसभेच्या अधिवेशनात त्याकाळात झिरो अवर म्हणजे शून्य प्रहरला, प्रश्नोत्तराच्या तासाला आणि लक्षवेधी सूचनांच्या कामकाजाला सर्वाधिक महत्त्व असायचे, बातमीदारांना त्या थोडक्याच अवधीत कितीतरी बातम्या मिळायच्या, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या वक्तृत्वशैलीचा आणि संसदीय कौशल्याचा या काळात कस लागायचा. या सर्व वेगवान घडामोडी आपापल्या वाचकांसमोर कशा पद्धतीने मांडायच्या, कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचे याचे अधिवेशन कव्हर करणाऱ्या विविध वृत्तपत्रांच्या बातमीदारांसमोर आव्हानच असायचे.

विधानसभेत बातमीदार म्हणून मी नव्यानेच प्रवेश केल्याने नवहिंद टाइम्सचे या इंग्रजी दैनिकातील माझे वरिष्ठ बातमीदार प्रमोद खांडेपारकर आणि र. वि. प्रभुगावकर हे पहिल्या फळीवर राहून बातम्यांचे नियोजन आपसांत वाटून घेत होते. माझ्याकडे केवळ बघ्याची भूमिका म्हणजे निरीक्षण करण्याचे काम होते. हातात मिळालेले ते कागदांचे बांड म्हणजे वर्षभर पुरेल अशा बातम्यांचा किंवा बातम्यांच्या कच्चा मालाचा खजिना असतो हे मला नंतर अनुभवाने कळाले. यात तारांकित प्रश्न आणि त्यांची संबंधीत मंत्रालयाने वा खात्याने दिलेली उत्तरे असायची. पहिल्या काही दिवसांत या छापील मजकुराच्या आधारे काही छोट्याशा बातम्या मी दिल्या होत्या.

काही दिवसांनंतर मध्यांतरानंतर खांडेपारकर आणि प्रभुगावकर दोघेही विधानसभेच्या हॉलबाहेर पडले. बहुधा तो शुक्रवार असावा, त्यादिवशी आमदारांना खासगी विधेयके म्हणजे पक्षरहीत विधेयके मांडण्याची परवानगी असायची. दिल्लीत संसदेतही शुक्रवारी अशीच प्रथा असते. त्यामुळे त्यादिवशी फार महत्त्वाचे कामकाज नसायचे.

सदनातून बाहेर पडताना खांडेपारकर मला म्हणाले, '''कामिल, होल्ड द फोर्ट !''

अशाप्रकारे नवहिंद टाइम्सच्या वतीने किल्लेरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आल्याने खूष होऊन मी सरसावून पुढील कामकाज अगदी लक्षपूर्वक पाहू लागलो. थोड्या वेळाने विधानसभेच्या कर्मचाऱ्यांनी आणखी काही कागदपत्रे आम्हा बातमीदारांना वाटली. तोपर्यंत तिथले पत्रकार कक्ष जवळजवळ निम्मे रिकामे झाले होते, सदनातील मंत्र्यांची आणि आमदारांची संख्याही खूप रोडावली होती. बहुधा आता काही महत्त्वाचे कामकाज राहिले नसावे.

सभापतींनी कुठल्याशा ठरावावर उपस्थित आमदारांची म्हणजे सभागृहाची अनुमती मागितली तेव्हा 'आये' आये असा सदनातून उपस्थित आमदारांचा संमतीदर्शक औपचारिक प्रतिसाद मिळाला होता. थोड्याच वेळाने सभापतीमहाशयांनी त्या दिवसासाठी सदनाचे कामकाज स्थगित केले. सभापती उठून मागे आपल्या दालनात गेले तसे इतर बातमीदारांसह मीसुद्धा तळमजल्याच्या प्रेसरुमकडे लाकडी जिन्याने जाऊ लागलो. संध्याकाळी ऑफिसात जाऊन विधानसभेच्या अधिवेशनाची दोन पॅराग्राफची एक बातमी मी दिली आणि माझ्या नेहेमीच्या क्राईम आणि कोर्टच्या बातम्याही टाईप केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी विधानसभेच्या प्रेसरुममध्ये आलयावर सभापतींना ताबडतोब भेटावे मला हा निरोप मला मिळाला होता !

`आलिया भोगासी, असावे सादर' अशी मी मानसिक तयारी करण्याची गरज होती

सभापतींच्या दालनात गेलो तेव्हा कळाले की विधानसभा खात्याच्या सचिवांना माझ्याशी बोलायचे होते. भेटताक्षणी त्यांनी त्यादिवशी आमच्या `नवहिंद टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एक कलमी आणि केवळ एक परिच्छेदाच्या त्या बातमीचा उल्लेख केला. गोवा, दमण आणि दीव विधानसभेने पंचायतीराजसंबंधी एक विधेयक संमत केले आहे अशी ती बातमी होती.

कुठलेही विधेयक सभागृहाने संमत होण्याच्या विविध पायऱ्या असतात, त्यापैकी पहिल्या पायरीत विधानसभेने ते विधेयक सभागृहात केवळ मांडायला परवानगी दिली होती, त्यावर चर्चा आणि मतदान वगैरे काहीही झाले नव्हते, त्यामुळे त्यावर मतदान होण्याचा किंवा ते संमत होण्याचा मुळी प्रश्नच नव्हता.

सचिवांनी मला हे सांगितले आणि पुढच्या वेळी सभागृहाचे काळजीपूर्वक वृत्तांकन करण्याची त्यांनी मला सूचना केली. एव्हढ्यावरच यावर पडदा पडला. मी हुश्श्य केले.

हे तसे काही गंभीर प्रकरण नव्हते, त्यामुळे सभागृहाचा अवमान किंवा सभागृहाचा हस्तभंग वगैरे मुद्दे निर्माण होत नव्हते.

सचिवालयाच्या पहिल्या मजल्यावरुन त्या लाकडी पायऱ्यांवरील लाल गालिच्यावर चालत जड मनाने मी खाली प्रेसरुममध्ये आलो तेव्हा तेथील बहुतेक पत्रकार माझ्याकडे पाहत गालातल्या गालात हसत होते. माझ्या त्या बातमीबाबत त्यांच्यात नक्कीच काहीतरी शिजले होते. आतापर्यंत माझ्या डोक्यात चाललेल्या त्या एका प्रश्नाचा मात्र या शंकेने आता उलगडा होऊ शकत होता.

कुठल्याही वृत्तपत्रातील एखादी बातमी कुठल्या बातमीदाराने दिली आहे किंवा एखादा नावाशिवाय प्रसिद्ध झालेला स्तंभ व लेख कुणी लिहिला आहे हे केवळ त्या वृत्तपत्रातल्या लोकांनाच माहिती असते, ती माहिती कुठल्याही कारणांसाठी बाहेर खुली करणे हे वृत्तपत्रीय आचारसहिंतेविरुद्ध आणि नैतिकतेविरुद्ध मानले जाते.

भारतीय पत्रकारितेतील यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक यांनी 'केसरी'चे संपादक म्हणून घेतलेली भूमिका. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या 'केसरी' त प्रसिद्ध झालेला ब्रिटिश सरकारविरोधी अग्रलेख त्यांनी स्वतः लिहिलेला नसतानासुद्धा संपादक म्हणून त्या अग्रलेखाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्यासाठी दोषी ठरवले जाऊन शिक्षा झाल्यावर मंडाले येथे तुरुंगवासही भोगला असे म्हटले जाते.

असे असताना त्या दिवसाची `नवहिंद टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेली ती फॅक्युअली रॉंग म्हणजे वास्तवाशी विसंगत, चुकीची असलेली ती बातमी मीच दिली हे विधानसभा खात्याच्या त्या अधिकाऱ्याला कसे कळाले असेल?

मला पडलेल्या या प्रश्नाचा तेथील एका पत्रकाराने ताबडतोब खुलासा केला आणि सगळे जण हसत सुटले. त्या बातमीदारांत सर्वांत ज्युनिअरमोस्ट असलेल्या मला शरमिंदे होऊन का होईना त्या पण हास्यकल्लोळात सहभागी व्हावेच लागले.

प्रेसरुममधल्या बालाजी गावणेकर या एका ज्येष्ठ पत्रकार मित्राने माझ्या या चुकीबद्दल सोनाराकडूनच माझे कान टोचवून घ्यावे म्हणून त्या सकाळी विधानसभा खात्यातील त्या अधिकाऱ्याला सहभागी करवून घेऊन हा गंमतीदार बनाव घडवून आणला होता. मग माझ्यावरील तणाव घालवण्यासाठी त्या पत्रकार मित्राने लगेचच माझ्यासह तेथील पाचसहा पत्रकारांसाठी चहा मागवून हा प्रकरणाचा शेवट गोड केला होता.

तरीसुद्धा मला या घटनेने खूप काही शिकवले. कुठल्याही प्रसंगांचे आणि घटनांचे वार्तांकन करताना तो विषय नीट समजावून घ्यावा आणि मुख्य म्हणजे त्या त्या बिट्सवर काम करणाऱ्या विविध दैनिकांतील वरिष्ठ पत्रकारांच्या बातम्या नेहेमी वाचाव्यात हा धडा मी त्यातून शिकलो. अर्थात प्रत्येक बिट्सवर काम करताना सुरुवातीला काही टक्केटोपणे खावे लागतातच हे सुद्धा नंतर क्राईम आणि कोर्ट, शिक्षण, डिफेन्स, उच्च न्यायालय, बिझिनेस वगैरे बिट्स हाताळताना अनुभवाने लक्षात आले.

No comments:

Post a Comment