शंभर रुपये किलो दराने पुस्तकांची विक्री
शहरात नव्यानेच सुरु झालेल्या विविध गृहोपयोगी, हस्तकला आणि बचतगटांच्या कलाकृतींच्या आणि उत्पादनांच्या प्रदर्शनाला गेलो होतो. दरवर्षी आमच्या शहरात वर्षांतून दोनदा महिन्याभराच्या कालावधीसाठी भरणाऱ्या या प्रदर्शनाला बायकोसह मी आवर्जून जात असतो, त्याचे कारण आम्हा दोघांनाही शॉपिंग करणे आवडते आणि दुसरे म्हणजे नित्योपयोगी असणाऱ्या अनेक वस्तू - अगदी कपडेसुद्धा - येथे स्वस्त दरांत मिळकत असतात. तर परवा या प्रदर्शनाला गेलो आणि अंग अगदी आनंदाने मोहोरून गेले.
पाचशे चौरस मिटर क्षेत्राच्या आसपास भरलेल्या त्या प्रदर्शनाला लोक अगदी उत्साहाने आले होते आणि ते पाहून आनंद होण्याचे कारण तसे वेगळेच होते. जवळजवळ दोनअडीच वर्षांच्या खंडानंतर हे प्रदर्शन भरले होते आणि इतक्या दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच लोक तोंडाला मास्क लावून की होईना पण मोठ्या संख्येनें जमले होते. कोरोनाच्या साथीमुळे गेली अनेक महिने अशाप्रकारे कुठल्याही कार्यक्रमाला एकत्र येणे शक्य झाले नव्हते.पण आता कोरोनाचे संकट नियंत्रणात आले आहे हे समोरच्या लोकांच्या गर्दीवरुन स्पष्ट होत होते.
माझ्या मनात घोळत असलेल्या या भावना तिथे जमलेल्या इतर लोकांमध्ये असण्याची शक्यता होती. एकदिड तासांच्या भ्रमंतीनंतर प्रदर्शनास्थळाच्या एका कोपऱ्यात `एक्झिट' असे बाणाच्या चिन्हाने दर्शवलेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. सामान घेऊन कारच्या दिशेने वळण्याआधी प्रवेशद्वारापाशीच असलेल्या एका स्वतंत्र दालनाकडे माझे लक्ष गेले आणि मी जागच्याजागी थिजलो.
गेली अनेक वर्षे या प्रदर्शनाला मी येत असलो तरी अशा प्रकारचे स्वतंत्र भव्य दालन मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्या दालनाचे नाव वाचून त्या क्षणी मला काय वाटले हे व्यक्त करणे खूप अवघड आहे.
त्या दालनाच्या प्रवेशदारात ठळकपणे लिहिले होते. ``शंभर रुपये किलो दराने पुस्तकांची विक्री''
विविध विषयांवरची पुस्तके विकत घेऊन वाचण्याचे वेड मला माझ्या लहानपणापासून लागलेले असले तरी मला त्या दालनाकडे जाऊसे वाटेना. दोन्ही हातांत विविध वस्तूंनी भरलेल्या पिशव्या घेऊन मी त्याच जागेवर थिजून राहिलो होतो याचे कारण कि वाचण्यायोग्य पुस्तकांची किलोंच्या मापाने विक्री ही कल्पनाच मला खिन्नखिन्न करुन गेली होती.
गोव्यात आणि कोकणात अनेक ठिकाणी बांगडा, सार्दिन वगैरे मासळी वाट्याने विकतात, इतरत्र ही मासळी किलोच्या मापाने विकली जाते, काही ठिकाणी केळी डझनावार विकली जाते तर काही ठिकाणी किलोने विकली जातात. एक वर्षांपूर्वी दमण येथे मेथीची भाजी किलोने विकली जाते हे पाहून असाच मी गारगार झालो होतो. तरीसुद्धा हे सर्व ठीक आहे पण पुस्तकांची किलोंनी विक्री ?
पुस्तकांचे मूल्य कसे मोजले जावे याविषयी काही ठोकताळे असू शकत नाही. अनेकदा अभ्यासासाठी नोट्स घेतलेल्या जुन्या वह्या रद्दीत काढाव्या लागतात तेव्हा त्या वह्यांचे खरेखुरे मूल्य त्या परिश्रमपूर्वक नोट्स तयार करणाराच जाणत असतो. तीच बाब वर्षानुवर्षे गोळा केलेल्या पुस्तकांचीही असते.
दहापंधरा वर्षांपूर्वी मेकॅनिकल इंजिनीरिंगचे पदवीधर असलेले एक स्नेही सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आणि आपल्या सरकारी निवासस्थानाचा ताबा देण्याआधी त्यांनी आपल्याकडे असलेल्या तांत्रिक विषयांवरील पुस्तकांचा मोठा संच हुबळी येथील इंजिनियरिंग असोसिएशनकडे सुपूर्द केला. देशात विविध ठिकाणी आणि त्याचप्रमाणे परदेशांत कामानिमित्त गेल्यावर ही पुस्तके त्यांनी जमा केली होती.
काही वर्षांनी परदेशातील एक इंजिनियरने या वाचनालयाला भेट दिली असता या संग्रहाकडे त्याचे लक्ष गेले आणि इतकी अमूल्य असलेली पुस्तके कोठून मिळवली आणि या पुस्तकांच्या फोटोकॉपीज मिळू शकतील का अशी विचारणा त्याने ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यावेळी वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांना त्या पुस्तकांचे खरेखुरे मूल्य समजले !
ब्रिटिश जेसुईट धर्मगुरु असलेल्या फादर थॉमस स्टिफन्स यांनी गोव्यात सतराव्या शतका च्या सुरुवातीला 'ख्रिस्तपुराण' या मराठी महाकाव्याची रचना केली. देवनागरी लिपीत मुद्रणकला विकसित झाली नसल्याने हे पुस्तक पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात रोमन लिपीत छापण्यात आले, त्या दृष्टीने मराठीतील हे पहिले छापील पुस्तक. या ख्रिस्तपुराणाची देवनागरी लिपीतील एक प्रत जस्टीन एडवर्ड ॲबट यांना लंडनमधील स्कुल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज एका ग्रंथालयात आढळली.
कोण हे जस्टीन एडवर्ड ॲबट?
अहमदनगर येथे अनेक वर्षे राहिलेल्या अमेरिकन मिशनरी ॲबट यांनी अमेरिकेत परतल्यावर `पोएट्स ऑफ महाराष्ट्र' ही ग्रंथमाला लिहून मराठी संत वाड्मय इंग्रजीत आणण्याचे फार महत्त्वाचे योगदान दिले आहे. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या उभारणीसाठी आपल्या मृत्युपत्राद्वारे त्यांनी त्याकाळात तीन हजार डॉलर्सची मदत केली होती. त्यांचे तैलचित्र भारत इतिहास संशोधन मंडळात आजही आहे.
माझ्या 'ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या पुस्तकात जस्टीन एडवर्ड ॲबट यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे.
तर लंडनमधल्या ख्रिस्तपुराणाच्या देवनागरी लिपीतील प्रतीविषयी याविषयीचे एक पत्र ॲबट यांनी मुंबईतल्या The Times of India इंग्रजी दैनिकात १९२५ साली लिहिले. काही दशकानंतर या जुन्या पत्राविषयी संदर्भ मिळाल्यावर पुण्यात पेपल सेमिनरीत प्राध्यापक असणारे फादर हान्स स्टाफनर यांनी लंडनमधल्या देवनागरी लिपीतील या ख्रिस्तपुराणाची मायक्रोफिल्म मिळवली आणि त्यातून देवनागरी ख्रिस्तपुराणाच्या दोन प्रती केल्या,
त्यापैकी एक प्रत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर वाचनालयात ठेवण्यात आली आहे. दुसरी प्रत नारायण पेठेतल्या स्नेहसदन जेसुईट संस्थेत आहे !
काही पुस्तकांचे मुल्य ठरविणेसुद्धा शक्य नसते हे यावरुन दिसून येईल.
माझ्या शहरातल्या एका वाचनालयात गेली अनेक वर्षे मी जात आहे. काही वर्षांपूर्वी या वाचनालयात पुस्तके निवडण्यासाठी, बदलण्यासाठी येणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा आणि इतरांचा चांगला राबता असायचा. गेली काही वर्षे मात्र तिकडे कुणी फिरकतही नाही. पुस्तके शोधण्यासाठी ओळीने लावलेल्या कपाटांकडे मी जातो तेव्हा उडणाऱ्या धुळीपासून संरक्षणासाठी तोंडाला रुमाल लावावा लागतो. तिथे शेल्फवर रांगेत रचून ठेवलेल्या पुस्तकांना खूप काळ कुणी हातही लावलेला नाही हे लगेच कळते. मात्र पुस्तकांचे नाव आणि विषय पाहून यापैकी कुठले पुस्तक आधी वाचायला घ्यावे असा गोंधळ उडावा इतकी ही पुस्तके अमूल्य आणि दुर्मिळ आहेत.
अलिकडेच `गोष्ट एका सांस्कृतिक अपूर्व संगमाची' या जेसुईट फादर टोनी जॉर्ज यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रस्तावना वाचत होतो. `स्वातंत्र्यपूर्व काळातील (१८५० ते १९५०) धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तींची आत्मनिवेदने : सामाजिक आणि वाड्मयीन अभ्यास'' हा या पुस्तकाचा विषय आहे. या पुस्तकासाठी संशोधन करताना त्यांना फार महत्त्वाचा ग्रंथऐवज अहमदनगर कॉलेजमध्ये मिळाला.
मुंबईत अंधेरीइथल्या `विनयालय' या जेसुईट संस्थेतल्या प्राध्यापक असलेल्या फादर टोनी जॉर्ज यांनी लिहिले आहे: ''अहमदनगर कॉलेजच्या पुराभिलेख शाखेमध्ये नगरहून निघून गेलेल्या अनेक प्रोटेस्टंट मिशनरींची ग्रंथसंपदा पोत्यांत बंदिस्त होती. त्या जीर्णावस्थेत असलेल्या ज्ञानातून अभ्यासाविषयाचे ग्रंथ निवडले. परंतु ते हातांतच कोसळत असत, झेरॉक्स, फोटोमध्ये त्यांना बंदिस्तही करता येत नव्हते. ते बरेचसे हातांनी लिखित स्वरुपात उपलब्ध केले.''
अशाच स्वरुपाची कितीतरी अमुल्य असलेली ग्रंथसंपदा कितीतरी खासगी, निमसरकारी किंवा सरकारी वाचनालयांत धूळ गोळा करत असेल याची कल्पना करता येते. क्वचितच एखादा रत्नपारखी येतो आणि त्यातून आपल्याला हवे असलेले रत्ने निवडून, गोळा करून जातो.
रस्त्यांवर फुटपाथवर विक्रीला असलेल्या जुन्या पुस्तकांच्या गठ्ठ्यांमधून खूपदा दुर्मिळ असलेली पुस्तके मिळतात याचा अनुभव अनेकांना आलेला असतो.
पुण्याला गेलो कि `सकाळ' ऑफिसातून परतताना शनिवारवाड्याजवळच असलेल्या `साधना' च्या पुस्तक स्टॉलला मी नेहेमी भेट देतो. तेथे गेल्यावर लगेच आत न शिरता त्या आवारातच दाराबाहेर टेबलावर ठेवलेल्या जुनी पुस्तके, स्मरणिका, दिवाळी ग्रंथ आणि गौरव ग्रंथ मी चाळतो. निम्म्या किंमतीत ही पुस्तके असतात. या टेबलावर ठेवलेली कितीतरी मौल्यवान पुस्तके आणि इतर अंक मी गोळा केलेली आहेत.
त्यामुळेच त्या प्रदर्शनात किलोच्या मापात पुस्तके विकली जाताना पाहून माझ्या भावना संमिश्र होत्या. छापून झालेली, नवीकोरी असलेली ती शेकडो पुस्तके स्वस्त आणि किलोच्या दरात विकून टाकून निदान काही वाचकांना तरी वाचनसंस्कृतीचा लाभ मिळवून देण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता. न जाणो, त्या पुस्तकांतून काही जणांना ज्याचे मोलही करता येणार नाही असा आनंद आणि लाभ मिळू शकेल.
काही महिन्यांपूर्वी मीसुद्धा माझ्याकडची कितीतरी जुनी इंग्रजी आणि मराठी पुस्तके अशीच ग्रंथालयांना आणि इतरांना देऊन टाकली होती. ही पुस्तके `चांगल्या घरात' जावी एव्हढीच एक भावना होती.
त्या प्रदर्शनस्थळांतील विविध दालनांकडे गर्दीचे लोंढे दिसत होते तर पुस्तकविक्रीच्या या प्रशस्त दालनात काही मोजकेच लोक दिसत होते. इतर भरगच्च दालनांतल्या विक्रीला असलेल्या वस्तू आणि या दालनातील विक्रीला असलेली पुस्तके यांना मात्र एकाच तराजूच्या तागडींमध्ये मोजता येणार नव्हते हे नक्की. त्यांचे वेगळे मूल्य जाणण्यासाठी पारख करणारी दृष्टी मात्र हवी.
No comments:
Post a Comment