पंतप्रधान इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुत्तो यांचा ऐतिहासिक सिमला करार
मी श्रीरामपूरला शाळेत शिकत होती तेव्हाची गोष्ट. शाळेत असतानाच मला पेपर वाचायची सवय लागली होती हे मी माझ्या आधीच्या काही लेखांत लिहिले आहेच. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे. त्यावेळी मी पत्रकार होईल अशीकल्पना कशी असणार ? तर या दिवसांत दैनिकांच्या पहिल्या पानांवर एक विषय सातत्याने येऊ लागला होता.
ती बातमी भारतातल्या कुठल्याही घटनेविषयी किंवा व्यक्तिविषयी नव्हती तरी काळजी करण्यासारखी होती. ही बातमी होती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्या संदर्भातील.
पाकिस्तानचे भारताशी झालेल्या युद्धानंतर बांगला देशाची निर्मिती झाली होती, पाकिस्तानच्या पराभवानंतर नामुष्कीला सामोरे जात तेव्हाचे लष्करशहा जनरल याह्या खान हे सत्तेतून पायउतार झाले होते आणि त्यानंतर झुल्फिकार अली भुत्तो हे पाकिस्तानात पंतप्रधान झाले होते. सत्तेवर आल्याआल्या भुत्तो यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला होता.
तो म्हणजे त्यावेळी पश्चिम पाकिस्तानात कैदेत असलेल्या आणि देशद्रोहाबद्दल न्यायालयाने देहदंडाची शिक्षा झालेल्या पूर्व पाकिस्तानचे म्हणजे आताच्या बांगला देशचे नेते शेख मुजिबर रेहमान यांची सुटका करणे.
बांगला देशाच्या या नेत्याला जीवदान देऊन त्यांना आपल्या देशात जाण्याची मुभा देण्याच्या भुत्तो यांच्या निर्णयात भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या परदेशी वकिलातीने म्हणजे मुत्सद्यांनी अत्यंत कळीची भूमिका पार पाडली होती असे म्हटले जाते.
फाशीची शिक्षा रद्द होऊन सुटका झालेले शेख मुजिबर रेहमान नव्यानेच उदयास आलेल्या आपल्या बांगला देशात परतण्यास निघाले. मात्र त्याधी ते आले नवी दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटून आपला आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
या युद्धात पाकिस्तानचा पराभव करुन या देशाच्या सैन्याला बिनशर्त शरणागती पत्करण्यास भाग पाडण्यात आणि बांगला देश स्वतंत्र करण्यात पंतप्रधान इंदिरा गांधींच्या मुत्सद्दी धोरणाचा आणि लष्करप्रमुख जनरल सॅम मानेकशा यांच्या लष्करी डावपेचाचे प्रमुख योगदान होते.
शेख मुजिबर रेहमान यांचे या दिल्ली भेटीतल्या फोटोंमध्ये आणि त्यांचे, इंदिराजींची आणि जनरल सॅम मानेकशा यांच्या चेहेऱ्यावर हास्य आणि आनंद पाहिला की मी काय म्हणतो त्याची कल्पना येऊ शकेल.
माझ्या मते बांगला देश निंर्मिती हा इंदिराजींच्या सतरा वर्षे कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मुत्सद्दीपणाचा हा एक परमोच्च बिंदू होता, जसा १९७५ साली आणीबाणी लादण्याचा आणि नंतर सुवर्णमंदिरात लष्करी कारवाई करण्याचा निर्णय सर्वात दुःखद होता तर आणीबाणीनंतर १९८० साली लोंकांनी त्यांची केलेली पुनर्निवड हा त्यांच्या लोकप्रियतेचा कळसबिंदू होता.
त्यानंतर काही महिन्यांतच पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो हे स्वतः भारतात आले आणि त्यांच्याबरोबर झालेल्या सिमला करारानुसार शरण आलेले पाकिस्तानच्या लाख भर युद्धकैद्यांची सुटका करण्यास इंदिराजींनी मान्यता दिली. तोपर्यंत या युद्धकैदी भारताच्या कोठडीत होते.
पाकिस्तानी नेते झुल्फिकार अली भुत्तो यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर बातम्यांत झळकत होते, याचे कारण म्हणजे यावेळी भुत्तो स्वतःच पाकिस्तान मध्ये तुरुंगात होते आणि त्यांना पाकिस्तानी न्यायालयाने मृत्यू दंडाची शिक्षा फर्मावली होती.
पाकिस्तानी लोकशाही, तिथली सर्वशक्तिमान लष्करशाही आणि या लष्करशाहीच्या कलाने निवाडा देणारी तिथली न्यायसंस्था याबद्दल तर बोलायलाच नको.
भुत्तो यांना सत्तेतून पदच्युत करुन त्यांच्यावर भलतेसलते, खरेखुरे वा खोटेनाटे आरोप करुन आता त्यांना न्यायालयाने मृत्युदंड ठोठावला होता. एका देशातील राजकारणी नेत्याला अशा प्रकारे शिक्षा जाहीर झाल्याने जगभर खळबळ निर्माण झाली होती.
पुर्व पाकिस्तानात उठाव करणाऱ्या शेख मुजिबर रेहमान यांना फाशीच्या तख्तापासून दूर करणाऱ्या भुत्तो यांच्याच गळ्यापाशी आता फाशीचे दोर लावले जाणार होते.
भुत्तो यांच्यावर काहीही आरोप असले तरी त्यांना निदान देहदंड देऊ नये अशी विनंती अनेक देशांतील नेते आणि राष्ट्र प्रमुख करत होते. मानवी मूल्ये आणि नागरी हक्क पायंदळी तुडविली जाता कामा नये अशी अनेक देशांतील लोकांची आणि संघटनांची भूमिका होती . त्यावेळचे पोप पॉल सहावे यांनी सुद्धा अशाच प्रकारची विनंती पाकिस्तान सरकारकडे केली होती अशी बातमी वाचल्याचे आजही आठवते.
पण काहीही झाले तरी हा आमच्या सार्वभौम राष्ट्राचा अंतर्गत प्रश्न आहे अशी भूमिका घेत पाकिस्तानने सर्व राष्ट्र प्रमुखांच्या आणि संघटनांच्या मागणी आणि विनंती झुडकारली.
आणि एके दिवशी झुल्फिकार अली भुत्तो यांना फांसावर चढवण्यात आले.
भुत्तो यांच्या फाशीची ती घटना आठवते तेव्हा एका माजी राष्ट्रप्रमुखाला अशी शिक्षा दिली जावी याबद्दल आजही खूप वाईट वाटते. भुत्तो यांची फाशी म्हणजे न्यायसंस्था राजसत्तेची बटीक असल्यास काय होते याचे एक उत्तम उदाहरण होते.
फेसबुकवर आज पंतप्रधान इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुत्तो यांचा एकत्रित फोटो पाहिला आणि भूतकाळातल्या या घटना नजरेसमोर उभ्या राहिल्या.
त्या ऐतिहासिक सिमला कराराला आता पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
Camil Parkhe, July 27, 2022
No comments:
Post a Comment