Wednesday, October 12, 2022

एक उद्योगपती म्हणून शंतनुराव किर्लोस्कर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहेत. उद्योगक्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ भरीव कामगिरी करणाऱ्या देशात ज्या काही मोजक्या व्यक्ती आहेत त्यांमध्ये शंतनुरावांचा समावेश होतो. वृत्तपत्रांमधील वा इतर कुठल्याही छायाचित्रांतील महनीय व्यक्तींच्या गर्दीमध्ये शंतनुरावांना ओळखण्याची पक्की खूणगाठ म्हणजे त्यांच्या गळ्याभोवती असणारा तो बो-टाय.

पण शंतनुरावांच्या व्यक्तिमत्त्वातील बो-टाय हेच केवळ वैशिष्ट्य मुळीच नाही. '

`शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर' हे नाव वगळले तर या उद्योगमहर्षीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परंपरागत असे दुसरे काहीच नाही, असे एका इंग्रजी नियतकालिकाने म्हटले आहे ते उगाच नाही. " आमच्या इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत S L Kirloskar या नावानेच त्यांचा उल्लेख व्हायचा..

शंतनुरावांच्या पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या बंगल्याचे नाव `लकाकी' -- लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर या नावाचे लघुरुप. तिथं त्यांना मी एका सकाळी भेटलो होतो.
“तुम्हाला बो-टाय का आवडतो ? " असा एक प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारला गेला होता.
“ तुम्हाला या प्रश्नासाठी कोणते उत्तर अपेक्षित आहे- चांगले की वाईट ? " असाच मिश्किल प्रतिप्रश्न शंतनुरावांनी त्या प्रश्नकर्त्याला केला.
'दोन्ही प्रकारची उत्तरे चालतील. "मुलाखतकर्ता म्हणाला.
" त्याचे असे आहे.” शंतनुराव उत्तरले, "नेहमी वापरात असलेल्या टायप्रमाणे बो -टाय सूप पिण्याच्या कपामध्ये पडून भिजत नाही. या प्रश्नाचे दुसरे उत्तर सरळच आहे. मला बो-टाय वापरायला आवडते! "
या प्रश्नाच्या दुसऱ्या प्रकारच्या उत्तरातच शंतनुरावांचा आपला जीवनविषयक दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो.
आपल्या मनास पटतात त्याच मतांचा पाठपुरावा शंतनुरावांनी जग काय म्हणेल याची पर्वा न करता सातत्याने केला आहे.
एक नास्तिक आणि पूर्णत: बौद्धीकवादी म्हणून ते सुपरिचित आहेत. समाजवादी विचारांचा या देशात स्वातंत्र्यानंतर तब्बल चाळीस वर्षे अत्यंत गाढा पगडा असताना 'नफा मिळविण्यात वाईट असे काहीच नाही' असे अनेक दशके इतरांचा रोष ओढून मांडणारी ही व्यक्ती. केंद्रभूत आर्थिक नियोजनास असणारा त्यांचा प्रखर विरोध तर सर्वांनाच सुपरिचित आहे.
आयुष्याची नव्वदी पार केलेल्या शंतनुरावांनी सुख-दुःखाचे अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. ते अनुभवतांना आणि त्याचप्रमाणे त्यांना उजाळे देताना त्यांनी जी कमालीची स्थितप्रज्ञता बाळगली याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटणे साहजिकच आहे. पण 'सो व्हाट?' (त्यात विशेष असे काय ?) असे म्हणून त्याबद्दल स्वतः कडे विशेष मोठेपणा स्विकारण्यास शंतनुराव झटकन नकार देऊन मोकळेही होतात.
शंतनुरावांचा जीवनविषयक दृष्टीकोन हा पूर्णतः बुद्धीप्रामाण्यवादावर आधारलेला आहे. रूढीवादाविरुद्ध त्यांची स्वतःची अशी खास ठाम मते आहेत. मात्र त्याविषयी कसल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आपल्या प्रदीर्घ आयुष्यातील विविध प्रसंगांमध्ये रोखठोख भूमिका घेऊन त्यांनी आपल्या वा पुरोगामीत्वाची झलक दाखविली आहे.
शंतनुराव तरुणपणी अमेरिकेत शिकत असतांना घडलेला एक प्रसंग त्यांच्या परखड मतांविषयी बरेच काही सांगून जातो.
शंतनुरावांच्या एका शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना धर्म या विषयावर निबंध लिहावयास सांगितला होता. त्या शिक्षकाने शंतनुरावांचा निबंध वाचला. शंतनुरावांना त्यांनी जवळ बोलाविले आणि त्या निबंधातील काही ओळींवर बोट ठेवून म्हटले, " या ओळी तू मोठ्याने वाच अन् त्यात तू जे काही म्हटले आहे, त्यावर तुझा स्वतःचा तरी विश्वास बसतो काय ते मला सांग. "
जगामधील सर्व धर्म ज्यावेळी स्थापन झाले त्यावेळी ते त्या काळच्या समाजाला कितीही उपयुक्त ठरले असले तरी आधुनिक मानवास धर्माची काडीमात्र गरज नाही, असे मत शंतनुरावांनी या आपल्या निबंधात मांडले 'होते.
"पंचमहाभूतांविषयी आज विज्ञानाद्वारे प्रचंड माहिती उपलब्ध असताना पाऊस कसा पडतो, भूकंप कसे घडतात, याविषयी विज्ञान स्पष्टीकरण देत असताना पर्जन्यदेव वा इतर देवतांच्या दंतकथा अगदीच रानटी वाटतात. परमेश्वराने हे संपूर्ण विश्व सहा दिवसांत निर्माण केले आणि देवाने मातीच्या पुतळ्याच्या नासिकेत प्राण फुंकून मानवास निर्माण केले या कथांवर उत्क्रांतीवादाचा अभ्यास केलेली व्यक्ती कधीही विश्वास ठेवू शकणार नाही. या सर्व कथा त्या जुन्या काळातील लहान मुलांना झोपविण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टी असाव्यात, असेच माझे स्पष्ट मत आहे. ' असे शंतनुरावांनी या निबंधात लिहिले होते.
आपल्याला जे काही पटले तेच मत ठामपणे मांडण्याची ही वृत्ती शंतनुरावांनी आपल्या पुढील आयुष्यात कायम ठेवलेली दिसते. मृत्यूनंतर आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी त्यांनी घेतला, त्यावेळी या निर्णयासंबंधी वृत्तपत्रात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या
देहदान करण्याची कृती निश्चितच उदात्त; पण किर्लोस्करांसारख्या महनीय व्यक्तीचा मृतदेह विच्छेदनासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांकडे सोपविणे खरेच योग्य ठरेल काय? असा एक प्रश्न या चर्चेत उभा करण्यात आला होता.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी मृतदेहांची अत्यंत निकडीची गरज असते. पण मृतदेह मिळत नाही या कारणामुळे भारतातील बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मृतदेहाच्या मॉडेल्सद्वारे मानवी शरीररचना समजावून घ्यावी लागते. या महाविद्यालयांसाठी मृतदेह उपलब्ध करून दिले तर विद्यार्थ्यांना विच्छेदन करता येईल, त्यांचा अनुभव वाढेल आणि देशात अधिक कुशल आणि प्रशिक्षित डॉक्टर निर्माण होतील हे उघड आहे.
ही बाब लक्षात घेऊन पुण्यात काही वर्षांपूर्वी ग. म. सोहोनी यांनी लोकांनी आपला वा आपल्या नातलगांचा मृतदेह वैद्यकीय शिक्षणांसाठी दान करावा यासाठी देहदान चळवळ सुरू केली. ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे हे या चळवळीचे संस्थापक-अध्यक्ष. सोहोनींच्या प्रयत्नांमुळे अनेक व्यक्ती देहदानासाठी पुढे आल्या.
एके दिवशी 'किर्लोस्करांनीही मृत्यूत्तोर आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी दान केला' असे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले अन् अनेकांना धक्काच बसला.
दान केलेल्या मृतदेहांची वैद्यकीय विद्यार्थी चिरफाड करतात, हे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बराच काळ अभ्यासासाठी ठेवले जातात. विच्छेदन केल्यानंतर शवाच्या एकेका भागांची विल्हेवाट लावली जाते त्यामुळे या मृतदेहांचेदहन अथवा दफन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
याच कारणामुळे ``देहदानाची कल्पना उदात्त आहे हे सर्वमान्य असले, तरी यात मृतदेहाचे होणारे हाल लक्षात घेता निदान किर्लोस्करांसारख्या आदरणीय महनीय व्यक्तीने तरी आपला मृतदेह वैद्यकीय शिक्षणासाठी दान करू नये'' असे विनंतीवजा पत्र त्या काळात एका डॉक्टर महाशयांनी किर्लोस्करांना लिहिले होते.
या पत्रात आणि त्या निमित्ताने वृत्तपत्रात झालेल्या चर्चेस किर्लोस्करांनी दिलेल्या उत्तराने त्यांच्या स्वभावाची साक्ष पटते. " देहदानाच्या माझ्या निर्णयामुळे एवढा वाद निर्माण होण्याचे कारणच काय ? " असे त्यांनी म्हटले होते.
देहदानाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात
माझ्या शरीरावर आत्तापर्यंत बारा-चौदा लहान आणि मोठ्या स्वरूपांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक शस्त्रक्रियेच्या वेळी वैद्यकशास्त्राने केलेल्या भरीव प्रगतीबद्दल मला अचंबा वाटलेला आहे. दहन अथवा दफन केल्याने मृतदेहाचा काहीही उपयोग होत नाही. दहनातून माझ्या देहाची राख होण्याऐवजी या शरीराचा वैद्यकशास्त्राच्या प्रगतीसाठी काही उपयोग होत असेल, तर देहदान करण्याचा माझा निर्णय योग्यच आहे असे मला वाटते. "
गांधीजींच्या चळवळीतील काही सिद्धांत किर्लोस्करांमधील उद्योजकास कधीच पटले नाही. गांधीवादाच्या आचरणातून आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती साधता येईल, एक नवे ' रामराज्य' आणता येईल हा दावाच किर्लोस्करांना मान्य नव्हता. सुवर्णयुग म्हणून संबोधल्या गेलेल्या त्या रामराज्याची आणि विसाव्या शतकातील रेल्वे, रस्ते आणि विविध साधन सोयींनी समृद्ध असलेल्या समाजाशी तुलनाच कशी करता येईल असा त्यांचा प्रश्न.
गांधीवादावर विश्वास ठेवणारे आदर्शवादी इतिहासातील घटनांकडे केवळ कानाडोळाच करत नाही तर या आधुनिक काळातील वास्तवतादेखील नाकारतात, असे किर्लोस्करांचे स्पष्ट मत होते. ब्रिटीशांच्या ताब्यात भारत गेला या घटनेचे विश्लेषण करताना त्यांनी म्हटले होते की, यंत्रे ताब्यात असलेल्या एका देशाने दुसऱ्या यंत्रहीन देशावर स्वामित्व मिळविण्याचा हा प्रकार होता.
पुणे शहर आज अनेक औद्योगिक प्रकल्पांसाठी प्रसिद्ध आहे. देशातील आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये विविध बड़े औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये स्पर्धाही चाललेली दिसून येते. या पार्श्वभूमीवर केवळ पन्नास वर्षांपूर्वी पुण्यातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरण बिघडू नये, या कारणाखाली स्थानिक नोकरशहांनी किर्लोस्करांना येथे उद्योगप्रकल्प उभारण्यास परवानगी नाकारली होती
ही घटना आहे दुसऱ्या महायुद्धानंतरची. पुण्यात किंवा पुण्याशेजारी किर्लोस्कर ऑईल इंजिन्सच्या कारखान्यासाठी जागा मिळविण्यासाठी शंतनुरावांचे चिकाटीचे प्रयत्न चालू होते. मात्र त्यावेळचे पुण्यातील कलेक्टर या योजनेमध्ये झारीतील शुक्राचार्यासारखे आडवे आले. पुणे हे एक पेन्शनरांचे शहर आहे, येथील जीवन अगदी संथगतीने चालते. पुण्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील शैक्षणिक वातावरण. येथे कारखान्यांस परवानगी दिली तर औद्योगिकीकरणामुळे पुण्यातील परंपरागत वातावरणच मुळी बिघडून जाईल. त्यामुळे किर्लोस्करांच्या उद्योग प्रकल्पास सरकारने मान्यता देऊ नये, असा शेरा या कलेक्टर महाशयांनी सरकारदरबारी सादर केला होता.
अखेरीस मुंबई प्रांताच्या सचिवालयाकडे हे प्रकरण नेऊन किर्लोस्करांनी पुण्यातच आपल्या उद्योग प्रकल्पासाठी परवानगी मिळविली आणि किर्लोस्कर उद्योग साम्राज्य इथेच आकारास आले.
या उद्योग प्रकल्पानंतर इतरही अनेक कारखाने पुण्यात आले आणि एक औद्योगिक नगर म्हणून पुण्याची वाढ झाली.
" ज्यावेळी या देशामध्ये नफा मिळविणे यात वाईट असे काही मानले जाणार नाही, त्या दिवसापासून या देशाच्या प्रगतीची वाटचाल सुरू होईल." हे किर्लोस्करांचे एक प्रसिद्ध वाक्य.
“नफा मिळविणे हे कुठल्याही उद्योगाचे मुख्य उद्दिष्ट असावे आणि केवळ नफा याच कसोटी व कुठल्याही उद्योगधंद्याची कार्यक्षमता मोजली पाहिजे. 'ना नफा, ना तोटा' या सरकारच्या आत्मघातकी धोरणाविषयी आम्हाला मुळीच आत्मीयता वाटत नाही, कारण या धोरणाची फलश्रुती नेहमीच 'नफा नाहीच पण भरमसाठ तोटा' यातच होत असते." असे किर्लोस्करांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
शंतनुरावांच्या जीवनातील एक अत्यंत कसोटीचा प्रसंग म्हणजे त्यांच्या उद्योगसंस्थांवर १९८५ साली सरकारी अधिकाऱ्यांनी घातलेल्या धाडी. राजीव गांधी यांच्या कॅबिनेटमध्ये त्यावेळी अर्थमंत्री असलेल्या व्ही. पी. सिंग यांच्या आदेशानुसार देशात आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या अनेक व्यक्ती आणि कंपन्यांवर धाडीचे सत्र सुरू झाले. सुरुवातीला या धाडीच्या सत्राचे समाजाच्या सर्वच क्षेत्रांकडून स्वागतही झाले.
मात्र एके दिवशी पुण्यामध्ये खुद्द किर्लोस्करांच्याच घरावर धाड पडली, किर्लोस्करांना अटक झाली, त्यांच्या सर्व कंपन्यांच्या कार्यालयातील कागदपत्रांची कसून तपासणी घेण्यात आली आणि अर्थखात्याच्या या मोहिमेबद्दल जनतेच्या आणि खुद्द वृत्तपत्रांच्याही अनुकूल मतात ताबडतोब बदल झाला.
किर्लोस्करांना अटक झाल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती, मात्र देशातून बाहेर न जाण्यासंबंधी न्यायालयातर्फे त्यांच्यावर बंधन लादण्यात आले होते.
किर्लोस्करांविरूद्ध सरकारने केलेल्या या कारवाईचे फलित काय झाले ? किर्लोस्करांना अटक करण्यात आली या घटनेचे सगळ्याच क्षेत्रात तीव्र प्रतिसाद उमटले. या अटकेविरुद्ध केवळ मराठीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी वृत्तपत्रांतदेखील टिकेची झोड उठविण्यात आली होती. ( वृद्वताकडे झुकलेल्या शंतनुरावांना त्यावेळी चौकशीसाठी पोलीस चौकीत अनेक तास ठेवण्यात आले होते याबद्दल लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात शनिवारवाड्यासमोर निषेध सभाही झाली होती.)
किर्लोस्करांच्या जीवनातील दुसरे कसोटीचे प्रसंग म्हणजे गेल्या दशकात त्यांच्या दोन्ही चिरंजीवांचे काही वर्षांच्या अंतराने झालेले निधन. निवृत्तीच्या वयात शंतनुरावांनी त्यावेळी पुन्हा एकदा आपल्या उद्योगसंस्थांच्या जबाबदारीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली व समोर आलेल्या विविध समस्यांना खंबीरपणे तोंड दिले.
पूर्णत: बुद्धीप्रामाण्यवादी असल्याने भावनाविवश होण्याची वा दैवावर सर्व हवाला ठेवून बसण्याची त्यांची मुळी प्रवृत्तीच नाही.
शंतनुरावांच्या पत्नींच्या म्हणजे यमूताई किर्लोस्करांच्या अखेरच्या आजाराचा तो प्रसंग. यमुताईंचा आजार बळावला, त्यातून त्या बरे होण्याची आशाच नव्हती. त्यावेळी शंतनुरावांनी आपल्या जवळच्या नातलगांना सांगितले, 'कृपा करून तुम्ही त्यांना आता दवाखान्यात नेऊ नका. यमूताईंना एक-दोन आठवडे वा महिनाभर कसेबसे जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करू नका."
एका मुलाखतीत मुलाखतकर्त्याने किर्लोस्करांना विचारले होते, “ तुमचा नशिबावर विश्वास आहे काय ?"
" नशीब! कसले नशीब ? "
किर्लोस्करांनी त्या मुलाखतकर्त्यासच प्रतिप्रश्न केला.
त्या प्रतिप्रश्नांतच किर्लोस्करांचे उत्तर आणि त्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन सामावला होता."
" दैववाद म्हणजे अज्ञान. घेतलेल्या एखाद्या निर्णयाची वा त्या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी टाळण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणजे दैववाद" असे किर्लोस्करांनी म्हटले आहे.
समाज बदलायला फार वेळ लागतो तोपर्यंत समाजाच्या कलाने घेतले पाहिजे ही वृत्ती मला मान्य नाही, " असे किर्लोस्करांनी 'जेट युगातील मराठी माणूस' या आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
समाजात दारिद्र्य आहे म्हणून ते स्विकारावयास हवे, अज्ञान आहे म्हणून ते स्विकारावयास हवे, परंपरेची गुलामगिरी अंगी भिनली आहे म्हणून ती स्विकारली पाहिजे, इतरांना जोराने चालता येत नाही, म्हणून स्वतः हळू चाललं पाहिजे, ही तत्वे त्यांना पटत नाही. "
प्रस्थापित वृत्ती स्विकारायच्या विरुद्ध असायचं कारण हे आहे की, सतत बदल करण्याची वृत्ती त्यामुळे नष्ट होते, " असेच त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
`उत्तुंग' व्यक्तिचित्रसंग्रहातील एक प्रकरण , लेखक कामिल पारखे (प्रकाशक संजय सोनवणी , १९९३ )
Camil Parkhe, August 1, 2022

No comments:

Post a Comment