Tuesday, October 11, 2022


पापक्षालन - प्रायश्चित घेण्यासाठी कन्फेशनल बॉक्ससमोर आम्हा मुलांची रांग लागलेली असायची.

साठच्या दशकातला उत्तरार्ध. त्याकाळात श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगावच्या संत तेरेजा मुलांचे विद्यालय बोर्डिंगमध्ये मी तिसरी किंवा चौथीत असेन. त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात सर्वच मिशनकेंद्रांत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे सदस्य असलेले जर्मन, ऑस्ट्रेलियन किंवा स्विस फादर्स असत. देशी धर्मगुरुंचे युग सुरु होण्यास अजून एक दशकाचा कालावधी होता. तर या युरोपियन धर्मगुरुंच्या देखरेखीखाली आम्हा मुलांची अध्यात्मिक जडणघडण होत होती.

दर शनिवारी संध्याकाळीं किंवा रविवारच्या सकाळच्या मिस्साविधिपूर्वी आम्हा मुलांची संत तेरेजा देवळात रांग लागायची. उंचच उंच शिखर असलेल्या त्या भव्य देवळाच्या भिंतीच्या दोन्ही बाजूला दोन किंवा तीन फादर - फादर ह्युबर्ट सिक्स्थ, फादर रिचर्ड वासरर, फादर ज्यो पिंटो - प्रायश्चित ऐकण्यासाठी आपल्या खुर्चीवर बसलेले असायचे. त्यांच्या खुर्चीच्या एका बाजूला जाळीधारी लाकडी फळी असायची, त्या फळीच्या खाली असलेल्या लाकडी पट्टीवर गुडघे टेकून मुलं त्या आठवड्यात आपण केलेल्या लहानमोठ्या पापांची यादी फादरांना सांगत असत.
प्राथमिक शाळातील मुलांनीं केलेली ती पापं शांतपणे ऐकत ते फादर मुलांना पापक्षालन म्हणून एकदोन `आमच्या बापा' अन एक `नमो मारिया' या प्रार्थना म्हणायला सांगत, नंतर आपला उजवा हात उंचावून पवित्र क्रुसाची खूण करत ते मुलांच्या पापांची क्षमा करत.
त्यानंतर रांगेतला दुसरा मुलगा आपली पापं कबूल करायला, त्या पापांची क्षमा मागण्यासाठी त्या फळीवर गुडघे टेकायचा.
अशाप्रकारे पापक्षालन झाल्यावर पापमुक्त झालेली ही मुले नंतर होणाऱ्या मिस्साविधीत पवित्र कम्युनियन किंवा ख्रिस्तशरीर सेवन करण्यासाठी पात्र असायची.
आम्हा सर्व मुलांचे जन्मल्यानंतर काही महिन्यांतच बाप्तिस्मे झाले होते, त्यानंतरचे दोन महत्त्वाचे सांक्रामेन्त प्रथम कम्युनियन आणि प्रायश्चित या शाळेच्या बोर्डिंगमध्ये असताना झाले.
जन्मानंतर कुठलीही व्यक्ती देवाने मोशेला दिलेल्या दहा आज्ञांचे (टेन कमांडमेंट्स) उल्लंघन करतेच आणि पाप करते. या पापांचे क्षालन होण्यासाठी प्रायश्चित किंवा कन्फेशन हा स्नानसंस्कार किंवा सांक्रामेंत.
या `टेन कमांडमेंट्स'मध्ये मुर्तीपुजा करु नकोस, आईवडलांचा सन्मान कर, रविवार (शब्बाथ) पवित्र पाळ, खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस, व्यभिचार करु नकोस, खून करु नकोस, वगैरेंचा समावेश होतो.
आता दहाबारा वर्षांची मुलंमुली असं कोणतं पाप करणार आहेत ? मात्र त्याकाळात प्रायश्चित घेण्यासाठी कन्फेशनल बॉक्ससमोर आम्हा मुलांची रांग लागलेली असायची.
हल्ली रविवारी किंवा सणावाराला चर्चला आवर्जून जाणाऱ्या भाविकांपैकी अनेकांना त्यांनी प्रायश्चित कधी घेतले होते हे आठवणारसुद्धा नाही. मीसुद्धा याला अपवाद नाही
कॅथोलिक धर्मात सप्त स्नानसंस्कार म्हणजे सात सांक्रामेंत असतात. जन्मानंतर काही दिवसांत होणारा बाप्तिस्मा (नामकरण विधी) , बालपणी कम्युनियन, प्रायश्चित किंवा कन्फेशन, पौंगडावस्थेत कन्फर्मेशन किंवा दृढीकरण, तरुणपणी लग्नविधी किंवा दिक्षाविधी, आणि पार्थिव देहावर अंतिम संस्कार हे ते सप्त स्नानसंस्कार.
यापैकी बाप्तिस्मा, लग्नविधी, दीक्षाविधी आणि अंतिम संस्कार हे सांक्रामेंत आयुष्यातून एकदाच होतात तर कम्युनियन आणि प्रायश्चित हे दोन सांक्रामेंत भाविक वारंवार घेऊ शकतात. लग्नाचा विधी अर्थात काहींच्या बाबतीत एकापेक्षा अनेकदा होऊ शकतो !
कॅथोलिक देवळात रविवारीही (आणि दररोजही) होणाऱ्या मिस्साविधीत भाविकांना ख्रिस्तशरीर किंवा कम्युनियन दिले जाते. प्रायश्चित या सांक्रामेंतचा लाभ भाविक त्यांना हवे तेव्हा घेऊ शकतात.
मात्र कन्फर्मेशन (दृढीकरण), लग्न, दीक्षाविधी यासारख्या महत्त्वाचे सांक्रामेंत स्विकारण्याआधी त्या व्यक्तींनी प्रायश्चित घेऊन म्हणजे एकप्रकारे अध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध, पवित्र होऊन पुढले पाऊल उचलावे अशी अपेक्षा असते.
ख्रिस्ती धर्मानुसार जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती मूळ पापाचा कलंक घेऊन येत असते. आदाम आणि ईव्ह या पृथ्वीतलावरील पहिल्या पुरुष आणि स्त्रीने देवाची आज्ञा मोडली. इदेन बागेतलं देवाने मना केलेलं एक फळ (सफरचंद? ) इव्हने सैतानाच्या सांगण्यानुसार खाल्ले, आदामालाही खाल्लेलं अर्धे फळ खाण्यास दिलं, हेच ते मूळ पाप किंवा ओरिजिनल सिन. येशू ख्रिस्ताने क्रुसावर मरण पत्करुन मानवजातीची मूळ पापापासून सुटका केली.
बाप्तिस्मा घेणारी प्रत्येक व्यक्ती जन्मतः येणाऱ्या या मूळ पापापासून मुक्त होते. येशूची आई मदर मेरी मात्र या मूळ पापाच्या कलंकाशिवाय जन्माला आली, असा कॅथोलिक धर्माचा एक धर्मसिद्धांत ( डॉक्टरीन) आहे.
``ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता, त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची पापे तुम्ही तशीच राहू द्याल, ती तशीच राहतील,'' असं येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना म्हटलं होतं, त्या आधारावर पापक्षालन या स्नानसंस्काराची स्थापना झाली आहे.
कुठल्याही कॅथोलिक चर्चच्या सणानिमित्त, यात्रेनिमित्त जमलेले अनेक भाविक पापक्षालन सांक्रामेंत घेत असतात.
धर्मगुरु, बिशप, आर्चबिशप आणि कार्डिनल्स, पोपसुद्धा मानवच असल्याने पापं करणारच, त्यामुळे तेसुद्धा वेळोवेळी प्रायश्चित घेत असतात.
पोप हे भुतलावरचे येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधी, सेंट पिटरचे उत्तराधिकारी, त्यांना `होली फादर' असेच संबोधले जाते. तर सर्वोच्च धर्माचार्य असलेले सद्याचे पोप फ्रान्सिस हे सुद्धा आपल्या पापक्षालनासाठी एखाद्या धर्मगुरुकडे आपल्या पापांची कबुली देऊन पापक्षालन करत असतात, हे वाचून अनेकांना धक्का बसायची शक्यता आहे.
यावरुन एक आठवलं. पोपपदावर आल्यानंतर लगेचच पोप जॉन पॉल दुसरे यांच्यावर व्हॅटिकन सिटीत सेंट पिटर्स चौकात दर्शनासाठी भाविकांमध्ये वाहनातून फिरत असताना जीवघेणा गोळीबार झाला. पोटात तीनचार गोळया जाऊनसुद्धा आश्चर्यकारकरित्या ते बचावले आणि पुढे सत्तावीस वर्षे पोप राहण्याचा आणि जगाचा राजकीय आणि भौगोलिक इतिहास बदलण्याचा विक्रम त्यांचा नावावर जमा झाला.
पोप यांच्यावर हल्ला करणाऱ्या अली अगका नावाच्या तुर्किश तरुणाला पुढे जन्मठेपेची सजा झाली. पोप जॉन पॉल या स्वतःच्या मारेकऱ्याला तुरुंगात जाऊन भेटले आणि त्याला त्याच्या पापाची किंवा गुन्ह्याची आपण क्षमा केली आहे असे त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर सांगितले.
अर्थात अली अगकाच्या पापाचे क्षालन झाले तरी या लौकिक जगातल्या न्यायानुसार अली अगका याला तुरुंगवासाची शिक्षा मात्र माफ झाली नव्हती. (पोप जॉन पॉल यांच्याप्रमाणेच प्रियंका गांधीसुद्धा त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना तुरुंगात भेटल्या आणि त्यांच्याविषयी आपल्या मनात कटुता नाही असं नंतर त्यांनी सांगितलं.)
मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांच्या मृत्यूच्या सजेआधी त्यांचं प्रायश्चित ऐकून घेतले जाते.
विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचेही प्रायश्चित ऐकून घेतल्यानंतर, पापांची कबुली ऐकल्यावर ती कबुली धर्मगुरुंना इतर कुणालाही अगदी न्यायालयांतसुद्धा उघड करण्याची परवानगी नसते. मग ही पापाची कबुली एखाद्या चोरीबद्दल, खुनाबद्दल, बलात्कारासारख्या किंवा खुनासारख्या मोठ्या गुन्ह्यांबद्दल असो. ही पापकबुली धर्मगुरुंना स्वतःपाशीच ठेवावी लागते.
अशा प्रकारचे कन्फेशन करणे किंवा पापांची कबुली देणे याचे फायदे खूप असतात आणि त्यामुळे धार्मिक बाब एकवेळ बाजूला ठेवली तरी मानसशास्त्रात त्यास फार महत्त्वाचे मानले गेले आहे.
मूळ पाप हे जन्मतः येते, तर काही पापे अथवा गुन्हे सामूहिक असतात. उदाहरणार्थ, अडॉल्फ हिटलरच्या कारकिर्दीत जर्मनीत लाखो निरपराध ज्यु लोकांना मृत्युदंडाची सजा देण्यात आली, अगणित लोकांचा छावण्यांत छळ करण्यात आला आणि त्याकडे इतर समाजघटकांनी, देशांनी आणि कॅथोलिक चर्चसारख्या सामर्थ्यवान संस्थांनी सरळसरळ काणाडोळा केला.
जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्लंडच्या राजघराण्याने किंवा प्रतिनिधींनी भारताची माफी मागावी, पापक्षालन करावे अशीसुद्धा मागणी केली जाते.
तसेच युरोपात आणि अमेरिकेत ख्रिस्ती धर्मगुरुंनी लहान मुलांवर केलेल्या लैगिक अत्याचाराबाबत म्हणता येईल, त्याबद्दल संबंधीत लोकांची आणि कुटुंबियांची पोप बेनेडिक्त सोळावे आणि पोप फ्रान्सिस यांनी माफी मागून एकप्रकारे पापक्षालनाची विनंती केली आहे.
तर अशा या पापक्षालनाविषयी अजून बरंच काही लिहिता येईल.

^^^^
Camil Parkhe, October 10, 2022

No comments:

Post a Comment