शाह रुख खान, राज कपूरभारताचे अनभिषिक्त सांस्कृतिक राजदूत -
काही वर्षांपूर्वी कुटुंबियांसह युरोपच्या सहलीवर होतो तेव्हाची ही गोष्ट. निघण्याआधी ऐनवेळेस इंग्लंडचा व्हिसा मिळाला नव्हता, त्यामुळे फ्रान्स आणि इटलीतील मुक्काम वाढवला होता. फ्रान्समध्ये आठवडाभर आणि पॅरीस येथे तीनचार दिवस होतो. त्यामुळे तिथली मेट्रो सेवा आणि इतर गोष्टी थोड्याफार अंगवळणी पडल्या होत्या.
एक दिवस पॅरीसमधल्या मॉन्ट मार्त या आमच्या स्थानाच्या परिसरातील रस्त्यावर आम्ही तिघं जण फिरत होतो आणि एका सुपरमार्केटमध्ये शिरलो.
त्याचं ते उत्साही उद्गार ऐकून आम्ही तिघंही चकित झालो. अन त्यानंतर साहजिकच त्या तरुणाशी थोडंफार बोलणंही झालं.
आम्हाला फ्रेंच मुळी येत नव्हतं आणि तो मोडकंतोडकं इंग्रजी बोलू शकत होता.
त्या संभाषणातून कळलं कि बॉलीवूड नट शाह रुख खान त्याचा आवडता अभिनेता होता आणि शाहरुखचे सिनेमे तो आवर्जून पाहत होता. सब-टायटल्सच्या माध्यमातून त्याला हिंदी सिनेमे पाहणं आणि समजून घेणं शक्य झालं होतं. हिंदी चित्रपटांच्या कथा, नाच-गाणी आणि संगीत त्याला आणि फ्रान्समधल्या त्याच्या तरुण पिढीला आवडत आहे असं तो सांगत होता.
शाह रूख खान शिवाय ह्रतिक रोशन, सलमान खान, आमिर खान, प्रियांका चोप्रा आणि ऐश्वर्या राय हे त्याचे आवडते अभिनेते-अभिनेत्री होते.
खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९८६ साली मी पूर्व युरोपात बल्गेरियात आणि सोव्हिएत रशियात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी गेलो होतो तेव्हा असाच थक्क करणारा अनुभव मी घेतला होता.
मॉस्को शहरात आणि बल्गेरियात आम्हा भारतीयांचं 'हिंदी चित्रपट अभिनेता राज कपूर याच्या देशातील लोक' असं म्हणूनच अगदी प्रेमानं स्वागत व्हायचं.
राज कपूरचे `श्री ४२०', 'आवारा' असे कितीतरी चित्रपट रशिया आणि पूर्व युरोपियन देशांत तुफान लोकप्रिय होते. ``मेरा जुता हे जपानी'' हे राज कपूरचे गाणं तिथल्या अनेक लोकांना तोंडपाठ होतं.
पॅरीसमधल्या त्या तरुण पोराचं बॉलीवूडच्या लोकांवरचं प्रेम अनुभवलं आणि राज कपूरप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतील हे अभिनेतेसुद्धा परदेशांत भारताचे अनभिषिक्त सांस्कृतिक राजदूत म्हणून काम करत आहेत याची जाणिव झाली
उगाच नाही `पठाण' ने जागतिक पातळीवर बॉक्स ऑफिसवरचे आधीचे सगळे विक्रम मोडून काढलेत !
No comments:
Post a Comment