मासळी : दिड-दोन महिन्यांआधी शंभर किंवा दिडशे रुपये किलो असणारे ओले बोंबील काल साडेतीनशे रुपये किलो होते, माझा आवडीचा `ऑल टाइम फेवरेट' असलेला बांगडा मे महिन्याअखेरीस शंभर रुपये किलो होता, त्याची किंमत सुद्धा आता साडेतीनशेच्या आसपास होती.सहज म्हणून चौकशी केली. सुरमई, रावस प्रत्येकी हजार रूपये किलो. नदीतले काही मासे होते, काळेकुट्ट रंगाचे काही खेकडेपण होती पण त्याबद्दल मी काही चौकशी केली नाही.
घ्यायचे नव्हते तरी सहज म्हणून चौकशी केली. सुरमई, रावस प्रत्येकी हजार रूपये किलो. नदीतले काही मासे होते, काळेकुट्ट रंगाचे काही खेकडेपण होती, पण त्याबद्दल मी काही चौकशी केली नाही.
जिथे जायचे नाही त्या गावाच्या वाटेची कशाला चौकशी करायची ?
कालचीच गोष्ट पाहा ना. संध्याकाळी घरी तळण्यासाठी काही न्यावे म्हणून दुकानात गेलो तर 'पुढील आठ दिवस अमुकअमुक तारखेपर्यंत दुकान बंद राहील' अशी पाटी होती.
खूप हिरमोड झाला. वर्षातून याच काळात जेव्हा मालाची आणि गिऱ्हाईकांचीही आवक कमी असते नेमके तेव्हाच हा दुकानदार धार्मिक पर्यटन, भटकंती अशी विविध कामे उरकून घेत असतो.
तर हमरस्त्यावरच्या या दुसऱ्या दुकानात मी गेलो, तिथे प्रत्येक माशांच्या प्रकारांची किंमत त्या-त्या कंटेनरवर लिहिली होती. मॉलमध्ये असते तशी.
आणि मासळीची किंमत काहीही असली तरी अनेक बायापुरुष रांगा लावून, हातांत ट्रे घेऊन आपल्याला हवी ती मासे घेत होती, वजन करायला आणि पैसे द्यायला गल्ल्याकडे जात होती.
मासे आणायला गेलो की मला हमखास गोव्यातल्या पणजी फिश मार्केटची आठवण येते.
आमच्या 'द नवहिंद टाइम्स' दैनिकाचे मुख्य वार्ताहर दुपारी साडेबाराच्या आसपास अगदी शेजारीच असलेल्या या फिश मार्केटमध्ये जायचे. त्याआधी शिपायाकडून प्रतिस्पर्धी असलेल्या दैनिक `गोमंतक' किंवा इंग्रजी `हेराल्ड'चा एक अंक मागवायचे आणि त्यात मासळी गुंडाळून घेऊन यायचे. स्कुटरच्या डिकीमध्ये ही मासळी ठेवून पर्वरीला ते आपल्या घरी जेवायला आणि दुपारच्या सिएस्ता म्हणजे वामकुक्षीसाठी जायचे.
काही वर्षांनंतर ते `गोमंतक टाइम्स'ला रुजू झाल्यानंतर मासळी नेण्यासाठी ते काय करायचे हे मला माहित नाही.
ताळगावला घरी जाण्याआधी फिश मार्केट मध्ये संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मी जायचो.
तिथे बांगडा आणि इतर काही मासळीचे वाटे पसरुन ठेवलेले असायचे. एका वाट्यामध्ये सात आठ बांगडे असायचे. दहा रुपयाला एक वाटा.
बांगडे करी करायला, तळायला सोपे, त्याशिवाय एकच सरळ, मोठा काटा. हल्ली दहा रुपयाला वाट्यामध्ये मिळणाऱ्या सात-आठ बांगडे माशांची आठवण तशी सुखद वाटते.
आणि दुसरे एक.
गोव्यात जसा समान नागरी कायदा शंभर वर्षांपासून, पोर्तुगीज राजवट असल्यापासून, अंमलात आहे, त्याचप्रमाणे तिथे जवळजवळ बहुसंख्य लोक अगदी प्रेमाने, आवडीने मासळी खात असतात. मासळीबाबत अलिखित समान खाद्य संस्कृती ! बंगाली लोकांप्रमाणेच. अर्थात काही दिवसांचा आणि सणावारांचा तिथेही अपवाद असतोच.
काल नेहमीपेक्षा तिपटीने अधिक मासळीची किंमत देऊन मी आलो आणि सहज लक्षात आले.
सद्या टमाटे खूप महाग झाले याविषयी सगळीकडे चर्चा झाली, होत आहे, तशी मासळीच्या तात्पुरत्या वाढलेल्या किंमतीची झालेली नाही.
बहुधा होणारही नाही.
No comments:
Post a Comment