सोव्हिएत रशिया
Chernobel, ``आता आपण हिमालय पर्वतरांगांच्या वरुन अमुकअमुक हजार मिटर्स उंचावरुन जात आहोत '' अशी आमच्या एरोफ्लोट विमानाच्या स्पिकरवर ती रशियन, इंग्लिश, हिंदी आणि इतर काही भाषांतून केली जाणारी घोषणा ऐकली आणि नजर आपसूक विमानाच्या खिडकीतून खालच्या दिशेने वळाली.
आमच्या विमानाने मॉस्कोच्या दिशेने जाण्यासाठी रात्री दोनला दिल्ली विमानतळावरुन उड्डाण केले होते आणि काही वेळाने ही घोषणा झाली होती. विमानातून हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत नव्हत्या, मात्र आपण या उंच पर्वतांच्या जवळ आहोत ही भावना सुखावत होती. काही तासांनंतर विमान जमिनीच्या दिशेने उतरु लागले तेव्हा बाहेर अगदी अंधुक दिसत होते.
विमान जमिनीवर उतरले तेव्हाच ती घोषणा झाली: ''आपणास कळविण्यास खेद होत आहे की आज मॉस्को शहरातील तापमान नेहेमीपेक्षा खूपच खाली गेले आहे. विमानाबाहेर यावेळेस उणे १२ डिग्री सेल्शियस तापमान असून बर्फवृष्टी होत आहे. प्रवाशांनी विमानतळाबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी.''
''बाप रे, उणे १२ तापमान, म्हणजे किती थंडी असेल?'' आम्ही पत्रकार आपापसांत चर्चा करु लागलो.
मार्च महिन्यात मॉस्को शहरात खरे तर इतके कमी तापमान सहसा नसते, त्यामुळे आज असाधारणरित्या तापमान खाली उतरुन बर्फवृष्टी होत आहे, असे कळाले. आम्ही मात्र इतके कमी तापमान आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अगदी उत्सुक झालो होतो.
ही घटना आहे मार्च १९८६ची. युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रशिया (यूएसएसआर ) ची राजधानी असलेल्या मॉस्कोत आम्ही भारतीय पत्रकार आलो होतो. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपातील अनेक राष्ट्रांत त्यावेळी म्हणजे शीतयुद्धाच्या काळात भारतातील पत्रकारांसाठी विविध दौरे, अभ्यासक्रम आयोजित केले जात असत. रशियाच्या पूर्ण प्रभावाखाली असलेल्या म्हणजे वॉर्सा पॅक्टअंतर्गत (नाटो पॅक्टच्या अगदी उलट) साम्यवादी राष्ट्रांनी किती प्रगती साधली आहे हे दाखवण्याचा या दौऱ्यांचा अंतःस्थ हेतू असायचा हे उघड गुपित होते.
मॉस्को शहरात असताना त्या दिवसांत सोव्हिएत रशियातल्या साम्यवादी वातावरणाची पहिल्यांदा ओळख झाली. पुढील काही महिने असेच वातावरण वेगवेगळ्या स्वरुपांत दिसणार होते. त्या कडाक्याच्या थंडीत दिडेक किलोमीटर लांब असलेल्या रांगेत उभे राहिल्यानंतर भुयारी स्मारकात गेल्यावर तिथे काचेच्या पेटीत थ्री-पिस सूटमध्ये असलेल्या कॉम्रेड ब्लादिमीर लेनिनचे दर्शन घडले. स्मारकाबाहेर त्या जगप्रसिद्ध रेड स्केअर मध्ये आणि क्रेमलिनमध्ये कार्ल मार्क्स, फ्रेड्रिक्स एंजल्स, लेनिन, जोसेफ स्टॅलिन यांचे भव्य पुतळे पाहिले.
मॉस्कोत बसने फिरत असताना एका चौकात नुकतेच हौतात्म्य प्राप्त झालेल्या भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुतळाही पाहिला. इंदिरा गांधीं यांच्याशिवाय हिंदी चित्रपट अभिनेते राज कपूर यांचे नाव आणि त्यांच्या चित्रपटातील गाणी रशियात बहुपरिचित होते याचा सुखद अनुभवही आला.
मॉस्कोत क्रेमलीनमध्ये फिरत असताना त्यावेळच्या सोव्हिएत रशियाचे प्रमुख म्हणजे रशियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस असलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निवासस्थान आम्हा पत्रकारांना लांबूनही दाखवण्यात आले नाही हे त्याचवेळी लक्षात आले.
आम्हाला सोव्हिएत रशियाची, तेथल्या स्मारकांची आणि मॉस्को शहराची माहिती देताना आमचे अनुवादक आणि गाईड पोपटपंची करत आहेत, नेहेमीची तोंडपाठ केलेली माहिती ते सांगत आहेत हेसुद्धा जाणवत होते.
ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी वर्णिलेल्या आर्यन कर्टन किंवा पोलादी पडदा काय असू शकेल याची ही अर्थांत केवळ झलक होती
गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत रशियाचे प्रमुख म्हणून नुकतीच सूत्रे घेतली होती, मात्र त्यांचे ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइका या राजकीय आणि राजकीय सुधारणांबाबत तोपर्यंत जागतिक पातळीवर चर्चा सुरु झाली नव्हती. अजूनही रशियाकडे आणि या `बिग ब्रदर'चे कठपुतळी राष्ट्रे असलेल्या पूर्व युरोपातल्या रुमानिया, पूर्व जर्मनी, युगोस्लाव्हाकिया, पोलंड, बल्गेरिया वगैरे राष्ट्रांकडे संशयित नजरेने पाहिले जात असे.
या छोट्याछोट्या साम्यवादी देशांचे पश्चिम युरोपातल्या नाटो
राष्ट्रांशी आदानप्रदान नसायचे, प्रत्येक बाबतीत ही राष्ट्रे सोव्हिएत रशियावर अवलंबून असायची हे आम्हा पत्रकारांना आमच्या तेथील वास्तव्यात नेहेमी जाणवायचे. उदाहरणार्थ, बल्गेरियातील साम्यवादी क्रांतीचा नेता आणि या देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष असलेल्या जॉर्जि दिमित्रोव यांचे शरीर लेनिनप्रमाणेच सोफिया या राजधानीच्या शहरात जपवून ठेवले होते !
आमचा पत्रकारितेचा अभ्यासक्रम बल्गेरियात होता. याकाळात या देशातील बल्गेरियन भाषा शिकता आली, या भाषेसाठी वापरली जाणारी सिरिलिक ही लिपी रशियन आणि इतर देशांतील भाषांसाठीसुद्धा वापरली जाते.
सेंट सिरील आणि त्याचा भाऊ सेंट मेथोडियस या ख्रिस्ती धर्मगुरुंनी या लिपीतील काही वर्णाक्षरे सर्वप्रथम विकसित केली म्हणून या लिपीला सिरिलिक असे नाव पडले. हातात वर्णाक्षरांची पाट्या असलेल्या सेंट सिरील आणि सेंट मेथोडियस याची चित्रे युरोपात अनेक ठिकाणी दिसतात. हिच सिरिलिक लिपी रशियन भाषेसाठी वापरली जात असल्याने या लिपीला रशियन लिपी असेही म्हटले जाते. रशियाचा असाही प्रभाव इतर पूर्व युरोपियन देशांत दिसायचा.
मॉस्कोत अनेक जुन्या चर्चेसला आम्ही भेट दिल्या. `धर्म ही अफूची गोळी आहे' असे मानणाऱ्या सोव्हिएत रशियातल्या कम्युनिस्ट राजवटीने धर्मावर सरळसरळ बंदीच घातली होती. अत्यंत देखणे वास्तुशिल्प असलेल्या अनेक चर्चमध्ये आम्ही गेलो, तिथे केवळ सत्तरी पार केलेले मोजकेच पुरुष आणि महिला दिसायचे, काळे झगे आणि डोक्यावर काळेच उंच मुकुटवजा पगडी घातलेले आर्थोडॉक्स पंथीय धर्मगुरु दिसायचे.
त्याकाळच्या कम्युनिस्ट राजवटीत केजीबी आद्याक्षरे असलेली एक पाताळयंत्री गुप्तहेर संघटना होती, अमेरिकेतल्या सीआयए सारखी आणि तशाच स्वरुपाचे कामे करणारी. सीआयए आणि केजीबी या प्रतिस्पर्धी गुप्तहेर संघटनांवर आधारीत दीर्घकाळ चाललेल्या शितयुद्धाच्या काळात अनेक कादंबऱ्या आणि चित्रपटांची निर्मिती झाली.
सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन काही वर्षांनंतर आताचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे सत्तेवर आले. विशेष म्हणजे हे पुतीन महाशय त्याकाळच्या भयानक दरारा असलेल्या त्या केजीबी संस्थेचे प्रमुख होते !
कम्युनिस्ट राजवट संपल्यावर पुतीन यांनी आता स्वतःच्या हातात सर्व सत्ता ठेवली आहे आणि ते स्वतः ख्रिस्तीधर्मीय बनले आहेत आणि रशियात सहा जानेवारीला साजरा होणाऱ्या ख्रिसमसच्या प्रार्थनाविधीला ते नियमितपणे हजेरी लावत असतात ! राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याप्रमाणेच रशियातील अनेक लोक पुन्हा धर्माकडे वळले आहेत.
सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यावर विविध राष्ट्रे नव्याने अस्तित्वात आली त्यापैकी काही राष्ट्रांत बहुसंख्य लोक मुस्लीम आहेत. धर्माला बळजबरीने गाडून टाकण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच लोकांमध्ये
धार्मिक भावना पुन्हा उफाळून येतात हे यावरुन दिसून आले आहे.
मी बल्गेरियात असताना चेर्नोबल अणुभट्टीतील दुर्घटना घडली. जगाच्या इतिहासातील ही पहिली मोठ्या स्वरुपाची अणुशक्ती अपघात आणि दुर्घटना. सोव्हिएत रशियातील मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या राजवटीने चेर्नोबल अणुभट्टीतील ही दुर्घटना आणि तिचे स्वरुप जगापासून अनेक दिवस लपवून ठेवले होते, मात्र अमेरिकेने हे बिंग फोडले आणि साऱ्या जगाला धक्का बसला.
अशा स्वरुपाच्या अनेक बातम्या त्याकाळी आणि आजही चीन आणि आताच्या रशियन राजवटी जगापासून लपवून ठेवत असतात.
गोर्बाचेव्ह यांच्या राजवटीत सोव्हिएत रशियाचे विघटन आले, युरोप आणि आशियात अस्तित्व असलेल्या महाकाय आकाराच्या अखंड सोव्हिएत रशियातून अनेक राष्ट्रे जन्माला आली. हुकूमशाही कम्युनिस्ट राजवटीत यापैकी अनेक प्रदेश सोव्हिएत रशियात जबरदस्तीने विलीन करण्यात आले होते. त्या प्रदेशांतील लोकांची संस्कृती आणि अस्मिता दडपून टाकण्यात आली होती.
(At my residence in Bankya, Sofia in Bulgaria - 1986)
Camil Parkhe
No comments:
Post a Comment