Francisco Luis Gomes
गोव्यात पणजीला तुम्ही गेला तर डोना पॉलच्या दिशेने जाणाऱ्या दयानंद बांदोडकर मार्गावर मांडवीच्या किनाऱ्यापाशी कंपाल गार्डनमध्ये एक पूर्णाकृती पुतळा दिसतो.
पणजी येथील मध्ययुगीन आदिलशहा पॅलेस किंवा जुन्या सेक्रेटरीएटजवळ असलेला ऍबे फरिया यांचा पुतळा त्यातून वाचला, तसाच कला अकादमीशेजारच्या कंपाल गार्डनमधला हा पुतळासुद्धा. या दोन्ही पुतळ्यांबाबत यामागील कारण एकच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या दोन्ही व्यक्ती ` नीज गोंयकार' आहेत.
पणजीला नेहेमी येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तींचे कंपाल गार्डनमधील कमरेवर एक हात ठेवून असलेल्या या व्यक्तीच्या पुतळ्याकडे सहसा लक्ष जात नाही किंवा अगदी क्वचित लक्ष जाते.
सुरुवातीला शिक्षणानिमित्त आणि नंतर `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात बातमीदारी करताना अनेक वर्षे मी मिरामार बिचजवळ आणि नंतर शेजारच्या ताळगावला राहिलो, बसने आणि दुचाकीने येता-जाताना या पुतळ्याविषयी नेहेमीच कुतूहल वाटायचे.
हा पुतळा आहे डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स (Francisco Luis Gomes) यांचा. पोर्तुगीज उच्चारांनुसार फ्रांसिश्कु लुईश गोमिश. गोव्यातील अनेक लोकांनासुद्धा या डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याविषयी फार माहिती असण्याची शक्यता कमीच आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून तीनदा निवडून गेले होते.
त्याशिवाय फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे एक अगदी महत्त्वाचे आगळेवेगळेपण आहे.
एकोणिसाव्या शतकात जेव्हा निम्म्याहून अधिक जग वसाहतवादाने वेढले होते तेव्हा पारतंत्र्यात असलेल्या भारताला पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे फ्रान्सिस्को लुईस गोम्स हे पहिलेच राष्ट्रवादी नेते होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचा हा पुतळा शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९३१ साली साली पोर्तुगाल राजवटीतच डॉ. गोम्स यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उभारला गेला होता.
गोम्स यांच्या जन्मशताब्दीच्या दिनी म्हणजे ३१ मे १९२९ रोजी या पुतळ्याची कोनशिला बसवण्यात आली होती. या पुतळ्याचे ब्राँझ कास्टिंग इटालीमधील फ्लॉरेन्स शहरात झाले होते.
गोव्यातील तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर जनरल जोआओ कार्लोस क्राव्हेइरो लोपेश आणि आणि ईस्ट इंडिजचे पॅट्रियार्क हे पद असलेले गोव्यातील चर्चप्रमुख डॉम तिओटोनिओ डी कॅस्ट्रो यांनी २३ डिसेंबर १९३१ रोजी या पूर्णाकृती पुतळ्याचे या कंपाल गार्डनमध्ये अनावरण केले.
डॉ. गोम्स यांनी २२ डिसेंबर १८६० रोजी लिस्बनमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवून संसदेच्या आपल्या खासदारकीची सुरुवात केली होती.
पोर्तुगीज राजवटीतच त्यांचा पूर्णाकृती पुतळा पणजी येथे उभारला गेला तेव्हा पोर्तुगाल आणि भारत या दोन्ही देशांसाठी आपली प्रतिभा आणि सर्व गुण समर्पित करणारा देशभक्त म्हणून तेथील शिलालेखात त्यांचा गौरव करण्यात आला होता.
या पुतळ्याच्या चौथऱ्यावर पोर्तुगीज भाषेत खालील शिलालेख आहे . त्याचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे:
डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्या गौरवशाली स्मृतीस
स्वातंत्र्याचे निर्भयी पुरस्कर्ते
प्रखर वक्ते
थोर साहित्यिक
विद्वान अर्थशास्त्रज्ञ
देशभक्त
ज्यांनी आपल्या तेजस्वी बुद्धीच्या
सर्व शक्ती
भारत आणि पोर्तुगालच्या कल्याणासाठी अर्पण केल्या
जन्मशताब्दीप्रित्यर्थ
१८२९–१९२९
" हा पुतळा पोर्तुगीज भारताच्या ७ व्या प्रांतीय अधिवेशनाच्या अभ्यास समितीने सुचवला.
अध्यक्ष डॉ. अँटोनिओ मारिया दा कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली,
प्रख्यात खासदार आणि नामांकित लेखकाचा गौरव करण्यासाठी,
ज्यांनी द ब्राह्मिन्स, द मार्क्विस ऑफ पोम्बाल, राजकीय अर्थशास्त्र आणि भूमी स्वातंत्र्य यांसारखी साहित्यकृती निर्माण केली."
गोव्यात आणि दमण, दीव, दादरा नगर हवेली या भारताच्या इतर प्रदेशांत पोर्तुगालची तब्बल साडेचारशे वर्षे सत्ता होती. यापैकी बहुतांश काळात १८२२ नंतर गोवा, दमण, दीव, दादरा नगर हवेली यांचा समावेश असलेल्या पोर्तुगीज इंडियातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते.
पोर्तुगीज नागरिकांप्रमाणे पोर्तुगालच्या सर्व वसाहतीमध्ये स्थलांतर करण्याचे अधिकार आणि हक्क गोवा, दमण आणि दीव दादरा, नगर हवेली यासारख्या इतर सर्व पोर्तुगीज वसाहतीतील लोकांनाही होते.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गोवामुक्तीआधी म्हणजे १९ डिसेंबर १९६१ आधी पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना पोर्तुगीज नागरिकत्वावरचा हक्क आजही शाबूत आहे.
इतकेच नव्हे तर त्यांच्या पुढच्या दोन पिढ्यांनासुद्धा हा हक्क आहे.
पोर्तुगालमध्ये 1822 सालच्या राज्यघटनेनुसार गोव्यात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी लिस्बनमध्ये सत्तेवर आलेल्या लिबरल पार्टीने सर्व नागरिकांना मतदानाचे अधिकार दिले होते. विशेष म्हणजे पोर्तुगाल साम्राज्याच्या जगभरातील सर्व वसाहतीतील - पोर्तुगीज इंडियासह- सर्व नागरिकांचा त्यात समावेश होता.
लोकशाही तत्त्वानुसार ही फार मोठी राजकीय घटना होती. अर्थात निवडणुकीत मतदानाचे हे अधिकार काही विशिष्ट लोकाना होते. पोर्तुगीज बऱ्यापैकी लिहू आणि वाचू शकणारे आणि काही किमान सरकारी कर भरणारे पोर्तुगाल साम्राज्यातील वसाहतींतील सर्व नागरिक या मतदानासाठी पात्र होते.
पोर्तुगालच्या संसदेचे सभासद म्हणून फ्रान्सिस्को लुईस गोम्स गोव्यातून तीनदा निवडून गेले होते. .
मात्र फ्रान्सिस्को लुईस गोम्स हेसुद्धा गोव्यातून पोर्तुगाल संसदेवर निवडून जाणारे पोर्तुगीज इंडियातले - गोव्यातले - पहिले नागरिक नव्हते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांच्याआधी म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीच बर्नार्डो पेरेस दा सिल्व्हा यांची आणि कॉन्स्टॅनशिओ रॉक दा कोस्टा या दोन गोवन नागरिकांची सर्वप्रथम यांची पोर्तुगालच्या संसदेवर चार जानेवारी १८२२ रोजी निवड झाली होती.
यापैकी बर्नार्डो पेरेस दा सिल्व्हा (१७७५- १८४४) हे पोर्तुगाल संसदेवर गोव्यातून तब्बल तीनदा निवडून गेले होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी मात्र इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, साहित्य अशा विविध क्षेत्रांत भरीव योगदान केले आणि जागतिक कीर्तीला पात्र ठरले. गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरु ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे इंग्रजी भाषेत लिहिलेले विस्तृत चरित्र नॅशनल बुक ट्रस्टने २०१० साली प्रकाशित केले आहे.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचा जन्म दक्षिण गोव्यातील नावेली येथे ३१ मे १८२९ रोजी झाला. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी तरुण वयातच पोर्तुगीज भाषेबरोबरच फ्रेंच, लॅटिन, मराठी, कोकणी भाषांत प्राविण्य मिळवले.
पणजीतल्या गोवा मेडिकल कॉलेजात त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पणजी येथे १८०१ साली स्थापन झालेले हे स्कूल ऑफ मेडिसिन अँड सर्जरी हे केवळ भारताततली नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली आधुनिक वैद्यकीय शिक्षण संस्था होती.
या वैद्यकीय शिक्षणानंतर गोम्स यांनी सहा महिने ब्रिटिश भारतातील मुंबईत वास्तव्य केले.
मुंबईतल्या या अल्प काळात त्यांचा या शहरातल्या मूळच्या गोमंतकीय, अँग्लो इंडियन तसेच पारशी कुटुंबांशी संबंध आला. पोर्तुगीज इंडियाच्या म्हणजे गोव्याबाहेरील इतर भारतीय भागांत प्रचलीत असलेल्या समाजव्यवस्थेची त्यांना पहिल्यांदाच अशाप्रकारे ओळख झाली.
याच काळात त्यांनी मुंबई सोडून उत्तर भारतातील काही प्रदेशांना भेटी दिल्या असाव्यात. याचे कारण म्हणजे पोर्तुगालला गेल्यानंतर त्यांच्या लिखाणात उत्तर भारतातील समाज व्यवस्थेचे चित्रण आढळते. विशेषत त्यांनी पुढे लिहिलेल्या `द ब्राह्मण' या पोर्तुगीज कादंबरीत उत्तर भारतातील समव्यवस्थेचे चित्रण आहे.
ब्रिटिश भारतात असताना याच काळात गोम्स यांनी इंग्रजी, मराठी आणि इतर भारतीय भाषांत प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
गोव्यात परतल्यानंतर गोम्स यांनी गोवा सरकारच्या आरोग्य सेवा खात्यातर्फे आयोजित केलेल्या स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेतला. त्यानंतर त्यांची सहाय्यक सर्जन पदावर निवड झाली आणि पणजी येथील सैन्यदलात त्यांची नेमणूक झाली. नंतर त्यांची पोंडा येथे सहायक सर्जन या पदावर बढती मिळाली.
डॉ. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांची १८६०च्या ऑगस्ट महिन्यात दक्षिण गोव्यातून सालसेट- काणकोण मतदारसंघातून पोर्तुगाल संसदेवर निवड झाली. त्यावेळी त्यांचे वय अवघे बत्तीस वर्षे होते.
पोर्तुगीज संसदेत त्यांनी उदारमतवादी विरोधी पक्षात प्रवेश केला. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर लवकरच ते आपल्या पक्षाचे एक प्रमुख नेते बनले. पोर्तुगालच्या विविध नियतकालिकांत त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. पट्टीचे वक्ते म्हणूनसुद्धा ते गाजले. पोर्तुगीज पार्लमेंटमधील त्यांची भाषणे माहितीपूर्ण असत.
अफोन्सेका नावाच्या एका खासदाराने पोर्तुगीज संसदेतील वसाहतींचे प्रतिनिधित्व रद्द करावे असे एक विधेयक 1861 च्या जानेवारीत आणले होते. इंग्लंडने आपल्या संसदेतील कॅनडाचे प्रतिनिधित्व रद्द केले होते, त्या धर्तीवर हा ठराव दाखल करण्यात आला होता.
आपल्या भाषणातून गोम्स यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. पोर्तुगीज वसाहतीतील लोकांच्या राजकीय हक्कांचा धडाडीने समर्थन करत त्यांनी या विधेयकास विरोध केला.
वसाहतींमधील शेकडो लोकांना त्यांचा केवळ जन्म परदेशातील वसाहतींमध्ये झाला या एकाच कारणास्तव त्यांच्या राजकीय हक्कांपासून वंचित ठेवले जाऊ नये असे त्यांनी ठामपणे मांडले. `परदेशातील वसाहतींमधील लोक सुसंकृत नाहीत, त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क देण्यात येऊ नये' या अफोन्सेका यांच्या मुद्द्यात तथ्य नाही असेही गोम्स यांनी ठणकावून मांडले.
त्यांच्या या भूमिकेमुळे हे विधेयक बारगळले.
फ्रान्समधील साहित्यिक अल्फान्सो डी लामार्तिन (१७९० – १८६९) यांच्यापासून गोम्स यांनी प्रेरणा घेतली होती.
लामार्तिन यांना पाच जानेवारी १८६१ रोजी फ्रेंच भाषेत लिहिलेल्या एका पत्रात गोम्स यांनी म्हटले होते:
``भारत देशात माझा जन्म झाला. जो देश एके काळी काव्य, तत्त्वज्ञान, इतिहास यांचा पाळणा होता व जो आज दुदैवाने त्याचे थडगे होऊन राहिला आहे. ज्या देशाने महाभारत निर्माण केले व बुद्धिबळाचा शोध लावला, तो देश माझा आहे. या दोन महान कृतींत दिक्कालातीत असे काहीतरी आहे. पण हे राष्ट्र ज्याने आपल्या संहितांना कवितेत लिहिले, ज्याने आपल्या राजकारणाला खेळामधून प्रकट केले ते राष्ट्र आता मुळी अस्तित्वातच नाही! हा देश आपल्या मातृभूमीतच कैद झाला आहे, स्वतःच्या समृद्धीनेच पार थकलेला आहे आणि स्वतःच्या वैभवाच्या तेजोमयतेतच झाकोळून गेलेला आहे.
आपल्या पंखांच्या मदतीने हिमालयाच्या उंच शिखरांवर भरारी मारणाऱ्या या पक्ष्याने आता आपल्याच पिंजऱ्याच्या गजांशी झुंजत आपली पिसे गमावली आहेत. कोणे एकेकाळी या पक्ष्याच्या गीताचे स्वर संपूर्ण आकाश व्यापत असत, आता स्वातंत्र्य गमावल्यामुळे आक्रोश करणारी ही कोकिळा आपला मंजुळ स्वरच विसरुन गेली आहे. मी भारतासाठी स्वातंत्र्याची मागणी करत आहे.”
कल्पना करा कि फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी पारतंत्र्याच्या जोखंडात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी १८६१ साली केली.
गोम्स यांनी या पत्रात गुलामगिरीत जखडलेल्या आपल्या देशाची व्यथा मांडत व्यक्त केलेली ही भूमिका तेव्हा गुलामगिरीत असलेल्या भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामाच म्हणता येईल.
त्या काळात भारत हा प्रदेश एक एकसंघ राष्ट्र आहे अशी संकल्पना या भूमीवर राहणाऱ्या लोकांमध्येसुद्धा सोडा, येथील राज्यकर्त्यांमध्येसुद्धा रुजली नव्हती. या उपखंडातील छोटेमोठे राज्यकर्ते शतकोनुशतके आपापसांत लढत होती.
गोम्स यांनी हे ऐतिहासिक विधान केले त्याच्या चार वर्षे आधीच भारतातील विविध संस्थानिक मांडलिक आणि राजेमहाराजे यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेच्या विरोधात दिल्लीतील शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जाफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ साली उठाव केला होता. आपापल्या मुलखांत आपली सत्ता कायम राहावी यासाठी त्यांनी केलेली ही अखेरची धडपड होती.
त्यामुळेच फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी समुद्रापार युरोपात केलेली ही मागणी विलक्षण आणि ऐतिहासिक ठरते.
भारताला स्वातंत्र्य मिळावे, या देशाची गुलामी संपायला हवी अशी मागणी गोम्स त्याकाळात केली होती आणि तीसुद्धा युरोपात आणि पोर्तुगालच्या भुमीवर ही महत्त्वाची बाब आहे.
भारताला परकीय सत्तेतून मुक्ती मिळावी अशी मागणी तोपर्यंत देशात कुणीही केली नव्हती.
भारताच्या स्वातंत्र्याची अशी मागणी करणारे गोम्स हे पहिलेच भारतीय नेते.
त्यांच्यानंतर तब्बल तीन दशकांनंतर १८९२ साली ब्रिटिश भारतातून दादाभाई नौरोजी यांची इंग्लंडच्या संसदेवर निवड झाली. इंग्लंडच्या संसदेवर खासदार म्हणून निवड झालेले दादाभाई हे पहिलेच आणि एकमेव भारतीय.
भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी करण्याची मानसिकता भारतीय नेत्यांमध्ये निर्माण होण्यासाठी पुढे बराच काळ लागला. त्यामुळेच फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे भारतीय राष्ट्रवादी असणे अधिक ठळक होते.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी आपल्या याच पत्रात एक महत्त्वाची टिपण्णी केली होती. विशेष म्हणजे गोम्स यांचा हा उतारा देताना त्यातील पुढील वाक्य अनेकदा गाळले जाते, असे गोम्स यांचे चरित्रकार ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी म्हटले आहे.
मात्र या वाक्यातील मतितार्थ खूप महत्त्वाचा आहे. त्या पत्रातील हे वाक्य पुढीलप्रमाणे आहे :
“ही शीर्षके माझ्या देशावर प्रेम करणाऱ्या आणि मानवजातीवर प्रेम करणाऱ्या तुमच्यासाठी पुरेशी शिफारस ठरतील. माझ्याबद्दल सांगायचे झाले, तर मी माझ्या देशबांधवांपेक्षा अधिक आनंदी आहे. मी स्वतंत्र आहे. `Civis Sum'
या वाक्यानंतर त्यांनी `civis sum' (एक नागरिक आहे) हा अभिजात लॅटिन भाषेतला वाक्प्रचार वापरला होता.
` मी सर्वार्थाने सर्व नागरी हक्क आणि अधिकार असलेला एक नागरिक आहे.’ असे या वाक्प्रचारातून स्पष्ट होते.
`मी माझ्या देशबांधवांपेक्षा अधिक आनंदी आहे. मी स्वतंत्र आहे. मी `नागरिक’ आहे,’’ या वाक्यात गोम्स यांनी ब्रिटिश भारतात आणि पोर्तुगीज भारतात लोकांना दिल्या जाणाऱ्या राजकीय आणि नागरी हक्कांची तुलना केली आहे आणि आपल्या भारतीय देशबांधवांपेक्षा आपण अधिक आनंदी आहोत असे म्हटले आहे.
हे स्पष्ट करताना ओलिव्हियानो जे. एफ. गोम्स यांनी पोर्तुगाल आणि इंग्लंडने जगभरातील आपल्या वसाहतींतील लोंकाना दिलेल्या राजकीय आणि नागरी हक्कांची तुलना केली आहे.
``कारण पोर्तुगालने गोव्यातील आणि आपल्या इतर वसाहतींतील लोकांना आपल्या राष्ट्राचे नागरिक मानले होते आणि त्या सर्वांना समान अधिकार दिले होते. परंतु फ्रान्सिको लुईस गोम्स यांचे जे भारतीय देशबांधव इंग्रजांच्या राजवटीखाली होते ते त्यांच्यासारखे पोर्तुगीजांच्या राजवटीतील ‘नागरिक’ नव्हते, तर त्यांना नेहेमीच केवळ दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती, ” असे ओलिव्हियानो गोम्स यांनी लिहिले आहे.
फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांचे हे पत्र त्याकाळात खूप गाजले होते. फ्रान्समध्ये हे पत्र वाचल्यानंतर लामार्तिन आनंदाने बेहोश झाला होता असे म्हणतात. खूप सुंदर, खूप सुंदर.पत्र. हे पत्र लिहिणारा नक्कीच खूप प्रतिभासंपन्न आहे. मला या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायला आवडेल. ‘’
लामार्तिन यांची इच्छा लवकरच पूर्ण झाली.
युरोपमध्ये डॉ गोम्स यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे जोरदार स्वागत झाले. पॅरिस येथील दौऱ्यात ते लामार्तिन यांना १८६६ साली भेटले तर याच वर्षी इंग्लंडमध्ये लंडन येथे जॉन स्टुअर्ट मिल यांनी त्यांचे स्वागत केले.
गोम्स यांनी १८६६ साली Os Brâmanes किंवा द ब्राह्मण ही कादंबरी पोर्तुगीज भाषेत लिहिली. भारतातील जातिव्यवस्थेवर या कादंबरीत लिहिण्यात आले आहे.
लक्ष्मणराव सरदेसाई यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीं अध्यक्ष असताना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा अनुवाद १९७३ साली पहिल्यांदा प्रकाशित केला होता.
विशेष म्हणजे आपल्या या कादंबरीसाठी गोम्स यांनी गोव्याऐवजी उत्तर भारतातील फैजाबाद जिल्ह्यातील एक खेडे निवडले आहे.
गोम्स यांच्या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे पोर्तुगीज संस्कृतीत वाढलेला ता तरुण मनाने भारतीयच राहिला, आपल्या भारतीयत्वाचा विसर त्यांना कधीही पडला नाही असे लक्ष्मणराव सरदेसाई यांनी म्हटले आहे.
पोर्तुगीज संसदेतील गोव्याचे प्रतिनिधी या नात्याने फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी गोव्याच्या हिताची अनेक कामे करवून घेतली, गोव्यासाठी अनेक सवलती मिळवल्या, करांचे ओझे कमी केले, त्याशिवाय गोव्यातील सरकारी नोकरांचा दर्जा पोर्तुगालमधील सरकारी नोकरांच्या बरोबरीचा करून घेतला.
गोव्यातील ख्रिस्ती लोकांना अंत्यसंकारासाठी आणि कबरस्थानात मृतदेह पुरण्यासाठी सरकारला मोठ्या रकमेचा कर भरावा लागत असे, त्यामुळे गरीब लोकांना खूप त्रास होत असे. संसदेतील आपल्या भाषणांत गोम्स यांनी या जाचक करांवर सडकून टीका होती.
आपल्या भाषणात उपहासात्मक शैलीत गोम्स यांनी म्हटले होते:
``सरकारी कर गोळा करणाऱ्या लोकांचा हात इतका लांब की तो मृत माणसाच्या थडग्यापलीकडेही शिरतो आणि मृतांकडून त्याचा ‘मांसाचा हिस्सा’ खेचून घेतो. गोव्यात मेलेल्या लोकांनासुद्धा कर द्यावा लागतो ! अंत्यसंकारासाठी कर असलेली ही १५० रईसांची रक्कम त्या मृत व्यक्तींच्या शाश्वत निद्रेत आणि एकांतात व्यत्यय आणते. ‘’
पोर्तुगालच्या संसदेत बोलताना फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांनी मतदानाचा हक्क केवळ पोर्तुगीज वाचु आणि लिहू शकणाऱ्या आणि सरकारला कर देणाऱ्या लोकांपुरता ठेवणाऱ्या कायदेशीर तरतुदींवर टीका केली
``मी स्वतः जरी जवळजवळ एक लाख मतदारांचे प्रतिनिधीत्व करत असलो तरी त्यापैकी प्रत्यक्षात फक्त दोन हजार लोक मला मतदान करु शकले आहेत. याचे कारण कि या नागरिकांपैकी खूप कमी लोक पोर्तुगीज वाचू आणि लिहू शकतात किंवा सरकारला कर देत असतात. पोर्तुगीज भाषा येणे आणि सरकारला कर देणे या दोन गोष्टी मतदानासाठी अटी असल्याने हे नागरिक मतदानासाठी पात्र नसतात.''
पोर्तुगालच्या सर्व वसाहतींतील लोकांसाठी असलेला या अटी अर्थातच अन्यायकारक होत्या. उदाहरणार्थ, गोव्यात राहणाऱ्या लोकांना हिंदू लोकांपैकी अनेकांना कोकणी आणि मराठी भाषा लिहिता आणि वाचता येत असे, मात्र त्यांना पोर्तुगीज भाषेचे ज्ञान नसे. पोर्तुगीज भाषा प्रामुख्याने गोव्यातल्या ख्रिस्ती लोकांना येत असे, स्थानिक समाजातील उच्च वर्णातील म्हणजे शेणवी, सारस्वत वगैरे जातींची पार्श्वभूमी असलेल्या ख्रिस्ती लोकांनी पोर्तुगाल भाषेला स्वीकारले होते. त्यामुळेच पोर्तुगालची राजधानी लिस्बनकडे यापैकी अनेकांचा ओढा असे.
ऍबे फरीया यासारखी काही उदाहरणे यासंदर्भात देता येईल. त्यामुळेच या वसाहतीकाळात पोर्तुगीज इंडियातून पोर्तुगाल संसदेसाठी मतदान करणारे बहुसंख्य नागरिक कॅथोलिक असत आणि खासदार म्हणून निवडून येणारेसुद्धा कॅथोलिकच असत.
अर्थात पोर्तुगालच्या जुन्या आणि नव्या मुलखांत या देशाची सत्ता बळकट झाल्यानंतर ख्रिस्ती लोकांबरोबरच हिंदू लोकांनीही पोर्तुगीज भाषेला जवळ केले होते, शिक्षण, व्यवसाय वगैरे मूलभूत गोष्टींसाठी राज्यकर्त्यांची भाषा शिकणे गरजचे होते.
अर्थात तरीही पोर्तुगाल इंडिया १९६१ साली भारतीय संघराज्यात सामील होईपर्यंत एकाही हिंदू गोवन नागरिकांची पोर्तुगालच्या संसदेवर निवड झाली नव्हती.
पोर्तुगालच्या एकतंत्री राजवटीचा अनेक वर्षे पंतप्रधान असलेल्या मार्केज द पोम्बाल याचे चरित्र गोम्स यांनी लिहिले, मार्केज द पोम्बालच्या या ले मार्कीस द पोंबाल : एस्कीस द सा वि पब्लिक ( Le Marquis de Pombal : Esquisse de sa vie publique ) चरित्रात गोम्स यांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील समग्र राजकीय इतिहास उभा केला त्यामुळे युरोपात त्यांना इतिहासकार म्हणून मान्यता मिळाली.
पोम्बालने गोव्याच्या बाबतीत केलेली अनेक स्मरणीय कामे गोम्स यांनी “मार्कीस दे पोंबाल : त्याच्या सार्वजनिक जीवनाची रूपरेषा’’ या चरित्रात विस्ताराने सांगितली आहेत. पोर्तुगालच्या नागरीकांना मिळणारे हक्क आणि सवलती गोव्यातील लोकांनाही देण्याचा प्रयत्न पोम्बाल याने केला होता, त्याची कारकीर्द गोव्यासाठी हितकारक ठरली असे गोम्स यांनी या चरित्रात मांडले आहे.
गोम्स यांनी लिहिलेल्या एका अर्थशास्त्रातील ग्रंथाने त्यांना अर्थशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळाली. एस्से सुर ला थेओरी द ल'एकोनोमी पॉलिटिक ( Essai sur la théorie de L 'Economie Politiquen) हा तो ग्रंथ. गोम्स यांनी हे दोन्ही ग्रंथ फ्रेंच भाषेत लिहिले होते.
डॉ. गोम्स यांच्या गौरवार्थ मुंबईतील रॉयल आशियाटीक सोसायटीने त्यांची सदस्य म्हणुन निवड केली होती.
युरोपातील रोमँटिसिझम काळात ही कादंबरी त्यांनी लिहिली. त्यावेळी त्यांच्यावर व्हिक्टर ह्युगो आणि लामार्तिन यांचा प्रभाव होता. या कादंबरीच्या तात्त्विक बाजूचे श्रेय व्हिक्टर ह्युगो यांच्याकडे तर भावनात्मक बाजूचे श्रेय लामार्तिन यांच्याकडे जाते असे लक्ष्मणराव सरदेसाई यांनी म्हटले आहे.
दुदैवाने गोव्याच्या या महान सुपुत्राला फार कमी आयुष्य लाभले.
त्याकाळात बरा न होणाऱ्या क्षयासारख्या रोगाची लागण झाल्यामुळे आपले उर्वरित आयुष्य गोव्यात घालवण्याच्या इराद्याने त्यांनी पोर्तुगाल सोडले, मात्र बोटीवर प्रवासात असतानाच त्यांचे ३० सप्टेंबर १८६९ रोजी निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे चाळीस वर्षे होते.
गोम्स यांच्या पार्थिव देहाला मग जलसमाधी देण्यात आली. फ्रान्सिस्को लुईस गोम्स यांची आपल्या जन्मभूमीत परतण्याची इच्छा अपुरीच राहिली.
आपल्या मायदेशात शेवटचा श्वास घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या गोम्स यांना घेऊन येणारी ती बोट गुजरातमधील पोरबंदर या बंदरात 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोहोचली.
तेव्हा या बोटीतल्या प्रवाश्यांमध्ये फ्रान्सिस्को लुईस गोम्स नव्हते.
योगायोग म्हणजे गोम्स यांच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नासाठी यशस्वीरीत्या लढणाऱ्या एका नेत्याचा याच दिवशी पोरबंदर येथे जन्म झाला होता.
मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे नाव.
आपल्या भारत देशाची गुलामी संपून पूर्ण स्वातंत्र्य लाभावे अशी खुली मागणी पहिल्यांदाच करणाऱ्या फ्रान्सिस्को लुईस गोम्स या राष्ट्रवादी नेत्याची ही मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी महात्मा गांधी यांनी अपार कष्ट घेतले.
Camil Parkhe, August 23, 2025
No comments:
Post a Comment