देवाचे गोठणे. कोकणात राजापूरजवळ देवाचे गोठणे हे गाव आहे. मराठी साहित्यविश्वाची थोडीफार ओळख असलेल्या कुणाही व्यक्तीला हे नाव परिचित असेल.
नाथ पै यांचा या मतदारसंघात पुढे वारसा चालवणारे मधू दंडवते यांचे नाव तोपर्यंत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या नजरेत भरले नव्हते.
तर देवाचे गोठणे लक्षात राहते ते एका वेगळया प्रकारचे नाव असलेल्या 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या पुस्तकामुळे.
माधव कोंडविलकर यांनी लिहिलेले हे आत्मकथन सत्तरीच्या दशकातील दया पवारांचे `बलुतं', सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांचे `अगा जे कल्पिले नाही' आणि, लक्ष्मण माने यांचे 'उपरा' अशा पहिल्या दलित लेखकांच्या आत्मकथनांत आपले स्थान राखून आहे.
अशा प्रकारे लक्षात राहिलेल्या या गावाचे नाव काही महिन्यांपूर्वी ऐतिहासिक संदर्भात वाचले तेव्हा हे नाव अधिक ठळकपणे मनात कोरले गेले.
नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या `सावलीचा शोध' या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकात देवाचे गोठणे येथील बाबाजी रघुनाथ या ख्रिस्ती झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या कोकणस्थ ब्राह्मण माणसाविषयी केलेली संक्षिप्त नोंद वाचली अन ख्रिस्ती समाजात आढळणाऱ्या असंख्य जातीजमाती या विषयावरील लिखाणाबाबत माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात बीज पेरले गेले होते.
रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांनी १८८१ साली लिहिलेल्या `अमेरिकन मराठी मिशन यासंबंधी मंडळ्यांची संक्षिप्त बखर' या पुस्तकात बाबाजी रघुनाथ मराठे या आद्य एतद्देशीय ख्रिस्ती मिशनरीबाबत माहिती लिहिली आहे.
अहिल्यानगरमधून ख्रिस्ती झालेल्या पहिल्या काही ब्राह्मण व्यक्तींमध्ये रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांचा समावेश होता.
त्यांची आणखी एक ओळख म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत कृष्णाची भूमिका करण्याबाबत प्रसिद्ध असलेले अभिनेते शाहू मोडक यांचे ते पणजोबा.
या पुस्तकात मोडक यांनी लिहिले आहे,
'' या (अहमदनगर) मिशनातील पहिले एतद्देशीय ख्रिस्ती साह्यकारकही उच्च जातींतले मनुष्य होते. बाबाजी रघुनाथ मराठे नामक कोकणस्थ ब्राह्मण जो मुंबईस मिशनरी लोकांस भाषा शिकवणारा पंडित असता, ख्रिस्ती शास्त्र शिकून व सत्याची खात्री पावून ख्रिस्ती झालेला होता, तोच या मिशनातला पहिला एतद्देशीय ख्रिस्ती उपदेशक होता.’’
मात्र अवघे बेचाळीस वर्षे आर्युमान लाभलेल्या या कोकणस्थ ब्राह्मण ख्रिस्ती माणसाचे भारतीय सामाजिक इतिहासात आणखी एक आगळेवेगळे स्थान आहे.
त्याकाळात ब्राह्मण आणि इतर वरच्या वर्णातील पुरुषांनी एखाद्या विधवेशी रितसर लग्न करणे ही अशक्यप्राय घटना होती. बाप्तिस्मा स्विकारुन ख्रिस्ती झालेल्या बाबाजी रघुनाथ मराठे या ब्राह्मणाने नेमके हेच केले.
त्या जमान्यात समाजातल्या खालच्या गणल्या जातींजमातींमध्ये स्त्रियांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक मोकळीक होते असे दिसते.
या जातींजमातींमधल्या विधवांना किंवा नवऱ्याने टाकून दिलेल्या स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची मुभा होती. गाठ मारणे. पाट लावणे किंवा म्होतुर लावणे अशी काही नावे या पुनर्विवाहांना होती. सती ही अत्यंत घृण प्रथासुद्धा केवळ वरच्या जातींत होती.
भारतात उच्चवर्णिय गणल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजातील विधवा पुनर्विवाहाची ही पहिलीच घटना. बाबाजी रघुनाथ मराठे यांनी अमेरिकन मिशनच्या मुंबईतल्या आवारात आवडाबाई नावाच्या एक ब्राह्मण विधवेशी विधिवत लग्न करून हा इतिहास घडवला.
रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत लिहिले आहे: `` १८३१ साली या (ख्रिस्ती) मंडळीत बाबाजी रघुनाथ हा एकच एतद्देशीय ख्रिस्ती होता.
१८३१ यावर्षी आवडाबाई ब्राह्मणीण, जी बाबाजी रघुनाथाची बायको ती, कोंडू महार, काशिबा महार आणि भिक्या महार ही चौघेजणे (ख्रिस्ती) मंडळीत मिळाली.''
ब्राह्मण जातीतील विधवा पुनर्विवाहाच्या या घटनेनंतर अनेक वर्षांनी म्हणजे तब्बल पंचवीस वर्षांनी १८५६ मध्ये पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती. त्यावेळी ब्रिटिश संसदेने कायदा संमत करुन भारतात विधवाविवाह कायदेशीर ठरवला होता.
कॅथोलिक धर्मगुरु आणि नन्स यांनी आजन्म अविवाहित राहण्याचे व्रत स्विकारलेले असते. बाबाजी रघुनाथ मराठे हे ज्या प्रोटेस्टंट ख्रिस्ती मिशनरींबरोबर काम करत होते त्यांच्यामध्ये विवाह आणि पुनर्विवाह निषिद्ध नव्हता.
पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर अनेक वर्षांनी धोंडो केशव कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या पुण्यातील शारदा सदनातील गोदूबाई (नंतर आनंदीबाई) या बालविधवेशी १८९३ला पुनर्विवाह केला होता.
बाबाजी रघुनाथ मराठे या ब्राह्मणाशी एका ब्राह्मण विधवेने १८३१ साली केलेला हा पुनर्विवाह समाजशास्त्रज्ञांकडून आणि इतर अभ्यासकांकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
विशेष म्हणजे ब्रिटिश अमदानीच्या सुरुवातीच्या काळात असा जगावेगळा जीवनपट असलेल्या बाबाजी रघुनाथ मराठे यांचे चरित्र त्यांच्या अकाली निधनानंतर लगेचच १८३५ साली लिहिले गेले होते.
अमेरिकन मिशनरी हॉलीस रीड यांनी लिहिलेले हे चरित्र अलीकडेच पुण्यातील एक संशोधक अशोक एस. हिवाळे यांच्या वाचनात आले आणि `बाबाजीची बखर' या शिर्षकाखाली ७६ पानांचे पुस्तक त्यांनी ते स्वतःच्या सुमित्र प्रकाशनतर्फे प्रकाशित केले आहे.
मात्र या चरित्रात मी वर उल्लेख केलेल्या बाबाजी रघुनाथ यांनी केलेल्या विधवाविवाहाचा उल्लेख नाही. हा उल्लेख आढळतो तो अमेरिकन मराठी मिशनच्या १८३१-१९१३ या अर्धशतकाच्या कार्याच्या इतिहासात.
विल्यम हेजन यांनी लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या `अ सेंच्युरी इन इंडिया - अ हिस्टॉरीकल स्केच ऑफ द मराठी मिशन ऑफ द अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर फॉरेन मिशन्स (अमेरिकन मराठी मिशन) फ्रॉम १८१३ टू १९१३' या ग्रंथात हा उल्लेख मला आढळला तेव्हा मी अचंबित झालो होतो.
या पुस्तकात लिहिले आहे:
``बाबाजींचा २० नोव्हेंबर १८३१ रोजी बाप्तिस्मा झाला आणि लवकरच त्यांनी ज्या महिलेसोबत ते काही काळ राहात (म्हणजे आताच्या भाषेत `लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये) होते. अशा एका ब्राह्मण विधवेशी विवाह केला. हिंदू असलेल्या व्यक्तींसाठी प्रथमच हा ख्रिस्ती विवाहसोहळा अशा रीतीने पार पडला आणि हा विलक्षण सोहळा पाहण्यासाठी चॅपेल (छोटे प्रार्थनामंदिर)मध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांसाठी तो एक नवा अनुभव होता.
त्याचवेळी, बाबाजींच्या बाप्तिस्म्याबरोबरच गोपीबाई नावाच्या एका महार स्त्रीलाही प्रभुभोजनात (होली कम्युनियन) सामिल करुन घेण्यात आले आणि अशा प्रकारे हिंदू समाजातील दोन विरुद्ध टोकांचे घटक पहिल्यांदाच या नव्या ख्रिस्ती बंधुभावात एकत्र आले.
मिशनरींनी एकत्रित आणलेल्या या ख्रिस्ती मंडळीचे स्वरूप विविध घटकांचे मिश्रण वाटावे असेच होते. प्रभुभोजनात सामिल झालेल्या त्या एकोणीस व्यक्तींविषयी त्यांनी म्हटले की, त्या “ जगाच्या चारही दिशांमधून आलेल्या शेम, हाम आणि जाफेथ यांचे ते वंशज आहेत.''
(नौकेच्या मदतीने जगबुडीतून वाचलेल्या नोहाची शेम, हाम आणि जाफेथ ही तीन मुले होती. त्यांच्यापासून पुढे पृथ्वीवर मानववंश विस्तार झाला, असे बायबलमध्ये उत्पत्तीच्या - जेनेसिस - पुस्तकात लिहिले आहे.)
रेव्ह. रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत जातीभेदाच्या प्रथेला छेद देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे :
``नोव्हेंबरात बाबाजी रघुनाथ मराठे कोकणस्थ ब्राह्मणातला प्रथमच ख्रिस्ती होऊन या मंडळीला मिळाला. आणि त्याच वेळेला कोणी गोपी महारीणही ख्रिस्ती होऊन या मंडळीला मिळाली. तेव्हा ब्राह्मण व महारीण ही उभयता प्रथमच ख्रिस्ती होऊन भाऊ बहिण अशी होऊन एका पंगतीत बसली असा चमत्कार दृष्टीस पडला.’’
बाबाजींच्या या धर्मपरिवर्तनानंतर लगेचच म्हणजे एक महिन्यातच मुंबईतल्या अमेरिकन मिशनची एक तुकडी अहिल्यानगरला आली. त्या तुकडीमध्ये बाबाजी रघुनाथ मराठे यांचा समावेश होता. या घटनेचे ``अमेरिकन मराठी मिशनची दीडशे वर्षे' या ग्रंथात पुढीलप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे:
``अहमदनगरातील व सभोवतालच्या प्रदेशांतील मिशनच्या इतिहासाला २० डिसेंबर १८३१ मध्ये प्रारंभ झाला. या सुमारास सहा व्यक्ती - यापैकी पाच मिशनरी व एक धर्मांतरित ब्राह्मण भक्त - अकरा दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर येथे येऊन पोहोचले. मुंबईपासून अहमदनगरचे अंतर अवघे २०० मैलांचे असूनही प्रवासाला इतका दीर्घकाल लागत होता. दुसऱ्याच दिवशी ते वचनबद्ध होऊन त्यांनी स्वतःचेच ख्रिस्ती चर्च निर्माण केले. अनेक प्रेरक घटनांपैकी अमेरिकन मिशन बोर्डाच्या बखरीत या पहिल्याच चर्च सभेचा वृत्तांत आढळतो तो असा:
डिसेंबर २१, १८३१
आम्ही, सहाजण ज्यांची नावे खाली दिली आहेत ते या ठिकाणी मुंबईच्या अमेरिकन मिशनची शाखा म्हणून आल्यावर आणि या व्यवहारावर दैवी कृपा व्हावी म्हणून विनम्र विनंती केल्यावर, आम्ही विधियुक्त एकत्रित येत आहोत आणि त्रैक्य, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा - याला ख्रिस्ती चर्च म्हणून समर्पण करीत आहोत.
आमचा स्वीकार व्हावा आणि परस्परांना (आम्ही) आशिर्वादित करुन या ठिकाणच्या लोकांना आशिर्वादित करावे.
अँलन ग्रेव्ह्ज, हॉलिस रॉड
मेरी ग्रेव्हज कॅरोलिन रॉड
विल्यम हार्वे बाबाजी रघुनाथ मराठे ‘’
रामकृष्ण विनायक मोडक यांनी आपल्या बखरीत नगर येथील मिशन स्थापनेचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे:
``याच (१८३१) वर्षांच्या डिसेंबर महिन्यात रेव्ह. (अँलन) ग्रेव्हज साहेब, रेव्ह (हॉलीस) रीड साहेब, रेव्ह. (विल्यम) हार्वे साहेब, हे तिघे मिशनरी सहकुटुंब, बाबाजी रघुनाथ मराठे या एतद्देशीय ख्रिस्ती भावास संगती घेऊन येथे आले आणि या सातांनी १८३१ ता. २१ रोजी म्हणजे शालीवाहन शके १७५३ मार्गशीर्ष वंध्य ३ बुधवार या दिवशी महंमदनगर येथे यथाविधी ईश्वरी भक्ती करण्यासाठी व जे उमेदवार मंडळीस मिळण्यास तयार होतील त्यास मुंबई मंडळींची शाखा अशी एक मंडळी स्थापिली.
नंतर आठ एतद्देशीय मनुष्ये बाप्तिस्मा घेऊन त्यासी मिळाल्यावर त्यांची स. १८३३ मार्च ता. सहा रोजी अहमदनगर मिशनातली शुद्ध एतद्देशीय ख्रिस्ती मंडळी स्थापली गेली. तिजवर रेव्ह. रीड साहेब हे तूर्त पाळक म्हणून निवडले गेले आणि रा. बाबाजी रघुनाथ हे वडील असे आणि रा. दाजीबा निळकंठ (प्रभू) हे सेवक म्हणजे कारभारी असे नेमले गेले.’’
रामकृष्ण विनायक मोडक यांनी पुढे असेही लिहिले आहे:
``या (नगर) मिशनातील पहिले एतद्देशीय ख्रिस्त साह्यकारकही उच्च जातीतले सुशिक्षित मनुष्य होते, बाबाजी रघुनाथ मराठे नामक कोकणस्थ ब्राह्मण जो मुंबईस मिशनरी लोकांस भाषा शिकवणारा पंडित असता, ख्रिस्ती शास्त्र शिकून व त्याच्या सत्याची खात्री पावून ख्रिस्ती झालेला होता, तोच या मिशनातला पहिला एतद्देशीय उपदेशक होता. त्याचप्रमाणे दाजी निळकंठ प्रभूही मिशनशाळेचा पंतोजी मुंबईस असता ख्रिस्ती झाला तो या मिशनचा दुसरा प्रथमचा एत्तद्देशीय ख्रिस्ती उपदेशक होता.‘’
त्याकाळचे अहमदनगर आणि आजचे अहिल्यानगर महाराष्ट्रातील `मराठी ख्रिस्ती समाजाचे येरुशलेम’ असे समजले जाते. अहिल्यानगर शहरातील पहिल्या संस्थापक ख्रिस्ती मंडळींमध्ये पाच युरोपियन मिशनरींबरोबरच बाबाजी रघुनाथ मराठे या कोकणस्थ ब्राह्मण ख्रिस्ती व्यक्तीचाही समावेश होता हे विशेष.
बाबाजी रघुनाथ मराठे यांचे मराठी ख्रिस्ती समाजाला आणि पर्यायाने या मातीतल्या संस्कृतीला दिलेले आणखी एक मोठे योगदान आहे.
ते म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच ख्रिस्ती उपासनेच्या प्रसंगी उपयोगी पडेल अशा हेतूने मराठी गीते रचली.
मराठी भाषेच्या इतिहासात फादर थॉमस स्टीफन्स यांच्यानंतर मात्र इथल्याच मातीतील, एतद्देशीय ख्रिस्ती व्यक्तीने केलेली ही पहिलीच पद्यरचना, त्यामुळे या गायनांना आणि भजनकीर्तनाला खूप महत्त्व आहे.
नारायण वामन टिळक किंवा कृष्णाजी सांगळे यांच्याआधी अनेक दशकांपूर्वी बाबाजींनी ही भजने आणि कीर्तने लिहिली होती.
हॉलीस रीड यांनी बाबाजी रघुनाथ मराठे यांच्या चरित्रात बाबाजींची अनेक भजने आणि कीर्तनेसुद्धा दिली आहेत. बाबाजींच्या अभंगाच्या अखेरच्या कडव्यात `बाबाजी म्हणे' किंवा `ख्रिस्तदास म्हणे’ अशी ओळ असते.
मात्र बाबाजींबद्दल आणि त्यांच्या काव्य, भजन आणि कीर्तन अशा साहित्यकृतींबाबत काहीच माहिती नसल्याने आणि त्यांच्या आद्य पद्यरचना कुठल्याच उपासना संगीत पुस्तकांत नसल्याने त्यांचे कर्तृत्व आणि महती यावर गेली दोन शतके पडदा पडला गेला होता.
नवलाची आणखी एक बाब म्हणजे बाबाजी रघुनाथ मराठे यांचे अमेरिकन मिशनरी हॉलीस रीड यांनी १८३५ साली लिहिलेले आणि नंतर काळाच्या ओघात गायब झालेले चरित्र अशोक हिवाळे यांना कसे मिळाले ही आहे.
``मला बाबाजींचे रेव्ह. हॉलीस रीड यांनी लिहिलेले मराठी चरित्र गुगलवर एका वेबसाईटवर मिळाले. त्याच्या जेपीईजे फाईल्स मी डाऊनलोड करून त्यातील टेक्स्ट युनिकोड टेक्स्टमध्ये रुपांतरीत करुन स्वतःलाच ईमेल केले. तेथून कॉम्प्युटरवर त्याचे श्रीलिपी टाइपात रूपांतर करून हे पुस्तक पेजमेकरमध्ये सेट केले आहे व मुद्रित करण्यासाठी त्याची पीडीएफ फाईल बनवली. ‘’
मला आजही घरच्या टिव्हीवर ओटीटीवर चित्रपट लावणे जमत नाही. लॅपटॉपवर दररोज मी अनेक तास काम करतो, मात्र हे फक्त जुने टाईपरायटर बडवण्यापुरते मर्यादित असते. लॅपटॉपला माऊस लावल्याशिवाय मला टाईप करताच येत नाही, टचपॅडचा वापरच नाही. मोबाईलच्या वापराबाबतसुद्धा डिट्टो.
तर अशा या टेक्नॉसॅव्ही अशोक हिवाळे यांच्या व्यक्तिमत्वाबाबत तुम्ही काय ठोकताळे बांधणे असतील ?
अवघे एकोणऎंशी वर्षे आयुर्मान असलेल्या हिवाळे यांची नजर आता अधू झाली असून त्यांना केवळ एका डोळ्यानेच थोडेफार स्पष्ट दिसते, आतापर्यंत पाच वेळेला हृदयाच्या धक्क्यांना ते सामोरे गेलेले आहेत. हालचाल केवळ त्यांच्या घरापुरतीच मर्यादित आहे. असे असले तरी मोबाईल डोळ्याजवळ घेऊन त्यांचे वाचन-लिखाण, पुस्तक प्रकाशन आणि संशोधन अव्याहत चालू आहे.
हिवाळे यांनी पुण्यात जीवनवचन प्रकाशन या प्रकाशन संस्थेत अनेक पदांवर काम करताना पाचशेहून अधिक पुस्तकांचे संपादन, मुद्रिशोधन केलेले आहे, अनेक पुस्तके लिहिली आहेत,अनुवादित केली आहेत.
मुंबई विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या गोव्यातल्या धेम्पे कॉलेजात बीएला माझा ऐच्छिक मराठी हा विषय होता. मराठी लिहिण्याशी माझा तो अखेरचा संबंध. त्यानंतरची माझी संपूर्ण बातमीदारी आणि पत्रकारिता इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीतली.
काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमातला माझा एक मराठी लेख अशोक हिवाळे यांच्या वाचण्यात आला. त्यांच्यातील संपादक आणि मुद्रितशोधक जागा होऊन सहज एक चाळा म्हणून त्यातील शुद्धलेखनातील थोड्याफार चुका कंसात लिहून तो लेख त्यांनी माझ्याकडे पाठवला होता !
काळाच्या उदरात लुप्त झालेल्या आणि आता अचानक अवतरलेल्या बाबाजी रघुनाथ मराठे यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि त्यांच्या काव्याविषयी अशोक हिवाळे यांनी लिहिले आहे:
``बाबाजींचे हे चरित्र मला फारच आवडले. कारण (हॉलीस रीड या ) लेखकाने ते त्या काळातील मराठीत अगदी सोप्या भाषेत लिहिले आहे. बाबाजींनी ख्रिस्ती मंडळीला केलेला बोध आजही अनुकरणीय, तसेच त्यांनी मंडळीला लिहिलेली पत्रे बोधप्रद आहेत. देवाच्या वचनांनी पुरेपूर भरलेली आहेत. त्या काळात उपासना संगीत नव्हते. बाबाजी हे कवीही होते. त्यांच्याच कविता मंडळीमध्ये गाइल्या जात असत. . त्या काळात बाबाजीने जे निःस्वार्थी परिश्रम ख्रिस्ती मंडळीसाठी केले ते वाखाणण्यासारखे आहेत.
कॉलऱ्याच्या साथीत (1833) त्यांचा दुदैवी अंत झाला व ख्रिस्ती मंडळी एका खऱ्या ख्रिस्ती सेवकाला मुकली. त्यांना अवघे ४२ वर्षांचे आयुष्य लाभले. मला वाटते ते आणखी जगले असते, तर खूप मोठ्या प्रमाणावर व सखोल आध्यात्मिक कार्य अहमदनगर जिल्ह्यात झाले असते. ''
Camil Parkhe
No comments:
Post a Comment