सन १९६७ ते २०२६ .. काँग्रेसच्या दिड तपाच्या देशातील सत्तेला १९६७ साली सर्वप्रथम सुरुंग लागला आणि भाजपच्या एक तपाच्या निरंकुश सत्तेच्या बुरुजाला २०२६ साली अगदी खिजगणकीतसुद्धा नसलेल्या गटाकडून -झेन झी - कडून मोठे भगदाड पाडले.
महाराष्ट्रात १९६७च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी काँग्रेसच्या स. का. पाटील यांचा पराभव केला होता.
याच वर्षी १९६७ साली महाराष्ट्रात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी युवक क्रांती दलाची स्थापना केली होती.
`युक्रांद' या नावाने ओळखल्या गेलेल्या या संघटनेने राज्यात आपल्या कामाने भरीव ठसा निर्माण केला. युक्रांद नाव घेतले कि लगेचच डॉ. कुमार सप्तर्षी यांचे नाव नजरेसमोर येते.
डॉ. कुमार सप्तर्षी यांचे गेल्या महिन्यात निधन झाल्यानंतर रविवारी पुण्यात कोथरूडच्या गांधी भवनात डॉ. सप्तर्षी यांच्या आठवणी जागवण्यात आल्या.
वयाची ऐंशी पार केल्यानंतरसुद्धा विविध उपक्रमांद्वारे तरुणांशी कायम संवाद साधणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांच्याबद्दल विविध वयोगटांचे लोक यावेळी बोलले.
देशात झेन झीने दाखवलेली ताकद डॉ. सप्तर्षी यांनी पाहायला हवी होती असा काही वक्त्यांचा सूर होता.
बाळासाहेब भारदे यांच्यानंतर महाराष्ट्र गांधी स्मारक भवनाचे अध्यक्ष झाल्यानंतर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अनेक उपक्रम सुरु केले.
दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गांधी भवनात दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम हा त्यापैकी एक.
या नव्या पर्वात चक्क गांधीजींच्या विचारावर आधारित तीन दिवसीय शिबीर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अलीकडेच भरवले होते आणि त्याला भरघोस प्रतिसादही मिळाला होता.
बापूंचे चित्र असलेल्या टी-शर्टची विक्रीही या काळात झाली.
`डॉ कुमार सप्तर्षी यांच्या आठवणी' असे शिर्षक असलेल्या कार्यक्रमास हजेरी लावण्याची खरे तर मला इच्छा नव्हती.
पण श्याम बेनेगल यांचा `अंकुर' चित्रपट पाहिल्यानंतर आणखी काही वेळ तिथे रेंगाळलो आणि वक्त्यांच्या तोंडून जे ऐकले त्याने १९६७ ते २०१६ या काळातल्या अनेक घडामोडींवर प्रकाश पडला.
डॉ. कुमार सप्तर्षी हे आमच्या नगर जिल्ह्यातल्या राशिन गावचे, त्यांनी जानवे सोडले, आंतरजातीय लग्न केले आणि जातिअंताची चळवळ राबवली.
विविध विद्यार्थी चळवळींमध्ये जुळणारे प्रेमविवाह हा त्याकाळात एक थट्टेचा विषय झाला होता हे आठवते.
युक्रांदच्या तालमीत तयार झालेल्या अनेक व्यक्तींनी नंतर विविध समाजक्षेत्रांत नाव कमावले.
डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि पर्यायाने त्यांचे दीर्घ मनोगत ऐकण्याचे प्रसंग गेल्या वर्षी दोनदा आले.
त्यांच्याशी खूप आधीपासून संबंध ठेवायला हवे होते असे तेव्हापासूनच वाटायला लागले.
आणीबाणीत तुरुंगवास भोगल्यानंतर जनता पार्टीच्या लाटेत डॉ. सप्तर्षी नगर शहरातून विधानसभेवर निवडून गेले होते.
विधानसभेत जनता पार्टीचे सर्वाधिक म्हणजे शंभराहून अधिक आमदार असल्याने एस. एम. जोशी यांनी मुख्यमंत्री व्हावे असा आग्रह सप्तर्षी यांनी केला होता.
एसेम यांनी नकार दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ शरद पवारांच्या गळ्यात पडली.
युक्रांदची सुरुवातीचा काळ, त्यानंतरची मधली काही वर्षे आणि दोन दशकांपूर्वी युक्रांदच्या पुनरुज्जीकरणानंतरची वर्षे याबद्दल त्यात्या काळात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांच्या भाषणांतून डॉ. सप्तर्षी यांचे व्यक्तिमत्व, कार्यपध्द्त आणि एकूण व्यक्तिमत्वाविषयी बरीच माहिती मिळाली.
पुण्यात उद्यान प्रसाद सभागृहात साक्षात पुरीचे शंकराचार्य यांच्याशी दोन दिवसांचा भरगच्च गर्दीत झालेला जाहीर संवाद हा सप्तर्षी यांच्या सुरुवातीच्या काळातील एक मोठा गाजलेला प्रसंग.
या संवादाला त्यावेळी कॉलेज विद्यार्थीनी म्हणून उपस्थित असलेल्या अंजली कुलकर्णी यांच्या तोंडून रविवारच्या कार्यक्रमात ऐकणे म्हणजे अलभ्य लाभ योग होता.
सुशीला मोराळे आणि कॉम्रेड किशोर ढमाले म्हणाले कि डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यावर प्रस्थापित समाजवादी नेत्यांनी खरे तर अन्यायच केला.
सत्तरच्या दशकातील दलित पँथर ही प्रस्थापित रिपब्लिकन नेत्याविरुद्ध, मागोवा ही संघटना मार्क्सवादी नेत्यांविरुद्ध आणि युक्रांद ही संघटना समाजवादी नेत्यांविरुद्ध नकार होती असे ढमाले म्हणाले.
ढमाले म्हणाले कि समाजवाद्यांनी डॉ. सप्तर्षी यांना साथ दिली नाही आणि काँग्रेसवाले त्यांना आपल्या पक्षात घेण्यास तयार नव्हते. डॉ. सप्तर्षी यांच्याकडे `साधना' साप्ताहिकाची सूत्रे देण्यास नकारघंटा मिळाल्यानंतर डॉ. सप्तर्षी यांनी स्वतः `सत्याग्रही विचारधारा' हे मासिक सुरु केले.
समाजवाद्यांनी डॉ. सप्तर्षी यांना साथ दिली असती तर महाराष्ट्रात सद्याची स्थिती आली नसती असे कॉम्रेड ढमाले म्हणाले.
Camil Parkhe August 10, 202