Tuesday, September 15, 2026

 


विद्यानंद बापट आणि बायबलमधील आदाम आणि इव्ह यांच्यामार्फत मानवजातीला मिळालेले ओरिजनल सिन किंवा मूळ पाप.

विद्यानंद बापट कुणाच्या तावडीत आतापर्यंत तरी लागलेले नाहीत, तसेच ते कुणालाही सोडत नसतात.

तर परवाच्या बापटांच्या पत्रकार परिषदेत ज्यु, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मियांच्या धर्मग्रंथांत समान असलेल्या आदाम आणि इव्ह यांचा विषय निघाला.

बापटांनी पत्रकार परिषदेत `ओरिजनल सीन' चा उल्लेख केला आणि मी चमकलो.

महाभारत आणि इतर ग्रंथांतील अनेक दाखले, सुभाषिते बापट आपल्या बोलण्यात पेरत असतात, मशिदीवरील भोंग्यांचा त्यांनी अनेकदा उल्लेख केलेला आहे.

मात्र ख्रिस्ती धर्मातील सिद्धांताचा विस्तृत उल्लेख मी त्यांच्या बोलण्यात पहिल्यांदाच ऐकत होतो.

बापट यांच्याबरोबरीने पत्रकार परिषदेच्या आयोजक या नात्याने मंचावर असलेल्या अश्विनी सातव डोके यांनीसुद्धा बायबलचा संदर्भ येताच माझ्याकडे वळून पाहिले, असाही भास मला त्यावेळी झाला.

बायबलमधील पहिल्याच म्हणजे उत्पत्तीच्या ( Genesis) अध्यायात सर्पाच्या रुपातला सैतान इव्ह हिला फितवून तिला आणि तिच्यामार्फत आदामला देवाने मना केलेले फळ अर्थात `फॉरबिडन फ्रूट' खायला भाग पाडतो.

हेच ते पहिल्या मानवांनी केलेले मूळ पाप किंवा सर्व मानवजातीला जन्मतः आलेले ओरिजनल सीन.

येशू ख्रिस्ताची कुमारी माता मारिया (निष्कलंक गर्भसंभव किंवा Immaculate Conception ) हिचा एकमेव अपवाद वगळता इतर कुठलाही मानव ओरिजनल सीन किंवा मूळ पापावाचून जन्मलेला नाही असा कॅथोलिक धर्मात एक डॉग्मा म्हणजे धर्मसिद्धांत आहे. 

बाप्तिस्मा स्नानसंस्काराने व्यक्तीची या मूळ पापापासून मुक्तता होते अशी ख्रिस्ती धर्मात श्रद्धा आहे.  येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील मृत्यूने मानवावरील हे ओरिजनल सीन, मूळ पाप धुऊन निघाले अशा श्रद्धेचा संदर्भ बापटांनी या पत्रकार परिषदेत दिला.

गोव्यात धेम्पे कॉलेजात पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी तत्वज्ञान हा माझा खास विषय होता.  विविध धर्मांचे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसॉफी ऑफ रिलिजन्स हा माझा अभ्यासासाठी एक विषय होता. 

बापट यांचा विविध विद्याशाखांत आणि विषयांत मुक्त संचार आहे, याचे मला निश्चितच कौतुक वाटते. त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दलसुद्धा.

आपली रॅशनलिस्ट किंवा विवेकवादी भुमिका याबाबत कुठलीही लपाछेप न करता आपली भूमिका ते निःसंदिग्धपणे' मांडत असतात.

पत्रकार परिषदेत अनेक संवदेनाशील विषयांवर बापट यांना प्रश्न विचारण्यात आले आणि आपल्या विवेकनिष्ठ भुमिकेला साजेशी अशी बापट यांनी उत्तरे दिली.

विद्यानंद बापट यांना प्रत्यक्ष पाहण्याचा, त्यांचे बोलणे ऐकण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग.

टेलीव्हिजनवर मुलाखत पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात जमीनअस्मानाचा फरक असतो.

पत्रकारांनी पत्रकारांसाठीच आयोजित केलेली ती एक लाईव्ह पत्रकार परिषद होती.  मात्र एकही प्रश्न न विचारता या पत्रकार परिषदेत मी मौन राखले.

त्यांना विचारण्यासारखे माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत.  विशेषतः त्यांच्या आजवरच्या वैचारिक जीवनप्रवासाबद्दल.

उदाहरणार्थ एक झलक.  `देव रिटायर करा' असे म्हणणाऱ्या डॉ. श्रीराम लागूंचा पुढाकार असलेल्या नाशिकच्या नास्तिक परिषदेत विद्यानंद बापट यांनी हजेरी लावली होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यापेक्षा डॉ. लागू आपल्याला अधिक जवळचे वाटतात, असे एका प्रश्नाचे उत्तर म्हणून या पत्रकार परिषदेत बापटांनी सांगितले.

पुढे कदाचित बापटांना ऑफलाईन भेटण्याचा योग आला तर माझ्या मनातील प्रश्न मी निश्चितच त्यांना विचारेन.



Camil Parkhe 



Saturday, September 12, 2026

 

बापटांना आतापर्यंत भेदरलेले किंवा भांबावलेले फक्त एकदाच पाहिले आहे.
त्यांच्यावर तो अचानक हल्ला झाला तेव्हा.
त्यांची मुलाखत रेकॉर्ड करणाऱ्या व्हिडिओग्राफरने कमालीचे प्रसंगावधान राखून एका हाताने आपला अवजड कॅमेरा सांभाळत आणि दुसऱ्या हाताने हल्लेखोराला मागे ढकलत नेले तेव्हा बापट बेदम मारहाण होण्यापासून बचावले होते.
कुणी तरी स्वतःची ढाल बनवून विद्यानंद बापट यांचे आणखी हल्ल्यापासून रक्षण केले तेव्हा बापट यांचा ओझरता चेहरा दिसला तेव्हा या अचानक झालेल्या मारहाणीमुळे ते गांगरलेले दिसले.
मानवी स्वभावाला धरुन ते स्वाभाविकच होते ते.
बापट मुद्द्द्यांना सामोरे जाऊ शकतात. गुद्द्यांना खचितच नाही.
विद्यानंद बापट यांच्या कानशिलात लगावल्यानंतर त्या घटनेची दृश्ये पाहताना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताना तक्षणी मला तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता त्याची आठवण झाली.
झालेल्या हल्ल्याने पवार साहेब निश्चितच गांगरले होते.
काहींना यासंदर्भात अण्णा हजारे यांची ती प्रतिक्रियासुध्दा आठवली असेल.
विद्यानंद बापट यांची चावडीवर झालेली ती बहुचर्चित सामुहिक मुलाखत काल रात्री मुद्दाम सर्च देऊन पाहिली अन् बापट यांचे खूप, खूप कौतुक वाटले.
त्यावेळी त्यांच्यावर चहूबाजूंनी हल्लाच केला गेला होता.
`कौन बनेगा करोडपती' किंवा इतर शो मध्ये रॅपिड फायर सारखे पाठोपाठ प्रश्न विचारले जातात.
बापट यांच्या मुलाखतीत असलेली बापटांना घोळात घेण्याची, त्यांची मजाक उडवण्याची लिखित स्क्रिप्ट फक्त मुलाखतकारांकडे होती.
सत्ताधारी पक्षाच्या किंवा राज्यकर्त्यांपैकी कुणाला त्यांनी असा जाब कधी मागितला असेल असे वाटत नाही.
बापट यांची मराठी भाषा, वैयक्तिक जीवन, भावनिक जीवन वगैरे विषयांवर प्रश्नांचा भडीमार करुन त्यांची खिल्ली उडवण्याचा मुलाखतीमागचा हेतू होता.
या मंडळीचा खरा हेतू त्यांच्या लक्षात न येण्याइतके बापट बावळट नक्कीच नाहीत.
मात्र बापट यांनी स्थितप्रज्ञ वृत्ती राखत या मुलाखतीत ध्वनीप्रदुषणाबाबतचा त्यांचा सखोल अभ्यास उत्तमरित्या पेश केला असे मला वाटते.
बापट त्या दिवशी पुणे महापालिकेच्या सभेत अचानक गेले आणि नंतर हे बापट पुराण सुरु झाले असे अनेकांना वाटते.
परिस्थिती तशी अजिबात नाहीये.
बापट यांनी त्यापूर्वी बराच काळ राज्यपातळीवर थेट मुख्यमंत्री कार्यालयापासून ते प्रदूषण नियंत्रण महामंडळ, विविध सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी याबाबत भरपूर पत्रव्यवहार केला होता.
याच मुलाखतीत बापट ध्वनी प्रदुषणाबाबत गेल्या काही दशकांतील देशांतील अनेक प्रकरणांचा उल्लेख करतात, हवाला देतात.
त्यांपैकी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, विविध महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, स्मॉल कॉजेस कोर्ट (लघु कारणांचे लवाद - बापट लगेच मराठी शब्द पर्यायसुद्धा पुरवतात), वगैरे वगैरे.
पुणे महापालिकेच्या सभागृहात त्यांना जर पूर्ण बोलण्याची संधी मिळाली असती तर त्यांचे हे सारासार मुद्दे ऐकून उपस्थितांची काय स्थिती झाली असती याची कल्पना करवत नाही.
बापट यांची मुलाखत घेण्यापूर्वी, त्यांना प्रश्न विचाण्याआधी किती प्रचंड तयारी करावी लागेल याची एक छोटीशी झलक चावडीतल्या या मुलाखतीतून मिळते.
नारायण पेठेतच राहणाऱ्या विद्यानंद बापट यांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला व्यक्तिशः एक पत्रकार म्हणून मला खूप आवडेल.
पण ध्वनी प्रदूषण या विषयावर मुलाखत घेण्यासाठी तरी नक्कीच नाही.

Camil Parkhe



 विद्यानंद बापट भरकटलेत. बापटांनी आता मुलाखती देणे बंद करावेत.

पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांना विद्यानंद बापटांच्या रुपाने आता एक नवे खेळणे मिळाले आहे. त्यांचा वापर करुन हे लोक स्वतःचा टीआरपी वाढवतायेत.
गेल्या काही दिवसांत विद्यानंद बापट यांच्या मुलाखती सर्वच वृत्तवाहिन्या आणि यु- ट्यूबर्स घेतायत.
गेल्या दोन दिवसांत राज ठाकरे यांच्या भाषणाला असाच तुफान टीआरपी लाभला असे म्हणतात. मात्र तो एका अगदी वेगळ्या कारणाने.
राज्यातल्या दहीहंडी कार्यक्रमांना खूप टीआरपी लाभला तसा.
वृत्तवाहिन्यांनी आपले नवशिके बातमीदार बापट यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यासाठी सोडले आहेत आणि त्यांची प्रश्ने पाहता अनेकांची करमणूक होतेय.
बापट यांना घेरण्याचा प्रयत्नांत अनेक दिग्गज पत्रकारांचाही अभिमन्यू झालेला दिसतोय.
बापट कुणाच्याच हाताला लागत नाहीत.
पत्रकार बापट यांना देव, धर्म, नास्तिकता वगैरे बाबतींत मुद्दाम खोचूनखोचून प्रश्न विचारुन, डिचवून त्यांना बहकू पाहतात.
त्यामुळे बापटांनी केवळ डिजे आणि ध्वनी प्रदूषण या त्यांच्या पेटंट मुद्द्यावरच बोलावे, संस्कृत सुभाषिते, रामायण आणि महाभारतातील दाखले देणे बंद करावे, असा अनाहूत सार्वजनिक सल्ला अनेकांनी त्यांना दिला आहे.
त्यात त्यांचे कट्टर समर्थक आणि चाहते यांचाही समावेश आहे.
मात्र बापट आपला तोल ढाळत नाहीत. कायदयाच्या कचाटीत येतील, त्यांच्या विरोधकांच्या हातात कोलीत मिळेल असे एकही आक्षेपार्ह विधान करत नाहीत.
राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत बापट यांची दखल घेतली आहे.
पुण्यातल्या नारायण पेठेत सप्ताहातून तिनचार दिवस माझा वावर असतो. अशावेळी विद्यानंद बापट कधीतरी रस्त्यावर दिसतील असे वाटायचे.
त्यांचा चेहेरामोहरा आणि देहबोली आतापर्यंत अनेकांच्या परिचयाची झाली आहे. बापट यांची मुलाखत आपणसुद्धा घ्यावी असा विचार अनेकदा मनात आला आहे.
मात्र सद्याचा हा गदारोळ खाली बसेपर्यंत हे टाळायचे असे ठरवले होते.
त्यानंतर त्यांच्यावर हल्ल्याची ती घटना घडली.
आता एवीतेवी सुरक्षेच्या कारणास्तव बापट यांनी एकटेदुकटे बाहेर पडायचे टाळावे असा पोलिसांनी आणि इतरांनीही त्यांना सल्ला दिलाच आहे.
त्यामुळे बापटाख्यान कमी होईल असे मला वाटले होते.
आपल्या हितचिंतकांचा सल्ला मनावर घेऊन बापट काही काळ ध्वनिप्रदूषण वगळता इतर संवेदनाशील मुद्द्यांवर बोलणे टाळतील असे गृहीत धरले होते.
मात्र तसे झालेले नाही.
परवा प्रवासात असताना बापट यांची नवी मुलाखत ऐकली आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
नेहेमीप्रमाणे मुलाखत घेणारा पत्रकार पोरसवदा होता.
चिफ पब्लिसिटी किंवा सवंग लोकप्रियता मिळवणे हा आपला उद्देश नाही असे बापट सतत मनात आले आहेत.
या पत्रकाराने दोन प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांनी बापट यांच्या विचारसरणी एकदम स्पष्ट झाली.
`चिफ पब्लिसिटी किंवा सवंग लोकप्रियतेसाठी मी मुलाखती देत नाही, मात्र माझ्या या सततच्या मुलाखतींनी जर सार्वजनिक कार्यक्रमांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, रस्त्यांची आणि वाहतुकीची कोंडी, लोकांची गैरसोयण, हाल, आणि इतरांच्या दैनंदिन जीवनात येणारे नियंत्रण याबाबत समाजात जागृती होऊन सकारात्मक बदल होत असतील तर मी मुलाखती देत राहील.''
सर्वच धर्मांच्या सार्वजनिक, रस्त्यांवर साजरे उत्सवांमुळे आणि महापुरुषांच्या जयंत्या-मयंत्यांमुळे (हा त्यांचाच शब्द) होणाऱ्या उपद्रवाविरोधी त्यांनी भूमिका घेतली आहे.
हे उत्सव आणि कार्यक्रम बंद हॉलमध्ये आणि इतरांना त्रास न होता साजरे व्हावे असे बापट म्हणतात.
त्या पत्रकाराचा दुसरा प्रश्न असा होता
``तुम्ही कधी असा कधी विचार करता कि ज्या देवासाठी हे सर्व सण, उत्सव केले जाते त्या देवाला तरी हे पटणारे आहे का? ''
``देवाच्या मुळी अस्तित्वावरच माझा विश्वास नाही तर मग देवाला काय वाटेल याचा मी विचारच कसा करेल?'' असे बापट यांचे उत्तर होते.
भारतीय माणूस फार सश्रद्ध आहे. आपल्या समाजजीवनात आणि राजकारणात अनेक वर्षांपासून जात आणि धर्म या अत्यंत महत्वाच्या बाबी राहिलेल्या आहेत, याचे पडसाद वेळोवेळी अनेक ठिकाणी पडत असतात.
त्यामुळे आपल्या जाती आणि धर्म यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या प्रदर्शन करणे लोकांना भाग पडते किंवा फायदेशीर ठरत असते.
भारतीय लोक परदेशी गेल्यानंतरसुद्धा असेच वागतात हे आपण नेहेमीच अनुभवत असतो.
निधर्मी राज्यघटना असलेल्या आपल्या देशात गेल्या काही दशकांत उघडउघड धर्माधिष्टीत राजकारण आणि समाजकारण प्रस्थापित झाले आहे.
यामुळेच समाजकारणात आणि राजकारणात असलेली अनेक नेते मंडळी नास्तिक असली तरी देवधर्मांबाबत असलेल्या मतांबाबत आपली ठाम भूमिका कधी मांडत नाहीत.
`काहीही असले तरी आपण सश्रद्ध आहोत, आम्ही त्यांच्यापैकी नाही' अशी सारवासारव लोकानुयास्तव अनेक जण करत असतात.
यामुळेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखालील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने देव आणि धर्म याबाबत रोखठोख भूमिका घेण्याचे सातत्याने टाळले होते.
देव आणि श्रद्दा याविरुद्ध थेट भूमिका घेतल्यास सश्रद्ध असलेला बहुसंख्य समाज आपल्या चळवळीविरुद्ध जाईल अशी भीती यामागे होती आणि आहे .
आपल्या विविध मुलाखतींत आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ बापट महाभारतातील काही प्रसंग, संस्कृतमधील श्र्लोक, मराठीतील सुभाषिते यांची पेरणी करत असतात , काही इंग्रजी पुस्तकांचा, पाश्चात्त्य विचारवंतांचा हवाला देत असतात, आपल्या नागरी अधिकारांच्या समर्थनार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरलिखित राज्यघटनेतील मूलभूत स्वातंत्र्य आणि अधिकारांचा उल्लेख करतात, त्याचप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारसरणीचीही पाठराखण करत असतात.
कुठलाही आडपडदा न ठेवता आणि परिणामांची पर्वा न ठेवता आपण नास्तिक आहोत हे बापट यांनी आपल्या पहिल्याच मुलाखतीत स्पष्ट केले तेव्हा अनेकांना धक्काच बसला होता.
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियले नाही बहुमता ।। ही तुकोबांची शिकवण बापट लोकांना नेहेमी ऐकवत असतात.
फार वर्षांपूर्वी डॉ. श्रीराम लागू यांनी `देवाला रिटायर करा' अशी भूमिका घेतली तेव्हा मोठा गदारोळ उडाला होता याचे कारण बहुसंख्य समाज सश्रद्ध आहे हेच होते.
डॉ. लागू यांच्या थेट धर्मविरोधी आणि देवाच्या अस्तित्वाविरोधी भूमिकेने त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची फार मोठी गोची केली होती.
त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे त्याकाळात गावोगावी डॉ. श्रीराम लागू आणि डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यामध्ये देव ही संकल्पना, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयांवर सार्वजनिकरित्या संवाद घडवून आणले जात असत.
या संवादांत आपल्या चळवळीचा रोख लोकांच्या श्रद्धा, देव ही संकल्पना आणि धार्मिक प्रथा-परंपरा याविरुद्ध नाही तर समाजघातक, विविध प्रकारचे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा याविरुद्ध आहे अशी मांडणी डॉ. दाभोलकर करत असत.
हा सरळसरळ ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार होता.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या संवादांची पुस्तिका मराठीत आणि इंग्रजीत प्रकाशित झाल्या आहेत. त्या संवादाकडे एक नजर फिरवली तर मी काय म्हणतो आहे हे समजू शकेल.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही अंधश्रद्धा आणि श्रद्धा यामध्ये फरक मानते, चळवळीचा विरोध कुठल्याही समाजघातक, शोषण करणाऱ्या अंधश्रद्धेला आहे, श्रद्धेला नाही, अशी काहीशी गोलमाल आणि बोटचेपी भूमिका या चळवळीने घेतली होती.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील नेमका फरक काय आहे याबाबत मात्र स्पष्टीकरण दिले जात नसायचे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याही एक पाऊल पुढे जाऊन आपले राज्यघटनादत्त व्यक्तिस्वातंत्र्य आणि अधिकार याबाबत आपला मुद्दा मांडताना देवाचे अस्तित्व निःसंदिग्धपणे नाकारुन विद्यानंद बापट यांनी आता सरळसरळ मुळावरच घाव घातला आहे.
या मुद्द्यांवर विद्यानंद बापट यांना सरळसरळ भिडणे आतापर्यंत कुणालाच शक्य झालेले नाही.
Camil Parkhe September 9, 2026

Saturday, September 5, 2026

red with Pub

lic
प्रसारमाध्यमांची व्यावसायिकता आणि माणुसकीशी बांधिलकी
परवा विद्यानंद बापट हे बेदम मारहाण आणि त्यांची लाथाबुक्क्यांनी तुडवणूक होण्यापासून थोडक्यात वाचले.
पुण्यात टिळक रोडपासून जवळच असलेल्या एका चौकात मुलाखत देताना हल्लेखोर त्यांच्या कानशिलात केवळ एक जोरदार थप्पड देऊ शकला.
तिथे असलेल्या दोन व्यक्तींनी लगेचच हल्लेखोराला पूर्ण ताकदीने प्रतिकार केल्याने बापट यांच्यावरील एक बाका प्रसंग टळला.
त्यादिवशी त्या घटनास्थळी बापट यांच्या भुमिकेशी सहमत असणार काही लोक होते, असहमत असणारेही होते.
त्याशिवाय त्या वर्दळीच्या ठिकाणी ये-जा करणारे अनेक लोक होते.
दोन व्यक्तींमध्ये झगडा, संघर्ष होत असेल तर तिथे असलेले लोक क्वचितच हस्तक्षेप करतात.
समोर हिंसा होत असताना त्रयस्थ व्यक्तींनी हस्तक्षेप केल्यास या त्रयस्थ व्यक्तीच अनेकदा हिंसेचे बळी ठरत असतात याचा अनुभव नेहेमी येत असतो. एक क्राईम रिपोर्टर म्हणून अशा घटनांचे मी अनेकदा वार्तांकन केले आहे.
तर त्या भर दिवशी भर चौकात एक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना विद्यानंद बापट आपले मत मांडताना अचानक एका हल्लेखोराने बापट यांच्या कानशिलात लगावली तेव्हा तेथे असलेल्या फक्त दोन व्यक्तींनी या हल्लेखोरास पूर्ण ताकदीनिशी रोखले.
हल्लेखोरास रोखणाऱ्या याच दोन व्यक्तींनी असा प्रतिकार करावा हे खरे पाहता पूर्णतः अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते.
हल्लेखोऱ्याने बापट यांना थप्पड मारल्यानंतर तिथे असलेल्या एका मध्यमवयीन महिलेने तत्क्षणी हल्लेखोऱ्याचा उगारलेला हात अडवला आणि बापट यांना वाचवले.
आपल्या मुलाखतीत बापट नेहेमीच सांगत असतात कि ''लोकांनी मला स्वतःला फार महत्त्व देऊ नये, माझ्यावर टीका करू नका, त्याऐवजी मी मांडतो त्या मुद्द्यांना उत्तरे द्या, त्या मुद्द्यांचा प्रतिवाद करा.''
विशेष म्हणजे या हातघाईच्या लढाईच्या बिकट प्रसंगी ती धाडसी महिला त्या हल्लेखोऱ्याला नेमके हेच सुनावत होती. मला त्या महिलेचे फार कौतुक वाटले.
बापट यांना बेदम मारहाणीपासून रोखण्यास त्याशिवाय आणखी एका व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावली.
खरे तर त्या व्यक्तीने असे करणे त्याच्या व्यवसायिक हिताच्या अगदी विरुद्ध होते.
बापट यांच्या मुलाखतीचे चित्रण करणाऱ्या व्हिडीओग्राफरने बापट यांच्यावर हल्ला होताच लगेचच आपले चित्रण थांबवले आणि हल्लेखोऱ्याला एका हाताने ढकलत बापट यांच्यापासून दूर नेले.
आपल्यापैकी अनेक जण छोट्या आकाराचे पण महागडे मोबाईल वापरत असतात. प्रसारमाध्यमांतील फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर यांचे कॅमेरे किती महागडे असतील याची कल्पनाच केलेली बरे.
तर बापट यांच्यावर हल्ला होताच या व्हिडिओग्राफरने एका हाताने आपला अवजड कॅमेरा सांभाळत आणि दुसऱ्या हाताने हल्लेखोऱ्याला पूर्ण शक्तींनिशी मागे लोटत नेले.
या अवधीत तिथे जमलेल्या लोकांना विद्यानंद बापट यांना सुरक्षित ठिकाणी नेणे शक्य झाले. तरीसुद्धा लांबूनच तो हल्लेखोर ' बापट याला मी सोडणार नाही, मी त्याला मारणार आहे,'' असे जोरजोरात ओरडून सांगत होता. यावेळी ती महिला त्याला असे करु नकोस म्हणून सांगत होती.
या मारहाणीच्या झालेल्या चित्रणात हे दृश्य तुम्ही पाहू शकता.
हल्लेखोऱ्याने बापट यांच्या कानशिलात लगावली याचे चित्रण केवळ `टिव्ही नाईन' या वाहिनीकडेच आहे. या चित्रणामुळे या वाहिनीचा टिआरपी नक्कीच भरपूर वाढला असेल.
जर या व्हिडीओग्राफरने बापट यांच्या हल्लेखोऱ्याला रोखण्याऐवजी त्याला हल्ला चालू ठेवण्यास पूर्णतः मोकळीक दिली असती आणि या हल्ल्याचे चित्रण चालू ठेवले असते तर या वाहिनीकडे या हल्ल्याच्या एक्सल्युझिव्ह चित्रणाचे अधिक फुटेज, काही सेकंदाऐवजी काही मिनिटांचे झाले असते.
व्हिडिओग्राफर म्हणून हा हल्ला चालू ठेवणे नक्कीच त्याच्या व्यावसायिक हिताचे आणि बांधिलकीचे होते.
मात्र व्यावसायिक बांधिलकी आणि हित याऐवजी या व्हिडीओग्राफरने माणुसकीला प्राधान्य दिले.
खरे पाहता ही घटना इतक्या वेगाने घडली कि `हे बरे कि ते बरे' याचा विचार करण्यास त्या व्हिडिओग्राफरला मुळी वेळच मिळाला नाही.
त्यामुळे बापट यांच्या मदतीस जाऊन हल्लेखोऱ्यास रोखण्याची कृती व्हिडिओग्राफरकडून उत्स्फूर्तपणे घडली.
व्यावसायिक हिताऐवजी माणुसकीस जपण्याची व्हिडीओग्राफरची ही कृती पूर्ण विचारांती नव्हती तर ती एक प्रतिक्षिप्त कृती होती.
व्यावसायिक हितापेक्षा माणुसकीशी बांधिलकीला प्राधान्य मिळाले.
हा प्रसंग पाहताना आफ्रिकेतील एका देशात दुष्काळात मरणासन्न अवस्थेतील हाडांचा सापळा बनलेल्या एका बाळाकडे एक गिधाड बुभूक्षित नजरेने पाहत आहे, असा क्षण टिपलेल्या एका फोटोला एक जगप्रसिद्ध पारितोषक मिळाले होते ते आठवले.

Camil Parkhe