`कोण तुम्ही? आणि चक्क पुण्यात कार्यक्रम घेतायत?''
जोतिबांच्या द्विशतकी जयंतीनिमित्त सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्यावर आधारीत पुण्यात `सत्यशोधक कॉन्क्लेव्ह' आयोजित करण्याच्या निमित्ताने पुण्याबाहेरची काही तरुण लोक शहरात विविध जणांच्या गाठीभेटी घेत होते तेव्हा त्यांच्यावर वरील प्रश्नांचा भडीमार झाला.
ही साधारणतः तीनचारेक महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे.
त्यांच्या अशा अगदी पहिल्याच भेटीगाठीत मीही सामिल झालो होतो त्यामुळे त्यांच्या अशाप्रकारच्या स्वागताला मी साक्षीदार होतो.
नागपुरातील एक फेसबुक मित्र आणि पत्रकारितेच्या व्यवसायातील एक सहकारी राम यांचे मोबाईलवर या परिषदेसंदर्भात आधी बोलणे झाले होते.
त्यानंतर पुणे महापालिकेतील विधी अधिकारी निशा चव्हाण यांना या कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून आमंत्रण देण्यासाठी या तरुणांबरोबर मीही महापालिका कार्यालयात गेलो तेव्हा साधारणतः असेच सवालजबाब झडले होते.
म्हणजे `आपण कोण' या प्रश्नाच्या उत्तरापासून सुरुवात करुन हा कार्यक्रम केवळ युवकांना केंद्रस्थानी ठेवून आयोजन होईल अशी महत्त्वाकांक्षा या भेटीत एका दमात व्यक्त करण्यात आली होती.
निशा चव्हाण यांनी लगेचच व्याख्यानांचे आमंत्रण स्विकारुन या तरुणांच्या जिद्दीला दाद दिली होती.
का कुणास ठाऊक, राम आणि मयूर के. यांनी मलाही आपल्या आयोजन समितीत सामिल करुन घेतले होते. त्यानंतर नियोजनाच्या काही ऑनलाईन मिटिंगांना काहीही न बोलता मी उपस्थित राहिलो होतो.
कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजकांमध्ये `सत्यशोधक' मराठी चित्रपटाचे निर्माते आणि उपजिल्हाधिकारी पदावर असताना सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेणारे सुनील शेळके होते.
दिल्ली येथील तरुण संशोधक मयूर के. आपल्या लॅपटॉपवर या कॉक्लेव्हचे पूर्ण नियोजन आखत होते.
`बीबीसी मराठी'चे दिल्ली-स्थित संपाद्क अभिजीत कांबळे एक प्रमुख वक्ते होते.
जोतिबांनी स्थापन केलेल्या `सत्यशोधक समाजा'च्या स्थापनादिनानिमित्त रविवारी २७ सप्टेंबरला पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात ही `सत्यशोधक कॉन्क्लेव्ह' पार पडली.
आणि `तुम्ही कोण' असे पुसणाऱ्या शहरातील तमाम बुजुर्गांना आणि इतर समस्त मंडळींना संपूर्ण राज्यातून आणि देशाच्या राजधानीतून या परिषदेसाठी पुण्यात अवतरलेल्या विशीतिशीतील असणाऱ्या पोरांपोरींनी चोख उत्तर दिले.
कॉन्क्लेव्हचा विषय तसा स्फोटकच होता:
`` महात्मा फुलेंचा शैक्षणिक मुक्तीचा विचार आणि आजच्या संकटातील अंधकारमय सार्वजनिक शिक्षण: एक पुनरावलोकन'
या भरगच्च सभागृहातील श्रोत्यांमध्ये सर्वाधिक भरणा आताशा चर्चेमध्ये असलेल्या `झेन झी' वर्गाचा होता ही तर सर्वाधिक उल्लेखनीय बाब होती.
`आताच्या नव्या पिढीला समाजातील कुठल्याच घडामोडींबाबत काहीही देणेघेणे नाही' हा समज तसा अलीकडेच कॉक्रेच चळवळीने आणि राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज''ने साफ खोटा ठरवला आहे.
रविवारची ही `सत्यशोधक कॉन्क्लेव्ह'सुद्धा अशीच होती.
या कार्यक्रमाला स्वयंसेवक म्हणून राबवणारे तरुण राज्याच्या कानाकोपऱ्यांतून परिषदेच्या पूर्वसंध्येला पुण्यात आले होते, ते नागपुरातून, अकोल्यातून, बीड आणि यवतमाळ येथून, कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथून आणि ठाण्यातून आले होते.
विशेष म्हणजे या बहुतांश लोकांची परिषदेच्या आयोजक चमूशी `पहली मुलाखत' गेल्या तीन महिन्यांतच झाली होती.
कॉक्रेच चळवळीच्या अभिजित दीपके आणि इतरांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सावित्रीबाई आणि जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगत सिंग आणि भारताची धर्मनिरपेक्ष राज्यघटना पुन्हा एकदा देशाच्या अजेंड्यावर केंद्रस्थानी आणून ठेवली आहे,
अन्यथा या महापुरुषांच्या नावांची पोपटपंची राजकारणी नेत्यांच्या भाषणांपुरती मर्यादित राहिली होती.
सत्यशोधक कॉन्क्लेव्हच्या मंचावर यापैकी काही महापुरुषांचे फोटो होते.
या महापुरुषांनी सुरु केलेल्या महान कार्यानंतर आता पुढे काय करायचे हा प्रमुख वक्त्यांच्या भाषणांचा मुख्य सूर होता.
या महापुरुषांच्या कार्यावर पुण्यात आणि इतरत्रही अनेक सभा अन परिषदा होत असतात.
तेचतेच विषय ठरलेले असतात, अनेकदा वक्तेही तेच असतात, ते काय बोलणार हेही लोकांना ठाऊक असते आणि त्यामुळे जेमतेम अर्ध्याहून कमी भरलेल्या सभागृहांतील श्रोतेही तेच असतात.
त्यापैकी बहुतांश लोक साठी आणि सत्तरी ओलांडलेले असतात.
पुण्यात तसे नवख्या असलेल्या या कॉन्क्लेव्हच्या आयोजक तरुणांनी यापेक्षा वेगळी वाट चोखाळून आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
Keep it up !! .
Camil Parkhe September 28, 2026