Showing posts with label Mahatma Phule. Show all posts
Showing posts with label Mahatma Phule. Show all posts

Saturday, January 6, 2024

जॉन आणि मार्गारेट विल्सन :  सावित्रीबाई,जोतिबांचे शिक्षणक्षेत्रातील पुर्वसुरी


एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरु झाला, त्यानंतर ख्रिस्ती मिशनरींचे भारतात आगमन झाले. या मिशनरींनी देशाच्या विविध भागांत समाजातील सर्व घटकांसाठी आधुनिक पद्धतीच्या शाळा सुरु केल्या आणि भारतात नव्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मुंबईत, कोकणात आणि पुण्यात अमेरिकन मराठी मिशनच्या आणि स्कॉटिश मिशनच्या मिशनरींनी पहिल्यांदाच मुलांमुलींसाठी शाळा सुरु केले आणि देशात नवे युग सुरु झाले. तोपर्यंत अशाप्रकारे शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली गेलेली नव्हती. स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन आणि त्यांच्या पत्नी मार्गारेट विल्सन यांनी भारताच्या शिक्षणक्षेत्रात पायाभूत स्वरूपाचे योगदान केले आहे.

सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या विविध चरित्रांत अमेरीकन मराठी मिशनच्या अहमदनगरच्या सिंथिया फरारबाई त्यांचे नाव हमखास येते. त्याचबरोबर स्कॉटिश मिशनरी जॉन स्टिव्हन्सन, डॉ. जॉन विल्सन, जेम्स मिचेल, मिसेस मार्गारेट शॉ मिचेल, जॉन मरे मिचेल आणि मिसेस मारिया मॅकेन्झी मिचेल यांची नावे विविध संदर्भांत वारंवार येत असतात.
स्कॉटिश मिशनरी सोसायटीने १८२२ साली भारताकडे लक्ष वळवले. त्यावेळी संपूर्ण पश्चिम भारत फक्तसहा मिशनरी होते असे त्या सालच्या सोसायटीच्या अहवालात म्हटले आहे. या सोसायटीचा पहिला मिशनरी डोनाल्ड मिचेल यांचे भारतात १९२३ च्या जानेवारीत आगमन झाले. त्यापूर्वी डोनाल्ड मिचेल हे ईस्ट इंडिया कंपनीत अधिकारी होते. त्यानंतर मिचेल यांचे वर्षभरातच- दहा महिन्यांतच - निधन झाले. मात्र त्यांच्या निधनापूर्वी इतर चार जण भारतात त्यांना सामील झाले होते. क्रॉफर्ड, कूपर, जेम्स मिचेल आणि जॉन स्टिव्हन्सन ही त्यांची नावे. ब्रिटिशांनी पेशवाई सत्ता संपवल्यानंतरही भारतात आलेल्या ख्रिस्ती मिशनरींना पुणे शहरात आणि मध्य महाराष्ट्रात येण्यास काही काळ पूर्ण मज्जाव होता.
`ब्राह्मणांच्या पुणे शहरात स्थायिक होण्याचे स्कॉटिश मिशनचा इरादा होता. स्कॉटिश मिशनरी भारतात पोहोचले तोपर्यंत मुंबईतील ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा मिशनरींबद्दलचा आकस मावळला होता. मात्र तरीसुद्धा स्कॉटिश मिशनला पुण्यात मिशनकेंद्र उघडण्यास परवानगी देण्यास या सरकारचा ठाम विरोध होता. या शहरात ख्रिस्ती मिशनकेंद्र उघडले तर पुण्यातल्या ब्राह्मणांच्या प्रचंड प्रक्षोपाला तोंड द्यावे लागेल असे कंपनी सरकारला वाटत होते,’’ असे जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
नरेंद्र चपळगावकर यांनी `सावलीचा शोध’ या पुस्तकात स्कॉटिश मिशनरी डॉ. जॉन विल्सन आणि त्याची पत्नी मार्गारेट यांच्या शिक्षणकार्याची माहिती दिली आहे. त्यानुसार ‘’स्कॉटिश मिशनने कोकणात मिशनकार्य सुरु केले होते. डोनाल्ड मिचेल हा मिशनरी रत्नागिरीपाशी असलेल्या बाणकोट येथे १८२३च्या जानेवारीत पोहोचला होता, तेथे मराठी शिकून त्याने तेथे लगेच एक मराठी शाळा काढली.
जेम्स मिचेल आणि अलेक्झांडर क्रॉफर्ड हे स्कॉटिश मिशनरीही तेथे त्याच्या कामात सहभागी झाले. बाणकोट आणि हर्णै येथे स्कॉटिश मिशनचे कार्य चालू होते. सन १८२९ च्या दरम्यान या भागातल्या स्कॉटिश मिशनच्या शाळांची संख्या ८० पेक्षा जास्त होती, त्यात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी तीनशेपेक्षा अधिक मुली होत्या.
जॉन आणि मार्गारेट विल्सन यांचे १८२८ ला स्कॉटलंडहून मुंबईत आगमन झाले. त्यावेळी त्यांचा नुकताच विवाह झाला होता. कोकणातील आपला मराठीचा अभ्यास संपवून जॉन आणि मार्गारेट विल्सन १८२९च्या नोव्हेंबरात मुंबईत परतले.
दक्षिण कोकणात लोकसंख्या खूप विरळ असल्याने आणि तिथे जाण्यासाठी प्रवासाची सुलभ साधने नसल्याने स्कॉटिश मिशनरींनी १८२७ साली मुंबईत आपले लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटिश मिशनरींनी आपले कार्य फक्त मुंबई आणि पुण्यात चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोकणातील मिशनकार्य बंद करण्यात आले.
``शाळेत शिकायला एकही मुलगी येणार नाही’ असे मुंबईत आलेल्या स्कॉटिश मिशनरींना सांगण्यात आले होते. मात्र या मिशनरींनी या सांगण्याकडे साफ डे दुर्लक्ष केले. याचा परिणाम म्हणून १३ मार्च १८२४ रोजी मुलांबरोबरच अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागल्या आणि त्यामुळे मुलींसाठी एक वेगळा वर्ग सुरु करण्याची गरज निर्माण झाली.
सन १८२७ पर्यंत स्कॉटिश मिशनने ८० शाळा सुरु केलेल्या होत्या आणि त्यांत हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत होते. ब्राह्मणांपासून इतर सर्व जातींचे मुलेमुली या शाळांत शिकत होते. केवळ चार स्कॉटिश मिशनरी दूर अंतरावर पसरलेल्या ८० शाळा चालवत होते आणि या सर्व शाळांवर लक्ष ठेवणे कसे शक्य होते.
त्याशिवाय ख्रिस्ती धर्मप्रसार हा या मिशनरींचे मुख्य ध्येय होते आणि त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते. स्कॉटिश मिशनरी सोसायटीने मुंबईत आपले कार्य सुरु केले होते तोपर्यंत मुंबईत एकही ख्रिस्ती धर्मांतर नव्हते. लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माविषयी अत्यंत प्रतिकूल भावना होत्या. ``स्थानिक लोक बाप्तिस्मा कधी घेणार, धर्मांतर होते का ? असा प्रश्न या मिशनरींना वारंवार त्यांच्या मायदेशातील लोक विचारात होते.
जॉन विल्सन बाणकोटला १८२९ आले तेव्हा बाणकोटचा रामचंद्र पुराणिक हे पुराण सांगणारे ब्राह्मण ख्रिस्ती झाले होते. जॉन विल्सन यांनी मुंबईत १८३० साली हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म याबाबत वादविवाद आयोजित केला तेंव्हा ख्रिस्ती धर्माचा गड या रामचंद्र पुराणिक यांनीं लढवला होता.
``महाराष्ट्रात अमेरिकन मिशन, स्कॉटिश मिशन, लंडन मिशनरी सोसायटी, चर्च मिशनरी सोसायटी इत्यादी अनेक संस्था ख्रिस्ती धर्मप्रचाराचे कार्य करीत होत्या. या सर्व संस्थांचे कार्यकतें एकोप्याने व परस्पर सहकार्याने काम करीत होते. त्यासाठी बॉम्बे मिशनरी युनियन, मुंबई बायबल सोसायटी, बॉम्बे ट्रॅक्ट अॅन्ड बुक सोसायटी, मुंबई टेंपरन्स सोसायटी इत्यादी व्यापक संस्था स्थापन झाल्या होत्या. स्कॉटिश मिशनचे धर्मोपदेशक इ. स. १८२२ मध्ये मुंबई इलाख्यात प्रथम आले. त्यानंतर एकामागून एक जे उपदेशक आले, त्यांत जेम्स मिचेल, जॉन स्टिव्हन्सन, रॉबर्ट नेस्बिट, जॉन विल्सन, मरे मिचेल हे प्रमुख होते. सर्व धर्मोपदेशकांच्या कार्यपद्धतीत एकसूत्रीपणा होता. ज्या प्रदेशात प्रचार करायचा, त्यातील लोकांची भाषा आत्मसात करणे अत्यावश्यक आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणून येथे आल्यावर अल्पावकाशातच ते मराठी शिकले. इतर कार्यकर्त्यांना ती शिकणे सोपे जावे म्हणून त्यांनी मराठीचे कोश व व्याकरणे रचली. स्टिव्हन्सन, विल्सन, मिचेल यांना अनेक देशी भाषा अवगत होत्या. हिंदूचे धर्मग्रंथ पाहता यावेत म्हणून त्यांनी संस्कृतचाही अभ्यास केला,’’ असे ज्येष्ठ विचारवंत गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे. .
विल्सन यांची पत्नी मार्गारेट या कोकणात हर्णैला असताना स्कॉटिश मिशनने सुरू केलेल्या मुलींच्या शाळांत रस घेऊ लागल्या होत्या. हेच काम मुंबईत सुरु करण्याचे त्यांनी ठरविले. अमेरिकन मराठी मिशनने त्यापूर्वीच मुंबईत मुलींच्या शाळा सुरु केल्या होत्या.

१८२९च्या सप्टेंबरात विल्सन दाम्पत्य मुंबईत आले आणि अंब्रोळीच्या मिशन हाऊसमध्ये त्यांनी शाळा सुरु केली. मुलींना मार्गारेट शिकवत असत, या शाळेत पहिल्या तीन महिन्यातच ५३ मुली शाळेत दाखल झाल्या होत्या. मार्गारेट विल्सन यांनी आपल्या घरातच मुलींची शाळा चालू केली होते, त्यापैकी काही मुली अपंग तर काही अनाथ होत्या.
मार्गारेट विल्सन यांनी २९ मार्च १८३२ रोजी मुंबईत अँब्रोळी मिशन हाऊसमध्ये अँब्रोळी इंग्लिश स्कुल; या नावाने एक इंग्रजी शाळा सुरु केली. या मुलींना शिक्षणाबरोबरच कपडेलत्ते आणि जेवणासाठी थोडीशी रक्कम दिली जाई. मुंबईत राहणाऱ्या अनेक महिलांनी या शाळेला आर्थिक मदत पुरवून आपला पाठिंबा व्यक्त केला,
ही शाळा सुरु झाल्यानंतर तीन वर्षातच यापैकी सात मुली मार्गारेट यांच्या देखरेखीखाली मिशन हाऊसमध्येच राहू लागल्या. भारतातल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिल्यावहिल्या मुलींच्या बोर्डिंगची ही सुरुवात होती.
या शाळेसाठी मार्गारेट दररोज पाच तास देत असत. त्याशिवाय त्या कुलाबा येथे युरोपियन पेन्शरांना भेट द्यायच्या, जॉन विल्सन त्यांच्या साहित्यविषयक कामांत मदत करीत आणि त्याशिवाय काही एतद्देशीय नोकरांना धार्मिक शिक्षण द्यायच्या.
मार्गारेट यांनी पुढील सहा महिन्यांत सहा शाळा मुंबईत सुरु केल्या आणि या शाळांत १२५ मुली शिकत होत्या. या शाळांत सर्वाधिक हिंदू मुली होत्या, पारशी आणि मुस्लिम मुस्लीम मुलीही होत्या. या सहांपैकी एक शाळा आजही सेंट कोलंबा हायस्कुल फॉर गर्ल्स या नावाने प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने मराठी माध्यम होते.
``स्कॉटिश मिशनरी सोसायटीने डॉ. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, पुणे, नाशिक जिल्ह्यांतून आणि कोकण, गोव्यातही मुलींच्या शाळा, मुलीसाठी वसतिगृहे चालू केली. १८३२ मध्ये मुंबई शहरात स्कॉटिश मिशनने चालविलेल्या पाच शाळा एकमेकींशी संलग्न करण्याचे काम मिसेस विल्सन यांनी केले. तेव्हा त्या शाळांत एकंदर १२६९ विद्यार्थी होते. त्यांपैकी १७६ मुली होत्या. १८३९ सालच्या वार्षिक अहवालातील माहितीनुसार स्कॉटिश मिशनने चालविलेल्या मुंबईतील सर्व शाळांतील मिळून एकंदर ५४७ मुली मराठी माध्यमातून शिकत होत्या. १८२६-१८२७ साली मिशन यांच्या सर्व शाळांत मिळून ३०० होत्या. त्यांची संख्या १८४९-१८५० साली २००० झाली. या मुलीना शाळांत येण्यासाठी पैसे द्यावे लागत. ‘’ असे प्रतिभा रानडे यांनी आपल्या ` स्त्रीप्रश्नांची चर्चा: एकोणिसावे शतक’ या पुस्तकात लिहिले आहे.
विल्सन यांनी २९ मार्च १८३२ रोजी अंब्रोळी इंग्लिश स्कुल सुरु केली. या शाळेची परिक्षा सार्वजनिक रीतीने होई, या शाळेला नंतर कॉलेज डिव्हिजन जोडण्यात आले. या शाळेत इंग्रजी वाचन, व्याकरण, गणित, भूमिती, भूगोल इतिहास बायबल हे विषय शिकवले जात असत.’’
नाजूक प्रकृतीच्या मार्गारेट विल्सन यांच्या आरोग्यावर विपरीत परिमाण झाला आणि काही दिवस आजारी पडल्यानंतर त्यांचे १९ एप्रिल १८३५ला मुंबईतच निधन झाले. मृत्युशय्येवर असताना मार्गारेट यांनी `शक्य असल्यास मुलींच्या शाळेचे कार्य त्यांच्यानंतरही चालू ठेवावे'' अशी कळकळीची विनंती जॉन विल्सन यांना केली. पत्नीच्या या विनंतीने हेलावून गेलेल्या विल्सन यांनी मार्गारेटच्या दोन्ही बहिणींना या कामासाठी भारतात येण्याची विनंती केली.
मार्गारेट यांच्या या दोन्ही बहिणी रूढार्थाने मिशनरी नव्हत्या तरीही त्यांनी विल्सन यांच्या विनंतीला होकार दिला आणि त्या दोघी स्वखर्चाने स्कॉटलंडहून भारतात १८३७ साली आल्या.
मार्गारेट यांच्या दोन भगिनी मुंबईत मिशनकार्यासाठी आल्या या घटनेचा स्कॉटलंडमध्ये मोठा प्रभाव पडला.स्कॉटलंडच्या महिलांनीं भारतातील महिलांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन कॅप्टन सेंट क्लेर जेम्सन यांनी केले. त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून स्कॉटिश लेडीज असोसिएशन फॉर फिमेल एज्युकेशन इन इंडिया या संस्थेची मार्च १८३७ मध्ये स्थापना झाली. मिशनरींच्या पत्नींनी स्त्रीशिक्षणासाठी सुरु केलेल्या कामासाठी आर्थिक मदत पुरवणे आणि भारतात पूर्णवेळ कार्य करण्यासाठी स्कॉटलंडहून अविवाहित महिला स्कॉटलँडवरून पाठवणे ही या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट्ये होती.
मिस रीड या पहिल्या मिशनरी महिलेचे १८३८ ला भारत आगमन झाले, मात्र वर्षभरात त्यांचे निधन झाले. मेडल जेलट या दुसऱ्या महिलेने त्यांची जागा घेतली. मात्र कॉलराने त्यांचा लगेचच बळी घेतला. मार्गारेट विल्सन यांची बहीण मिस अँना बेना यांचेसुद्धा १८४१ साली निधन झाले. दुसरी बहीण हे बेना यांचे रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याशी विवाह झाला, त्यांचेही लग्नानंतर काही वर्षातच निधन झाले.
ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी भारतात आलेल्या या मिशनरींचे कार्य मात्र पूर्णतः व्यर्थ गेले नव्हते. बोर्डिंग स्कुलमधल्या सहा मुलींनी १८३८ साली बाप्तिस्मा घेतला आणि त्यानंतर १८४० मध्ये आणखी सहा मुली ख्रिस्ती झाल्या होत्या.
शिक्षणाचे कोणते उद्दिष्ट्य आपल्यासमोर आहे हे स्पष्ट करणारा लेख विल्सन यांनी `ओरिएंटल ख्रिश्चन स्पेक्टेकर'' मध्ये लिहिला. ``मानवसेवा हे ख्रिश्चनांचे प्रमुख कर्तव्य आहे. या सेवेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ज्ञानदान. सर्वांत चांगले ज्ञान म्हणजे धर्मसत्याचे ज्ञान. त्यानंतरचा क्रम कला आणि विज्ञान यांचा येतो. या ज्ञानालाच उपयुक्त ज्ञान असे आज संबोधले जाते. या ज्ञानाचा प्रसार शक्य होईल तेवढा करणे जे आपले (ख्रिश्चनांचे ) कर्तव्य आहे’’ असे त्यांनी म्हटल्याचे नरेंद्र चपळगावकर यांनी नमूद केले आहे.
धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी यांच्या धर्मांतरांनंतर पारशी लोकांनी आपल्या मुलांना विल्सन यांच्या शाळेतून काढून घेतले आणि ही शाळा काही काळ जवळपास ओस पडली.
जॉन विल्सन यांनी आपली शाळा मुंबईत फोर्ट येथे हलवली आणि जनरल असेम्ब्ली इन्स्टिट्यूट या नावाने ही शाळा प्रसिद्ध झाली. जॉन विल्सन यांनी आपली शाळा मुंबईत फोर्ट येथे हलवली आणि जनरल असेम्ब्ली इन्स्टिट्यूट या नावाने ही शाळा प्रसिद्ध झाली. जॉन विल्सन यांनी मुंबईत फोर्ट येथे उघडलेल्या शाळेत म्हणजे जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूट मध्ये अनेक वर्षे मरे मिचेल आणि रॉबर्ट नेस्बिट हे इतर स्कॉटिश मिशनरीसुद्धा शिकवत असत.
जॉन विल्सन, रॉबर्ट नेस्बिट आणि जॉन मरे मिचेल यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूट या संस्थेच्या आणि शाखांच्या कामांत सतरा वर्षे एकत्रितरित्या मिशनकार्य केले. मुंबईत १८२६ साली कार्य सुरु करणारे नेस्बिट यांचे १८५५ साली निधन झाले आणि या तिघांची ही भागीदारी संपुष्टात आली.
स्कॉटिश मिशनरी जॉन विल्सन यांच्या शाळेत शिकणाऱ्या धनजीभाई नौरोजी आणि होरमसजी पेस्तनजी या दोन पारशी तरुणांनी १८३९च्या अनुक्रमे १ मे आणि ५ मे रोजी पोलीस पहाऱ्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा मोठी खळबळ माजली होती.
या पारशी धर्मांतरीत मुलांना जॉन विल्सन यांनी कोंडून ठेवले आहे आणि त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात यावे अशी विनंती करणारा `हेबीअस कॉपर्स’ ; अर्ज पारशी समाजाच्या वतीने मुंबईतील सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला. या अर्जात जॉन विल्सन यांना प्रतिवादी करण्यात आले होते.
कंपनी सरकारच्या अमदानीत भारतात पहिल्यांदा सर्व नागरिकांना समान मानणाऱ्या ब्रिटिश कायद्याचे राज्य सुरू झाले होते. `हेबीअस कॉपर्स’ पेटिशन म्हणजे कोंडून ठेवलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर आणले जावे अशी विनंती करणे. या कायद्यानुसार भारतात न्यायालयात आलेले हे बहुधा पहिलेच प्रकरण असावे.
मुंबईत स्कॉटिश मिशनरींच्या प्रभावाने परळीचा तरुण देशस्थ ब्राह्मण नारायणशास्त्री शेषाद्री ख्रिस्ती झाला, त्याचा बारा वर्षाचा धाकटा भाऊ श्रीपतशास्त्री यानेसुद्धा स्कॉटिश मिशन हाऊसमध्ये धर्मातरासाठी आश्रय घेतला होता. याप्रकरणी श्रीपतीला डांबून ठेवल्याचा आरोप करणारा हेबीअसं कॉपर्स अर्ज न्यायालयात रेव्हरंड रॉबर्ट नेस्बिट यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात श्रीपत शास्त्रीला उभे करण्यात आले तेव्हा न्यायाधीश एरस्किन पेरी यांनी बारा वर्षाच्या अज्ञान मुलाचे धर्मांतराबाबतचे मत मुळी विचारात घेण्यासारखेच नाही, असे जाहीर केले. हा निवाडा देऊन त्या लहान मुलाला ताबडतोब त्याच्या वडलांकडे सोपवण्याचा आदेश न्यायाधिशांनीं दिला. तेव्हा ``;पण मूर्तिपूजा करण्यास मला का भाग पाडले जात आहे ?’’ त्या मुलाच्या प्रश्नाकडे अर्थात सरळसरळ दुर्लक्ष करण्यात आले आणि नारायण आणि श्रीपत या दोन भावांची अशाप्रकारे ताटातूट झाली.
यापैकी नंतर रेव्हरंड झालेल्या नारायणशास्त्री शेषाद्री यांनी ख्रिस्ती मिशनरी म्हणून फार मोठे योगदान दिले, पुण्यात त्यांनी काम केले आणि नंतर मराठवाड्यात बेथेल हे ख्रिस्ती लोकांचे एक नगरच वसवले. नरेंद्र चपलगावकर यांनी या बेथेल गावावर एक पूर्ण प्रकरणच लिहिले आहे.
नारायणशास्त्री आणि श्रीपतशास्त्री शेषाद्री यांच्या संदर्भांतल्या हेबीअसं कॉपर्स खटल्यात निवड देणाऱ्या न्यायाधीश एरस्किन पेरी यांचे नाव लक्षात ठेवण्यासारखे आहे. काही काळानंतर पुण्यात त्यांची वेगळ्या पदावर नेमणूक झाली होती आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रांत त्यांचे नाव विविध संदर्भांत झळकत असते.
जोतिबा फुले यांचे इंग्रजी शिक्षण स्कॉटिश मिशन शाळेत झाले. दरम्यानच्या काळात जेम्स मिचेल, मरे मिचेल, कँडी, इज्देल, डॉ. जॉन विल्सन (मुंबईतील विल्सन हायस्कूल व विल्सन कॉलेजचे संस्थापक) यांच्याशी त्यांचा बराच संबंध आल्यामुळे ख्रिस्ताने शिकविलेल्या मानवतावादाचा आणि ख्रिस्ती मिशनरींच्या समर्पित जीवनाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला.
मार्गारेट आणि जॉन विल्सन यांच्या सेवेतून अंब्रोली चर्च, विल्सन कॉलेज, विल्सन हाय स्कूल, सेंट कोलंबा गर्ल्स स्कूल वगैरे शैक्षणिकसंस्था २०० वर्षापूर्वी सुरु झाल्या. पुढील काळात म्हणजे १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. देशातील या पहिल्यावहिल्या विद्यापीठाचे उपकुलगुरूपद हे पद जॉन विल्सन यांना १८६९ साली देऊन शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दाखल घेतली गेली.
भारतात पहिल्यांदाच प्राथमिक शाळा ते उच्च शिक्षण अशी सेवा उपलब्ध करून देऊन शिक्षणक्षेत्रात मोठी मजल मारणाऱ्या रेव्हरंड डॉ. जॉन विल्सन यांना आधुनिक भारतीय शिक्षणक्षेत्रातील पितामह म्हणता येईल.
^^^
Camil Parkhe, December 27, 2023

Wednesday, December 13, 2023

                                                    प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
माझ्या पिढीतल्या लोकांना १ ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आठवणार. कारण या दिवशी शाळांत टिळकांवर वक्तृत्व स्पर्धा असायची. मी सुद्धा एकदा या वक्तृत्वस्पर्धेत पहिल्यांदा (आणि अखेरीस) भाग घेतला होता.

टिळकांना त्याच्या हयातीत लोकमान्यता मिळाली. त्या तुलनेत अनेक इतर सामाजिक आणि राजकीय पुढारी तसे दुलर्क्षित राहिले. टिळकांचे न. चिं. केळकर लिखित खंडात्मक चरित्र १९२१ साली म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर एका वर्षात प्रसिद्ग झाले. महात्मा जोतीराव फुले यांचे चरित्र पंढरीनाथ सीताराम पाटील लिखित चरित्र १९२७ साली, जोतिबांच्या निधनानंतर चार दशकांनी प्रसिद्ध झाले.
महात्मा गांधी यांचे पहिले चरित्र त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरवातीलाच लिहिले गेले होते. अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेले गांधीजींचे हे चरित्र १९१८ साली प्रसिद्ध झाले होते आणि या चरित्राला लोकमान्य टिळकांची प्रस्तावना होती.
गोव्यात मी मुंबई विद्यापिठाचा बीएचा आणि एमचा तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी असताना टिळकांचे गीतारहस्य प्रकरण १८ वे मला अभ्यासाला होते. भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या माझ्या अभ्यासात जोतिबा फुले यांच्या विचारांची कधीच गाठभेट झाली नाही.
धनंजय कीर यांनी लिहिलेले जोतिबा फुले यांचे पहिले समग्र चरित्र १९६७ साली प्रसिद्ध झाले, कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला शब्द पाळून हे चरित्र लिहिले असे कीर यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लिहिले आहे. नाही तर जोतिबांचे कार्य आणि विचारधन लोकांपर्यंत पोहोचायला आणखी काळ लोटला असता.
मात्र जोतिबा फुले यांना `राजकीय विचारवंत' हा दर्जा देण्यास खुद्द कीर यांनीच आखडता हात घेतला आहे, तसे त्यांनी लिहिले आहे. जोतिबा फार तर सामाजिक कार्यकर्ते होते असा कीर यांचा सूर आहे.
महात्मा फुलेंच्या महानतेकडे दुर्लक्ष करण्याच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रात त्यांच्या विचारधनाकडे दुर्लक्ष झाले आणि केवळ शहरांत आणि गावोगावी भाजीमंडईंना त्यांचे नाव देऊन, पुतळा उभारून त्यांची उपेक्षा केली गेली.
जोतिबांच्या आणि सावित्रीबाईंच्या कार्याची महती जगाला पटायला खूप कालावधी लागला. अजूनही या दोन महान व्यक्तींची समग्र म्हणावी अशी चरित्रे लिहिले गेली नाहीत.
सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर येथील सिंथिया फरारबाई आणि पुण्यात आपल्या नॉर्मल स्कुलमध्ये सावित्रीबाईंना अद्यापनाचे पदवी शिक्षण देणाऱ्या रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांचे चरित्र अभ्यासताना ही उपेक्षा मला प्रकर्षाने जाणवली.
जोतिबा किंवा सावित्रीबाई यांची विविध चरित्रे लिहून झाली आहेत, मात्र जोतिबा आणि सावित्रीबाई यांचे शिक्षक आणि प्रेरक असणाऱ्या स्कॉटिश मिशनतर्फे पुण्यात शाळा चालवणाऱ्या जेम्स मिचेल, मिसेस मार्गारेट शॉ मिचेल आणि त्यांचे सहकारी जॉन मरे मिचेल यांचा नामोल्लेख या चरित्रांत क्वचितच आढळतो.

असे का व्हावे. जोतिबांना एक दृष्टे विचारवंत, तत्त्ववेत्ते आणि समाजसुधारक म्हणून लोकमान्यता मिळायला इतका उशीर का लागावा ?
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा सोमवार, नोव्हेंबर २० ला पन्नासावा स्मृतिदिन आहे. महात्मा जोतिबांच्या कार्याकडे लोकांनी दुर्लक्ष करावे याबद्दल प्रबोधनकारांनी खूप आधी म्हणजे १९२५ सालीच संताप व्यक्त केला होता.
आजच्या `लोकसत्ता’त प्रसाद माधव कुलकर्णी यांनी प्रबोधनकारांवर लेख लिहिला आहे, त्यात म्हटले आहे : ``धारदार लेखणी आणि तडफदार वाणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. प्रबोधनकार यांच्या धारदार लेखणीने आणि तडफदार वाणीने अनेकांचे वस्त्रहरण झाले. ‘’
महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या हरी नरके संपादित `आम्ही पाहिलेले फुले’ या ग्रंथात खालील लेख समाविष्ट आहे. त्यावरून प्रबोधनकारांच्या धारदार लेखणीचे दर्शन होते. ( महात्मा फुले यांचा पुण्यात पुतळा उभारण्याचा ठराव पुणे नगरपालिकेत फेटाळला गेला होता त्याचा संदर्भ पहिल्या वाक्यात आहे.)
``जेध्यांच्या ठरावाला हाणून पाडायला व फुल्यांची निंदा मनसोक्त करायला त्यांच्याच जातभाईपैकी काही 'मांजराच्या डावल्या त्यांनी पुढे आणल्या. म्युनिसिपालिटीत ब्राह्मणेतरांची बहुसंख्या असताना ठराव का हो नापास होतो ? म्हणून पृच्छा करणारांपैकी बरेच अजागळ व पुष्कळ लुच्चे असतात. लुच्चांना खरी मख्खी माहीत असते. आजपर्यंत कोणत्या लहान मोठया पापात कोब्रांनी प्रत्यक्ष भाग घेतला आहे? हंडी आपण शिजववायाची, पण फोडावयाची मात्र भलत्याकडून! आपण स्वच्छ नामा निराळे !! शपथेला मोकळे!!!
खरा सुधारक हा जवळ जवळ बंडखोरच म्हणला तरी चालेल. त्याचे बंड रुढींच्या विरुध्द असते. त्याचा मारा प्रचलीत लोककल्पनांवरच असल्यामुळे लोकमान्यतेचा तो प्रथम संन्यास करून कडव्या निश्वयाने कार्यक्षेत्रात उडी घेतो, अर्थात लोकांना तो अप्रिय असतो. त्याचे सत्यशोधन लोकांच्या अनादरास पात्र होते. त्याला कर्तव्याची चाड असते, लोकजागृतीची तळमळ असते, सत्यावर त्याचा अढळ विश्वास असतो, पण तो कोणाच्या अभिप्रायाची पर्वा बाळगीत नाही. त्यामुळे ज्यांच्या कल्याणाविषयी तो झगडत असतो, तेच त्याला अतोनात विरोध करतात. त्याचा छळ करतात. वेळी त्याचा प्राणही घेतात. जोतीराव फुले या उच्च समाजसुधारक कोटीतले महात्मा होते.
ते टिळकांप्रमाणे बी.ए.एलएल. बी. नसले तरी हिंदुसमाज व धर्मात त्यांनी कितीतरी पट श्रेष्ठ कामगिरी केलेली आहे. ते लोकमान्य झाले नाहीत; हीच त्यांच्या श्रेष्ठ कर्तव्याची साक्ष आहे. लोकमान्य होणे सोपे, पण जोतीरावांचे एकादे मत नुसते प्रतिपादन करणे फार कठीण. लोकमताला वळण देण्याचे काम लोकमान्यतेच्या भरी पडणाऱ्यांच्या हातून जगात आजपर्यंत घडलेले नाही. आणि हे काम करणारे लोकहितवादी, भागवत, आगरकर, कर्वे, शिंदे, शाहू छत्रपति वगैरे सुधारक लोकक्षोभाला बळी पाडल्यावाचून राहिले नाहीत.
जोतीराव बोलून चालून कड़वा सुधारक. त्याला कसली लोकमान्यता? आणि त्याच्या अस्तित्वाची तरी कोण दाद घेतो? आपला आजा कोण होता हे नातवाला सुध्दा भाडोत्री भटजवळून शिकण्याचा प्रसंग तेथे लोकमान्यतेच्या चौघड्यापुढे बिचाऱ्या फुले सुधारकांच्या चरित्राची टिमकी लोकांना काय माहित असणार? भटांजवळून शिकण्याचा प्रसंग, तेथे लोकमान्यतेच्या चौघड्यापुढे बिचाऱ्या फुले सुधारकांच्या चरित्राची टिमकी लोकांना काय माहीत असणार?"
[`प्रबोधन', सप्टेंबर १९२५ प्रबोधनकार ठाकरे संपादक]
Camil Parkhe

 

महात्मा फुले यांच्या प्राथमिक जडणघडणीत दोन व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान आहे, त्या दोन्हीही व्यक्तींबाबत आज काहीही माहिती उपलब्ध नाही. त्या दोन व्यक्ती म्हणजे गोविंदराव फुले यांचे शेजारी उर्दू शिक्षक गफार बेग मुनशी आणि धर्मोपदेशक किंवा सरकारी अधिकारी असलेले लिजिट साहेब. गोविंदरावांनी आपल्या हुशार मुलाचे शिक्षण पुन्हा सुरु करावे असा आग्रह या दोन सदगृहस्थांनीं केला, गोविंदरावांनी त्यांचे ऐकले आणि लहानगा जोतिबा स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत जाऊ लागला आणि एका महात्म्याचा अशा प्रकारे जन्म झाला.

सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वांची जडणघडण करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या नावांचा फुले दाम्पत्त्यांच्या चरित्रांत अगदी ओझरता उल्लेख होतो, कधी तर अनुल्लेखाने त्यांना टाळले जाते. मात्र असे करण्याने सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची समग्र चरित्रे आतापर्यंत लिहून झालेली नाहीत. या दोन महान व्यक्तींची ही एकप्रकारे उपेक्षाच आहे.
जोतिबा स्कॉटिश मिशनरींच्या शाळॆत शिकले, वडलांनी घराबाहेर काढल्याने आणि नंतर स्वतःच्या शाळा चालवताना अर्थार्जनासाठी स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत जोतिबा अर्धवेळ शिक्षकाची नोकरी करत असत असेही उल्लेख अनेक चरित्रकार करतात.
स्कॉटिश शाळेत जोतिबांना शिकवणाऱ्या या स्कॉटिश मिशनरींची नावे मात्र कुठेही झळकत नाहीत.
जोतिबा फुले आपले मित्र सदाशिवराव गावंडे यांच्याबरोबर अहमदनगरला अमेरिकन मराठी मिशनच्या सिंथिया फरारबाई यांच्या मुलींच्या शाळेला भेट देतात, त्यांच्याशी सविस्तर बोलणे होऊन, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण पुण्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या असे स्वतः जोतिबा लिहितात. धनंजय कीरलिखित महात्मा फुले चरित्रात यावर दोन-अडीच पाने आहेत.
फरारबाईंचे पूर्ण चरित्र कागदपत्रांच्या रुपात गेले एक शतकभर उपलब्ध आहे. तर या `मिस सिंथिया फरार' कोण याविषयी बहुतेक फुले चरित्रकार मौन बाळगतात.
उपलब्ध दस्तऐवजाच्या आधारे अलीकडेच सावित्रीबाईंच्या शिक्षिका असलेल्या सिंथिया फरारबाईंचे चरित्र आणि कार्य याविषयी माहिती देणारे पुस्तक मी स्वतः लिहिले आहे.
रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन यांच्यासह रेव्हरंड जेम्स मिचेल हे स्कॉटिश मिशनरी पुण्यात १८३० पासून कार्यरत होते. जेम्स मिचेल यांनी आपल्या निधनापर्यंत वीस वर्षे पुण्यातल्या स्कॉटिश मिशनची जवळजवळ एकखांबी धुरा वाहिली. जोतिबांना आपल्या स्कॉटिश शाळेत १८४१ ते १८४७ या काळात शिकवणाऱ्या जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांचे यांचे केवळ ओझरते उल्लेख फुले दाम्पत्याच्या चरित्रांत आढळतात.
मुलींच्या शाळा चालवणाऱ्या जोतिबांचा पुण्यात जंगी सत्कार झाला, त्याकाळच्या वृत्तपत्रांत त्या कार्यक्रमाला हजर असणाऱ्या प्रतिष्ठित देशी आणि परदेशी व्यक्तींच्या यादीत जोतिबाचे शिक्षक असलेल्या रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांचे नाव साहजिकच झळकते.
सावित्रीबाईंनीं पुण्यात स्कॉटिश मिशनरी मिचेलबाई यांच्याकडे अद्यापनाचे धडे घेतले असे हरी नरके आणि इतर अभ्यासक लिहितात. सर विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर साक्ष देताना आपल्या लेखी इंग्रजी निवेदनात आपण आपल्या शाळा मिचेलबाईंकडे चालवण्यासाठी दिल्या आणि त्या शाळा आजही (१८८२) चालू आहेत असे जोतिबा फुले म्हणतात.
तर नॉर्मल स्कुल चालवणाऱ्या या मिचेलबाई कोण? रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी असलेल्या ( मार्गारेट शॉ) मिचेलबाईंबद्दल उपलब्ध ग्रंथांत आणि दस्तऐवजात कितीतरी माहिती आहे, मात्र त्याकडे कानाडोळा करून मिचेलबाईंची उपेक्षा केली जाते.
रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या मदतीसाठी मुंबईहून नंतर रेव्हरंड जॉन मरे मिचेल पुण्यात आले, मेजर थॉमस कँडी यांच्या गैरहजेरीत ते पूना कॉलेजचे (डेक्कन कॉलेज) प्रिन्सिपल आणि संस्कृत-मराठी विभागाचे प्रमुख होते.
महात्मा फुले यांचे एक महत्त्वाचे चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यानी `चटईचा विटाळ' या संदर्भात जोतिबांनी जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत पाठवलेल्या एका महार मुलाची अत्यंत हृदयद्रावक कथा सांगितली आहे.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेली आणखी एक घटना धनंजय कीर यांनी सांगितली आहे.
कीर यांनी लिहिले आहे : `रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली. त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती. तिचा उपयोग ते पंतोजी अधूनमधून चांगलाच करीत. आदम व्हाईट यांनी त्या ब्राह्मण पंतोजीला विचारले की, 'ही ढेकळं तुमच्याजवळ कशाकरिता ठेवली आहेत?"
पंतोजी उत्तरले, "स्पृश्य मुलांच्याबाबतीत मी छडी वापरतो. जर मी छडीने महार मुलास मारले तर तो अस्पृश्य असल्यामुळे काठीबरोबर विटाळ येईल आणि माझे सर्व शरीर विटाळेल. म्हणून जेव्हा महार मुलगा मूर्खपणाने वागतो तेव्हा मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फेकतो. जर चुकलं तर दुसरं मारतो."
या दोन्ही घटनांचे वर्णन कीर यांनी जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्राच्या आधारे केले आहे आपले आत्मचरित्र आणि इतर कितीतरी लिखाण करणारे जॉन मरे मिचेल यांच्या या साहित्याचा मात्र फुले चरित्रकार प्राथमिक चरित्रसाधने म्हणून मुळी विचारच करत नाहीत.
खूप जुनी, शंभर-दीडशे वर्षांपूर्वी अमेरिकन मराठी मिशनची आणि स्कॉटिश मिशनची पुण्यामुंबईत मराठीत आणि इंग्रजीत लंडनमध्ये आणि अमेरिकेत प्रकाशित झालेली अनेक पुस्तके आणि कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. मात्र या साहित्याचा फुले दाम्पत्याची प्राथमिक चरित्रसाधने म्हणून का वापर केला जात नाही याचे आश्चर्य वाटते.
जॉन मरे मिचेल यांचे सर्वात महत्त्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी भारतात केवळ मुस्लिम मुलींसाठी असलेली शाळा पुण्यात चालवली, या शाळेत तब्बल ७० मुली होत्या आणि त्याहून विशेष म्हणजे जॉन मरे मिचेल या मुलींना फी सुद्धा आकारत असत.
त्याकाळी म्हणजे १८६२ ला शाळेत येणाऱ्या मुलांमुलींसाठी पैशाची रक्कम, खाणेपिणे , कपडेलत्ते पुरवणे अशी आमिषे दाखवावी लागत, फुले दाम्पत्याला सुद्धा असे करणे भाग पडले होते.
मात्र जॉन मरे मिचेल यांची मुस्लिम मुलींसाठी शाळा भारतातील हा असा पहिला प्रयोग नव्हता. त्याआधी कितीतरी वर्षे आधी स्कॉटिश मिशनरी वजीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लिम मुलींसाठी शाळा सुरु केली होती. रेव्हरंड वजीर बेग यांना भारतातील मुस्लिम मुलींच्या आधुनिक शिक्षणाचे जनक म्हणता येईल. ही शाळा अल्पावधीत - बहुधा अल्प प्रतिसादाने - बंद पडली होती.
ही सर्व माहिती अनेक पुस्तकांत उपलब्ध असली तरी स्त्रीशिक्षणाच्या ग्रंथांत आणि जवळजवळ सर्वच फुले दाम्पत्याच्या चरित्रांत या माहितीचा उल्लेखच आढळत नाही.
स्त्रीशिक्षणाबाबत फुले दाम्पत्याने केलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची माहितीपूर्ण असलेली आणि समग्र म्हणावीत अशी चरित्रे आजही लिहिली जात नाही याचे वैषम्य वाटते.

Camil Parkhe

Thursday, September 8, 2022

 बाबा पदमनजी 

 

मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार म्हणून बाबा पदमनजी सुपरिचित आहेत. तत्कालीन समाजातील विधवांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यासाठी 1857 साली ‘यमुनापर्यटन‘ ही कादंबरी लिहून त्यांनी मराठी भाषेत कादंबरी या वाङ्मयप्रकाराचा पाया घातला. 

जवळजवळ सव्वाशे पुस्तके लिहून बाबांनी मराठी साहित्यातील कोश, निबंध, आत्मचरित्र वगैरे वाङ्मयप्रकारांची दालने समृद्घ केली. 
 
बाबा पदमनजी त्या काळातील एक प्रमुख समाजसुधारकही होते. आपल्या साहित्यातून त्यांनी प्रचलित विविध घनिष्ट सामाजिक रीतिरिवाजांवर टीका केली. पेशवाईचा अस्त होऊन ब्रिटिश आमदानीच्या काळात महाराष्ट्रातील समाज जीवनास नवी दिशा देणाऱ्या सामाजिक पुढाऱ्यांमध्ये बाबा पदमनजींचा समावेश होतो.
 
बाबा पदमनजी यांचा जन्म बेळगाव येथे 1831 च्या मे महिन्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. मात्र त्या काळात प्रचलित असलेल्या प्रथेमुळे त्यांनी आपल्या आडनावाचा वापर केला नाही. बाबा पदमनजी हे कासार जातीचे होते. त्यांचे वडील पदमनजी माणिकजी यांनी दक्षिण कोकणात सब असिस्टंट सर्व्हेअर व बिल्डर म्हणून काम केले होते, नंतर त्यांची बेळगावात बदली झाली. 
 
बेळगावातच लंडन मिशनच्या शाळेत बाबा पदमनजींनी शिक्षण घेतले. 1847 साली वर्षभर त्यांचे एडन येथे वास्तव्य होते. तेथून परल्यानंतर 1849 साली त्यांनी मुंबईतील काळबादेवी गायवाडी येथील फ्री चर्च विद्यालयात प्रवेश घेतला. या विद्यालयात नारायण शेषाद्री हे मूळचे चित्पावन ब्राह्मण समाजातील, पण नंतर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेले शिक्षक शिकवित असत. 
 
या काळातच बाबा पदमनजी यांची हिंदू समाजातील चालीरीतींविषयी, जातिभेदांविषयीची मते बदलत गेली. त्याकाळात अत्यंत गुप्त रीतीने स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचे ते सभासद बनले. . मात्र त्याकाळात समाजसुधारणांबाबत कर्मठ मंडळींचा कडवा विरोध लक्षात घेऊन परमहंस मंडळीच्या स्थापनेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत असे. 
 
मात्र या मंडळीच्या एका सभासदाने या सभेच्या सदस्यांची यादीच प्रसिद्ध केली. 
 
परमहंस मंडळीच्या सभासदांच्या या यादीने त्याकाळात समाजात मोठी खळबळ निर्माण केली होती. या सभेच्या सदस्यांचा ख्रिस्ती धर्माकडे कल आहे, हे सर्व सभासद लवकरच ख्रिस्ती होणार अशीही वदंता सगळीकडे पसरली.
बाबा पदमनजींच्या वडिलांनी त्यामुळे बाबांना ताबडतोब घरी म्हणजे साताऱ्याजवळील उडतरे गावी बोलावून घेतले. बाबा पदमनजींनी 3 सप्टेंबर 1854 रोजी म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी बेळगाव येथे बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. 
 
आपण धर्मांतर का केले याची कारणे बाबांनी ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात दिली होती. या धर्मांतराचे वृत्त तत्कालीन अनेक मराठी नियतकालिकांतही प्रसिद्ध झाले.
 
सोळा वर्षे बाबांचे पुण्यात वास्तव्य होते. पुण्यात ते बराच काळ फ्री चर्चच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत.
बाबा पदमनजींचे महात्मा जोतिबा फुले यांच्याशी चांगले संबंध होते. बाबा पदमनजी हे अनेकदा बी.पी. किंवा बा.प. या आपल्या नावाच्या आद्याक्षरांनी लेख लिहित असत. महात्मा फुल्यांच्या ‘ब्राम्हणाचे कसब’ या पुस्तकाला बाबांनी प्रस्तावना लिहिली होती व प्रस्तावनेखाली बी.पी. अशी सही केली होती. 
 
त्याशिवाय महात्मा फुले यांच्या ‘शिवाजीचा पोवाडा’ या पुस्तकाची प्रूफेही बाबांनी तपासली होती.
 
बाबा पदमनजी त्याकाळात ख्रिस्ती समाजात खूप लोकप्रिय होते असे दिसून येते. त्यांच्या धर्मातरास 40 आणि 50 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी हा प्रसंग साजरा करण्यासाठी खास समारंभ झाले होते व या समारंभाचे वृत्तान्तही प्रसिद्ध झाले होते.
 
त्यांनी स्वतःही काही नियतकालिकांचे अनेक वर्षे प्रकाशन केले. ‘उदयप्रभा’, ‘सत्यदीपिका (धाकटी), ‘सत्यदीपिका (थोरली)’, सत्यवादी, कुटुंबमित्र आणि ऐक्यदर्शक पत्रिका ही बाबांनी चालविलेली नियतकालिके. 
 
समाजाचे उपेक्षित घटक असणाऱ्या बालविधवा आणि महिलांच्या उन्नतीसाठी महात्मा फुल्यांनी कार्य सुरू केले तेव्हा त्यांना प्रचंड सामाजिक प्रक्षोभास तोंड द्यावे लागले. अशावेळी बाबांनी आपल्या या स्नेह्यास पाठबळ पुरविले.
‘सत्यदीपिका’ नियतकालिक चालविणारे बाबा पदमनजी यांच्यासारखे ख्रिस्ती मिशनरी आणि ` ज्ञानोदय’ सारख्या मिशनरींच्या मुखपत्राने जोतिरावांना नेहमी साहाय्य केले आणि त्यांची कड घेतली, असे ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांनी आपल्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड पहिला) या ग्रंथात नमूद केले आहे.
 
मराठी साहित्यातील कादंबरी, शब्दकोश, निबंधसंग्रह, चरित्रे, आत्मचरित्र, मृत्युलेख वगैरे विविध वाङ्मयप्रकारांत मोलाची भर टाकणाऱ्या बाबा पदमनजींना आपल्या या साहित्यकृतींच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होण्याचे भाग्य लाभले. अर्थात यासाठी त्यांची जाहिरातपद्धती आणि ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रभावी पद्धती उपयुक्त ठरल्या. 
 
आपल्या या साहित्यकृती अधिकाधिक वाचकांपर्यंत जाण्यासाठी बाबा प्रकाशनपूर्व सवलीची किंमत, भरपूर जाहिरात वगैरे मार्केटिंग तंत्रांचा कुशलतेने वापर करत. त्यामुळे त्यांच्या हयातीत ‘यमुनापर्यटन‘च्या तीन आवृत्या हातोहात खपल्या. 
 
आपल्या या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीत ही कादंबरी कुणी खरेदी केली याची बाबांनी सरळसरळ यादीच प्रकाशित केली. या यादीमध्ये दादोबा पांडुरंग, जगन्नाथ शंकरशेठ, लोकहितवादी, महात्मा जोतिबा फुले, शेख दाऊद गुलाम महंमद, शिक्षणतज्ज्ञ रेव्ह. जॉन विल्सन, रेव्ह. नारायण शेषाद्री, मराठी शब्दकोशकार जेम्स टी. मोल्सवर्थ आदी त्याकाळच्या नामांकित व्यक्तींचा समावेश होता.
 
या सामाजिक पुढाऱ्याचे वयाच्या 75 व्या वर्षी म्हणजे 29 ऑगस्ट 1906 रोजी मुंबईत निधन झाले. मुंबईतील शिवडी येथे त्यांचा पार्थिव देह पुरण्यात आला.
 
एखाद्या वाङ्मयप्रकारातील पहिली वहिली कृतीच मोठी प्रक्षोभक, वादग्रस्त आणि तत्कालीन समाजातील एखाद्या महत्त्वाच्या ज्वलंत प्रश्नाचा वेध घेणारी क्वचितच असते, ‘यमुनापर्यटन‘ ही पहिली वहिली कृती त्यादृष्टीने अपवादात्मकच म्हणाली लागेल, असे बाबा पदमनजींचे चरित्रकार डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर यांनी म्हटले आहे. 
 
एकोणिसाव्या शतकात विधवांची स्थिती आणि त्यांचा पुनर्विवाह हा अत्यंत ज्वलंत सामाजिक विषय होता. विधवांच्या प्रश्नावर लिहिलेल्या या कादंबरीस बाबांचे एक स्नेही आणि समाजसुधारक दादोबा पांडुरंग यांनी छापील 27 पानांची संस्कृतमध्ये प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेचा 18 पानांचा मराठीतील सारांशही बाबांनी आपल्या या कादंबरीबरोबर प्रसिद्घ केला. 
 
विधवांच्या पुनर्विवाहाची गरज दादोबा पांडुरंगांनी आपल्या या प्रस्तावनेत मांडली. त्यामुळे ‘यमुनापर्यटन‘ या कादंबरीद्बारे समाजात विधवाविवाहाबाबत जागृती करण्याचा कादंबरीकाराचा हेतू होता हे स्पष्ट होते. बाबांनी आपल्या या कादंबरीचे उपशीर्षक ‘हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण‘ असे ठेवले त्यावरूनही हेच स्पष्ट होते.
 
बाबा पदमनजींनी ‘शब्दरत्नावली‘ या नावाचा समानार्थी शब्दांचा कोश अथवा थिसॉरस 1860 साली प्रसिद्घ केला. मराठी भाषेतील हा पहिलाच समशब्दकोश. इंग्रजी भाषेतील ज्येष्ठ कोशकार पीटर मार्क रॉजेट थिसॉरस या प्रसिद्घ समानार्थी शब्दांच्या कोशाच्या धर्तीवर ‘शब्दरत्नावली‘ची निर्मिती करण्यात आली आहे. 
 
विशेष म्हणजे रॉजेट थिसॉरसची पहिली आवृत्ती 1852 साली प्रसिद्घ झाली. त्यानंतर केवळ आठ वर्षातच रेव्ह. पदमनजींनी आपला ‘शब्दरत्नावली‘ कोश प्रसिद्घ केला. 
 
मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी मराठी भाषेतील एक प्रमुख कोशकर्ते म्हणूनही ओळखले जातात. संस्कृतमध्ये ‘निघंटु‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शब्दकोश या वाङ्मयप्रकाराचा मराठीत सर्वप्रथम पाया रेव्ह. विल्यम केरी या बॅप्टिस्ट मिशनरीने 1810 साली रचला. 
 
बाबा पदमनजी यांनी 1860 साली इंग्लीश आणि मराठी कोशाचा संक्षेप (A Comprehensive Dictionary-English and Marathi) या नावाचा त्यांचा पहिला शब्दकोश प्रसिद्घ केला. बावीस हजारांहून अधिक शब्द असलेल्या या कोशाची दुसरी आवृत्ती 1870 साली तर तिसरी आवृत्ती 1889 साली प्रसिद्घ झाली.
 
पुण्याच्या भवानी पेठेत बोहरा दफन भूमी जवळ त्यांच्या नावाने चौक आहे.
 
 
  ^^
 
 
( संदर्भ : ‘बाबा पदमनजी' : काल व कर्तृत्व’-डॉ. केशव सीताराम कऱ्हाडकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई 400 032 (1979).
 
^^^
( `ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' , लेखक कामिल (पारखे (वितरक सुगावा प्रकाशन, पुणे, दुसरी आवृत्ती २०१७) मधील एक प्रकरण )