मिरामार बीचवर फुटबॉल -- फुटबाँलवेडा गोवा
(Siridao beach photo by Willy Goes)
समोरचे ते लांबवर पसरलेले पाणी पाहून मी अगदी थक्क झालो होतो. काही ठिकाणी तर दुसरा किनाराही नजरेस पडत नव्हता. इतके पाणी मी केवळ हिंदी चित्रपटांत एखादे गाणे चालू असताना गंगामैया किंवा यमुना नदीचा प्रवाह दाखवतात तेव्हाच पाहिले होते.
माझी उत्फुर्त प्रतिक्रिया होती ; अरे बापरे, किती मोठी नदी आहे ही !
नदी? ही नदी नाही, समुद्र आहे, अरबी समुद्र ! आमच्या दौऱ्याचे प्रमुख असलेले फादर किस्स पटकन म्हणाले.
त्या उत्तराने आता माझ्या तोंडाचा आ अधिकच वासला होता. आपण काय पाहत आहोत यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
ही घटना आहे १९७८ ची. गोवा पुणे बेळगाव येशूसंघीय प्रांताने दहावी आणि अकरावीची परीक्षा दिलेल्या पंधरासोळा मुलांची आपल्या प्रांतातील मिशनकेंद्रांची व्होकेशनल टूर किंवा दैवी पाचारण दौरा आयोजित केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरहून मी एकटा या दौऱ्यात सामील झालो होतो. दौऱ्याच्या शेवटी पणजीला आल्यावर मिरामार बीचवर हा प्रसंग घडला होता.
एका बाजूला म्हणजे आमच्यासमोरच पणजी आणि कंपालकडून येणारे मांडवी नदीचे विशाल पात्र त्या अथांग सागरात विलीन होत होते आणि दुसऱ्या टोकाला निळ्याभोर आकाशापर्यंत भिडणारे ते पाणी म्हणजेच अरबी समुद्र होता !
माझी तर मती एकदम गुंग झाली होती. शालेय पुस्तकांत समुद्राविषयी कितीही शिकलो होतो तरी समुद्र प्रत्यक्ष पाहण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग होता.
मिरामार समुद्रकिनाऱ्यावर उभे राहण्याची, तेथून तो समुद्र पाहाण्याची ही माझी पहिलीच वेळ. या मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशीच आणि नंतर सान्त इनेजशेजारच्या ताळगावात मी माझ्या आयुष्याची यापुढील तब्बल चौदा वर्षे घालवणार आहे याची तेव्हा मला साधी कल्पनाही नव्हती !
त्यानंतर एक महिन्यानंतर येशूसंघीयांतर्फे नव्यानेच उघडलेल्या लोयोला प्री-नोव्हिशिएट किंवा पूर्वसेमिनरीत मी दाखल झालो. अशाप्रकारे बीए होईपर्यंत म्हणजे चार वर्षे माझे समुद्रकिनारी वास्तव्य होते.
जून महिन्यात मी मिरामार बीचपाशी राहायला आलो. त्या पहिल्या पावसाळ्यात समोरच्या समुद्राने धारण केलेल्या रुद्र रुपाने खूप भीती वाटायची. खवळलेल्या समुद्राच्या पाण्याच्या लाटांची उंची खूप असायची आणि भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी तर अगदी रस्त्यापाशी आलेले असायचे. रात्री खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा घोघो आवाज झोप उडवायचा.
नंतर काही दिवसातच या समुद्राची भिती गेली, समुद्राचे पाणी कोठे किती खोल, कुठे कमी खोल हे कळायला लागले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोण्याचीं सवय आणि आवड निर्माण झाली.
धेम्पे कॉलेजातच माझे हायर सेकंडरी, पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले. बॉंबे युनिव्हर्सिटीची गोव्यातील आमची शेवटची बॅच. त्यानंतर गोवा युनिव्हर्सिटी स्थापन झाली.
धेम्पे कॉलेजासमोरच आमचे हॉस्टेल होते. पावसाळ्याचे दिवस वगळता वर्षभर दर दिवशी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत आम्ही मुले मिरामार बीचवर फुटबॉल खेळायचो.
तेथील स्वच्छ आणि सफेद मऊ वाळूत हा खेळ खेळताना पायात बूट घालायची गरज भासली नाही. एका बाजूला माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकरांची समाधी आणि दुसऱ्या बाजूला पाईन वृक्षांचे दाट जंगल यामध्ये असलेल्या समुद्र किनाऱ्यावर फुटबॉल खेळण्याची मजा काही औरच होती.
त्या मऊ वाळूत पळणे, फुटबॉल खेळवणे किंवा डॉज करणे, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला मार्क करणे आणि गोलकिपरने चेंडू अडविणे वगैरे सर्वकाही त्या खेळातील नियमांप्रमाणे होई. खेळतांना खाली पडले तरी वाळूमुळे अंग खरचटण्याचे, रक्त येण्याचे प्रमाण वा मोठी जखमा होण्याचे प्रमाण खूप कमी असायचे.
१९७०च्या दशकांत गोव्यात पर्यटकांची संख्या आजच्या इतकी नव्हती. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर कुठल्याही अडथळ्याविना किंवा इतरांना त्रास ना होता दररोज एक तासाचा खेळ होई. फुटबॉल समुद्रात गेला तर तो आणणारा येताना पाण्यात एका डुबकीही घेऊन होई. फुटबॉलची मॅच चालू असताना पाऊस सुरू झाला तर खेळण्याची मजा काही औरच असायची.
युरो फ़ुटबाँल स्पर्धेमुळे पुढील काही दिवसांत फुटबॉल फीवर सर्वत्र चढत जाणार आहे अर्थात गोव्यासारख्या छोट्याशा राज्यातील फुटबॉलप्रेम यापुरते मर्यादित नाही. ते गोमंतकीय संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे.
गोव्यातील शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात कधीही फुटबॉल खेळली नाही अशी व्यक्ती सहसा सापडणार नाही. अनेक घरांत गिटार वाजविणारी तरुण मुले आणि मुली आणि ज्येष्ठ नागरिकही असतात, त्याचप्रमाणे या छोटयाशा राज्यात घराघरांत फुटबाँलही असतो. गोवा ही चारशे वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीजांची वसाहत होती, त्याचा हा एक परिणाम.
पावसाळा संपला आणि मोकळ्या मैदानांवरचे पाणी जमिनीत जिरले, भाताची शेते मोकळी झाली की मग तेथे सकाळी आणि संध्याकाळी शाळकरी मुले आपल्या कोचसह फुटबॉल खेळू लागतात.
फुटबॉलचा हा सराव कधी आंतरशालेय स्पर्धांसाठी असतो, कधी कुठल्या स्पोर्टस क्लबने आयोजित केलेल्या टुर्नामेंटसाठी असतो. मात्र हे दृश्य तुम्हाला पणजी, म्हापशासारख्या शहरात दिसेल तसेच अंजुना समुद्रकिनाऱ्यापाशी दिसेल किंवा सांता एस्तेव्ह सारख्या बेटावरही दिसते (आता या गावाला काही बाजूंनी पुलाने जोडले गेले असल्याने बेट असण्याचे नावीन्य राहिले नाही).
भाताची कापणी होऊन एखादे शेत मोकळे झाले कि मग मुले फुटबॉल खेळण्यासाठी त्याचा ताबा घेतात. शाळेच्या मैदानांवर तर त्यांचा वर्षभर हक्क असतोच.
कधीकधी ही मुले फुटबॉल शूज, लांब मोजे घालून आलेली असतात तर कधी बूटमोज्याविनाही सराव करताना आढळतात. फुटबॉल डॉज करण्यासाठी, वेडीवाकडी वळणे घेत फुटबॉलशी खेळता यावे यासाठी सरावाची साधने घेऊन आली असतात. त्यांना कोचिंग करणारा तरुण किंवा मध्यमवयीन व्यक्ती त्यांच्या शाळेतले क्रीडाशिक्षक असतात किंवा स्थानिक स्पोर्टस क्लबचे सदस्य असतात.
गोव्यात माझ्या बहिणीकडे गेलो की या शाळेच्या मैदानात किंवा एखादया मोकळ्या झालेल्या पॅडी फिल्डवर मुलांचा फुटबॉलचा सराव पाहणे, कधी एखादा अटीतटीचा सामना पाहणे यात चांगला वेळ जातो. एकूण फुटबॉल हा खेळ अनेक गोमंतकीयांची पॅशन आहे.
पणजी येथील कम्पाला ग्राउंडवर तुम्ही गेलात तर तेथे अनेक जण क्रिकेट आणि फुटबॉल खेळतांना तुम्हाला हमखास सापडतील. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी दूरदृष्टी राखून पणजीतील मांडवी नदीच्या तीरावरील मिरामारपर्यंतचा लांबवरचा पट्टा विविध कला, क्रीडा आणि संस्कृती क्षेत्रांसाठी राखून ठेवला.
त्यामुळे या क्षेत्रांत रस असणाऱ्या गोमंतकीय आणि इतरांचीही खूप सोय झाली. गोव्याची कला अकादमी येथेच आहे.
विशेष म्हणजे कला, क्रीडा आणि संस्कृती या विषयाला वाहिलेल्या अनेक संस्था आणि स्पोर्टस क्लब्स गोव्यात गावोगावी सापडतात. फुटबॉल हा या स्पोर्टस क्लबचा प्रमुख आणि सर्वाधिक लोकप्रिय खेळ असतो. यापैकी अनेक स्पोर्टस क्लब्सना खूप वर्षांचा वारसा आहे. त्यापैकी काही पोर्तुगीज जमान्यातील आहेत.
काही क्लब्सना स्वतःच्या मालकीचे स्पोर्टस ग्राउंड्स आहेत, इमारती आणि कार्यालये आहेत, ग्राउंडवर फुटबॉल, हॉकी किंवा क्रिकेट खेळले जाते आणि इमारतीत विविध इन-डोअर गेम्स खेळले जातात.
गोव्यात घरी सकाळी वृत्तपत्र आले की पहिल्यांदा अगदी शेवटचे म्हणजे क्रीडा पान वाचणारे माझे अनेक मित्र आहेत. गोमंतकीयांसारखे इतके क्रीडाप्रेम भारताच्या काही मोजक्याच राज्यांत आढळेल.
गोव्याच्या या लोकप्रिय खेळास प्रमुख स्थानिक उद्योग कंपन्यांनी, दानशूर व्यक्तींनी आणि धनवानांनी गेली अनेक वर्षे आर्थिक पाठबळ पुरविले आहे. डेम्पो स्पोर्टस क्लब, साळगावकर स्पोर्ट्स क्लब, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचा चर्चिल ब्रदर्स वगैरे नामांकित स्पोर्टस क्लब्स गोव्यात आहेत.
या क्लब्ससाठी गोव्यातील फुटबॉलपटू खेळात असतात. त्यामुळे या फुटबॉलपटूंना बिदागी मिळतेच, त्याशिवाय या खेळास आर्थिक पाठबळ मिळून नवी पिढीही या खेळाकडे आकर्षित होते.
गोव्यातील वृत्तपत्रांत फुटबॉलची माहिती असणारा स्पोर्टस रिपोर्टर असणे आवश्यक असते, कारण क्रीडापानांवरील प्रमुख बातम्या या फुटबॉलच्या असतात.
तसे पाहू गेल्यास फुटबॉल हा खेळ जगातील सर्वाधिक देशात सर्वाधिक खेळला जाणारा आणि प्रत्यक्ष मैदानावर वा टीव्हीवर पाहिला जाणारा खेळ आहे. त्या तुलनेने क्रिकेट, हॉकी किंवा टेनिस हे खेळ काही ठराविक देशांतच लोकप्रिय आहे. या क्रीडाप्रकारांत प्रावीण्य मिळालेले पेले आणि डायगो मॅराडोना यासारखे अनेक खेळाडू त्यांच्या हयातीतच दंतकथा बनले आहेत.
मात्र भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारतात काही अगदी मोजक्याच राज्यांत फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे आणि त्या राज्यांमध्ये गोव्याचा समावेश होतो. इतर राज्यांमध्ये केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांचा समावेश होतो.
संतोष ट्रॉफी हा या खेळातील देशातील सर्वात मानाचा चषक. तो चषक केवळ या मोजक्या राज्यांत वर्षानुवर्षे फिरत राहिला आहे. त्यांत नव्या राज्यांची भर पडलेली दिसत नाही.
ब्रह्मानंद संकवाळकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्याच्या संघाने संतोष ट्रॉफी पहिल्यांदा १९८३ साली जिंकली. ट्रॉफी जिंकून गोव्यात आल्यानंतर ब्रह्मानंद आणि त्यांच्या संघातील खेळाडूंची पणजीत ट्रकमधून मिरवणूक काढली होती. मला आठवते लोक मोठया संख्येने या फुटबॉलपटूंचे स्वागत करण्यास आले होते. ब्रह्मानंद संकवाळकर यांना नंतर देशातील क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारतात गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांत फुटबॉलची इतकी क्रेझ असूनही आपला देश आंतराष्ट्रीय स्तरावर या खेळात खूप मागे आहे. जगाच्या नकाशावर टिंबाएव्हढे अस्तित्व असणारे छोटेछोटे देश सध्या चालू असलेल्या फुटबॉलच्या जागतिक कप स्पर्धेत हिरीरीने भाग घेत आहेत.
फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच पदार्पण करणारे काही देश तर या स्पर्धेच्या चषकाचे दावेदार असणाऱ्या देशांनाच आव्हान देताना दिसत आहेत.
यापैकी अनेक देशांची नावे प्रेक्षक पहिल्यांदाच ऐकत असतील. गेली अनेक वर्षे भारत मात्र या महत्त्वाच्या स्पर्धेत पात्रताफेरीतच बाद होतो,
युरो फुटबॉल कप आज रात्री 12.30 पासून सुरू
आता पुढील काही दिवस मी फ़ुटबाँल मॅचेस पाहणार आहे.
No comments:
Post a Comment