Saturday, August 14, 2021

 

पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि पातोळ्या खाण्याचा दिवस असं समीकरण आजही माझ्या डोक्यात घट्ट रुतून बसलेलं आहे
पडघम - सांस्कृतिक
कामिल पारखे
‘अक्षरनामा’

  • पातोळ्याचं एक छायाचित्र
  • Fri , 13 August 2021
  • पडघमसांस्कृतिकपातोळ्यागोवामिस्साविधीस्वातंत्र्य दिन

पंधरा ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन.

स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या लहानपणाच्या काही आठवणी आहेत. या दिवशी श्रीरामपूरला आम्ही सकाळीच सातलाच देवळात जायचो आणि तिथं मिस्साविधीत सहभागी व्हायचो. ही खास मिस्सा असते, पवित्र मारियामातेच्या स्वर्गारोहणाच्या सणानिमित्त किंवा ‘द फिस्ट ऑफ द अझम्पशन ऑफ आवर लेडी मिस्सा’ झाल्या झाल्या सगळे लोक तिथल्या जर्मन हॉस्पिटल किंवा संत ल्युकस दवाखान्याच्या प्रवेशद्वारापाशी जमा व्हायचे. तिथं झेंडावंदन व्हायचं, राष्ट्रगीत गायलं जायचं आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा व्हायच्या. 

त्यानंतर शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा व्हायचा आणि घरातली इतर मंडळी चर्चला जाऊन तिथंच स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनात सामील व्हायची.

जन गण मन हे राष्ट्रगीत उपासनासंगीत या ख्रिस्ती उपासना गीत पुस्तकातील गीत आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी ध्वज वंदनाच्या वेळेस चर्च आवारात, हे राष्ट्रगीत गायले जाते.

गोव्यात उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयात असताना स्वातंत्र्य दिनाच्या आणि मारियामातेच्या स्वर्गारोहणाच्या सणाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. गोव्यात मारियामातेच्या सणानिमित्त मिस्सा इंग्रजीतून व्हायची आणि शेवटचं गायन ठरलेलं असायचं.

चर्चमध्ये वर्षभर साजऱ्या होणाऱ्या काही सणांच्या मिस्साचं शेवटचं गीत विशिष्ट असतं. उदाहरणार्थ ख्रिसमसच्या मिडनाईट  मिस्साचा शेवट ‘वी विश यू अ मेरी ख्रिस्मस’ या गाण्यानं होतो, तर सेंट फ्रान्सिस झेव्हियरच्या ३ डिसेंबरच्या सणाची मिस्सा ‘सान फ्रान्सिस शाव्हिएरा’ या कोकणी गीतानं होते. कारण गोवन ख्रिस्ती लोकांचा सेंट फ्रान्सिस झेव्हियर हा सर्वांत महत्त्वाचा संत. भारतातील बहुतेक चर्चेसमध्ये पंधरा ऑगस्टच्या इंग्रजी मिस्साचा शेवट होतो- रवीन्द्रनाथ टागोरांची पुढील प्रसिद्ध कविता गाऊन-

“Where the mind is without fear and the head is held high;

Where knowledge is free;

Where the world has not been broken up into fragments by domestic walls;

Where words come out from the depth of truth;

Into that heaven of freedom, my Father, let my country awake

चर्चमध्ये गिटार किंवा कि-बोर्डच्या संगीताच्या सुरांवर धीरगंभीर स्वरांत गायली जाणारी ही कविता आपल्याला देवाच्या भक्तीकडून देशभक्तीच्या वाटेवर घेऊन जाते.

एकदा येशू ख्रिस्ताला अडचणीत टाकण्यासाठी एकाने येशूला कैसरचे चिन्ह असलेले नाणे दाखवले आणि कर भरण्याविषयी त्याचे मत विचारले. तेव्हा ''जे कैसरचे आहेे ते कैसरला द्या आणि देवाचे आहे ते देवाला द्या '' असे उत्तर दिले.
विशेष म्हणजे याच येशू ख्रिस्ताला पुढे राजद्रोहाच्या आरोपाखाली रोमन पद्धतीने क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले होते. राजद्रोहाचे हे जुलमी कलम तसे फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.

पिंपरी-चिंचवडच्या आताच्या आमच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चमध्येही पंधरा ऑगस्टला ‘अझम्पशन ऑफ आवर लेडी’ या सणानिमित्त होणाऱ्या मिस्सेची सांगता याच देशभक्तीपर कवितेनं होते. देशाच्या इतर कॅथोलिक चर्चेसमध्येसुद्धा असंच होतं.

टागोरांची ही आशयघन कविता गेल्या काही वर्षांत तर अधिकच महत्त्वपूर्ण बनली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील केवळ चर्चेसमध्ये नव्हे, तर विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांत ती गायली जायला हवी. त्याद्वारे भीतीमय  वातावरणाचा आणि विविध प्रकारच्या असमानतेचा कायमचा नाश व्हावा आणि सर्वांना आपलं डोकं उंचावून जगण्याची संधी मिळावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची भावना निर्माण व्हायला हवी.

काही पक्क्वानं विशिष्ट सणांनिमित्त बनवली जातात. त्या सणाचा तो खास मेन्यू असतो. गणेशोत्सव म्हटलं की, उकडीचे मोदक हवेतच. दिवाळीत फराळ, नाताळाच्या सणाला केक आणि रमझान ईदला शिरकुर्मा हवाच. अशा पक्क्वानांच्या जोड्या आपल्या मनात तयार झालेल्या असतात.  

माझी मुलगी आदिती लहान होती, तेव्हा दर होळीच्या सणाला संध्याकाळी आमच्या शेजारच्या शेडगेकाकूंकडून तिच्यासाठी पुरणपोळीचं ताट यायचं. त्यामुळे आजही होळी म्हटलं की, आदितीशी घट्ट नातं जुळलेल्या शेडगे काकूंच्या पुरणपोळीची हमखास आठवण येते.

अशाच एका पक्क्वानामुळे स्वातंत्र्य दिन माझ्या दृष्टीनं स्मरणीय झालेला आहे. हा खाद्यपदार्थ म्हणजे पातोळ्या. म्हणजे नारळाचं खोबरं आणि गूळ घालून हळदीच्या पानांत उकडलेलं पक्क्वान्न. हा पदार्थ उकडीच्या मोदकांसारखाच, मात्र घड्या घालून हळदीच्या पानांत उकडून तयार केला जातो. पंधरा ऑगस्टला मारिया मातेच्या सणानिमित्त गोव्यात कॅथोलिक समाजात पातोळ्या हे मिष्टान्न बनवलं जातं.


१९७०च्या दशकात गोव्यात मिरामारच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पहिल्यांदा पातोळ्या खाल्ल्या. त्या दिवशी सकाळीच गोव्यातील मुलांच्या आई-वडिलांकडून गरमागरम पातोळ्यांचे डबे आमच्या वसतिगृहात यायचे.

मागच्या वर्षी पहिल्यांदाच एकेकाळी गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग असलेल्या दमण शहरात मी गेलो होतो . दमण शेजारचे सिल्व्हासा हेसुद्धा एकेकाळी पोर्तुगिज वसाहतीचे भाग होते. दमण आणि सिल्व्हासा या दोन्ही शहरांत गोव्याप्रमाणेच कॅथोलिक समाजात पातोळ्या बनवल्या जातात.


पालघर जिल्ह्यातल्या वसईतील कॅथोलिक समाजातही पातोळ्या हे एक आवडते पक्क्वान्न आहे.

विशेष महत्त्वाचं म्हणजे गोव्यात हिंदू समाजातसुद्धा पातोळ्या करतात, तोही एका विशिष्ट सणाच्या दिवशी. हा सण म्हणजे ऑगस्टच्या आसपास श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या नागपंचमीला.

या शुक्रवारी झालेल्या नागपंचमीनिमित्त गोव्यात घराघरांत पातोळ्या बनवल्या गेल्या आणि उद्या पंधरा ऑगस्टला मारियामातेच्या स्वर्गारोहणानिमित्त ख्रिस्ती कुटुंबांत पातोळ्यांचा आस्वाद घेतला जाणार आहे.

या पातोळ्या हा गोव्यातील हिंदू आणि किरीस्तांव समाजातील खाद्यसंस्कृतीचा एक आगळावेगळा ठेवा आहे. 

पातोळ्या आणि उकडीचे मोदक करण्यासाठी वापरले जाणारे घटक सारखेच असतात. तांदळाचं पीठ, नारळाचं खोबरं आणि गूळ. त्यामुळे या दोन पदार्थांची चवही साधारणत: सारखीच असते. फरक असतो फक्त आकारात. पातोळ्या करताना तांदळाचं पीठ, खोबरं आणि गूळ यांचं सारण हळदीच्या पानांवर घालून मग भांड्यांत उकडलं जातं. त्यामुळे हळदीच्या पानाचा वास त्याला वेगळी चव आणतो.

मोदक आणि पातोळ्या यांच्यात फरक असतो तो फक्त त्यांच्या आकारात, आतील सारण आणि चव एकच ! काय लाजवाब संगम आहे !

त्यामुळे पंधरा ऑगस्ट म्हणजे देशाचा स्वातंत्र्यदिन आणि मारियेच्या सणानिमित्त पातोळ्या हे पक्क्वान्न खाण्याचा दिवस असे समीकरण तेव्हापासून आजपर्यंत माझ्या डोक्यात घट्ट बसले आहे.

त्याशिवाय नागपंचमी म्हणजे गोव्यात घरांघरांत पातोळ्या असेही दुसरे समीकरण असतेच.

Wednesday, August 4, 2021

 

हेरगिरीपासून सर्वसामान्य व्यक्ती, अगदी तुम्ही-आम्हीही सुटू शकत नाही, हे भयावह सत्य आहे!
पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 04 August 2021
  • पडघममाध्यमनामापेगाससPegasusहेरगिरीspywareपेगाससPegasus spyware

मी दिल्लीहून एअरोफ्लोट (Aeroflot) एअरलाईन्सच्या विमानाने रशियाच्या दिशेने निघालो, तेव्हा जगात शीतयुद्ध जारी होते. ते लवकरच संपणार होते, मात्र कसे आणि कशामुळे हे कुणालाच माहीत नव्हते. ते वर्ष होते १९८६. शीतयुद्धातील दोन पक्ष होते- अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. या दोन महाशक्तींच्या सीआयए आणि केजीबी या हेरयंत्रणांविषयी त्या काळात अनेक पुस्तके लिहिली गेली, चित्रपट निघाले होते. मॉस्को विमानतळावर उतरल्यावर माझी ज्या तऱ्हेने उलटतपासणी सुरू झाली, तेव्हा या दोन्ही पाताळयंत्री गुप्तहेर यंत्रणांविषयी वाचलेले सर्व काही एकदम आठवले.

आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. पासपोर्ट तयार करण्यासाठी लिहिलेल्या अर्जामध्ये माझ्या डोळ्यांच्या ‘बुबुळांचा रंग काळा’ असे लिहिले होते. समोरच्या काचेच्या केबिनमध्ये बसून माझ्या चेहऱ्याचे, केसांचे, कानांचे सूक्ष्म निरीक्षण करणारा आणि पडताळणीसाठी पुन्हा माझ्या पासपोर्टच्या फोटोकडे वळणाऱ्या त्या निळ्या डोळ्यांच्या अधिकाऱ्याकडे पाहून मला केजीबीची आठवण होत होती !

विमान जमिनीवर उतरण्याआधी ‘मॉस्कोचे तापमान उणे बारा आहे’ असे आम्हा प्रवाशांना सांगण्यात आले होते. प्रत्यक्षातही तितक्याच थंड नजरेने माझ्या चेहऱ्याचे निरीक्षण चालू होते. त्या केबिनमध्ये समोरच्या व्यक्तीला पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेले तीन-चार छोटेसे आरसे होते. त्यांत आळीपाळीने पाहून माझ्या चेहरपट्टीचे, केसाचे विविध कोनांतून तो अधिकारी निरीक्षण करत होता. त्या पाच-दहा मिनिटे चाललेल्या तपासणीदरम्यान त्या अधिकाऱ्याने मला साधा एकही प्रश्न विचारला नव्हता! पासपोर्ट माझ्याकडे परत देण्यात आला, तेव्हा हुश्श्य करत मी पुढे निघालो.

अशा अनुभवामुळे मॉस्कोतल्या त्या वास्तव्यात ‘केजीबी’चे लोक सगळीकडेच पेरून ठेवले आहेत की, काय अशी मला शंका यायची. एअरोफ्लोट विमानातल्या त्या हवाईसुंदरी प्रवाशांना ‘वेलकम’ म्हणताना साधे स्मितसुद्धा करत नव्हत्या. मॉस्कोत हॉटेलवर उतरलो होतो, तेव्हा लिफ्ट आणि दरवाजापाशी एका स्टुलावर काळ्या कपड्यांतली एक वयस्कर बाई बसून असायची. तिच्याविषयीही मला हाच संशय होता, मात्र नंतर मला ती ओळखीचं स्मित द्यायला लागली, तेव्हा हा संशय मी बाजूला ठेवला.

मी त्या वेळी भारतीय पत्रकारांच्या तुकडीसह बल्गेरियात पत्रकारितेचा अभ्यासक्रम करण्याआधी रशियात पोहोचलो होतो. मॉस्कोत प्रसिद्ध रेड स्केअरला भेट दिली, लेनिन म्युझियमला भेट दिली, तिथे कॉम्रेड ब्लादिमीर लेनिनचे शरीर थ्रीपीस सूटमध्ये सजवून ठेवलेले होते. क्रेमलिनच्या त्या भव्य इमारती पाहताना आमच्यातल्या एका पत्रकाराने रशियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि सोव्हिएत रशियाचे सर्वोच्च नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे अधिकृत निवासस्थान कुठे आहे असे विचारले, तेव्हा आमच्या अनुवादिकेने उत्तर देण्याचे टाळले. कुणी तरी आपल्यावर नजर ठेवून आहे, अशी भावना अशा वेळी प्रबळ व्हायची.  

दिल्लीत राष्ट्रपती भवन अगदी रस्त्यावरून सगळ्यांना दिसते. आत प्रवेश नसला तरी ही वास्तू मुद्दाम लांबून पाहिली, दाखवली जाते. काही वर्षांपूर्वी पॅरिसला असताना ‘आर्क ऑफ ट्रायम्प’ पाहून मी परतत होतो, तेव्हा जवळच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आहे, असे सांगितले गेले. त्यात शासकीय गुपिताचा भंग होण्याचा प्रश्नच नव्हता. कम्युनिस्टांच्या राजवटीत मात्र राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून लोकांपासून लपवण्यासारख्या कितीतरी गोष्टी होत्या.

पुढे बल्गेरियातल्या तीन महिन्यांच्या वास्तव्यात हाच अनुभव आला. पत्रकारितेच्या आमच्या लेक्चरच्या भाषांतराशिवाय बाकीच्या काही घडामोडींविषयी ती अनुवादक मंडळी एक चकार शब्द अधिक बोलत नसायची. आपल्यावर कुणीतरी, एखादा ‘बिग ब्रदर’ पाळत ठेवत आहे, याचे त्या लोकांना नेहमी भान असायचे. पोपटपंची म्हणजे काय असते, हे आम्ही प्रत्यक्ष त्या वेळी तेथे अनुभवले.

अमेरिकेला प्रतिकूल असलेल्या जगातील अनेक राजकीय राजवटींविरुद्ध ‘सीआयए’ने केलेल्या कारवायांविषयी अनेकदा लिहिले गेले आहे. जगातील अनेक राष्ट्राध्यक्षांच्या हत्या, काही देशांतील राजकीय अशांत वातावरण, यादवी युद्धे यामागे ‘सीआयए’ होती, असे म्हटले गेले आहे.

पंतप्रधान इंदिरा गांधी या आपल्या भाषणांत अमुक अमुक गोष्टीमागे ‘परकीय हात’ आहे, असे नेहमी म्हणायच्या. त्याबद्दल खूपदा विनोद केले जायचे. हा ‘फॉरेन हँड’ अर्थातच केजीबी नसणार आणि सीआयए असणार याबद्दल सर्वांनाच खात्री होती. शीतयुद्धाच्या काळात भारत अलिप्त राष्ट्रांचा नेता असला तरी रशियाच्या बाजूने झुकलेला होता, हे उघड गुपित होते. १९७१ला पाकिस्तानविरोधी युद्धात आणि बांगलादेश निर्मितीच्या वेळी रशियाच्या मदतीने इंदिराजींनी अमेरिकेची कशी नांग टेचली होती, हे सर्व जगाने पाहिले होते. रशियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हणजेच तेथील सत्ताधारी नेते निकिता कृशेव्ह, लिओनिड ब्रेझनेव्ह भारताच्या भेटीवर यायचे, तेव्हा मला आठवते की, त्या दिवसांतल्या वृत्तपत्रांतील त्यांचे इंदिरा गांधी यांच्याबरोबरचे फोटो आणि बातम्या भारत रशियाच्या किती जवळ आहे, हे दर्शवायच्या.

रशिया आणि बल्गेरियाला जाण्यापूर्वी व्हिसा आणि इतर कामानिमित्त दिल्लीतल्या चाणक्यपुरी या परिसराला अनेकदा भेटी दिल्या. या परिसरात विविध देशांतील वकिलाती, राजदूतांची कार्यालये आहेत, म्हणजे त्या वेळी होत्या. या वकिलातींचे वैशिष्टय म्हणजे तिथे काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींकडे संशयाने पाहिले जाऊ शकते, अगदी तिथे झाडलोट करणाऱ्या व्यक्तीकडेही. या वकिलातींत राजदूत हे अधिकृतरित्या आपापल्या देशांचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात. त्याशिवाय या कार्यालयांत सचिव, उपसचिव, क्लार्क वगैरे अनेक पदांवर त्या देशांतील माणसे काम करत असतात. या सर्वांकडे साहजिकच गुप्तहेर म्हणूनच अनेकदा पाहिले जाते. दूतावासातील लोकांच्या अधिकृत आणि अनधिकृत कामासंबंधी दोन्ही देशांना त्याची पुरेपूर कल्पना असते. मात्र दोन्हीही देश त्याकडे कानाडोळा करत असतात आणि त्याच वेळी आपली गुपिते बाहेर जाणार नाहीत, याविषयी पुरेपूर काळजी घेत असतात.  

कुठल्याही राजदूताला ‘डिप्लोमॅटिक इम्युनिटी’ असते. शत्रूकडून कितीही वाईट संदेश घेऊन आला तरी शत्रूच्या दूताला शिक्षा करण्याचे अगदी पुरातन काळापासून शिष्टसंमत नाही. पांडवांचा दूत म्हणून शिष्टाई करण्यासाठी कृष्ण हस्तिनापूरला कौरवांच्या दरबारात आला, तेव्हा त्याला जेरबंद करण्याचा बालिशपणा दुर्याधनाने केला होता. राजदूतावासातील कुठलीही व्यक्ती हेरगिरी करताना आढळली तर अटक वा शिक्षा न करता तिची देशातून हकालपट्टी केली जाते. दोन देशांत कुरबुरी वाढत गेल्या की, पहिली संक्रांत दूतावासातील लोकांवर कोसळते आणि रागाचा वचपा काढण्यासाठी मग दोन्ही राष्ट्रे दूतावासातील काही लोकांची हकालपट्टी करतात. अर्थात ही नेहमीची लुटुपुटीची लढाई असते, तणाव निवळल्यावर राजनैतिक आणि राजदूत संबंध पुन्हा प्रस्थापित होतात.   

त्या काळात दरदिवशी पाठवले जाणारे टपाल हेच हेरगिरीचे मुख्य साधन असायचे. प्रत्येक दूतावासातून, वकिलातींतून दरदिवशी त्यांच्या देशाला विविध कागदपत्रे आणि काही वस्तू पाठवल्या जायच्या. विमानांतून व इतर मार्गे जाणाऱ्या या सिलबंद पाकिटांना आणि वस्तूंना ‘डिप्लोमॅटिक इम्युनिटी’ असते. त्याची विमानतळांवर वा इतर चेकपोस्टवर उघडून तपासणी होत नसते. बल्गेरियातील त्या दीर्घ वास्तव्यात मला त्याचा अनुभव आला.

भारतात काही पत्रे पाठवायची असल्यास आम्ही ती पाकिटे सिलबंद करून, त्यावर तिकिटे लावून आम्ही आमच्या यजमानांकडे सोपवायचो. मग ती बल्गेरियातून भारताकडे जाणाऱ्या पार्सलमध्ये टाकली जात आणि दिल्लीला बल्गेरियन वकिलातीतील लोक ती पत्रे जवळच्या पोस्ट ऑफिसांत टाकत असत. यामुळे सोफियातील आमची पत्रे दिल्लीत एक-दोन दिवसांत पोहोचत आणि तिथून गोव्यात व इतरत्र ठिकाणी तीन-चार दिवसांत. वकिलातीकडून आलेली पार्सलांची तपासणी होत नाही, हे त्या वेळी मला समजले. 

आणि ही अगदी अलीकडची गोष्ट, तीन वर्षांपूर्वीची. ‘सकाळ टाइम्स'मध्ये सहाय्य्क संपादक-कम - न्यूज ब्युरो चीफ म्हणून काम करताना ‘थायलंडला प्रेस टूरवर जायला आपल्याला आवडले का?’ अशी एक ई-मेल मला आली अन मी उडालोच. ‘आवडेल का?’ काय प्रश्न होता! तर लवकरच थायलंडच्या मुंबई येथील वकिलातीने आयोजित केलेल्या या दौऱ्यासाठी माझी निवड झाली. थायलंड सरकारचा पाहुणा या नात्याने थायलंड वकिलातीतर्फे मला व्हिसा मिळाला. त्याशिवाय थायलंड वकिलातीच्या लेटरहेड आणि सहीशिक्यासह एक पत्रही देण्यात आले.

या पत्रामुळे बँकॉक विमानतळावर उतरताच तेथे कुठलीही तपासणी न होता, कुठल्याही रांगेत उभे न राहता एक स्वतंत्र प्रवेशदारातून मला तत्काळ बाहेर सोडण्यात आले होते आणि तेथे थायलंड सरकारचे प्रतिनिधी माझे स्वागत करण्यासाठी उभे होते. ‘डिप्लोमॅटिक इम्युनिटी’ आणि त्याबरोबर येणारे विशेष हक्क म्हणजे काय, हे मी तेव्हा प्रत्यक्ष अनुभवले.     

सीआयए आणि केजीबी यांच्या हेरगिरीविषयी आता फारशी चर्चा होत नाही. त्यांच्या गुप्त कारवाया अर्थातच चालूच असतील..

पुलित्झर पारितोषिक प्राप्त पत्रकार सेमुर हर्ष यांनी १९८३ साली प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे भारताच्या मंत्रीमंडळात मंत्री असताना ‘सीआयए एजंट’ होते, असा आरोप करून मोठा गदारोळ उडवून दिला होता. मोरारजी देसाई यांनी हर्ष यांच्या विरोधात अमेरिकेतील न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र काही तांत्रिक बाबींमुळे तो फेटाळला गेला होता.

आपला आत्मसन्मान जपण्यासाठी भारतीय राजकारण्यांनी परदेशांतील न्यायालयांत लेखक-पत्रकारांविरुद्ध असे दावे करण्याच्या घटना तशा अतिशय दुर्मीळ आहेत. त्याआधी सत्तर वर्षांपूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनीही लंडनच्या न्यायालयात अशाच प्रकारे एका पत्रकाराविरुद्ध दावा दाखल केला होता. 

व्हॅलेंटाईन चिरोल या पत्रकाराने आपल्या एका पुस्तकात लोकमान्य टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ (Father of Indian Unrest) असे म्हटले होते. या बिरुदाविरुद्ध टिळकांनी दीर्घकालीन न्यायालयीन दावा चालवला. त्यासाठी वसईचे बॅरिस्टर जोसेफ ‘काका’ बॅप्टिस्टा, विदर्भातले  दादासाहेब खापर्डे यांच्यासह त्यांनी विलायतवारीही केली. या नेत्यांबरोबरचे टिळकांचे लंडनमधल्या कुठल्याशा राजवाड्यासमोरचे सुटाबुटातले एक छायाचित्र पाहण्यासारखे आहे.

मात्र टिळक हा दावा हरले. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ हे बिरुद भविष्यात आपल्यामागे अभिमानाने लावले जाईल, याची टिळकांनी त्या वेळी कल्पनाही केली नसेल.   

लंडनला जाण्यासाठी शास्त्रांत निषिद्ध ठरवलेले समुद्रगमन केल्यामुळे टिळकांनी भारतात आल्यावर प्रायश्चितसुद्धा घेतले. शास्त्रनियम तोडल्याबद्दल त्यांनी घेतलेले हे दुसरे प्रायश्चित. पहिले प्रायश्चित पुण्यातल्या पंचहौद चर्चमध्ये चहा प्यायल्याबद्दल घेतले होते.

मोरारजी देसाईसुद्धा ‘सीआयए एजंट’ संदर्भांतील न्यायालयीन दावा १९८९मध्ये हरले आणि त्याच वेळी भारतातील दुसऱ्या एका राजकीय नेत्याचे नाव यासंदर्भात गोवले गेले. हे राजकीय नेते होते भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.

मुंबईतून नव्यानेच प्रकाशित होणाऱ्या आणि विनोद मेहता संपादक असलेल्या ‘द इंडिपेंडेंट’ या इंग्रजी दैनिकाने ‘यशवंतराव चव्हाण हे सीआयएचे हस्तक होते काय?’, अशी प्रश्नार्थक शीर्षक असलेली बातमी पान एकवर आठ कलमांत छापून मोठा बॉम्ब टाकला होता. यशवंतराव चव्हाण यांचे या बातमीआधीच निधन झाले होते.

अशी स्फोटक पण तथ्यहीन बातमी देण्याची पुरेपूर किंमत विनोद मेहता यांना मोजावी लागली. त्यांना संपादकपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ‘इंडिपेंडेंट’ हे दैनिकही लगेच बंद पडले. 

मानवी इतिहासात हेरगिरी ही तशी अगदी प्राचीन काळापासून प्रचलित आहे. तंत्रज्ञानाच्या बळावर आता पाळत ठेवण्याच्या पद्धतीत मोठी क्रांती घडवून आणली आहे. तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीने कुणावर पाळत राखण्याच्या, पाठलाग करण्याचा, संभाषण प्रत्यक्ष चोरून ऐकण्याच्या, महत्त्वाच्या दस्तऐवजांची नक्कल करण्याच्या जुन्या पारंपरिक हेरगिरीच्या पद्धती पूर्णतः कालबाह्य झाल्या आहेत.

विशेष म्हणजे पूर्वी केवळ महत्त्वाच्या राजकीय नेत्यांवर, सरकारी उच्चपदस्थांवर पाळत ठेवली जायची. आज स्थिती बदलली आहे. अलीकडेच उघडकीस आलेल्या नव्या पेगॅसास प्रकरणात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींशी दुरान्वयाने संबंधित असलेली व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय यांच्यावरसुद्धा पाळत ठेवली जात होती, असे दिसून आले आहे. त्यामुळे हेरगिरीपासून सर्वसामान्य व्यक्ती, अगदी तुम्ही-आम्हीही सुटू शकत नाही, हे भयावह सत्य आता समोर आले आहे. 

Tuesday, August 3, 2021

 

जगभर कुतूहल असणारी तिसरी व्यक्ती म्हणजे रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख पोप!
पडघम - विदेशनामा
कामिल पारखे
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख फ्रान्सिस पोप आणि इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ (दुसऱ्या)
  • Wed , 21 July 2021
  • पडघमविदेशनामाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षPresident of the United Statesजो बायडेनJoe Bidenफ्रान्सिस पोपPope FrancisपोपPopeराणी एलिझाबेथ (दुसऱ्या)Queen Elizabeth II

गेली काही दशके तीन पदांवरील व्यक्तींविषयीं जगातील अनेक लोकांमध्ये अपार कुतूहल असते. या तीन पदांवरील व्यक्ती वर्षभर या ना त्या कारणाने, निमित्ताने जगभरातील प्रसारमाध्यमांत झळकत असतात. त्या म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप. अमेरिका ‘सुपरपॉवर’ असल्याने त्या देशाचे प्रमुख नेहमीच जगातल्या प्रसारमाध्यमांत झळकत राहणार, हे साहजिकच आहे. इंग्लंडच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नसायचा तेव्हापासूनच या साम्राज्याची वारसदार असलेली आणि आता वयाच्या शंभरीकडे वाटचाल करणारी राणी एलिझाबेथ दुसरी ही सत्तर वर्षांपासून आपला मुकुट कायम राखून आहे. या दीर्घ कालखंडात शुभ्र हातमोजे घालून त्यांनी जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांशी, विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींशी हस्तांदोलन करण्याचा जो विक्रम केला आहे, तो इतर कुणीही राष्ट्रप्रमुख भविष्यात कधीही मोडू शकेल असे दिसत नाही.

पोप यांच्यासंबंधीच्याही बातम्या जगातील अनेक प्रमुख नियतकालिकांत आणि बीबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये आठवड्यातून निदान एकदा तरी झळकत असतात. त्याशिवाय  नाताळ, गुड फ्रायडे, ईस्टर व इतर सणानिमित्त आणि त्यांच्या परदेशदौऱ्यानिमित्त पोप यांच्या कार्यक्रमांना आणि प्रवचनांना संपूर्ण जगभर व प्रादेशिक प्रसारमाध्यमांतही हमखास प्रसिद्धी मिळते. यातूनही पोपपदाचे जागतिक महत्त्व अधोरेखित होत असते.   

व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख असलेले पोप यांच्याकडे खरे तर स्वतःचे सैन्य वा खास पोलीस यंत्रणाही नाही, तरी त्यांना संपूर्ण जगभर आदर आणि मान आहे. याचे कारण जगात सर्वाधिक संख्येने असलेल्या रोमन कॅथोलिक पंथाचे ते आचार्य आहेत. त्यामुळेच २७ वर्षे पोपपदावर असलेल्या पोप जॉन पॉल दुसरे यांना राष्ट्रप्रमुख या नात्याने जगातील अनेक राष्ट्रांना भेटी देण्याचा, सर्वाधिक राष्ट्रप्रमुखांना त्यांच्या देशांत किंवा व्हॅटिकन सिटीमध्ये भेटण्याचा मान मिळाला. सध्याचे पोप फ्रान्सिस पोप जॉन पॉल दुसरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून जुने अनेक संकेत आणि पुरातन भिंती मोडीत काढत विविध राष्ट्रांत जाऊन परधर्मियांच्या नेत्यांना भेटून सुसंवाद साधत आहेत.

पोप हे ख्रिस्तमंडळाचे म्हणजे कॅथोलिक चर्चचे प्रमुख, एका अर्थाने येशू ख्रिस्ताचे या भूतलावरील प्रतिनिधी. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांमध्ये एक असलेला सेंट पिटर किंवा संत पेत्र हा पहिला पोप. ख्रिस्ती धर्माच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत २६० पोप होऊन गेले आहेत. रोममध्ये मी असताना सेंट पिटर्स बॅसिलिकामध्ये या सर्व पोपमहाशयांच्या नावांची, कालखंडांची यादीच संगमरवरी दगडावर कोरलेली पाहिली, तेव्हा पटकन त्या यादीचं छायाचित्र काढलं.  

‘बायबल’मध्ये येशू ख्रिस्ताने पहिला पोप असलेल्या सेंट पिटरला स्वर्गाच्या चाव्या दिल्या, असा उल्लेख आहे. सेंट पिटरच्या कुठल्याही पुतळ्यात स्वर्गाच्या चाव्या असतातच. सेट पिटरचा पुतळा ओळखण्याची ती एक खूणच. व्हॅटिकन सिटीतल्या भव्य सेंट पिटर्स स्वेअरमध्ये सेंट पिटर आणि सेंट पॉल यांचे दोन भव्य पुतळे आहेत. त्यात सेंट पिटरच्या हातात स्वर्गाच्या या चाव्या आहेत, तर ख्रिस्ती धर्माला तत्त्वज्ञानाचा आणि धर्मसिद्धान्ताचा पाया उभारणाऱ्या सेंट पॉलच्या हातात ‘बायबल’ आहे.      



पॅलेस्टाईन राष्ट्राची स्थापना होण्याआधीच ‘पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ (पीएलओ)चे नेते यासर अराफत यांना या अस्तित्व नसलेल्या राष्ट्राचे प्रमुख म्हणून भारताने आणि इतर काही देशांनी मान्यता दिली होती. त्यांना राष्ट्रप्रमुख म्हणून शिष्टाचारानुसार वागवले जायचे. तीच गोष्ट तिबेटी बौद्धांचे नेते असलेल्या दलाई लामांची. राष्ट्रप्रमुख म्हणून पोप यांचे स्थान मात्र यासर अराफत किंवा दलाई लामा यांच्याहून आगळेवेगळे असे आहे. 

खरे पाहिले तर व्हॅटिकन सिटी हे सार्वभौम राष्ट्र म्हणजे एक गंमतीची बाब आहे. तिथे सातशेआठशे नागरिकही असतात, ते म्हणजे तिथले राहणारे कार्डिनल आणि पोपमहाशयांच्या कार्यालयातील अधिकारीवर्ग. या राष्ट्राची चतुःसीमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याएवढीही नाही. तरीही मध्ययुगीन काळापासूनचा युरोपच्या इतिहासाचा परिपाक आणि पोपमहाशयांचे जागतिक स्तरावरचे धार्मिक, राजकीय आणि नैतिक पातळीवरचे स्थान लक्षात घेऊन बहुसंख्य राष्ट्रांनी आणि संयुक्त राष्ट्र दलानेसुद्धा त्यांना राष्ट्रप्रमुखाचा दर्जा दिला आहे. याच नात्याने ते संयुक्त राष्ट्र दलाच्या सभेला संबोधित करत असतात. भारतानेही व्हॅटिकन सिटीला सार्वभौम राष्ट्र म्हणून आणि पोप यांना राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता दिली आहे.

लौकिकार्थाने भौगोलिक सीमा, लष्कर, नागरिकत्व, चलनी नोटा वा पासपोर्ट नसलेल्या राष्ट्राचे प्रमुख असलेले पोप हे सर्वार्थाने आगळेवेगळे राष्ट्रप्रमुख ठरतात. या राष्ट्राची संकल्पनाच केवळ प्रतीकात्मक असल्याने कुठल्याही राष्ट्रात जन्मलेली आणि कुठल्याही राष्ट्राचे नागरीकत्व असलेली व्यक्ती अगदी एका क्षणात म्हणजे पोपपदी निवड झाल्याक्षणी या व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख बनते. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भारतात २००४ साली सत्ता मिळवल्यावर कळीचा मुद्दा ठरलेला परकीय नागरिकत्वाचा विषय येथे अगदीच गैरलागू ठरतो. पोपपदावर आलेली व्यक्ती वैश्विक असते, त्यांचे अनुयायी संपूर्ण जगभर अगदी धर्मावर आणि कॅथोलिक पंथावर अधिकृत बंदी असलेल्या चीनसारख्या देशांतही असतात.   

चर्चच्या कॅनन लॉनुसार  जगभरातील बिशप वयाच्या ७५व्या वर्षी आणि कार्डिनल वयाच्या ८०व्या वर्षी निवृत्त होतात. नवीन पोपची निवड करण्याच्या प्रक्रियेत केवळ ८० वर्षे वयाखालील कार्डिनल सहभागी होतात आणि त्यांच्यापैकी कुणाचीही पोप म्हणून निवड होऊ शकते. अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लिओ २००८ साली पोपपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी एक ब्रिफकेस घेऊन, विमानाचे परतीचे तिकिट घेऊन व्हॅटिकनला आले आणि त्यांचीच पोपपदी निवड झाल्याने आणि पोप फ्रान्सिस असे नाव घेतलेल्या त्यांनी गेली तेरा वर्षे आजपर्यंत मायदेशी पाऊलही ठेवलेले नाही.    

पोप जॉन पॉल दुसरे यांच्या आधीचे पोप म्हणजे जॉन पॉल पहिले यांची कारकिर्द केवळ ३३ दिवसांची होती. पोप पॉल सहावे यांचे निधन झाल्यानंतर २६ ऑगस्ट १९७८ रोजी जॉन पॉल पहिले पोपपदावर आले. त्यानंतर एक महिन्याभरातच झालेल्या त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण जगाला बसलेला धक्का मला आजही आठवतो. चर्चच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक कमी काळ जॉन पॉल पहिले पोपपदावर होते. 

सेंट पिटरने आणि इतर अनेक ख्रिस्ती लोकांनी रोममध्ये हौतात्म्य स्वीकारल्यानंतर अचानक बदल झाला आणि रोमन सम्राटानेच ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे रोमन साम्राज्याचा हा अधिकृत धर्म बनला. जेरुसलेम व इस्राएल या येशू ख्रिस्ताच्या कर्मभूमीपेक्षा रोमला अधिक महत्त्व आले. रोम शहर ख्रिस्ती धर्माचे प्रमुख पीठ आणि पवित्र भूमी बनले.

रोमविषयी ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन ए सिंगल डे’ अशी एक म्हण आहे. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे १६०४ साली मराठीतील महाकाव्य ‘क्रिस्तपुराण’ गोव्यात रचणाऱ्या ब्रिटिश धर्मगुरू थॉमस स्टिफन्स यांनी या म्हणीचे ‘एके दिवशी रोमनगरी I उभविली नाही I’ असे मराठमोळे भाषांतर केले आहे!

गेले काही शतके ख्रिस्ती धर्माचे प्रमुख आचार्य म्हणून आणि विशेषतः मध्ययुगीन काळात पोप यांच्या हातात अमर्याद सत्ता होती. युरोपातील अनेक देशांतील राजसत्ता त्यांच्या ओजळीने पाणी पित होती, हे  इतिहासातील अनेक घटनांवरून दिसते. मध्ययुगीन काळात तर पोप अलेक्झांडर सहावा याने तर वसाहतीसाठी नव्या जगाची पोर्तुगाल आणि स्पेन या दर्यावर्दी राष्ट्रांमध्ये चक्क वाटणीच करून दिली होती! त्या काळातला चर्चचा आणि चर्चच्या पोपसारख्या धर्माधिकाऱ्यांचाही इतिहास फारसा अभिमानास्पद नाही. 

आपल्या घटस्फोटास कॅथोलिक चर्च मान्यता देत नाही, असे पाहिल्यावर इंग्लंडच्या राजा आठवा हेन्रीने पोप आणि कॅथोलिक चर्चपासूनच घटस्फोट घेत सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्वतःचे अँग्लिकन चर्च स्थापन केले आणि इंग्लंडच्या राजास (किंवा राणीस) त्या चर्चचे प्रमुख म्हणजे एका अर्थाने पोपच बनवले. ही व्यवस्था आजतागायत चालू आहे. सर्व जगातील लोकशाहीप्रधान व्यवस्थेचे मूळ असलेल्या इंग्लंड हा देश धर्माधिष्ठित असून इंग्लंडची राणी (अथवा राजा) चर्च ऑफ इंग्लंडची प्रमुख आहे, हे अनेकांना ठाऊकही नसेल.

त्यानंतर जर्मनीत धर्मगुरू मार्टिन ल्युथर किंगने धार्मिक बंड केल्यानंतर विविध प्रोटेस्टंट पंथ निर्माण झाले आणि पोपच्या अमर्याद सत्तेला अंकुश बसला. रेनॉयस्सन्सच्या काळात चर्च आणि धर्मसत्ता यांची फारकत होत गेली आणि पोप हे पद केवळ सन्माननीय पद राहिले, मात्र याच काळात नैतिक प्रश्नांवर म्हणजे अबॉर्शन, समलिंगी संबंध आणि लग्न, फाशीची सजा, युद्ध, मानवी हक्क, पर्यावरण वगैरे प्रश्नांवर देशसीमांच्या पलीकडे भूमिका घेणारी नैतिक सत्ता यादृष्टीने चर्च आणि पोप यांच्याकडे पहिले गेले आहे. युरोपात आणि इतर पाश्चात्य देशांत आजही कागदोपत्री बहुसंख्य ख्रिस्ती लोकसंख्या असल्याने पोप यांचे याबाबतीतील स्थान तसे अबाधित राहिले आहे. 

जगात विमानसेवा सुरू झाल्यानंतर जगभरातील कॅथोलिक पंथियांचे आचार्य असलेल्या पोप यांची भ्रमंती सुरू झाली. पोप पॉल सहावे यांनी १९६४ साली रोमहून इस्राएलकडे विमानाने प्रयाण केले, तेव्हा त्यांनी चर्चच्या इतिहासातील अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. विमानाने प्रवास करणारे ते पहिले पोप, त्याशिवाय त्यापूर्वी दीडशे वर्षे आधी कुठल्याही पोपने इटलीबाहेर पाऊल ठेवले नव्हते. इस्राएल ही येशू ख्रिस्ताची जन्मभूमी, ख्रिस्ती धर्माचे तीर्थक्षेत्र, पवित्र भूमी. मात्र पोप पॉल सहावे यांच्याआधी कुठल्याही पोपने या पवित्र भूमीवर प्रवेश केला नव्हता.

पोप पॉल हे विमानातून इस्राएलच्या भूमीवर उतरले, तेव्हा या पवित्र भूमीचे चुंबन केले, ख्रिस्ताच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या या धरतीला त्यांनी वंदन केले. (पोप पॉल सहावे भारताच्या भेटीवर १९६४ साली आले, तेव्हासुद्धा मुंबई विमानतळावर जमिनीचे चुंबन घेऊन त्यांनी आपला दौरा सुरू केला होता.) पोप जॉन पॉल दुसरे यांच्याप्रमाणेच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी म्हणजे पोप बेनेडिक्ट आणि आताचे पोप फ्रान्सिस यांनीही होली लँड इस्त्रायलला भेट दिली आहे.

ज्यु आणि ख्रिस्ती धर्मांसाठी तसेच इस्लाम धर्मांसाठी येरुशलेम आणि इस्राएलचे किती महत्त्वाचे स्थान आहे ते सांगायलाच नको. ज्यु लोकांसाठी इस्राएल म्हणजे देवाने वचन दिलेली भूमी -  किंवा ‘प्रॉमिस्ड लँड’. येशू ख्रिस्त या प्रदेशात जन्मला आणि फिरला. ज्यू आणि ख्रिस्ती धर्मियांचा देव (खरे पाहता मुस्लिमांचाही) एकच आहे असेही मानले जाते. या तिन्ही धर्मियांसाठी प्रेषित असलेल्या अब्राहाम याचे वर्णन या तिन्ही श्रद्धावंतांचा  ‘फादर इन फेथ’  म्हणजे श्रद्धेमध्ये  पिता असे केले जाते.

रोम हे ख्रिस्ती धर्मियांची नवी पवित्र भूमी बनलेली असली तरी येरुशलेम आणि इस्राएलचे महत्त्व अबाधित राहतेच. हे महत्त्व अधोरेखित करणारा हा गंमतीदार किस्सा  आहे.  

ज्यु धर्मियांचे येरुशलेम येथील प्रमुख धर्मगुरु ‘रब्बी’ एकदा रोमला पोपला भेटले. या भेटीदरम्यान पोप यांनी रब्बी यांना ‘देवाशी टेलिफोनवर बोलायचे आहे का?’ असे विचारले. त्यानंतर पोप यांच्या लॅण्डलाइन फोनवरून रब्बी काही काळ देवाशी बोलले. नंतर त्यांनी पोप यांना झालेल्या कॉलच्या फीची रक्कम विचारली आणि चारशे डॉलर्स ही रक्कमही त्यांनी पोप यांना दिली. पोप स्वतः इस्त्रायलला येरुशलेम येथे आल्यानंतर त्यांनाही तेथून रब्बी यांच्या लॅण्डलाइनवरून देवाशी संभाषण करण्याची संधी मिळाली. ‘कॉलचे चार्जेस किती?’ असे त्यांनी विचारल्यावर रब्बी म्हणाले, ‘हा लोकल कॉल होता, नो चार्जेस!’  

पोलिश पोप जॉन पॉल दुसरेयांच्यामुळे पोलंडमधील हुकूमशाही कम्युनिस्ट राजवट उलथवून कामगार नेते लेक वालेसा यांची लोकनियुक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होण्यात  मदत झाली.  इतकेच नव्हे तर पोप जॉन पॉल यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे पूर्व युरोपातील सर्व राष्ट्रांत कम्युनिस्ट हुकूमशाहीचा डोलारा कोसळून लोकशाही व्यवस्था प्रस्थापित झाली, हे आज इतिहासकारांनी मान्य केले आहे.

पोप जॉन पॉल दुसरे हे पोपपदावर आल्यानंतर काही वर्षांतच १९८१ साली सेंट पिटर्स चौकात पोपमोबाइलमधून फिरत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि ते खाली कोसळले. पोटात गोळ्या लागूनही पोप यातून आश्चर्यकारिकरीत्या बचावले आणि त्यांनी २७ वर्षे या सर्वोच्च पदावर राहण्याचा विक्रम केला.

पोप जॉन पॉल यांच्याप्रमाणेच याच काळात म्हणजे १९८१ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेनाल्ड रीगन यांच्यावर गोळीबार होऊन त्यांच्या छातीत गोळ्या घुसल्या होत्या. यशस्वीरीत्या उपचार होऊन रीगन बचावले. पोप जॉन पॉल दुसरे आणि राष्ट्राध्यक्ष रीगन यांच्याप्रमाणे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही १९८४ साली असाच भीषण गोळीबार झाला, मात्र त्यांच्या शरीररक्षकाने त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण केल्याने इंदिराजी यातून बचावल्या नाहीत.

पोलंडचे नागरिक असलेल्या पोप जॉन पॉल दुसरे यांच्या रूपाने इटलीबाहेरचे कार्डिनल पोपपदावर आले आणि याबाबत इटलीची तीनशे वर्षांची मक्तेदारी मोडली, त्यांनतर जर्मनीचे कार्डिनल पोप बेनेडिक्ट बनले आणि आताचे पोप फ्रान्सिस तर युरोप खंडाबाहेरचे पहिलेच पोप असून थेट लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनाचे  आहेत. 

राजीव गांधी पंतप्रधान असताना पोप जॉन पॉल दुसरे हे १९८६ साली भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांच्या मिरामार बीचजवळच्या कंपाल ग्राऊंडवर झालेल्या मिस्साविधीला ‘नवहिंद टाईम्स’चा बातमीदार म्हणून मी हजर होतो. शाही विधी काय असतो, याचा तो समारंभ उत्तम नमुना होता. पोप यांच्यांसाठी खास मंडप उंचावर उभारलेला होता. त्यांच्यापासून कितीतरी दूर अंतरावर मात्र उंचावरील दुसऱ्या मंडपात पत्रकार कक्ष होता. भारतासह आशिया खंडातील आणि जगभरातील  करड्या पोशाखातील, लाल हॅटमधील अनेक कार्डिनल, शंभराहूनही अधिक  बिशप आणि हजारभर धर्मगुरू पुढच्या रांगेत आणि त्यामागे भाविकांची अलोट गर्दी, असे ते दृश्य आजही माझ्या नजरेसमोर आहे.   

त्या काळात या ‘पोपमोबाइल’विषयी बरीच चर्चा झाली. या दहा दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी दोन खास डिझाईन केलेल्या ‘पोपमोबाईल’ होत्या. पोप यांच्या आगमनाआधी प्रत्येक समारंभाच्या ठिकाणी दोनपैकी एक बुलेटप्रुफ पोपमोबाईल विमानाने आधीच आणून ठेवली जायची. भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या त्या प्रसिद्ध रथयात्रेआधीचा हा प्रसंग आहे. त्यामुळे या खास डिझाईन केलेल्या पोपमोबाईलचे विशेष अप्रूप होते. आजही जगभर पोप अशाच पद्धतीच्या पोपमोबाईलमधून  भाविकांना दर्शन देतात,          

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली पोप जॉन पॉल दुसऱ्यांदा भारत भेटीवर आले. पोप यांना वाजपेयी भेटले होते. आधीच्या भेटीत पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी पोप जॉन पॉल यांची भेट घेतली होती.

पोप यांना संबोधित करताना आदराने `होली फादर' असे म्हटले जाते. मराठीत बिशपांना महागुरुस्वामी म्हटले जाते तसे पोप यांना परमगुरुस्वामी असे म्हटले जाते. हरेगावला सेंट तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगमध्ये असताना आणि श्रीरामपूरच्या देवळात मिस्सामध्ये वर्षांतून काही वेळेस खालील गायन गायले जायचे....

परमगुरुस्वामीला देव नित्य सुखी ठेवो
मेंढपाळ सद्गुरू तो चिरंजीवी जगी होवो //


इटली येथील वास्तव्यात मला रोम आणि व्हॅटिकन सिटी येथे भरपूर फिरता आले. तेथील ती भव्य सेंट पिटर्स बॅसिलिका, तो जगप्रसिद्ध सेंट पिटर्स स्केअर, व्हॅटिकन म्युझियम, मायकल अँजेलो या चित्रकाराने रंगवलेले सिस्टाईन चॅपेल पाहताना डोळे अक्षरशः फिरतात आणि मती गुंग होते, इतके हे सर्व अगदी प्रेक्षणीय आहे. त्या ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व माहीत असल्याने, त्याविषयी खूप वाचलेले असल्याने तर तिथे फिरताना काय पाहू आणि किती पाहू अशा संभ्रमात मी पडलो होतो. या सेंट पिटर्स चौकातच एका इमारतीच्या उंच मजल्यावरील बाल्कनीतून दर रविवारी आणि आठवड्यातून काही दिवस तसेच सणासुदीला  पोपमहाशय तेथे जमलेल्या  हजारो भाविकांशी संवाद साधत असतात.

कुटुंबासह मी रोमच्या सहलीवर असतानाची ही गोष्ट. जवळजवळ आठवडाभर आमचा मुक्काम रोममध्ये होता. बुधवारी सेंट पिटर्स चौकात पोप बेनेडिक्ट यांचे बाल्कनीतून दर्शन होईल, तेव्हा त्यादिवशी रोममध्येच थांबणार का? असे मला विचारण्यात आले, आमच्यापाशी दुसरा पर्याय होता तो सोमवारी व्हेनिसला जाऊन तिथे काही दिवस मुक्काम करण्याचा. 

मी ताबडतोब दुसऱ्या पर्यायाची निवड केली. जॅकलीन आणि मुलगी आदितीसह व्हेनिसला भरपूर हिंडलो. त्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या भेटीचा अनुभव पाहता मी पोप यांच्या दर्शनाऐवजी व्हेनिसभेटीची निवड केली याबद्दल आजही बिलकुल खंत वाटत नाही. त्याचे एक कारण म्हणजे पोप जॉन पॉल दुसरे यांचे गोव्यात  मी अगदी जवळून दर्शन घेतले होतेच. सेंट पिटर्स चौकात पोप फार उंचावरच्या गॅलरीतून भाविकांशी संवाद साधत असल्याने त्यांचे जवळून असे दर्शन होतच नाही. पाहू या, इन्शाअल्ला परत कधी रोम भेटीचा योग आला तर सेंट पिटर्स स्केअरमध्ये पोपदर्शनाचा अनुभव नक्कीच घेईन.       

व्हॅटिकनच्या खाजगी विभागाच्या प्रवेशद्वारातच खास पारंपरिक टोपी आणि रंगीबेरंगी पोशाखात हातात भाला घेऊन स्मार्टपणे उभे असलेले उंचपुरे गार्डस सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पोपमहाशयांची सुरक्षाव्यवस्था सांभाळणारे हे स्विस गार्डस. गेली पाच शतके स्वित्झर्लंड या देशातील तिशीच्या आतील युवक पोपमहाशयांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. अर्थांत हे तसे ‘सेरेमोनियल गार्ड’ म्हणजे शोभेचे गार्ड म्हणता येईल.

सेंट पिटर बॅसिलिका हे सेंट पिटरच्या समाधीवर उभारलेले चर्च आहे. सेंट पिटर बॅसिलिकातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे ऐतिहासिक सेंट सिस्टाईन चॅपेल. नव्या पोपची निवड करण्यासाठी येथे जगभरातील कार्डिनलांची बैठक होते. पोपपदाची गादी रीक्त झाल्यावर जगभरातील कार्डिनल सिस्टाईन चॅपेलमध्ये नवे पोप निवडण्यासाठी एकत्र येतात. 

पोपपदाची निवडणूक हा खरे तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. सिस्टाईन चॅपेलमध्ये होणारी ही निवडणूक आगळीवेगळी असते, येथे उमेदवार लॉबिंग वा स्वतःचा प्रचार करत नसतात. ही निवडणूक एक दिवसात संपू शकते किंवा मतैक्य होईपर्यंत काही आठवडेही चालू शकते. कार्डिनलांशिवाय इतर कोणालाही त्या आतून बंद असलेल्या सिस्टींन चॅपेलमध्ये कोणालाही प्रवेश नसतो. सिस्टाईन चॅपेलमध्ये पोपपदावर मतैक्य कसे झाले, कितीदा मतदान झाले, कोण उमेदवार होते, याची माहिती बाहेर कधीही येत नाही. 

कार्डिनलची ही कॉन्क्लेव्ह (बैठक) चालू असताना सेंट पिटर बॅसिलिकाच्या चिमणीतून काळा धूर निघाला, म्हणजे नव्या पोपसंदर्भात अजून मतैक्य झालेले नाही. ही बैठक अनेक दिवस चालू शकते. चिमणीतून पांढरा धूर येऊ लागला, म्हणजे चौकात जमलेल्या हजारो लोकांना आणि संपूर्ण जगाला कळते की, नव्या पोपची निवड झाली आहे. 

ताजे गवत जाळले कि काळा धूर येतो आणि सुकलेले गवत जाळल्यावर पांढरा धूर येतो.

असा पांढरा धूर चिमणीतून बाहेर आल्यावर काही क्षणांत पोपपदी निवड झालेल्या कार्डिनलना बाल्कनीत आणले जाते सेंट पिटर्स चौकात जमलेल्या आणि सर्व जगाला मग सांगितले जाते, ''वूई हॅव्ह अ पोप !''

आणि काही क्षणांत पोपपदी निवड झालेल्या कार्डिनलना बाल्कनीत आणले जाते आणि ते पोप म्हणून आपले नवे नाव सांगतात. पोपपदाची निवड कशी होती यावर ‘शूज ऑफ द फिशरमॅन’ हा एक अत्यंत गाजलेला चित्रपट आहे. 

काही वर्षांपर्यंत या वेळी नूतन पोपमहाशयांच्या डोक्यावर वर क्रूस असलेला रत्नजडित मोठा मुकुट चढवून त्यांचा राज्याभिषेक केला जाई. अलीकडच्या काळात सरंजामपद्धतीचे प्रतीक असणारा हा मुकुट पोप घालत नाहीत. इंग्लंडची राणीसुद्धा हल्ली अगदी प्रतीकात्मक स्वरूपात एक छोटासा मुकुट केवळ शाही समारंभाला घालतात. 

इंग्लंडच्या गादीवर येणारा राजा अथवा राणी आपले नवे नाव धारण करतात, जसे आताची राणी एलिझाबेथ दुसरी, तसे पोपपदावर येणारे कार्डिनल आपली जुनी ओळख टाकून नवे नाव घेतात. याआधीचे निवृत्त पोप हे बेनेडिक्ट सोळावे तर अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज बेर्गोग्लिओ यांनी पॉप झाल्यावर फ्रान्सिस नाव धारण केले, ते फ्रान्सिस नावाचे पहिलेच पोप आहेत. सोसायटी ऑफ जिझस (जेसुइटस) या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संघटनेचे पोपपदावर आलेले ते पहिलेच सदस्य आहेत.

सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट किंवा येशूसंघीय) या धर्मगुरूंच्या संघटनेचे जगभर शिक्षण, समाजकार्य वगैरे क्षेत्रांत मोठे योगदान आहे. दहशतवादाच्या आरोपात अलीकडेच तुरुंगात निधन झालेले फादर स्टॅन स्वामी हेसुद्धा जेसुईटच होते. जेसुईटांच्या जगभरच्या कार्याच्या मोठ्या जाळ्यामुळे संस्थेचे प्रमुख असलेले सुपिरियर जनरल यांना चर्चमध्ये पोप यांच्याखालोखाल महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे शुभ्रवस्त्रधारी पोप यांच्यासमोर काळा झगा घालणाऱ्या जेसुईट फादर जनरल यांना ‘ब्लॅक पोप’ असेही म्हटले जायचे.

काही वर्षांपूर्वी अडॉल्फो निकोलस हे जेसुईट सुपिरियर जनरल (ब्लॅक पोप) असताना भारतदौऱ्यावर आले, तेव्हा पुण्यात मी त्यांची मुलाखत घेतली होती. चर्चच्या इतिहासात आता पहिल्यांदाच पोप आणि ब्लॅक पोप हे दोघेही जेसुईट आहेत!

पोप यांना राष्ट्रप्रमुख म्हणून मान्यता दिलेल्या राष्ट्रांत पोपमहाशयांचे त्या राष्ट्रातील प्रतिनिधी (प्रो- नन- शिओ) असलेले आर्चबिशप किंवा बिशप यांना अधिकृतरीत्या राजदूताचा दर्जा असतो. त्यामुळे सूत्रे हाती घेण्याआधी राजदूत म्हणून आपले अधिकारपत्र ते भारताच्या राष्ट्रपतींना किंवा इतर राष्ट्रप्रमुखांना सादर करत असतात. व्हॅटिकन सिटीची स्वतःची अशी राजप्रतिनिधिक स्तराची सेवा असते. त्यातील धर्मगुरू, बिशप किंवा आर्चबिशप यांना राजदूत म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यातील देशांत पाठवले जाते. वसईचे सद्याचे बिशप फेलिक्स मच्याडो यांनीही पूर्वी व्हॅटिकन सिटीच्या एका शाखेत उपसचिवपदावर काम केले आहे. पोप बेनेडिक्ट यांच्याशी त्यांचा त्या काळी निकटचा संबंध असे.       

पोपचे हे प्रतिनिधी-राजदूत त्या देशातील कॅथोलिक चर्च आणि पोप यांच्यांतील दुवा असतात. उदाहरणार्थ, भारतातील कार्डिनल आणि विविध राज्यातील बिशपपदांवरील नेमणुका, चर्चसंबंधी विविध विषय याबाबत पोपच्या या प्रतिनिधींचा सल्ला व मत निर्णायक ठरते.    

येशू ख्रिस्ताचा शिष्य सेंट पिटर याचा पोप म्हणून वारसदार असलेले पोप कधीही चुका करू शकत नाही, असा एक नंतर वादग्रस्त ठरलेला धर्मसिद्धांत (डॉग्मा) दोन शतकापूर्वी चर्चमध्ये संमत झाला होता. दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलनंतर चर्चमध्ये झालेल्या वैचारिक सुधारणानंतर ‘पेपल इन्फालीबिलीटी’ या डॉग्मावर आता कुणी बोलतही नाही.

गॅलिलिओ आणि इतर वैज्ञानिकांविषयी चर्चची भूमिका, काही देशांत इन्क्विझिशनचा झालेला अतिरेक, दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचा झालेला संहार याबाबत चर्चची बोटचेपी भूमिका, तसेच गेल्या काही दशकांत युरोपात आणि अमेरिकेत धर्मगुरूंकडून मुलांवर झालेले लैगिक अत्याचार या प्रकरणांमुळे चर्चची मानहानी झाली. त्याबद्दल पोप जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट आणि पोप फ्रान्सिस यांनी खंत आणि खेद व्यक्त करून संबंधित पीडित व्यक्तींची आणि त्यांच्या नातलगांची माफी मागितली आहे.     

पोपमहाशय परदेशदौऱ्यावर निघतात, तेव्हा इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे त्यांच्याबरोबरसुद्धा पत्रकारांचा काफिला असतो. रोमकडे परतीच्या प्रवासात पोप जॉन पॉल पत्रकारांशी खुला संवाद साधत असत. पोप फ्रान्सिस यांनीही परंपरा चालू ठेवली आहे. आम्हा पत्रकारांसाठी अशा दीर्घकाळ चालणाऱ्या पत्रकार परिषदा म्हणजे मोठी पर्वणीच असते.

या पत्रकार परिषदेत चर्चच्या दृष्टीने कळीचे मुद्दे असणाऱ्या काही प्रश्नांची हमखास उजळणी होते. समलिंगी संबंध या प्रश्नावर ‘त्यांचा न्याय करणारा मी कोण?’ असा उलटपक्षी प्रश्न पत्रकारांना विचारून पोप फ्रान्सिस यांनी संबंधितांची सहानुभूती मिळवली आहे. मात्र गर्भपात, कॅथोलिक धर्मगुरूंचे अविवाहितपणाचे व्रत, स्त्रियांना धर्मगुरूपदाची दीक्षा, यांवर पोप फ्रान्सिस यांनी आपल्या पूर्वसूरींची कर्मठ भूमिका चालू ठेवली आहे.    

व्हॅटिकन सिटीतील ड्रेस कोड विषयीही सांगितले पाहिजे. चर्चच्या सर्व धर्मगुरूंचा, बिशपांचा, कार्डिनल्सचा आणि नन्सचाही विशिष्ट झगा असतो. धर्मगुरू आणि बिशप सफेद किंवा करड्या रंगाचा झगा घालतात. कार्डिनलांचा करड्या रंगाचा झगा, कमरेला लाल पट्टा आणि डोक्यावर छोटीशी लाल गोल टोपी (स्कल कॅप) असते. पोप मात्र सदैव पूर्ण पांढऱ्या झग्यात असतात आणि त्यांच्यासमोर इतरांनी पांढरा पोशाख वा झगा घालू नये असा संकेत आहे. जगातील सर्व बिशप पाच  वर्षातून एकदा आळीपाळीने पोप यांना व्हॅटिकन सिटीत भेटत असतात. त्या वेळी हे बिशप, कार्डिनल पोपसमोर नेहमी करड्या रंगाच्या झग्यांत असतात! पुण्याचे बिशप थॉमस डाबरे किंवा वसईचे बिशप फेलिक्स मच्याडो यांचे याआधीच्या आणि आताच्या पोपबरोबरचे फोटो पाहिले की, पोप यांच्याबाबतीतील या ड्रेस कोडविषयी कल्पना येईल.  

गेले वर्षभर करोना साथीमुळे जगभरातील प्रार्थनास्थळे बंद राहिली आहेत. व्हॅटिकन सिटीमधले सर्व व्यवहार, प्रार्थना आणि उपासनाविधी ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे केवळ ऑनलाईनच्या माध्यमातून पोपमहाशयांच्या तुरळक लोकांच्या हजेरीत सेंट पिटर्स बॅसिलिकात होणाऱ्या मिस्साविधीला मी उपस्थित राहत होतो. आता पोप फ्रान्सिस दर रविवारी आणि इतर काही दिवशी पुन्हा आपल्या गॅलरीत येऊन सेंट पिटर्स चौकात वाढत चाललेल्या भाविकांना संबोधित करत आहेत. मागच्या आठवड्यात त्यांच्यावर सर्जरी होऊन या रविवारी ते पुन्हा भाविकांना भेटले. तिथली लोकांची गर्दी, त्यांचा उत्साह आणि जल्लोष पोपविषयीच्या त्यांच्या भावनांबद्दल बरेच काही सांगून जातो.

गेली काही शतके फक्त इटलीच्या कार्डिनलचीच पोपपदावर निवड व्हायची, याचे कारण म्हणजे पोपपदाच्या निवडणुकीत भाग घेणाऱ्या कॉलेज ऑफ कार्डिनल्समध्ये इटलीच्या कार्डिनलांचाच अधिक भरणा असायचा. आतापर्यंत केवळ युरोपियन आणि सध्याचे पोप फ्रान्सिस यांच्या रूपाने युरोपाबाहेरील लॅटिन अमेरिकेतील व्यक्तीला म्हणजे केवळ गौरवर्णीय पोपपद मिळालेले आहे.  

पोप जॉन पॉल दुसरे, पोप बेनेडिक्ट सोळावे आणि आताचे पोप फ्रान्सिस यांनी कॉलेज ऑफ कार्डिनलचा पारंपरिक चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी अशियाई आणि आफ्रिकन बिशपांची कार्डिनलपदी नेमणूक केल्याचे स्पष्ट दिसते. पोप फ्रान्सिस यांनी बांगलादेशी आर्चबिशप पॅट्रिक डी  रोझारिओ यांची बांगलादेशचे पहिले कार्डिनल म्हणून २०१६ साली नेमणूक केली, २०२० साली कार्डिनलपदावर नेमणूक झालेले विल्टन डॅनियल ग्रेगरी हे अमेरिकेतील पहिलेच आफ्रिकन-अमेरिकन कार्डिनल ठरले आहेत. अर्थात आधी आफ्रिकेतील अनेक कृष्णवर्णियांची कार्डिनलपदावर नेमणूक झालेली आहे.

मुंबईचे पहिले भारतीय बिशप व्हॅलेरियन ग्रेशियस हे १९५३ साली भारताचे आणि आशिया खंडातलेही पहिले कार्डिनल बनले. मुंबईचे सायमन पिमेंटा हे पहिले मराठीभाषक कार्डिनल. भारताच्या कार्डिनलची संख्या सहापर्यंत पोहोचली आहे. सद्याचे मुंबईचे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस हे तर पोप फ्रान्सिस यांच्या आठ-सदस्यीय सल्लागार मंडळात आहेत. २००८ला पोप बेनेडिक्ट यांनी राजीनामा दिल्यावर झालेल्या पोपपदाच्या निवडणुकीत कार्डिनल ओसवाल्ड ग्रेशियस यांचे नाव चर्चेत होते.

कार्डिनलांच्या संख्येत आशियाई, आफ्रिकन किंवा कृष्णवर्णीय कार्डिनल अगदी नगण्य असले तरी मतपेटीतून आणि सेंट पिटर्स बॅसिलिकेच्या चिमणीतून येणाऱ्या पांढऱ्या धुरातून काही धक्कादायक निवडीचा संदेश येऊ शकतो, हे अलीकडच्या काही दशकांत दिसून आले आहे.

१९७०च्या दशकात पोलंड या तेव्हाच्या कम्युनिस्ट राजवटीतील क्रेकॉव येथील कार्डिनल कॅरोल जोसेफ वोझत्याला यांची पोप जॉन पॉल दुसरे म्हणून निवड करून या कॉलेज ऑफ कार्डिनल्सने जे धक्कातंत्र वापरले, ते त्यानंतर जर्मन कार्डीनल जोसेफ अलोशियस रॅतझिंगर (पोप बेनेडिक्ट सोळावे) आणि नंतर अर्जेंटिनाचे कार्डिनल जॉर्ज मारिओ बेर्गोग्लिओ  (पोप फ्रान्सिस) यांना निवडून आजतागायत चालू राहिले ठेवले आहे.   

त्यामुळेच भारतातील, आशियातील, आफ्रिकेतील किंवा इतर बिगर-पाश्चात्य कार्डिनल पोपपदावर येऊ शकतात, ही आता अशक्यप्राय बाब राहिलेली नाही. एके दिवशी एखादा भारतीय म्हणजे अगदी मुंबईतील मराठीभाषक कार्डिनलसुद्धा व्हॅटिकन सिटीमध्ये पोप आणि या चिमुकल्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख होऊ शकतो. आणि हा दावा म्हणजे केवळ स्वप्नरंजन, सैद्धान्तिक किंवा तात्त्विक पातळीवर नाही, असे भविष्यात कधीही होऊ शकते. सोनियाचा तो दिवस लवकर यावा हीच अपेक्षा !