Tuesday, November 2, 2021

रमाकांत खलप. 


गोव्यात मी पहिल्यांदा पाऊल ठेवले तेव्हा म्हणजे १९७७ साली. पणजीतले मांडवीच्या तिरावरचे मध्ययुगीन आदिलशाह पॅलेस हे गोवा, दमण दमण आणि दीव विधानसभेचे सचिवालय आणि मंत्रालय होते.

या सचिवालयाच्या एका बाजूला असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याकडे बोट दाखवत आमचे सहल मार्गदर्शक म्हणाले होते, `` गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा हा पुतळा. या भाऊसाहेब बांदोडकरांना गोव्यात फार मानाचे स्थान आहे

या दौऱ्याच्या दरम्यानच मिरामार समुद्रकिनाऱ्यावर गेलो, तेव्हा तेथील घनदाट सुरु वृक्षाच्या जंगलापाशी असलेल्या दयानंद बांदोडकरांच्या समाधीस्थानाला भेट दिली. बांदोडकरांचे आकस्मित निधन होऊन केवळ पाच वर्षे झाली होती आणि त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर मुख्यमंत्री बनल्या होत्या.

पणजीला त्याच वर्षी धेम्पे कॉलेजात बारावीसाठी प्रवेश घेतला तेव्हापासून गोव्याच्या इतिहासात डोकावू लागलो आणि वर्तमानातल्या घडामोडीही टिपू लागलो. पदवीधर झाल्यानंतर दैनिक `नवहिंद टाइम्समध्ये बातमीदार म्हणून नोकरीला लागलो तेव्हापासून तर घटनांचे साक्षीदार होणे आणि त्यांची नोंद करणे हा तर दैनंदिन कामकाजाचा एक भाग झाला.

दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर त्यांच्या मांद्रे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत विजयी होऊन गोव्याच्या राजकारणात प्रवेश केलेली व्यक्ती पुढे गोमंतकात आणि राष्ट्रीय पातळीवरही प्रकाशझोतात येणार होती. ती व्यक्ती होती रमाकांत खलप.

खलप हे एकदम प्रकाशझोतात आले ते १९८० च्या गोवा, दमण आणि दीव विधानसभेच्या निवडणुकीनंतर. या केंद्रशासित प्रदेशात १९६३ पासून सत्तेवर असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाचा या निवडणुकीत पराभव झालेला होता. मुख्यमंत्री शशिकला काकोडकर या आपल्या डिचोली मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या.

या निवडणुकीत मतदारांनी देवराज अर्स यांच्या नेतृत्वाखालील अर्स काँग्रेसला सत्तेवर पाठवले होते तरी या पक्षाच्या विधिमंडळाने सत्तेवर पुनरागमन केलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या इंदिरा काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यापाठोपाठ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या काही आमदारांनीही इंदिरा काँग्रेसची वाट धरली. या पक्षाच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री काकोडकर यांनीही काँग्रेस पक्षात जाऊन आपल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे विसर्जन करण्यात आल्याचे जाहीर केले होते.

मात्र पक्षाच्या या विलीनीकरणास `मगोच्या दोन आमदारांनी तीव्र विरोध केला आणि पक्षाचा झेंडा विधानसभेत आणि बाहेर कायम ठेवला. हे दोन तरुण आमदार होते रमाकांत खलप आणि बाबुसो गांवकर.

मांडवीच्या तीरावरच्या सचिवालयाच्या ऍबे फरियाच्या पूर्णाकृती पुतळ्यापाशी असलेल्या प्रेसरुममधले १९८० च्या दशकातले ते दिवस मला आजही स्पष्ट आठवतात.

त्याकाळात या सचिवालयात गोवा, दमण आणि दीव विधानसभेचे अधिवेशन दुपारी दोन वाजता सुरु व्हायचे. याचे कारण असे सांगितले जाई कि या विधानसभेचे अनेक आमदार वकिली करतात, त्यामुळे सकाळी पणजी, म्हापसा वगैरे सत्र न्यायालयांत आपली कामे उरकून दुपारी ते विधानसभेच्या अधिवेशनाला हजर होतात. यात तथ्य असावे. रमाकांत खलप यांना पांढऱ्या शुभ्र शर्टावर काळा कोट घालून विधानसभेत येताना त्याकाळात मी स्वतः अनेकदा पाहिले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि `मगोच्या अध्यक्ष असलेल्या शशिकला काकोडकरांना अनेक मुद्द्यांवर त्यांच्या पक्षातीलच आमदारांनी आणि इतरांनी धारेवर धरले तेव्हा वकिली पेशा असणाऱ्या या आमदारांचा त्या `` काळे डगलेवाले’’ अशा शब्दात उल्लेख करत असत हेही आज स्पष्ट आठवते.

प्रसन्न, हसतमुख आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व लाभलेले रमाकांत खलप त्याकाळात मगो पक्षाचे नेते बनले. विधानसभेत ते आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे त्यांचे सहकारी आमदार बाबुसो गांवकर हिरीरीने अनेक प्रश्न मांडत. विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते, तरी आक्रमक भूमिका घेताना ते कधीही आक्रस्ताळ होत नसत.

अकाली सफेद झालेला डोक्यावरचा दाट केशसंभार खलप यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वात घालत असे. त्यानंतर तब्बल चाळीस वर्षांचा काळ उलटलेला असला तरी आजही माझ्या नजरेसमोर खलप यांची ती हसतमुख छबी कायम आहे.

१९८०च्या दशकाअखेरीस मी गोवा सोडले, नंतर पुण्यात आधी `इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि नंतर `टाइम्स ऑफ इंडिया काम करु लागलो. गोव्यात मात्र वर्षांतून एकदा तरी येत होतो, इथल्या राजकीय आणि इतर घडामोडींवर पत्रकार आणि कुतूहल म्हणूनही लक्ष ठेवून होतो. त्याकाळातील गोव्यातील राजकीय अस्थिरता, सर्रास होणारे पक्षांतर कुणालाही अस्वस्थ करील असेच होते.

याकाळात कुणी अठरा दिवसांसाठी, कुणी काही आठवड्यांसाठी तर इतर कुणी काही महिन्यांसाठी गोव्याचे मुख्यमंत्री बनले.

या काळात रमाकांत खलप हेसुद्धा उपमुख्यमंत्री बनले. १९७० च्या दशकापासून गोव्याच्या राजकारणात अत्यंत सक्रीय असलेल्या खलप यांना मुख्यमंत्रीपदाने हूल दिली याची मला निश्चितच खंत वाटते.

१९९६साली देशात जनता दलाच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडी सत्तेवर आली तेव्हा पंतप्रधान हरदनहळ्ळी दोडेगौडा देवे गौडा आणि नंतर पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात रमाकांत खलप कायदा राज्यमंत्री बनले. ही बाब माझ्याप्रमाणेच गोव्यातील बहुसंख्य लोकांना सुखावून गेली.

१९६१च्या गोवामुक्तीनंतर या प्रदेशाचा भारतीय संघराज्यात समावेश झाल्यानंतर भारताच्या केंद्रिय मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवणारे खलप हे दुसरे गोमंतकीय.

त्याआधी म्हणजे गोव्याला राज्याचा दर्जा मिळण्याआधी १९८६ साली दक्षिण गोव्याचे लोकसभा सदस्य एदुआर्दो फालेरो यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री पद सांभाळले होते.

रमाकांत खलपबाब वयाची पंच्यात्तर वर्षे पूर्ण करत आहेत. आणखी समृद्ध आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा !

*********


No comments:

Post a Comment