ये कौन चित्रकार है ?
हे चित्र तसे खूप वेगळे आहे, म्हणजे या विषयावर जगभरातल्या नामवंत चित्रकारांनी अनेक चित्रे काढली आहेत. पण हे चित्र वेगळे आहे ते या अर्थाने कि ते भारतीय शैलीत काढण्यात आले आहे.
क्रूसिफिक्स म्हणजे कृसावर खिळलेला येशू खिस्त या विषयावर मायकल अँजेलोच्या ला पियता या अजरामर शिल्पकला कृतीसह अनेक चित्रे आणि शिल्पे प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही मध्ये अनेक व्यक्ती असतात तर काहींमध्ये येशू ख्रिस्ताशिवाय फक्त वरील दोन व्यक्ती असतात त्या म्हणजे येशूची आई मदर मेरी आणि त्याच्या बारा शिष्यापैकी एक असलेला संत जॉन...
येशूला कृसावर खिळे ठोकून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती. राजद्रोहाच्या कलमानुसार ही शिक्षा रोमन साम्राज्य पद्धतीनुसार जेरुसलेम मधील रोमन सुभेदार पोंती पायलट याने फर्मावली आणि रोमन सैनिकांनी ती अमलात आणली. यहुदी धर्मशास्त्रानुसार जमलेल्या जमावाकडून आरोपीला दगडाने ठेचून देहदंड देण्यात येत असे. प्राचीन भारतीय पद्धतीत राजाने शिक्षा फर्मावलेल्या आरोपीला अणकुचीदार सुळावर देण्यात येई.
तर वरील चित्रात देहदंडाची रोमन पद्धतीची शिक्षा वगळता बाकी सर्व भारतीय शैलीत आहे. कालवरी टेकडीवर मदर मेरी किंवा मारियाबाई भारतीय साडीत दाखवली आहे आणि पाठमोरा सेंट जॉनसुद्धा भारतीय पोशाखात आहे .
महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठ दशकांपूर्वी म्हणजे १९३८ला प्रसिद्ध झालेल्या ख्रिस्तायन या खंडकाव्याच्या मुखपृष्ठावर हे भारतीय शैलीतील चित्र होते.
हे खंडकाव्य रेव्हरंड नारायण वामन टिळक, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांच्यानंतर या दाम्पत्याचे चिरंजीव देवदत टिळक यांनी लिहिले. एक खंडकाव्य एका घरातील तिघांनी लिहिण्याची ही मराठीतील बहुधा पहिलीच वेळ असावी. लक्ष्मीबाईनी लिहिलेल्या `स्मृतिचित्रे' या आत्मचरित्रात त्यांच्या निधनानंतर देवदत्त टिळक यांनी भर घातली हे जाणकारांना माहित आहेच.
या चित्राखाली ख्रिस्तायन काव्यातील दोन ओळीसुद्धा दिलेल्या आहेत.
क्रूसिफिक्स या विषयावर भारतीय शैलीत मागच्या शतकात हे सुंदर चित्र काढणारा चित्रकार कोण असावा?
हा प्रश्न रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या नाशिक इथल्या पणती मुक्ता अशोक टिळक यांनी या फेसबुकवरच विचारला आहे.
जाणकारांनी या प्रश्नाचे उत्तर सोडवण्यास मदत करावी असे आवाहन मुक्ता अशोक टिळक यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment