Tuesday, November 30, 2021

आमच्यात अशी काही प्रथा नसते... "'?


चिंचवडगावातले ते प्रसूतीगृह सोडण्याची वेळ आली होती आणि हळूहळू मी सामान आवरु लागलो. आमची मुलगी सहा दिवसांची झाली होती आणि डॉक्टरांनी बिल भरण्याची सूचना केली होती.
जॅक्लीन आणि माझी आई आमच्या बाळाकडे लक्ष देत होत्या त्याचवेळी त्या मॅटर्निटी होमच्या दोन आया आणि एक पुरुष स्टाफ त्यांच्याकडे आला आणि घरी जाण्याआधी त्यांचे बक्षीस देण्याची आठवण करून गेला.
मी याबाबत तयारच होतो. आमच्या अपत्याच्या आगमनानंतर आनंदाचे वातावरण असल्याने त्या प्रसूतीगृहातील सर्व कामगारांना आमच्या या आनंदात सहभागी आम्ही करणार होतोच.
त्यासाठी त्या कामगारांना देण्यासाठी एक रक्कम मी माझ्या आईकडे सोपवली आणि तिला म्हटले, "बाई, तुझ्या हातानेच त्या सगळ्यांना घरी जाण्याआधी हे बक्षीस दे.."'
मात्र एव्हढ्यावरच त्या दोन आयांचे आणि इतर कामगारांचे समाधान होणार नव्हते.
"आमच्या बक्षिसीबरोबर बाळाच्या पाळण्यात नारळ ठेवून मगच घरी जा. ज्या पाळण्यात गेले काही दिवस बाळ आरामात पाहुडले होते तो बाळाचा पाळणा असा रिकामा, ओकाबोका सोडायचा नसतो...." त्या आयांपैकी जरा वयस्कर असलेल्या एकीने मला म्हटले.
"बक्षीसाबद्दल मला काही म्हणायचे नाही, ते तुम्हाला सगळ्यांना मिळेलच. पण नारळ वगैरे आम्ही काही देणार नाही... आमच्यात अशी काही प्रथा नसते... "'?
हे मी त्यांना सांगत होतो तोच बाईने माझे बोलणे हाताच्या इशाऱ्यानेच थांबवले.
"कामिल, तसं काई सांगू नकोस त्यांना.. जा लगेच चापेकर चौकात आणि आन एक नारळ.."
माझ्याकडे आता दुसरा काही पर्यायच नव्हता..
मुलीला बाळंत्यात घट्ट गुंडाळून घेऊन बाई, जॅक्लीन आणि मी त्या प्रसूतीगृहातून बाहेर पडलो तेव्हा बाळाचा तो पाळणा मोकळा नव्हता. तिथे ते श्रीफळ होते. मांगल्याचे आणि शुभ घटनेवे प्रतिक !
आम्हा तिघांना निरोप देण्यासाठी त्या आया त्या रूममध्ये जमल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची ती ख़ुशी मी पाहिली तेव्हा पाळण्यात श्रीफळ ठेवण्याचा बाईचा सल्ला मी ऐकला ते योग्यच केले याची लगेच जाणीव झाली. बक्षीसीच्या रकमेविषयी त्यांचे काहीच म्हणणे नव्हते.
श्रद्धा गार्डन कॉलनीत आमच्या इमारतीपाशी रिक्षा थांबली तसे मी घाईघाईने दुसऱ्या मजल्यावर आमव्या फ्लॅटपाशी जाऊन थांबलो. माझ्या पाठोपाठ आलेल्या बाईने मात्र हातात बाळ घेऊन असलेल्या जॅक्लीनला दाराबाहेरच थांबवले. लगबगीने किचनमध्ये शिरुन एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात चपातीचा चतकोर तुकडा घेऊन ती आली, बाळ आणि बाळाच्या भोवती त्या चतकोर चपातीने ओवाळून म्हणजे दृष्ट काढून झाल्यावर, बॅड ओमेनचा नायनाट करुन झाल्यावरच बाळ आणि बाळंतिणीचा -कुटुंबातील नव्या सदस्याचा - गृहप्रवेश झाला!
यावेळेस मात्र मी कुठलाही विरोध केलेला नव्हता, चुपचाप तो विधी पाहत मग घरात शिरलो.
प्रसूतिगृहातून बाहेर पडण्याआधीच बाईच्या सांगण्यानुसार मी मिठाईचे बॉक्स आणून ठेवले होते, त्यापैकी एक बॉक्स पहिल्यांदा येशू आणि मारियाबाईचे पुतळे असलेल्या आणि मेणबत्त्या लावलेल्या अल्तारापाशी ठेवला गेला आणि मगच या मिठाईचे शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये वाटप झाले.
पुणे कँम्पमध्ये असलेल्या इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताच्या ऑफिसात पत्रकार आणि इतर सहकाऱ्यांना मी पेढे वाटले तेव्हा अनेकांना आश्चर्यच वाटले.
"मुलगी झाली अन कामिल, तू चक्क पेढे देतोस? जिलेबी का नाही? पेढे तर मुलगा झाल्यावर देतात!" असे आश्चर्योदगार अनेकांनी काढले.
पण याबाबतीत लिंगाधारीत भेदभाव करणारी प्रचलित रूढ प्रथा पाळण्यास मी ठाम नकार दिला होता..
नारळ किंवा श्रीफळाने मात्र माझा पिच्छा त्यानंतरही सोडला नाही.
चिंचवडगावातील सोनार लेनमध्ये आता तीन महिन्यांच्या झालेल्या आदितीचे कान टोचण्यासाठी आम्ही तिला घेऊन गेलो. तिचा कान हातात धरण्याआधी सोनाराने श्रीफळ आणले की नाही याचीच पहिल्यांदा चौकशी केली होती. चापेकर चौकात जाऊन लगेच मी श्रीफळ घेऊन आलो होतो.
जॅक्लीनची मैत्रीण असलेल्या भट्टाचार्य या शेजारणीने तिच्या घरात पडून असलेला लोखंडाचा एक भलामोठा पाळणा आदितीसाठी घेऊन जाण्यास आम्हाला सांगितले. काही महिन्यांच्या कालावधीनंतर एक दिवस या पाळण्यात उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदितीला आम्ही पाहिले आणि आता या पाळण्याची गरज संपली हे लक्षात आले.
तो पाळणा परत नेल्यावर जॅक्लीनच्या त्या मैत्रिणीने तिच्या मदतीबद्दल काहीही रक्कम घेण्यास स्पष्ट नकार दिला. साडी-चोळी घ्यायला सुद्धा भट्टाचार्य मॅडमचा ठाम नकार होता.
"या पाळण्यात श्रीफळ ठेवून तो मला परत करा," अशी तिची माफक मागणी होती. त्यावर एक शब्दही न वाढवता आम्ही तिच्या मागणीचा आदर केला.
"आमच्यात अशा प्रथा नसतात,' हे वाक्य मी यावेळी जिभेवर आणले नाही.
आदिती दहा महिन्यांची झाली आणि आता तिचा हेअरकट फार लांबवता येणार नाही हे निश्चित झाले. मी नेहेमी ज्यांच्याकडे केस कापायला जायचो त्या कासिमभाईंकडे मी आदितीला घेऊन गेलो.
आपल्या या नव्या गिऱ्हाईकाकडे पाहून कासिमभाई खूष झाले. खुर्चीवर एक अतिरिक्त आडवी लाकडी पट्टी ठेवून त्यावर आदितीला आरामात बसवले.
"जावळ काढण्याचे पाचशे एक रुपये होतील आणि त्याआधी एक नारळ आणून ठेवावा लागेल " असे त्यांनी फर्मानच काढले अन मी उडालोच.
" ओ कासिमभाई, वो जावळ वगैरे कुछ भी नाही, साधी आपली कटिंग करायची आहे" या माझ्या सांगण्याचा कासिमभाईंवर काहीही परिणाम झाला नाही. नाभिक व्यवसायात त्यांनी अनेक वर्षे काढली होती, माझ्या मुलीकडे पाहताच ही जावळाची कटिंग आहे हे त्यांना कळाले होते.
बाळाचे जावळ काढण्यासाठी बाळाच्या मामाला सन्मानपूर्वक बोलावे लागते, त्याला टोपी-टॉवेल चढवून, कपडेलत्ते केल्यावर त्याने जावळाची पहिली बट कापल्यावर मग पुन्हा न्हाव्ह्याचाही मान राखावा लागतो, हे अर्थातच मला माहिती होते. पण गावाकडच्या या प्रथा-परंपरा गावातल्या लोकांबरोबर शहरांतही आल्या होत्या हे मला माहित नव्हते.
मला राग, चीड आणि आश्चर्य वाटले होते ते मात्र दुसऱ्याच गोष्टीचे..
"कासिमभाई, हे काय भलतंच? मी कोण हे तुम्हाला माहित नाही काय? आमच्यात या- जावळाच्या - प्रथा नसतात... आणि तुम्ही... तुम्हीपण - मला ही प्रथा पाळायला सांगताय काय?'
कासिमभाई हसले. त्यांना माहित होते, मला काय म्हणायचे होते ते.
पण जावळासाठी असे जास्त पैसे मोजायचे म्हटले म्हणजे या पातळीवर घसरणारा मी त्यांचा नक्कीच पहिला गिऱ्हाईक नसणार. अर्थात हे माझ्या उशिरा लक्षात आले. ते लक्षात आल्यावर मी स्वतःच शरमलो होतो.
ते माझी नेहेमी हेअर कटिंग करत असल्याने कासिमभाई मला चांगले ओळखत होते. त्यांच्या त्या स्मितहास्याने घात केला आणि शेजारच्या किराणा दुकानातून मी मुकाट्याने श्रीफळ घेऊन आलो.
मात्र पूर्ण हार मानण्यास मी तयार नव्हतो. जावळ काढण्याबदल पाचशेएक रुपयांऐवजी मी आता फक्त दोनशे एक्कावन रुपये देणार होतो.
कासिमभाई सुद्धा दोन पावले मागे येण्यास एक शब्दही न बोलता अगदी हसतहसत तयार झाले. आदितीच्या जावळाच्या केसाची एक बट त्यांनी हळुवारपणाने आपल्या हातात घेतली.
मागच्या वर्षी याच काळात, ऐन दिवाळीच्या दरम्यान, तनिष्काची ती वादग्रस्त जाहिरात टाटा ग्रुपने मागे घेतली होती, त्यावेळी ही पोस्ट मी फेसबुकवर टाकली होती.
यावर्षी टिकली आणि उर्दू शब्द 'इर्शाद'चे निमित्त झाले..

No comments:

Post a Comment