Monday, September 18, 2023

नव्या तंत्रज्ञानाप्रमाणेच नव्या पिढीचेसुद्धा कौतुक

 कामिल सर.. मी अमुक अमुक... शकुंतला परांजपे यांच्याविषयी तुम्ही बोलाल का?

चारपाच दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांत मला अचानक महत्त्व आले होते, अनेकांनी माझी मुलाखत घेतली होती, काहींनी माझा तो जुनाच लेख पुन्हा प्रसारीत केला होता. राष्ट्रपातळीवरच्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) ने माझ्यावर खास लेख केला असल्याने राष्ट्रीय पातळीवर तो बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध झाला होता.
विषय होता इंटरनॅशनल फेमस, अनेक तरुणींना आपल्या मोहजालात अडकवून त्यांची हत्या करणाऱ्या खतरनाक गुन्हेगार आणि `सेलिब्रिटी क्रिमिनल' असे वलय प्राप्त झालेल्या चार्ल्स सोबराजची नेपाळच्या तुरुंगातून सुटका झाली होती आणि आता म्हातारा झालेला तो मायदेशी फ्रान्सला रवाना होणार होता. तिहार तुरुंगातून पलायन करून फरार झालेल्या चार्ल्स सोबाराजला गोव्यात पर्वरी येथे पकडणारे मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे योगायोगाने सिंगापूरहून काही दिवसांसाठी मुंबई-पुण्यात परतले होते, त्यामुळे त्यांची अनेकांनी मुलाखत घेतली होती.
बैलगाड्याबरोबर नळ्याची पण यात्रा होत असते, इंग्रजीत "Basking in reflected glory" असे म्हणतात. त्याप्रमाणे चार्ल्स सोबराज आणि माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांच्यावर यानिमित्ताने प्रकाशझोत होता, आणि त्याच संदर्भात माझीसुद्धा मुलाखत घेतली जात होती.
याचे कारण म्हणजे जेव्हा मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांच्या टिमने पर्वरीत `ओ कोकेरो' हॉटेलात सोबराजच्या अक्षरशः मुसक्या आवळल्या आणि त्याला जेरबंद करून खासगी टॅक्सीतून मध्यरात्री गोव्यातून मुंबईला नेण्याची तयारी सुरु होती तेव्हा त्या रविवारी रात्री साडेनऊच्या आसपास तिथे म्हापशात मी हजर होतो. चाळीस वर्षांपूर्वी ..
त्या मुलाखतींनंतर लगेच आठवड्याभरात पुन्हा त्याच मराठी दैनिकाच्या कार्यालयातून मला मुलाखतीसाठी विचारणा होत होती आणि यावेळी निमित्त होते शकुंतला परांजपे यांची जयंती.
आणि या विषयावरच्या दुसऱ्या तज्ज्ञ म्हणून आणखी एक व्यक्ती होत्या. शकुंतलाबाईंप्रमाणेच सेलिब्रिटी असलेल्या त्यांच्या कन्या सई परांजपे...
आता शकुंतला परांजपे आणि माझे नेमके काय नाते? तर नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला शकुंतलाबाई आणि माझी चांगली गट्टी जमली होती. आमच्या दोघांच्या वयांत साठ वर्षांचा फरक होता. त्या आयुष्याच्या नव्वदीकडे वाटचाल करत होत्या आणि मी तिशीकडे.
त्यावेळी मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये कामाला होतो, बातमीदार म्हणून शकुंतलाबाईना पद्मभूषण मिळाले तेव्हा त्याची मी मुलाखत घेतली होती. आणि दुसरे म्हणजे आम्ही दोघे सख्खे शेजारी होतो. पुण्यात डेक्कनला शकुंतलाबाई परांजपे या हॉटेल वैशालीमागच्या आपल्या `पुरुषोत्तम' बंगल्यात म्हणजे परांजपे बंगल्यात राहत होत्या आणि त्याच फर्ग्युसन रोडच्या दुसऱ्या बाजूला ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी (BCL) मागे रानडे इन्स्टिट्युटसमोर हॉटेल हिलव्हयुच्या लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर मी राहायचो. त्यामुळे लेखाच्या बातमीचा संदर्भात नियमितपणे त्यांना भेट द्यायचो.
त्यावेळी या भेटी दरम्यान त्या मला आपल्या विदाऊट फिल्टर पनामा सिगारेट ऑफर करायच्या आणि मग त्यावेळी चेन स्मोकर असलेल्या मला माझी फोर स्केेअर सिगारेट ओढायची परवानगी आणि धाडसही नसायचे. तोपर्यंत शकुंतलाबाईंच्या स्वभावाची मला चांगली ओळख झाली होती. .खूप काही सांगता येईल ते मी माझ्या शकुंतलाबाईंवरच्या लेखात लिहिले आहे.
आणि त्याच लेखाच्या संदर्भात मला आज या दैनिकाच्या हापिसातून फोन आला होता. त्यासंदर्भात माझी पॉडकास्ट मुलाखत घेतली जाणार होती.
माझ्या सवयीप्रमाणे नेहेमीप्रमाणे मी नमनालाच घडाभर तेल ओतले आहे. मुद्द्यावर येतो. विषय चार्ल्स सोबराज किंवा शकुंतलाबाई परांजपे किंवा अस्मादिक पण नाही.
मुलाखत सुरु करण्यापूर्वी प्राथमिक चर्चेत मुलाखतकर्त्या तरुणीला विचारले कि तिने माझे शकुंतलाबाई परांजपे यांच्यावर लिहिलेले लेख वाचले आहेत का?
अपेक्षेप्रमाणे होकारात्मक उत्तर आले, पण त्याहून अधिक धक्कादायक माहिती समोर आली.
त्या मुलीने शकुंतलाबाईंच्या नामांकित कन्येची म्हणजे अर्थातच सई परांजपे यांची मुलाखत बेळगाव येथे झाली तेव्हा आपल्या पालकांसह तिने ऐकली होती.
त्यानंतर तिने त्या मुलाखतीतला एक प्रसंग मला सांगितला.
"छोटी सई शाळेत जायची तेव्हा अनेक महिला तिला विचारायच्या. ``तुझे वडील कोण गं ? काय करतात ते? तुझी आई कपाळावर कुंकू का लावत नाही..?"
एक ना एक, भाराभर चौकशा..
घरी आल्यावर छोटी सई आपल्या आईला शकुंतलाबाईना हे सांगायची. त्यावर खमक्या शकुंतलाबाई परांजपे यांनी आपल्या लहानगीला एक जालीम उत्तर शिकवले.
पुढच्या वेळेला त्या बायांनी सईला घेरले आणि तिच्या वडलांविषयी विचारले तेव्हा आईने शिकवल्याबरहुकुम सईने आपल्या कंबरेवर एक हात ठेवला, दुसरा हात हवेत प्रश्नांकित पद्धतीने उंचावत प्रतिप्रश्न केला.
"पण तुम्ही या चांभारचौकशा कशाला करता?"
त्या दिवसानंतर शाळेत सईला या नाना प्रश्नांपासून सुटका मिळाली. "
त्या दैनिकाच्या छोट्याशा स्टुडिओत मुलाखतकर्त्या मुलीने आपली खुर्ची सोडून, उभे राहून आणि कंबरेवर हात ठेवून साभिनय हा प्रसंग सादर केला तेव्हा मी थक्क झालो होतो.
आपल्या विषयाचे त्या तरुण पत्रकार मुलीला पूर्ण ज्ञान होते, मी काही त्या विषयातला तसा तज्ज्ञ नव्हतो. केवळ एक व्यावसायिक गरज म्हणून समोर मला ठेवून ती आपले काम करत होती याची मला तेव्हा जाणिव झाली.
या आधुनिक काळातील नवी पिढी माहिती, ज्ञान आणि कौशल्य या बाबतीत किती पुढे गेली आहे याची हा प्रसंग एक चुणूक होता.
(खूप म्हणजे तिसेक वर्षांनंतर, सई मोठ्या झाल्यानंतर आपल्या वडलांना रोम (`रोमा' ) विमानतळावर भेटल्या, तेव्हाचा प्रसंग त्यांनी `नोएल' या लेखात रेखाटला आहे. ''ए मुली, तुझे वडील कुठे असतात ग? " या वाक्याने मला बेजार केले होते'' असे त्यांनी या लेखात लिहिले आहे. ``बापलेकी'' या पद्मजा फाटक, दिपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस संपादित मौज प्रकाशनच्या पुस्तकात हा लेख मी अलीकडेच वाचला. -सौजन्य: मुक्ता अशोक टिळक, नाशिक , सई परांजपे यांचा हा लेख वाचताना तो सर्व भूतकाळ जिवंत उभा राहिल्यासारखा वाटला. )
या प्रसंगाने पत्रकारितेच्या क्षेत्रात चार दशके घालवलेल्या मला खूप काही शिकवले. या क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाविषयी आणि महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रातील नव्या पिढीबाबत..
दोन्हीही खूप, खूप आश्वासक आहेत..
सुरुवातीच्या काळात मराठी माध्यमातल्या असलेल्या मी बीए झाल्यानंतर पणजीला `द नवहिंद टाइम्स'मध्ये थेट इंग्रजी पत्रकारीतेत पाऊल टाकून पणजीला द नवहिंद टाइम्स मध्ये अनेक वर्षे टक्केटोपणे खात हळूहळू काय प्रगती केली ते मलाच माहित आहे.. आताच्या पिढीला पाण्यात उतरल्यावर लगेच पोहायला सुरुवात करावी लागते.
त्यामुळेच नव्या तंत्रज्ञानाप्रमाणेच नव्या पिढीचेसुद्धा खूप कौतुक वाटते.
`महाराष्ट्र टाइम्स'च्या मटा गोल्ड पॉडकास्ट ने या आठवड्यात एक वर्षपूर्ती केली. त्यानिमित्त ही टिपण्णी..
^^^

No comments:

Post a Comment