पुण्यात स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत महात्मा जोतिबा फुले शिकले, सावित्रीबाई यांनी स्कॉटिश मिशनरी मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये अद्यापनाचे शिक्षण घेतले असा उल्लेख फुले दाम्पत्याचे अनेक चरित्रकार करतात.
हंटर शिक्षण आयोगासमोर दिलेल्या लेखी निवेदनात जोतिबा फुले म्हणतात की त्यांनी आपल्या शाळा मिसेस मिचेल यांच्याकडे चालवण्यासाठी दिल्या अन् या शाळा आजही (१८८२ साली ) चालू आहेत.
या स्कॉटिश मिशन शाळेतील जोतिबा फुले यांचे शिक्षक कोण होते, फुले यांनी स्कॉटिश मिशन शाळेत काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली ती शाळा चालवणारे मिशनरी कोण याचा उल्लेख कुठल्याही फुले चरित्रांत चरित्रकार करत नाही.
जोतिबांनी सुरु केलेल्या शाळा पुढे चालवण्याची जबाबदारी घेणाऱ्या या मिसेस मिचेल कोण?
मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी शाळा सुरु करणाऱ्या जोतिबांचा पुण्यात १८५०च्या दशकाच्या. सुरुवातीला जंगी सत्कार करण्यात आला, शालजोडीही भेट म्हणून देण्यात आली.
या कौतुक समारंभाला हजर असलेल्या शहरातील देशी विदेशी प्रतिष्ठित व्यक्तींची नावे त्याकाळच्या वृत्तपत्रांत झळकतात. फुले चरित्रांत ही नावे येतात, त्यामध्ये रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल ही नावे आहेत.
जोतिबांबरोबर या कामात त्यांना साथ देणाऱ्या सावित्रीबाई यांचाही या कार्यक्रमात सत्कार व्हायला हवा होता, तो झाला की.नाही हे आता कळणार नाही. हंटर आयोगातल्या निवेदनात हे शिक्षणकार्य आपल्या पत्नीच्या मदतीने केले असा सावित्रीबाईंना त्यांचे श्रेय देताना, त्यांचे ऋण मान्य करताना जोतिबा स्पष्ट उल्लेख करतात. जोतिबा या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात लिहितात:
``सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन १८५४ ( १८५३) च्या सुमारास झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनीं कित्येक वर्षांपर्यंत त्या शाळेत काम केले. ’’
कोण आहेत हे जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल? काय म्हणून हे मिशनरी दांपत्य जोतिबांच्या सत्काराला उपस्थित होते?
हेच ते रेव्हरंड जेम्स मिचेल जोतिबांचे शिक्षक, ज्यांच्या स्कॉटिश शाळेत जोतिबा १८४१ ते १८४७ या काळात इंग्रजी शिकले. ( जोतिबांचे हंटर कमिशनला दिलेले इंग्रजी निवेदन मुळातून वाचण्यासारखे आहे. त्यांचे या भाषेवरील प्रभुत्व त्यातून दिसते.)
आणि जेम्स मिचेल यांच्या पत्नी मिसेस मिचेल म्हणजे सावित्रीबाईंच्या शिक्षिका मिसेस (मार्गारेट शॉ ) मिचेल.
यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये सावित्रीबाईंनी शिक्षकिणिचा (अद्यापनाचा ) अभ्यासक्रम पूर्ण केला ! याच मिसेस मिचेल यांनी जोतिबा दांपत्याने सुरू केलेल्या शाळा पुढे चालवल्या.
आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा असा भर मांडवात सत्कार होताना या मिशनरी मिचेल दाम्पत्याच्या भावना काय असतील याची आपण केवळ कल्पना करू शकतो.
स्कॉटलंडहून रेव्हरंड जेम्स मिचेल भारतात १८२९ साली आले. रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन आणि जेम्स मिचेल या दोघांनी पुण्यात स्कॉटिश मिशनचे कार्य पुण्यात १८३० साली सुरु केले, येथे शाळा सुरू केल्या.
याच शाळांत जोतिबा फुले, त्यांचे मित्र (आणि नंतर त्यांच्या समाजकार्यातले सहकारी) सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे यांचे शिक्षण झाले असे धनंजय कीर आणि इतर फुले चरित्रकार लिहितात.
जेम्स मिचेल यांच्या जोडीला पुण्यात नंतर रेव्हरंड जॉन मरे मिचेल आले. तिथल्या संस्कृत कॉलेज (नंतर पूना कॉलेज आणि आताचे डेक्कन कॉलेजचे) प्रिन्सिपल किंवा व्हिझिटर बनले आणि जोतिबा फुले यांचे घनिष्ट स्नेही बनले.
जॉन मरे मिचेल यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्याकाळच्या सामाजिक स्थितीचा तो एक उत्तम दस्तऐवज आहे, मात्र फुले दाम्पत्याच्या बहुतेक चरीत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
जोतिबांच्या चरित्रातील उल्लेख होणाऱ्या `चटईचा विटाळ' आणि `वर्गातल्या अस्पृश्य विद्यार्थ्याना ढेकळाने मारणारे पंतोजी' वगैरे घटना या जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलेल्या आहेत.
अलीकडेच मी जोतिबा फुले यांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि सावित्रीबाई यांच्या अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगर येथील शिक्षिका मिस सिंथिया फरारबाई यांचे चरित्र लिहिले.
आता जोतिबांचे शिक्षक असलेल्या रेव्हरंड जेम्स मिचेल यांचेही चरित्र लिहिले आहे. हे चरित्र जेसुईट धर्मगुरूंच्या संस्थेतर्फे `स्नेहसदन', पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या `निरोप्या' मासिकाच्या या महिन्याच्या (डिसेंबर २०२३) नाताळ विशेषांकात प्रसिद्ध झाले आहे.
विशेष म्हणजे `निरोप्या' हे मराठी पत्रकारितेतील एक सर्वांत दीर्घायुषी (स्थापना १९०३) नियतकालिक आहे.
रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्रावर आधारित त्यांचे सविस्तर चरित्र मी लिहिले आहे, तेसुद्धा लवकरच प्रसिद्ध होईल.
Camil Parkhe
No comments:
Post a Comment