Showing posts with label Sai Paranjape. Show all posts
Showing posts with label Sai Paranjape. Show all posts

Monday, September 18, 2023

नव्या तंत्रज्ञानाप्रमाणेच नव्या पिढीचेसुद्धा कौतुक

 कामिल सर.. मी अमुक अमुक... शकुंतला परांजपे यांच्याविषयी तुम्ही बोलाल का?

चारपाच दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांत मला अचानक महत्त्व आले होते, अनेकांनी माझी मुलाखत घेतली होती, काहींनी माझा तो जुनाच लेख पुन्हा प्रसारीत केला होता. राष्ट्रपातळीवरच्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) ने माझ्यावर खास लेख केला असल्याने राष्ट्रीय पातळीवर तो बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध झाला होता.
विषय होता इंटरनॅशनल फेमस, अनेक तरुणींना आपल्या मोहजालात अडकवून त्यांची हत्या करणाऱ्या खतरनाक गुन्हेगार आणि `सेलिब्रिटी क्रिमिनल' असे वलय प्राप्त झालेल्या चार्ल्स सोबराजची नेपाळच्या तुरुंगातून सुटका झाली होती आणि आता म्हातारा झालेला तो मायदेशी फ्रान्सला रवाना होणार होता. तिहार तुरुंगातून पलायन करून फरार झालेल्या चार्ल्स सोबाराजला गोव्यात पर्वरी येथे पकडणारे मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे योगायोगाने सिंगापूरहून काही दिवसांसाठी मुंबई-पुण्यात परतले होते, त्यामुळे त्यांची अनेकांनी मुलाखत घेतली होती.
बैलगाड्याबरोबर नळ्याची पण यात्रा होत असते, इंग्रजीत "Basking in reflected glory" असे म्हणतात. त्याप्रमाणे चार्ल्स सोबराज आणि माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांच्यावर यानिमित्ताने प्रकाशझोत होता, आणि त्याच संदर्भात माझीसुद्धा मुलाखत घेतली जात होती.
याचे कारण म्हणजे जेव्हा मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांच्या टिमने पर्वरीत `ओ कोकेरो' हॉटेलात सोबराजच्या अक्षरशः मुसक्या आवळल्या आणि त्याला जेरबंद करून खासगी टॅक्सीतून मध्यरात्री गोव्यातून मुंबईला नेण्याची तयारी सुरु होती तेव्हा त्या रविवारी रात्री साडेनऊच्या आसपास तिथे म्हापशात मी हजर होतो. चाळीस वर्षांपूर्वी ..
त्या मुलाखतींनंतर लगेच आठवड्याभरात पुन्हा त्याच मराठी दैनिकाच्या कार्यालयातून मला मुलाखतीसाठी विचारणा होत होती आणि यावेळी निमित्त होते शकुंतला परांजपे यांची जयंती.
आणि या विषयावरच्या दुसऱ्या तज्ज्ञ म्हणून आणखी एक व्यक्ती होत्या. शकुंतलाबाईंप्रमाणेच सेलिब्रिटी असलेल्या त्यांच्या कन्या सई परांजपे...
आता शकुंतला परांजपे आणि माझे नेमके काय नाते? तर नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला शकुंतलाबाई आणि माझी चांगली गट्टी जमली होती. आमच्या दोघांच्या वयांत साठ वर्षांचा फरक होता. त्या आयुष्याच्या नव्वदीकडे वाटचाल करत होत्या आणि मी तिशीकडे.
त्यावेळी मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये कामाला होतो, बातमीदार म्हणून शकुंतलाबाईना पद्मभूषण मिळाले तेव्हा त्याची मी मुलाखत घेतली होती. आणि दुसरे म्हणजे आम्ही दोघे सख्खे शेजारी होतो. पुण्यात डेक्कनला शकुंतलाबाई परांजपे या हॉटेल वैशालीमागच्या आपल्या `पुरुषोत्तम' बंगल्यात म्हणजे परांजपे बंगल्यात राहत होत्या आणि त्याच फर्ग्युसन रोडच्या दुसऱ्या बाजूला ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी (BCL) मागे रानडे इन्स्टिट्युटसमोर हॉटेल हिलव्हयुच्या लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर मी राहायचो. त्यामुळे लेखाच्या बातमीचा संदर्भात नियमितपणे त्यांना भेट द्यायचो.
त्यावेळी या भेटी दरम्यान त्या मला आपल्या विदाऊट फिल्टर पनामा सिगारेट ऑफर करायच्या आणि मग त्यावेळी चेन स्मोकर असलेल्या मला माझी फोर स्केेअर सिगारेट ओढायची परवानगी आणि धाडसही नसायचे. तोपर्यंत शकुंतलाबाईंच्या स्वभावाची मला चांगली ओळख झाली होती. .खूप काही सांगता येईल ते मी माझ्या शकुंतलाबाईंवरच्या लेखात लिहिले आहे.
आणि त्याच लेखाच्या संदर्भात मला आज या दैनिकाच्या हापिसातून फोन आला होता. त्यासंदर्भात माझी पॉडकास्ट मुलाखत घेतली जाणार होती.
माझ्या सवयीप्रमाणे नेहेमीप्रमाणे मी नमनालाच घडाभर तेल ओतले आहे. मुद्द्यावर येतो. विषय चार्ल्स सोबराज किंवा शकुंतलाबाई परांजपे किंवा अस्मादिक पण नाही.
मुलाखत सुरु करण्यापूर्वी प्राथमिक चर्चेत मुलाखतकर्त्या तरुणीला विचारले कि तिने माझे शकुंतलाबाई परांजपे यांच्यावर लिहिलेले लेख वाचले आहेत का?
अपेक्षेप्रमाणे होकारात्मक उत्तर आले, पण त्याहून अधिक धक्कादायक माहिती समोर आली.
त्या मुलीने शकुंतलाबाईंच्या नामांकित कन्येची म्हणजे अर्थातच सई परांजपे यांची मुलाखत बेळगाव येथे झाली तेव्हा आपल्या पालकांसह तिने ऐकली होती.
त्यानंतर तिने त्या मुलाखतीतला एक प्रसंग मला सांगितला.
"छोटी सई शाळेत जायची तेव्हा अनेक महिला तिला विचारायच्या. ``तुझे वडील कोण गं ? काय करतात ते? तुझी आई कपाळावर कुंकू का लावत नाही..?"
एक ना एक, भाराभर चौकशा..
घरी आल्यावर छोटी सई आपल्या आईला शकुंतलाबाईना हे सांगायची. त्यावर खमक्या शकुंतलाबाई परांजपे यांनी आपल्या लहानगीला एक जालीम उत्तर शिकवले.
पुढच्या वेळेला त्या बायांनी सईला घेरले आणि तिच्या वडलांविषयी विचारले तेव्हा आईने शिकवल्याबरहुकुम सईने आपल्या कंबरेवर एक हात ठेवला, दुसरा हात हवेत प्रश्नांकित पद्धतीने उंचावत प्रतिप्रश्न केला.
"पण तुम्ही या चांभारचौकशा कशाला करता?"
त्या दिवसानंतर शाळेत सईला या नाना प्रश्नांपासून सुटका मिळाली. "
त्या दैनिकाच्या छोट्याशा स्टुडिओत मुलाखतकर्त्या मुलीने आपली खुर्ची सोडून, उभे राहून आणि कंबरेवर हात ठेवून साभिनय हा प्रसंग सादर केला तेव्हा मी थक्क झालो होतो.
आपल्या विषयाचे त्या तरुण पत्रकार मुलीला पूर्ण ज्ञान होते, मी काही त्या विषयातला तसा तज्ज्ञ नव्हतो. केवळ एक व्यावसायिक गरज म्हणून समोर मला ठेवून ती आपले काम करत होती याची मला तेव्हा जाणिव झाली.
या आधुनिक काळातील नवी पिढी माहिती, ज्ञान आणि कौशल्य या बाबतीत किती पुढे गेली आहे याची हा प्रसंग एक चुणूक होता.
(खूप म्हणजे तिसेक वर्षांनंतर, सई मोठ्या झाल्यानंतर आपल्या वडलांना रोम (`रोमा' ) विमानतळावर भेटल्या, तेव्हाचा प्रसंग त्यांनी `नोएल' या लेखात रेखाटला आहे. ''ए मुली, तुझे वडील कुठे असतात ग? " या वाक्याने मला बेजार केले होते'' असे त्यांनी या लेखात लिहिले आहे. ``बापलेकी'' या पद्मजा फाटक, दिपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस संपादित मौज प्रकाशनच्या पुस्तकात हा लेख मी अलीकडेच वाचला. -सौजन्य: मुक्ता अशोक टिळक, नाशिक , सई परांजपे यांचा हा लेख वाचताना तो सर्व भूतकाळ जिवंत उभा राहिल्यासारखा वाटला. )
या प्रसंगाने पत्रकारितेच्या क्षेत्रात चार दशके घालवलेल्या मला खूप काही शिकवले. या क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाविषयी आणि महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रातील नव्या पिढीबाबत..
दोन्हीही खूप, खूप आश्वासक आहेत..
सुरुवातीच्या काळात मराठी माध्यमातल्या असलेल्या मी बीए झाल्यानंतर पणजीला `द नवहिंद टाइम्स'मध्ये थेट इंग्रजी पत्रकारीतेत पाऊल टाकून पणजीला द नवहिंद टाइम्स मध्ये अनेक वर्षे टक्केटोपणे खात हळूहळू काय प्रगती केली ते मलाच माहित आहे.. आताच्या पिढीला पाण्यात उतरल्यावर लगेच पोहायला सुरुवात करावी लागते.
त्यामुळेच नव्या तंत्रज्ञानाप्रमाणेच नव्या पिढीचेसुद्धा खूप कौतुक वाटते.
`महाराष्ट्र टाइम्स'च्या मटा गोल्ड पॉडकास्ट ने या आठवड्यात एक वर्षपूर्ती केली. त्यानिमित्त ही टिपण्णी..
^^^

Sunday, May 3, 2020

शकुंतलाबाई परांजपे : खमक्या स्वभावाच्या, बंडखोर, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या

शकुंतलाबाई  परांजपे : खमक्या स्वभावाच्या, बंडखोर, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या

पडघम - माध्यमनामा
कामिल पारखे


  • शकुंतलाबाई परांजपे, ‘कुंकु’ या सिनेमातील भूमिका, ‘निवडक शकुंतला परांजपे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचे एक मुखपृष्ठ
  • Sat , 02 May 2020
  • पडघममाध्यमनामाशकुंतला परांजपेShakuntala Paranjpyeरँग्लर परांजपेWrangler Paranjpyeसई परांजपेSai Paranjpye
उद्या, ३ मे, शकुंतला परांजपे यांची २०वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आणि त्या आजूबाजूला इतिहासाचे मैलाचे दगड अनेक आहेत. तेथील वैशाली हॉटेलला लागून असलेल्या बोळीत शंभर-दीडशे मीटर अंतरावर असलेला ‘पुरुषोत्तमाश्रम’ किंवा ‘रँग्लर परांजपे बंगला’ असाच एक मैलाचा दगड. एक पत्रकार म्हणून या बंगल्याशी काही काळ माझे घट्ट नाते जुळले होते. याचे कारण होत्या त्या बंगल्यातील त्यावेळच्या रहिवाशी शकुंतला परांजपे.
शकुंतलाबाई  परांजपेंना १९९१ साली ‘पद्मभूषण’ किताब जाहीर झाला आणि त्यानिमित्ताने ‘इंडियन एक्सप्रेस’च्या बातमीदार संगीता जहागीरदार-जैन आणि छायाचित्रकार मिलिंद वाडेकर यांच्याबरोबर मी त्यांची त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेतली. नव्वदच्या दशकाच्या सुमारास पद्मश्री, पद्मभूषण वगैरे पुरस्कारांचे आजच्याइतके अवमूल्यन झालेले नव्हते. त्यामुळे वृत्तपत्रे पुरस्कार विजेत्यांच्या मुलाखती छापत असत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या शकुंतलाबाईंना ‘पद्मभूषण’ किताब जाहीर  झाला होता. या मुलाखतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एका अत्यंत ख्यातनाम कुटुंबाच्या ऐतिहासिक बंगल्यात मला प्रवेश मिळाला. त्या वेळी महाराष्ट्राच्या मागील पाच-सहा दशकांच्या सामाजिक इतिहासाची नव्वदीकडे वाटचाल करणाऱ्या शकुंतलाबाईंकडून वेगळीच तोंडओळख झाली!
मुलाखतीदरम्यान शकुंतलाबाईंना त्यांच्या या वयात फोटोसाठी साडी वा एखादा चांगला ड्रेस घालण्याचा आग्रह करणे शहाणपणाचे नव्हते. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी बहुधा ते ऐकलेही नसते. म्हणून छायाचित्रकार मिलिंद वाडेकरने गाऊनआणि त्यावर जाकिट असे छायाचित्र घेतले. तेच मुलाखतीबरोबर छापण्यात आले.
महाराष्ट्राचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास परांजपे कुटुंबाचा उल्लेख टाळून होऊ शकत नाही. रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे इंग्लंडला जाऊन गणितातली सिनियर रँग्लर ही अत्यंत मानाची पदवी मिळवणारे पहिले भारतीय. विद्यार्थी असलेल्या विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी पुण्यात विलायती कापडांची होळी केली, तेव्हा शिस्तभंग म्हणून फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य असलेल्या परांजपे यांनी त्यांना दंड केला. त्यामुळे संतापलेल्या लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’त त्यांच्याविरुद्ध खरमरीत अग्रलेख लिहिला. तसे त्यांच्याविरुद्ध ‘केसरी’मध्ये अनेक अग्रलेख प्रसिद्ध झाले आहेत.
या रॅंग्लर परांजपे यांच्या शकुंतला या एकुलत्या कन्या. युरोपात केंब्रिजला शिक्षणासाठी असताना यूरा स्लेप्टझॉप या रशियन चित्रकाराशी त्यांनी लग्न केले. नंतर झालेल्या घटस्फोटानंतर १९३७ला मुलीला म्हणजे सईला  घेऊन त्या परत वडिलांकडे पुण्याला राहायला आल्या आणि अखेरपर्यंत तेथेच राहिल्या.  
युरोपातून परतल्यावर शकुंतलाबाईंनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत मध्यवर्ती भूमिका केल्या. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘कुंकू’ हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट. ‘दुनिया ना माने’ हा या चित्रपटाचा हिंदी रिमेक.
मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या आतेभावाने म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी आपल्या संततिनियमनाच्या प्रचारकामात मदत मागितली म्हणून त्या कुटुंबनियोजनाचा पुण्यातून प्रसार करू लागल्या. त्या काळात पुण्याबाहेर नदीपलीकडे असलेल्या भांबुर्डा येथील म्हणजे आताच्या शिवाजीनगरमधल्या परांजपेंच्या बंगल्यात त्या महिलांना संततीनियोजनासाठी खास बनवलेल्या टोप्या, जेली नाममात्र भावात विकू लागल्या. निरोध आणि गर्भनिरोधकांच्या गोळ्या वा संततीनियमनाची कुठल्याही पद्धती तोपर्यंत सुशिक्षित वा इतर सामान्य लोकांच्या कानावर पोहोचल्या नव्हत्या. लैंगिक विषयांवर बोलणे वा लिहिणे त्या काळात  पूर्णतः निषिद्ध होते.
महर्षी कर्वे यांच्या रघुनाथ या मुलाने आणि फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांच्या शकुंतला या मुलीने कामजीवनावर बोलावे, लिहावे आणि संततीनियोजनाचा प्रचार करावा ही कल्पना सनातनी मंडळींच्या पचनी पडणे अवघड होते. मात्र शकुंतला परांजपे या र. धों. कर्व्यांसारख्याच खमक्या स्वभावाच्या, बंडखोर, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या असल्याने त्यांनी या कुणाला भीक घातली नाही. संततिनियमनाची ही चळवळ त्यांनी १९३८ पासून १९५८ पर्यंत चालवली.
शकुंतलाबाईंच्या त्या पहिल्या भेटीत त्यांची थोरवी माझ्या लक्षात येणे शक्य नव्हते. पत्रकाराने मुलाखतीला जाण्याआधी त्या व्यक्तीची माहिती वा कुंडली गुगलवर पाहण्याची सोय तीन दशकापूर्वीच्या जमान्यात नव्हती. आपला बायोडेटा टाईप करून  ठेवण्याची प्रथाही तोपर्यंत रूढ झालेली नव्हती. शकुंतला परांजपे यांचे मोठेपण मला त्याच वेळी समजले असते तर कदाचित त्यांच्याकडे पुन्हापुन्हा जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसण्याचे, त्यांना पूर्वसूचना न देता डिस्टर्ब करण्याची मला हिंमत झाली नसती.
शकुंतलाबाईंची माझी मुलाखत ‘टाइम्स ऑफ इंडिया’, पुणे प्लस आणि महाराष्ट्रातील काही मराठी दैनिकांत छापून आल्यानंतर काही दिवसानंतर मी त्यांना पुन्हा भेटायला गेलो. नंतर या भेटी वाढत गेल्या. आमच्या दोघांच्या राहण्याच्या जागेमध्ये केवळ फर्ग्युसन कॉलेज रस्ता होता. याचे कारण परांजपे बंगला वैशाली हॉटेलच्या मागे तर माझी कॉटबेस मंथली लॉज रस्त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या मागेच होती. या काळात शकुंतलाबाईंची मुलगी नाट्य-सिनेमा दिग्दर्शिका सई परांजपे वा त्यांची नात विनी परांजपे मुंबईत राहत असत. त्यामुळे त्या दोघींची माझी कधीही भेट झाली नाही.
परांजपे कुटुंबियांच्या मार्जारप्रेमाविषयी तसेच ब्रिज खेळण्याच्या आवडीविषयी भरपूर लिहिले गेले आहे. शकुंतलाबाईंच्या घरी गेल्यावर छोटेसे फाटक उघडून तळमजल्यावरची बेल वाजवल्यावर केअरटेकरने दार उघडल्यानंतर डाव्या बाजूच्या खोलीत गेले की, शकुंतलाबाई समोर यायच्या. त्यावेळी त्यांच्या पायापाशी घुटमटणारी किमान पाच-सहा लहान-मोठ्या वयाची मांजरे असायची. शकुंतलाबाईंच्या हातात आयताकृती पत्र्याचा स्वीटचा बॉक्स असायचा. जुने लाकडी फर्निचर असलेल्या त्या खोलीत गप्पांसाठी बसले की, थोड्या वेळानंतर शकुंतलाबाई त्या बॉक्समधून काढून मला स्वीट द्यायच्या. आसपास लुडबुडणाऱ्या मांजरांशी बोलत त्यांनाही काहीतरी खायला द्यायच्या. मधूनच बॉक्समधून सिगारेट काढून ती लायटरने शिलगावणार. केंब्रिजला शिकायला गेल्यावर सिगारेट ओढण्याची सवय त्यांना लागली होती. त्या काळात गोव्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेला फोर स्क्वेअर ग्रीन हा माझा सिगारेटचा आवडता ब्रँड. पण शकुंतलाबाई मला आपली बिनाफिल्टर पनामा सिगारेट ओढण्याचा आग्रह करायच्या. तो आग्रह मोडण्याचा अन त्यांचे मन दुखावण्याचे धाडस मी कधी केले नाही!
बुटकी मूर्ती,  घारे डोळे असलेल्या, डोक्यावर पूर्ण पिकलेल्या केशसंभाराचा बॉबकट आणि तोंडाचे बोळके झालेल्या शकुंतलाबाईंचे हसणे अगदी निरागस असायचे. प्रसन्न मूड असला म्हणजे त्या स्वतःविषयी आणि  र. धों. किंवा  आप्पा कर्व्यांविषयी, जुन्या काळाविषयी भरभरून बोलायच्या. रघुनाथराव कर्व्यांबरोबर संततीनियमनाचा त्या कशा प्रचार करायच्या, संततीनियमनाची साधने घेण्यासाठी खानदानी महिला त्यांच्या घरी येण्यासाठी घाबरत असत याविषयी त्या सांगत असत. र. धों.च्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकात दरवेळी शकुंतलाबाईंच्या संततिनियमनाच्या साधनांची म्हणजे टोपी, जेली वगैरेंची जाहिरात असायची. ही जाहिरात पुढीलप्रमाणे असायची -
पुणेकरांची सोय
श्री शकुंतलाबाई परांजपे या स्त्रियांस  स्वतः तपासून योग्य आकाराच्या रबरी टोपीची निवड करून ती वापरण्यासंबंधी संपूर्ण माहिती देतील. टोपीबरोबर वापरावी लागणारी जेली व टोपीही त्यांजकडेच विकत मिळेल. गरजूंनी त्यांजकडे चौकशी करावी. भेटण्याची वेळ दुपारी ३ ते ५. पत्ता नं १२२०, रँग्लर परांजपे रोड, भांबुर्डा, पुणे ४.
ही जाहिरात त्या काळात पुण्यात व बाहेरही सनातनी आणि आंबटशौकीन मंडळींच्या चेष्टेचा आणि टवाळीचा विषय बनली होती. नियतकालिकांतही या जाहिरातीबद्दल काहीबाही छापून येत असे. नव्वदच्या दशकात एका खासगी कंपनीने पूजा बेदी या मॉडेलला घेऊन टेलिव्हिजनवर आपल्या निरोध उत्पादनाची पहिल्यांदा जाहिरात केली, तेव्हा देशभरातील समाजात किती खळबळ उडाली होती! ही तर अगदी अलीकडची गोष्ट आहे. आता तर निरोधच्या जाहिराती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दाखवण्यास बंदीच आहे. आजची ही स्थिती आहे, तर शकुंतलाबाईंची ती जाहिरात तर मागील शतकाच्या चाळीसच्या दशकात प्रसिद्ध व्हायची!! त्या वेळी त्यांना किती टवाळखोरीला आणि निंदानालस्तीला तोंड द्यावे लागले असेल याची कल्पनाच केलेली बरी!!! मात्र शकुंतलाबाईंनी या टीकेला उडवून लावले. त्यांचा स्वभावच तसा होता.
अशाच एका भेटीत ‘समाजस्वास्थ्य’चा एक अंक शकुंतलाबाईनी मला दिला. मासिकाच्या मुखपृष्ठावर नेहमीप्रमाणे नग्न स्त्रीचा फोटो आणि आतल्या पानावर मासिकाचे पुढील ब्रीदवाक्य- ‘अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा इतर वस्तूचा गुण नसून तो फक्त तसा आरोप करणारांच्या मनाचा गुण होय.’ (ऑबसेनीटी लाईज इन दी आईज ऑफ दी बिहोल्डर) या प्रसिद्ध वाक्याचे हे मराठी रूपांतर. र. धों. कर्व्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मराठीतील पहिल्या वैज्ञानिक कामजीवनावरील मासिकावर अश्लीलतेचा आरोप करणाऱ्यावर हे ब्रीदवाक्य म्हणजे एक चपराकच होती. रघुनाथराव एका अश्लीलतेच्या दाव्यात दोषी ठरून त्यांना दंड झाला, तेव्हापासून त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’मध्ये मासिकात हे ब्रीदवाक्य छापण्यास सुरुवात केली.  तो  १५ मार्च  १९४०चा दोन आणे किंमतीचा अंक आजही एक अमूल्य भेट आणि ऐतिहासिक वारसा म्हणून मी जपला आहे.
रघुनाथरावांच्या लेखांमुळे त्यांच्यावर अश्लीलतेच्या कायद्यानुसार खटले भरण्यात आले. रघुनाथरावांवर १९३१ साली पहिला खटला भरण्यात आला, तेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये जिनिव्हा येथे काम करणाऱ्या शकुंतलाबाईंनी त्यांना खटल्याच्या खर्चासाठी दोन पौंड पाठवून दिले होते. काही खटल्यांत रघुनाथरावांना शिक्षाही झाल्या. यापैकी एका अश्लीलतेच्या प्रकरणात तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी र.धो. कर्व्यांचे वकीलपत्र घेतले होते.
या मासिकात शकुंतला परांजपेंची एक लेखमालिकाही होती. रघुनाथराव कर्व्यांचे १४ ऑक्टोबर १९५३ ला  निधन झाल्यावर हे मासिक पुढे चालवण्याची विनंती मात्र शकुंतलाबाईंनी धुडकावून लावली. त्याबाबत त्या म्हणतात – “ ‘समाजस्वास्थ’चा  एकखांबी तंबू  काळाचं बोलावणं येईपर्यंत आप्पानं खंबीरपणे उचलून धरला. तो  गेल्यानंतर हे  मासिक मी चालवावं  अशी अनेकांनी गळ घातली. पण माझी कुवत मी ओळखते. धूमकेतूप्रमाणे चमकून गेलेल्या र. धो. कर्व्यांच्या ‘समाजस्वास्थ’चा मला विचका करायचा नव्हता.”
ब्रिटिश सरकारने १९४४ साली रँग्लर परांजपेंची ऑस्ट्रेलियातील हिंदुस्थानचे पहिले उच्चायुक्त म्हणून नेमणूक केली. त्यानिमित्ताने तीन वर्षे शकुंतलाबाईंचे ऑस्ट्रेलियात वास्तव्य होते.
कॉलेज जीवनात वीर सावरकरांना रँग्लर परांजप्यांनी शिक्षा केली होती, तरी ते नंतर परांजपे यांना भेटायला अनेकदा घरी येत असत. एकदा त्यांच्याबरोबर नथुराम गोडसेसुद्धा आला होता, अशी आठवण शकुंतलाबाईंनी सांगितली आहे.
शकुंतलाबाई १९५८ ते  १९६४ या काळात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभासद होत्या  राज्यसभेच्या राष्ट्रपतिनियुक्त सभासद म्हणून १९६४नंतर एक मुदतभर त्यांनी काम केले. संसदेच्या कामकाजाच्या दर्जाबाबत आणि सभागृहातील खासदारांच्या वर्तनाबाबत त्यांनी आपल्या एका लेखात खंत व्यक्त केली आहे.
ब्रिज खेळणे हा परांजपे कुटुंबियांचा आवडता विरंगुळा. या खेळामुळे दिल्लीतील आपले जीवन सुसह्य झाले असे त्यांनी लिहिले आहे. राजधानीत अनुभवलेली  भ्रष्टाचाराची प्रकरणे, लोकशाही मूल्यांचा ऱ्हास, पक्षातंरे वगैरेंमुळे भ्रमनिरास होऊन दिल्लीला रामराम ठोकताना हायसे वाटले असे त्या म्हणतात…
मुंबई इलाख्यात १६ वर्षे पूर्ण केल्याशिवाय मॅट्रिकच्या परीक्षेला बसता येत नसे. शिक्षणमंत्री झाल्यावर रँग्लर परांजपेंनी हा नियम बदलला. याचा फायदा पंधरा वर्षांच्या शकुंतलाला होत होता. मात्र आपल्या मुलीसाठी हा नियम बदलला असा आरोप होऊ नये म्हणून त्यांनी तिला त्या वर्षी मॅट्रिकच्या परीक्षेला बसू दिले नाही. अशा शिक्षणमंत्र्यांची मुलगी असलेल्या शकुंतलाबाईंना दिल्लीतल्या या वातावरणाशी मिळतेजुळते घेणे अवघड वाटणारच.
सत्तरच्या दशकातील संसदेतील अनुभव सांगताना त्या  लिहितात – “उत्तम वक्ता म्हणून कोणा व्यक्तीचे नाव घ्यायचे झाले तर ते श्री अटल बिहारी वाजपेयी यांचे. दोन्ही सभागृहांत त्यांचा हात धरणारा कोणी नाही. त्यांची विनोदबुद्धी त्यांच्या वक्तव्याइतकीच अभिजात आहे.”
शकुंतलाबाईंच्या फटकळ स्वभावाचाही मी अनेकदा अनुभव घेतला. तुम्ही आत्मचरित्र का लिहीत नाही, असे एकदा मी विचारल्यावर त्या खवळल्या होत्या. त्यांचा मूड लगेच ऑफ झाला, मग मी तेथून काढता पाय घेतला.
शकुंतलाबाईंच्या घरी झालेल्या अशा अनेक भेठीगाठीनंतर त्यांचे एक व्यक्तिचित्र मी लिहिले होते. ‘उत्तुंग’ या शीर्षकाच्या १९९३ साली प्रसिद्ध झालेल्या माझ्या व्यक्तिचित्रसंग्रहात त्याचा समावेश होता. माझ्या लग्नानंतर माझा मुक्काम डेक्कन जिमखान्यातून पिंपरी-चिंचवडला हलला आणि आमचे शेजारपण कायमचे तुटले.
मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे या रँग्लर परांजप्यांच्या घरी शकुंतला परांजपे यांच्याबरोबर वाढल्या. इरावतीबाईंनी ‘दुसरे मामंजी’ या आपल्या व्यक्तिचित्रणात रँग्लरांच्या सावलीत त्या दोघी कशा वाढल्या याविषयी छान लिहिले आहे. शकुंतलाबाईंनी मराठी आणि इंग्रजीतही भरपूर लिहिले आहे. र. धो. कर्व्यांवर ‘आप्पा कर्वे’ या नावाचा चटका लावणारा एक मोठा लेख त्यांनी लिहिला आहे. ‘सेन्स अँड नॉन्सेन्स’,  ‘थ्री इयर्स इन ऑस्ट्रेलिया’  ही त्यांची इंग्रजीतील, तर मराठीतील ‘काही आंबट काही गोड’,  ‘भिल्लिणिची बोरे’ ही मराठी पुस्तके गाजली. विनया खडपेकर यांनी संपादित केलेले ‘निवडक शकुंतला परांजपे’ या नावाचे एक पुस्तक राजहंस प्रकाशनने २०१७ साली प्रकाशित केले आहे. २९ लेखांचा आणि २७४ पानांचा हा ग्रंथ शकुंतलाबाईंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवतो.
‘माझी प्रेतयात्रा’ या लेखात शकुंतलाबाईंनी आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले आहे. आपले निधन झाले असे त्यांना स्वप्न पडून त्यानंतर आपली मुलगी सई, शेजारीपाजारी काय बोलतील, टिळक स्मारक मंदिरातील शोकसभेत काय भाषणे होतील, याविषयी हा लेख आहे. या कथित शोकसभेत मामा वरेरकर, कृष्णराव मराठे आणि आचार्य अत्रे वगैरे मंडळी शकुंतलाबाईंच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक घटनांचे, त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि जीवनशैलीचे पोस्टमार्टेम करतात  म्हणजे अक्षरशः  वाभाडे काढतात. स्वतःकडे तटस्थ वृत्तीने पाहतानाच ‘आपल्याला आवडले ते सर्व आपण केले, भले ते इतरांना आवडो ना आवडो’ अशी अप्रत्यक्ष भूमिका त्या या लेखात मांडतात.
शकुंतलाबाईंचा जन्म १७ जानेवारी १९०६चा. वयाच्या ९४व्या वर्षी म्हणजे ३ मे २००० रोजी त्यांचे निधन झाले.
वटवृक्षाखाली रोपटे वाढत नाही असे म्हणतात. शकुंतला परांजपे यांनी संततिनियमनाच्या चळवळीत र. धों. कर्व्यांना मोलाची मदत केली. मात्र आधी रॅंग्लर परांजप्यांची मुलगी म्हणून आणि नंतर दिग्दर्शिका सई परांजपे यांची आई म्हणून शकुंतलाबाईंना ओळख मिळाली. त्यांच्या कर्तृत्वावर हा खरे तर अन्याय. सुदैवाने शकुंतलाबाईंना ‘पद्मभूषण’ किताबाने सन्मानित करून भारत सरकारने ही कसर भरून काढली आणि त्यांचे योगदान अधोरेखित केले. नाट्य आणि सिनेमा क्षेत्रातील कामगिरीबद्दल शकुंतलाबाईंच्या कन्या सई परांजपे यांनाही भारत सरकारने २००६ साली ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवले. हा मानाचा पुरस्कार मिळवणाऱ्या या बहुधा एकमेव मायलेकी असाव्यात.  
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.