Showing posts with label Rome. Show all posts
Showing posts with label Rome. Show all posts

Sunday, June 30, 2024

पोप फ्रान्सिस भारतभेटीला

इटलीच्या दौऱ्यावर असताना शुक्रवारी G-7 बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले आहे.

परिषदेच्या यजमान असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलॉनी यांच्यासमवेत मोदीजी आणि पोप फ्रान्सिस यांचे हे छायाचित्र आहे.
मोदीजी यांनी याबाबत समाज माध्यम Xवर खालील टिपण्णी केली आहे.
“Met Pope Francis on the sidelines of the @G7 Summit. I admire his commitment to serve people and make our planet better. Also invited him to visit India. @Pontifex,”
G7 या राष्ट्रांच्या गटात भारताचा समावेश होत नसला तरी एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून भारताला या बैठकीचे आमंत्रण दिले जाते. इटलीत ही बैठक होत असल्याने व्हॅटिकन सिटीचे राष्ट्रप्रमुख या नात्याने पोप फ्रान्सिस यांनाही या बैठकीचे आमंत्रण होते.
याआधी मोदीजी पोपमहोदयांना व्हॅटिकन सिटीमध्ये २०२१ साली भेटले होते. तेव्हाही पोप फ्रान्सिस यांची गळाभेट घेऊन त्यांनी भारतभेटीचे आमंत्रण दिले होते.
दरम्यानच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील काही राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत.
इतर राष्ट्रप्रमुखांप्रमाणे पोप फ्रान्सिस यांचा दौरा अचानक होत नाही, याचे कारण त्यांची भेट ही नेहमीच धार्मिक उद्दिष्ट्याची ( Pastoral ) असते, त्यासाठी स्थानिक चर्चतर्फे खूप आधीपासून नियोजन केले जाते.
याआधी पोप जॉन पॉल दुसरे यांनी भारतात १९८६ साली दहा दिवसांचा दौरा केला होता, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ साली ते पुन्हा तीन दिवसांच्या भेटीसाठी भारतात आले होते.
पोप यांच्या भारतभेटीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहेमीच विरोध केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात पोप फ्रान्सिस यांनी आशियातील श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार अशा देशांना भेटी दिल्या होत्या. या देशांपेक्षा भारतात ख्रिश्चनांचे प्रमाण फार अधिक आहे.
मोदीजी यांचे भारतभेटीचे आमंत्रण केवळ औपचारीकता नसून अगदी मनापासून असेल तर भारतातील चर्चचे पदाधिकारी आनंदून या दौऱ्याच्या तयारीला लागतील.
भारतातील कॅथोलिक चर्च गेली अनेक वर्षे भारताने पोप यांच्या दौऱ्यास मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न करत आहेत.
पोप हे राष्ट्रप्रमुखसुद्धा असल्याने कुठल्याही दौऱ्यासाठी त्या देशाचे त्यांना औपचारिक आमंत्रण असणे आवश्यक असते.
भारत सरकारने पुन्हा औपचारिक आमंत्रण दिल्यास काही महिन्यांत पोप फ्रान्सिस यांचा भारतदौरा होऊ शकतो.
या वर्षाअखेरीस नोव्हेंबरात गोव्यात संत फ्रान्सिस झेव्हियरच्या पार्थिवाचे अवशेष दोन महिन्यासाठी भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
दर दहा वर्षानंतर होणाऱ्या या प्रदर्शनातून गोव्याला चांगला महसूल मिळत असतो.
संत फ्रान्सिस झेव्हियर हे सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट) किंवा येशूसंघ या धर्मगुरूंच्या संस्थेचे एक संस्थापक.
विशेष म्हणजे पोप फ्रान्सिस हे पोपपदावर निवड झालेले पहिलेच जेसुईट धर्मगुरु आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भारत दौऱ्यात गोव्याचाही समावेश असेल अशी आशा व्यक्त केली आहे.
Camil Parkhe

Monday, September 18, 2023

नव्या तंत्रज्ञानाप्रमाणेच नव्या पिढीचेसुद्धा कौतुक

 कामिल सर.. मी अमुक अमुक... शकुंतला परांजपे यांच्याविषयी तुम्ही बोलाल का?

चारपाच दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांत मला अचानक महत्त्व आले होते, अनेकांनी माझी मुलाखत घेतली होती, काहींनी माझा तो जुनाच लेख पुन्हा प्रसारीत केला होता. राष्ट्रपातळीवरच्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) ने माझ्यावर खास लेख केला असल्याने राष्ट्रीय पातळीवर तो बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध झाला होता.
विषय होता इंटरनॅशनल फेमस, अनेक तरुणींना आपल्या मोहजालात अडकवून त्यांची हत्या करणाऱ्या खतरनाक गुन्हेगार आणि `सेलिब्रिटी क्रिमिनल' असे वलय प्राप्त झालेल्या चार्ल्स सोबराजची नेपाळच्या तुरुंगातून सुटका झाली होती आणि आता म्हातारा झालेला तो मायदेशी फ्रान्सला रवाना होणार होता. तिहार तुरुंगातून पलायन करून फरार झालेल्या चार्ल्स सोबाराजला गोव्यात पर्वरी येथे पकडणारे मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे योगायोगाने सिंगापूरहून काही दिवसांसाठी मुंबई-पुण्यात परतले होते, त्यामुळे त्यांची अनेकांनी मुलाखत घेतली होती.
बैलगाड्याबरोबर नळ्याची पण यात्रा होत असते, इंग्रजीत "Basking in reflected glory" असे म्हणतात. त्याप्रमाणे चार्ल्स सोबराज आणि माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांच्यावर यानिमित्ताने प्रकाशझोत होता, आणि त्याच संदर्भात माझीसुद्धा मुलाखत घेतली जात होती.
याचे कारण म्हणजे जेव्हा मुंबई पोलिस अधिकारी मधुकर झेंडे यांच्या टिमने पर्वरीत `ओ कोकेरो' हॉटेलात सोबराजच्या अक्षरशः मुसक्या आवळल्या आणि त्याला जेरबंद करून खासगी टॅक्सीतून मध्यरात्री गोव्यातून मुंबईला नेण्याची तयारी सुरु होती तेव्हा त्या रविवारी रात्री साडेनऊच्या आसपास तिथे म्हापशात मी हजर होतो. चाळीस वर्षांपूर्वी ..
त्या मुलाखतींनंतर लगेच आठवड्याभरात पुन्हा त्याच मराठी दैनिकाच्या कार्यालयातून मला मुलाखतीसाठी विचारणा होत होती आणि यावेळी निमित्त होते शकुंतला परांजपे यांची जयंती.
आणि या विषयावरच्या दुसऱ्या तज्ज्ञ म्हणून आणखी एक व्यक्ती होत्या. शकुंतलाबाईंप्रमाणेच सेलिब्रिटी असलेल्या त्यांच्या कन्या सई परांजपे...
आता शकुंतला परांजपे आणि माझे नेमके काय नाते? तर नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला शकुंतलाबाई आणि माझी चांगली गट्टी जमली होती. आमच्या दोघांच्या वयांत साठ वर्षांचा फरक होता. त्या आयुष्याच्या नव्वदीकडे वाटचाल करत होत्या आणि मी तिशीकडे.
त्यावेळी मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये कामाला होतो, बातमीदार म्हणून शकुंतलाबाईना पद्मभूषण मिळाले तेव्हा त्याची मी मुलाखत घेतली होती. आणि दुसरे म्हणजे आम्ही दोघे सख्खे शेजारी होतो. पुण्यात डेक्कनला शकुंतलाबाई परांजपे या हॉटेल वैशालीमागच्या आपल्या `पुरुषोत्तम' बंगल्यात म्हणजे परांजपे बंगल्यात राहत होत्या आणि त्याच फर्ग्युसन रोडच्या दुसऱ्या बाजूला ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी (BCL) मागे रानडे इन्स्टिट्युटसमोर हॉटेल हिलव्हयुच्या लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर मी राहायचो. त्यामुळे लेखाच्या बातमीचा संदर्भात नियमितपणे त्यांना भेट द्यायचो.
त्यावेळी या भेटी दरम्यान त्या मला आपल्या विदाऊट फिल्टर पनामा सिगारेट ऑफर करायच्या आणि मग त्यावेळी चेन स्मोकर असलेल्या मला माझी फोर स्केेअर सिगारेट ओढायची परवानगी आणि धाडसही नसायचे. तोपर्यंत शकुंतलाबाईंच्या स्वभावाची मला चांगली ओळख झाली होती. .खूप काही सांगता येईल ते मी माझ्या शकुंतलाबाईंवरच्या लेखात लिहिले आहे.
आणि त्याच लेखाच्या संदर्भात मला आज या दैनिकाच्या हापिसातून फोन आला होता. त्यासंदर्भात माझी पॉडकास्ट मुलाखत घेतली जाणार होती.
माझ्या सवयीप्रमाणे नेहेमीप्रमाणे मी नमनालाच घडाभर तेल ओतले आहे. मुद्द्यावर येतो. विषय चार्ल्स सोबराज किंवा शकुंतलाबाई परांजपे किंवा अस्मादिक पण नाही.
मुलाखत सुरु करण्यापूर्वी प्राथमिक चर्चेत मुलाखतकर्त्या तरुणीला विचारले कि तिने माझे शकुंतलाबाई परांजपे यांच्यावर लिहिलेले लेख वाचले आहेत का?
अपेक्षेप्रमाणे होकारात्मक उत्तर आले, पण त्याहून अधिक धक्कादायक माहिती समोर आली.
त्या मुलीने शकुंतलाबाईंच्या नामांकित कन्येची म्हणजे अर्थातच सई परांजपे यांची मुलाखत बेळगाव येथे झाली तेव्हा आपल्या पालकांसह तिने ऐकली होती.
त्यानंतर तिने त्या मुलाखतीतला एक प्रसंग मला सांगितला.
"छोटी सई शाळेत जायची तेव्हा अनेक महिला तिला विचारायच्या. ``तुझे वडील कोण गं ? काय करतात ते? तुझी आई कपाळावर कुंकू का लावत नाही..?"
एक ना एक, भाराभर चौकशा..
घरी आल्यावर छोटी सई आपल्या आईला शकुंतलाबाईना हे सांगायची. त्यावर खमक्या शकुंतलाबाई परांजपे यांनी आपल्या लहानगीला एक जालीम उत्तर शिकवले.
पुढच्या वेळेला त्या बायांनी सईला घेरले आणि तिच्या वडलांविषयी विचारले तेव्हा आईने शिकवल्याबरहुकुम सईने आपल्या कंबरेवर एक हात ठेवला, दुसरा हात हवेत प्रश्नांकित पद्धतीने उंचावत प्रतिप्रश्न केला.
"पण तुम्ही या चांभारचौकशा कशाला करता?"
त्या दिवसानंतर शाळेत सईला या नाना प्रश्नांपासून सुटका मिळाली. "
त्या दैनिकाच्या छोट्याशा स्टुडिओत मुलाखतकर्त्या मुलीने आपली खुर्ची सोडून, उभे राहून आणि कंबरेवर हात ठेवून साभिनय हा प्रसंग सादर केला तेव्हा मी थक्क झालो होतो.
आपल्या विषयाचे त्या तरुण पत्रकार मुलीला पूर्ण ज्ञान होते, मी काही त्या विषयातला तसा तज्ज्ञ नव्हतो. केवळ एक व्यावसायिक गरज म्हणून समोर मला ठेवून ती आपले काम करत होती याची मला तेव्हा जाणिव झाली.
या आधुनिक काळातील नवी पिढी माहिती, ज्ञान आणि कौशल्य या बाबतीत किती पुढे गेली आहे याची हा प्रसंग एक चुणूक होता.
(खूप म्हणजे तिसेक वर्षांनंतर, सई मोठ्या झाल्यानंतर आपल्या वडलांना रोम (`रोमा' ) विमानतळावर भेटल्या, तेव्हाचा प्रसंग त्यांनी `नोएल' या लेखात रेखाटला आहे. ''ए मुली, तुझे वडील कुठे असतात ग? " या वाक्याने मला बेजार केले होते'' असे त्यांनी या लेखात लिहिले आहे. ``बापलेकी'' या पद्मजा फाटक, दिपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस संपादित मौज प्रकाशनच्या पुस्तकात हा लेख मी अलीकडेच वाचला. -सौजन्य: मुक्ता अशोक टिळक, नाशिक , सई परांजपे यांचा हा लेख वाचताना तो सर्व भूतकाळ जिवंत उभा राहिल्यासारखा वाटला. )
या प्रसंगाने पत्रकारितेच्या क्षेत्रात चार दशके घालवलेल्या मला खूप काही शिकवले. या क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाविषयी आणि महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रातील नव्या पिढीबाबत..
दोन्हीही खूप, खूप आश्वासक आहेत..
सुरुवातीच्या काळात मराठी माध्यमातल्या असलेल्या मी बीए झाल्यानंतर पणजीला `द नवहिंद टाइम्स'मध्ये थेट इंग्रजी पत्रकारीतेत पाऊल टाकून पणजीला द नवहिंद टाइम्स मध्ये अनेक वर्षे टक्केटोपणे खात हळूहळू काय प्रगती केली ते मलाच माहित आहे.. आताच्या पिढीला पाण्यात उतरल्यावर लगेच पोहायला सुरुवात करावी लागते.
त्यामुळेच नव्या तंत्रज्ञानाप्रमाणेच नव्या पिढीचेसुद्धा खूप कौतुक वाटते.
`महाराष्ट्र टाइम्स'च्या मटा गोल्ड पॉडकास्ट ने या आठवड्यात एक वर्षपूर्ती केली. त्यानिमित्त ही टिपण्णी..
^^^

Wednesday, April 27, 2022

`निरोप्या'कार आर्चबिशप हेन्री डोरिंग

बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली ‘दर्पण’ मासिक सुरू करून मराठी वृत्तपत्रकारितेचा पाया रोवला. त्यानंतर मराठी भाषेत अनेक नियतकालिके सुरू करण्यात आली. यापैकी बहुतेक नियतकालिके आज काळाच्या ओघात गडप झाली आहेत. ‘ज्ञानोदय’ हे 1842 साली सुरू झालेले नियतकालिक आजही पुण्यातून प्रसिद्ध होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वळण या आजही अत्यंत आडवळणाच्या ठिकाणी असलेल्या खेडेगावी फादर हेन्री डोरिंग या येशूसंघीय जर्मन धर्मगुरूने ‘निरोप्या’ हे मासिक 1903 च्या एप्रिल महिन्यापासून सुरू केले. हे मासिक अजूनही पुण्यातून प्रकाशित होत आहे.

4 जानेवारी 1881 पासून गोपाळ गणेश आगरकर यांच्या संपादकत्वाखाली ‘केसरी’ हे नियतकालिक सुरू झाले. त्यामुळे सर्वाधिक दीर्घायुषी ठरलेल्या मराठी नियतकालिकांमध्ये ‘निरोप्या’ या मासिकाने या एप्रिल २०२२ महिन्यात एकशेविसाव्या वर्षांत पदार्पण केले आहे ही बाब कौतुकास्पद आहे.
मराठी भाषिक कॅथोलिक समाजाची आध्यात्मिक गरज भागविणाऱ्या, या समाजातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वृत्त पुरविणाऱ्या या मासिकाची महाराष्ट्रातील विविध भागातील त्याचप्रमाणे देशातील इतर राज्यातील मराठी भाषक ख्रिस्ती वाचक आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. यावरून या मासिकाची लोकप्रियता लक्षात येते.
हिंदू मागासवर्गीय जातींतून नव्यानेच ख्रिस्ती धर्मात आलेल्या अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या समाजासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस नियतकालिक सुरू करणारे फादर हेन्री डोरिंग हे धर्मगुरू निश्‍चितच द्रष्ट्ये मिशनरी होते हे यावरून दिसून येते. ‘निरोप्या’च्या या संस्थापकाचे त्यामुळे मराठी भाषिक ख्रिस्ती समाजावर आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेवर मोठे ॠण आहेत.
विशेष म्हणजे ‘ज्ञानोदय’ आणि ‘निरोप्या’ ही मराठीतील दोन्ही दीर्घायुषी मासिके मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाची मुखपत्रे आहेत. ‘ज्ञानोदय’ हे रेव्ह. हेन्री बॅलन्टाईन या अमेरिकन धर्मगुरूने सुरू केलेले नियतकालिक प्रॉटेस्टंट समाजात, तर ‘निरोप्या’ हे कॅथोलिक समाजात प्रामुख्याने वितरित केले जाते. या मासिकांचा खप केवळ ख्रिस्ती समाजापुरताच मर्यादित असला तरी महाराष्ट्रातील सामाजिक स्थित्यंतराचे या नियतकालिकांत प्रतिबिंब उमटत असल्याने संपूर्ण मराठी समाजाची ही मासिके एक महत्त्वाचा सांस्कृतिक ठेवा आहेत.
हेन्री डोरिंग यांचा जन्म जर्मनीत बोकोल्ट येथे 13 सप्टेंबर 1859 रोजी झाला. 1882 मध्ये त्यांना गुरुदीक्षा मिळाली. 1895 मध्ये फादर डोरिंग यांचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीपाशी असलेल्या वळण येथे आगमन झाले. वळण शेजारी असलेले केंदळ हे गाव अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या खेडेगावातूनच कॅथोलिक मिशनरींनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वप्रथम धर्मप्रसार सुरू केला. आज अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, बीड, पुणे या जिल्ह्यात मराठी भाषिक कॅथोलिक ख्रिस्ती समाजाची मोठी संख्या आहे. यापैकी बहुसंख्य लोकांनी पूर्वाश्रमीच्या हिंदू महार या अस्पृश्‍य जातीतून ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला.
फादर डोरिंग वळण येथे आले तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील मिशनकार्य नुकतेच सुरू झाले होते. अस्पृश्‍य जातीतून अनेकजण ख्रिस्ती धर्मात येत होते तरी केवळ धर्मांतरामुळे त्यांच्या सामाजिक वा शैक्षणिक परिस्थितीत एकदम मोठा बदल होत नव्हता. या नवख्रिस्ती समाजाला शिक्षित करण्यासाठी मिशनऱ्यांनी प्राथमिक शाळा सुरू केल्या. या नवसाक्षरांसाठी ख्रिस्ती धर्माचे ज्ञान देण्यासाठी मग या मिशनऱ्यांनी स्वतः मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि नंतर या भाषेत धर्मशिक्षणाची पुस्तकेही तयार केली.
फादर डोरिंग वळणला येण्याआधीच काही मिशनऱ्यांनी मराठी भाषेत धर्मशिक्षणाची काही पुस्तके लिहिली होती असे दिसते. अहमदनगर आणि नजिकच्या जिल्ह्यातील कॅथोलिक समाजातील पहिल्या पुस्तकाचा मान ‘लहान कॅथेखिसम’ या धर्मशिक्षणविषयक पुस्तकाला मिळतो. या पुस्तकाच्या लेखकाच्या नावाची नोंद मिळत नसली तरी या पुस्तकाचे लेखक केंदळ वळणमध्येच काम करणारे फादर दालिंग असावेत असे फादर डॉ. ख्रिस्तोफर शेळके यांनी म्हटले आहे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असणारे आणि रोम येथील विद्यापीठात तौलनिक धर्मशास्त्राचे प्राध्यापक असणारे फादर शेळके यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्यावर संशोधन केलेले आहे.
फादर शेळके पुढे म्हणतात की, फादर डोरिंग केंदळ वळण येथे स्थायिक झाले तेव्हा त्यांना स्थानिक लोकांमध्ये ‘सुभक्तीसार’ या शीर्षकाचे धर्मशिक्षणाचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे असे आढळले.
फादर डोरिंग यांच्या आधी म्हणजे 1892 च्या मध्यास केंदळ येथे आलेल्या फादर फ्रान्सिस ट्रेनकाम्प यांनी ‘सुभक्तीसार’ हे पुस्तक 1895 पूर्वी लिहून प्रसिद्ध केले. फादर ट्रेनकाम्प यांनी मराठी भाषेचा चांगला अभ्यास केला. या पुस्तकासाठी त्यांनी पुण्या-मुंबईच्या पुस्तकात आढळणाऱ्या भाषेऐवजी अहमदनगर जिल्ह्यात प्रचलित असलेल्या बोलीभाषेचा वापर केला. थोडेफार शिक्षण झालेले नवख्रिस्ती लोक या पुस्तकाचा वापर करत. देवळात मिस्साच्या वेळी प्रार्थना करण्यासाठीही धर्मगुरू या पुस्तकाचा वापर करत असत.
धर्मकार्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात स्थायिक झालेल्या फादर डोरिंग यांना केवळ ‘लहान कॅथेखिसम’, ‘मोठे कॅथेखिसम’ या भाषांतरित आणि ‘सुभक्तीसार’ या पुस्तकांचाच उपयोग करावा लागत असे. त्याकाळी मिशनऱ्यांना आपल्या घरापासून लांबवर असलेल्या खेडेगावात उपदेशासाठी, मिस्सासाठी जावे लागत असे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना ख्रिस्ती धर्माचे मराठीतून धर्मज्ञान देण्यासाठी त्याकाळी मराठी भाषेत पुस्तकेच नसल्याने या भाषेत धर्मविषयक साहित्याची निर्मिती करण्याची गरज फादर डोरिंग यांना भासू लागली. अशा प्रकारचे साहित्य नसल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना ख्रिस्ती धर्माची शिकवण देणाऱ्या धर्मशिक्षकांना किंवा पालकांना त्यांचे कार्य करणे कठीण जात होते.
या समस्येवर उपाय म्हणून फादर डोरिंग यांनी मराठी भाषेतून धर्मविषयक माहिती देणारे मासिक सुरू करण्याचे ठरविले. येशूसंघाच्या अधिकाऱ्यांनी या मासिकासाठी आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. अशाप्रकारे 1903 च्या एप्रिल महिन्यात फादरनी ‘येशूच्या अतिपवित्र हृदयाचा निरोप्या’ या आपल्या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.
तेव्हापासून पहिल्या महायुद्धाच्या काळातील काही वर्षांचा अपवाद वगळता ‘निरोप्या’ आजपर्यंत नियमितपणे प्रकाशित होत आहे. येसूसंघ या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या मालकीचे हे नियतकालिक असल्याने केवळ एक अपवाद वगळता गेली १२० वर्षे येशूसंघीय धर्मगुरूच या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
फादर डोरिंग यांनी ‘निरोप्या’सुरू केल्यानंतर या मासिकात लिहिण्यासाठी स्वतःच्या मराठी भाषेच्या ज्ञानात अधिक भर घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांची बोलीभाषेतील शब्द, हिंदू धर्मसाहित्यात वापरले जाणारे शब्द तसेच संकल्पना ते शिकले. या ज्ञानाचा वापर करून आपले मासिक नवसाक्षर नवख्रिस्ती लोकांसाठी अधिकाधिक उपयुक्त करण्याचा ते प्रयत्न करू लागले.
फादर डोरिंग हे या मासिकाचे संपादक आणि लेखकही होते. सुरुवातीच्या काळात ‘निरोप्या’ मुंबईतील ‘एक्झामिनर’ प्रेसमध्ये छापले जात असे. ‘निरोप्या’च्या पहिल्या अंकाची एकूण दहा पाने होती आणि त्यात पाच विषयांवर लेख होते. एप्रिल महिन्यासाठी प्रार्थनेचा विषय, पवित्र मिस्साचा चाकर होणे, लिओ तेरावे परमगुरुस्वामींचा (पोप) सण, तुझे राज्य येवो आणि एक रक्तसाक्षी (हुतात्मा) हे ते पाच विषय होत.
राहुरी तालुक्यातील एका आडवळणाच्या ठिकाणी ‘निरोप्या’च्या संपादकांचे वास्तव्य होते आणि त्यांचे मासिक तर मुंबईतून प्रसिद्ध होत होते. त्यामुळे अंक वेळेवर छापला जाईल यासाठी संपादकांना खास प्रयत्न करावे लागत असत. आपल्या या मासिकाचा चौथा अंक तर खुद्द संपादक महाशयांनीच सरळ स्वतःच्या हाताने लिहून काढला होता असे दिसते. हा अंक त्यावेळी का छापला गेला नाही हे आजही स्पष्ट होत नसले तरी या मासिकाच्या हस्तलिखित प्रतींवरून आपले नियतकालिक वेळेवर प्रकाशित झाले पाहिजे याबद्दल फादर डोरिंग विशेष आग्रही होते हे दिसून येते.
‘निरोप्या’तून ख्रिस्ती संतांची चरित्रे आणि ख्रिस्ती जगातील विविध घडामोडींविषयी लेख असत. शंभरी गाठलेल्या या मासिकात आजही ही सदरे प्रसिद्ध होत आहेत. त्याशिवाय ख्रिस्ती अध्यात्मात अभिजात वाङ्मय समजल्या जाणाऱ्या खाळेीींंळे लहीळीींळ या लॅटिन पुस्तकाचा अनुवादही त्यांनी या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध केला. ‘ख्रिस्तानुवर्तन’ या नावाने या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायापर्यंत हे पुस्तक ‘निरोप्या’तून प्रकाशित केले गेले.
दर महिन्याला नियमितपणे प्रभूचा संदेश घेऊन ‘निरोप्या’ हे चिमुकले मासिक अहमदनगर आणि शेजारच्या जिल्ह्यातील खेड्याखेड्यांतून प्रवासाला निघत असे. त्याकाळी पुस्तकांची किंवा मासिकांची वानवाच असल्याने या छोट्याशा नियतकालिकाने शंभर वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागातील ख्रिस्ती धर्मीय वाचकांची वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली असणार.
1907 मध्ये फादर डोरिंग यांची पुणे धर्मप्रांताचे महागुरुस्वामी किंवा बिशप म्हणून नेमणूक झाली. केंदळ वळण येथे असताना त्यांना केवळ आपल्या धर्मग्रामाची जबाबदारी सांभाळावी लागे. बिशप झाल्यानंतर त्यांना आता संपूर्ण पुणे धर्मप्रांतात येणाऱ्या विविध जिल्ह्यांच्या धर्मग्रामांचे धर्माधिकारी म्हणून काम पाहावे लागत असे. त्याकाळच्या पुणे धर्मप्रांतात पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली वगैरे जिल्ह्यांचा परिसर येत असे. बिशप म्हणून डोरिंग यांची जबाबदारी अनेक पटींनी वाढली तरीसुद्धा या साहेबांनी ‘निरोप्या’ चे संपादन आणि लेखन सोडले नाही. ‘निरोप्या’च्या संपादकांची धर्मगुरुपदावरून महाधर्मगुरुपदावर बढती होऊन पुण्याला बदली झाली तसे या मासिकाचे प्रकाशनस्थळही पुण्याला हलविण्यात आले.
पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले तेव्हा बिशप डोरिंग पोपमहाशयांना भेटण्यासाठी रोम येथे गेले होते मूळचे जर्मन असलेल्या बिशपांना ब्रिटिशांची वसाहत असलेल्या आपल्या कर्मभूमीत परतणे अशक्य झाले. पोपनी जपानमधील हिरोशिमा धर्मप्रांताचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांची 1921 साली नेमणूक केली. या काळातच आर्चबिशप हे ख्रिस्ती महामंडळातील आणखी एक उच्च पद त्यांना देण्यात आले.
जपानमध्ये नेमणूक झाल्यानंतरही आपल्या कर्मभूमीत परतण्याची डोरिंग यांची तीव्र इच्छा असावी असे दिसते, कारण ब्रिटिश सरकारची परवानगी मिळताच त्यांनी पुन्हा 1927 साली पुणे धर्मप्रांतातील मराठी ख्रिस्ती समाजाचे मेंढपाळ म्हणून पुन्हा एकदा सूत्रे हाती घेतली.
पुण्यात परतल्यानंतर केवळ सहाच महिन्यात म्हणजे जून 1928 मध्ये त्यांनी बंद पडलेल्या ‘निरोप्या’चे पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने प्रकाशन सुरू केले. ‘निरोप्या’ त्याच्या गुरूप्रमाणेच (येशू ख्रिस्ताप्रमाणे) पुनरुत्थित झाला’’ असे या घटनेचे फादर ख्रिस्तोफर शेळके यांनी वर्णन केले आहे.
‘निरोप्या’ हे मराठी भाषिक कॅथोलिक समाजाचे सर्वात पहिले मुखपत्र. गेले एक शतक हे मासिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कॅथोलिक कुटुंबांमध्ये नियमितपणे जात आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास असलेल्या या समाजातील अनेक कुटुंबांना दररोज वर्तमानपत्र घेण्याचीही ऐपत नाही. मात्र अगदी वाजवी वर्गणी असलेले हे मासिक या कुटुंबातील लहानथोरांची वाचनाची भूक भागवत आहे. त्यादृष्टीने आर्चबिशप डोरिंग यांनी या समाजास मोठे उपकृत करून ठेवले आहे यात शंकाच नाही.
1981 साली या मासिकाची वार्षिक वर्गणी केवळ तीन रुपये हेाती आणि किरकोळ अंकाची किंमत तीस पैसे होती. आज 2022 साली रंगीत मुखपृष्ठ असलेल्या आणि एकूण 32 पाने असलेल्या या मासिकाची वार्षिक वर्गणी दोनशे रुपये आहे.
आर्चबिशप डोरिंग यांच्या ‘निरोप्या’ने मराठी भाषिक कॅथोलिक समाजात वाचनाची आवड निर्माण करण्याबरेाबरच या समाजात लेखकांच्या आणि कवींच्या पिढ्या निर्माण करण्याचेही मोठे योगदान दिले आहे. मराठी सारस्वतात पुढे मोठे नाव कमाविणाऱ्या अनेक कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट पंथीय लेखकांना त्यांच्या उमेदवारीच्या काळात ‘निरोप्या’ ने त्यांना हक्काचे एक व्यासपीठ मिळवून दिले. आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, कवी विश्‍वासकुमार आदी नामवंत साहित्यिकांचा ‘निरोप्या’च्या लेखकांमध्ये समावेश होतो.
आपले साहित्य आणि नाव पहिल्यांदाच छापून आल्यामुळे मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव मलासुद्धा ‘निरोप्या’मुळेच लाभला. माझा पहिला लेख होता वि.स, खांडेकर यांना त्यांच्या `ययाती' कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला याबद्दल. साल होते १९७४ आणि माझे वय १५ वर्षे.
एखाद्या नियतकालिकाच्या प्रकाशन स्थळात अगदी क्वचितच बदल होतात. ‘निरोप्या’च्या शंभर वर्षांच्या आयुष्यात मात्र असे प्रसंग अनेकदा घडून आलेले दिसतात. याचे कारण म्हणजे ‘निरोप्या’चे मालकीहक्क असणाऱ्या येशूसंघाचे धर्मप्रांताधिकारी यांच्यामार्फत ‘निरोप्या’च्या संपादकांची नेमणूक केली जाते. नव्या संपादकांच्या नियुक्तीनंतर हे मासिकही ते संपादक ज्या धर्मग्रामात कार्यरत असतात तेथून प्रसिद्ध होत राहिले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील केंदळ वळण, श्रीरामपूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, सातारा जिल्ह्यातील कराड, त्याचप्रमाणे नाशिक वगैरे ठिकाणी ‘निरोप्या’चे कार्यालय सातत्याने स्थलांतरित होत राहिले.
या विविध जिल्ह्यांतील ख्रिस्ती धर्मियांनी अर्थातच त्यामुळे ‘निरोप्या’ची साथ सोडली नाही. त्यांच्या अनेक पिढ्यांनी या चिमुकल्या नियतकालिकावर आपली वाचनाची आणि अध्यात्माची भूक भागविली आहे.
‘निरोप्या’कार आर्चबिशप डोरिंग यांनी मराठी साहित्याला आणखी एक मोठे योगदान दिले आहे. सतराव्या शतकात गोमंतकात मराठी भाषेत लिहिले गेलेले ‘क्रिस्तपुराण’ हे अस्सल देशी महाकाव्य त्यांनी महाराष्ट्रात उजेडात आणले. ‘क्रिस्तपुराणा’ची रचना फादर थॉमस स्टीफन्स या मूळच्या इंग्रज येशूसंघीय धर्मगुरूंनी 1616 साली केली. मात्र त्याकाळात गोव्यात देवनागरी मुद्रणकला विकसित झाली नसल्याने त्यांना ते छापावे लागले.. रोमन लिपीत असल्याने मराठी सारस्वताचे या अभिजात वाङ्मयाकडे तीन शतके लक्षच गेले नाही.
आर्चबिशप डोरिंग यांनी या महाकाव्याचा अभ्यास केला व या साहित्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी या पुराणातील येशू ख्रिस्ताच्या चरित्रावर आधारित काही भागांचे देवनागरीत लिप्यांतर करून त्यांच्या तीन पुस्तिका प्रकाशित केल्या. अशाप्रकारे मराठी भाषेत असूनही रोमन लिपीमुळे मराठी भाषिकांपासून दुरावलेल्या या महाकाव्याचा निदान काही भाग तरी आर्चबिशप डोरिंग यांच्यामुळे प्रथमतःच मराठी भाषिकांना प्राप्त झाला. हे संपूर्ण महाकाव्य 1956 साली शांताराम बंडेलू यांनी देवनागरीत आणून य. गो. जोशी यांच्या प्रसाद प्रकाशनाने प्रकाशित केले.
मराठीत साहित्यसंपदा असणारे आजचे पुण्याचे बिशप थॉमस डाबरे हे आर्चबिशप हेन्री डोरिंग यांचे उत्तराधिकारी आहेत. फादर भाऊसाहेब संसारे हे `निरोप्या'चे विद्यमान संपादक आहेत


1949 मध्ये वृद्धत्वामुळे आर्चबिशप डोरिंग यांनी निवृत्ती स्वीकारली आणि त्यांच्या जागी अँड्र्यू डिसोझा या धर्मगुरूंनी पुण्याचे पहिले भारतीय बिशप म्हणून सूत्रे हाती घेतली. ‘निरोप्या’तून शेवटचे बोधपत्र लिहून या मेंढपाळाने आपल्या कळपाचा निरोप घेतला. ‘निरोप्या’च्या अंकात प्रसिद्ध झालेले हे बोधपत्र पुढीलप्रमाणे आहे.
‘येशू ख्रिस्तामध्ये अतिप्रिय लेकरांनो, ईश्‍वराने तुम्हांस पुष्कळ वर्षे माझ्या हवाली केले, तरी आता तुम्हांस माझा शेवटचा सलाम सांगण्याची वेळ आली. 42 वर्षांपूर्वी 10वे प्रिय परमगुरुस्वामी यांनी मला पुण्याचे महागुरू म्हणून नेमिले आणि बायदरलीदन बिशपच्या जागी मला पुणे धर्मप्रांताचा अधिकार दिला.
सात वर्षे माझ्या कळपामध्ये शांतीने काम करता आले. मग पहिले महायुद्ध सुरू झाले, त्यावेळी मी परमगुरुस्वामींची भेेट घ्यायला रोम शहरी गेलो होतो. पुण्याला परत जाण्याचे माझे सर्व प्रयत्न व्यर्थ निघाले. मला माझ्या प्रिय लेकरांपासून लांब राहणे भाग पडले.
युद्ध संपल्यावर परमगुरुस्वामींनी मला जपान देशाला पाठविले. हिरोशिमा शहराचे अपोस्तोलिक व्हिकर म्हणून त्यांनी मला नेमिले. शेवटी 1927 साली ब्रिटिश सरकारने मला पुण्याला परत जाण्याची परवानगी दिली. तेव्हापासून मी पुन्हा तुम्हांमध्ये राहात होतो.
दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा नवीन अडचण व त्रास उत्पन्न झाला. काही तरुण फादर, जर्मन नागरिक असल्याकारणाने, त्यांस सरकारने कैद्यांच्या छावणीत ठेवले आणि बिशपचा व्यवहारदेखील जरा कठीण झाला. या अवघड दिवसात विश्‍वासी आणि फादर लोकांचा विश्‍वासूपणा, प्रेम ही मला मोठ्या समाधानाची व शक्तीची कारणे होती. त्यांची आस्था आणि साहाय्य शेवटपर्यंत उपकारी मनाने मी विसरणार नाही.
युद्ध संपल्यावर माझ्या वृद्धपणाचा परिणाम अधिकाधिक मजवर झाला. प्रवास करणे मला कठीण झाल्यामुळे सर्व मिशनस्थानांची भेट वेळोवेळी घेता आली नाही. म्हणून माझ्यापासून हे भारी ओझे काढण्यास आणि उत्साही खांद्यावर ठेवण्यास परमगुरुस्वामींची विनंती करण्यास मला योग्य वाटले. त्यांनी माझी विनंती मान्य करून अंद्रू डिसोजा फादर यांस माझ्या जागी महागुरू म्हणून नेमले. त्यांची दीक्षा 24 ऑगस्टला झाली आणि या दिवसापासून ते महागुरूचा अधिकार चालवू लागले. ते तुमची चांगली काळजी घेतील.
म्हणून माझ्या प्रिय लेकरांनो, मी तुम्हास माझा शेवटचा बोध करितो. तुम्ही विश्‍वासात स्थिर राहून आपल्या विश्‍वासाप्रमाणे वर्तन करा. तुमच्यापुढे नवीन संकटे आहेत. येशूच्या हृदयाची आणि प.मारियेच्या निष्कलंक हृदयाची भक्ती बाळगत जा. ती तुमची रक्षण करतील. तुमच्या नवीन महागुरुस्वामींसाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हांसाठी रोजरोज प्रार्थना करीत जाईन, अशी खातरी मी तुम्हाला देतो. ईश्‍वर तुम्हाला आशीर्वाद देवो.”
                                                                                                                    - हेन्री आर्चबिशप

निवृत्तीनंतर 17 डिसेंबर 1951 रोजी आर्चबिशप डोरिंग यांचे निधन झाले. पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलमध्ये त्यांची समाधी आहे. जर्मनीतून महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकून, स्थानिक निरक्षर आणि अर्धशिक्षित ख्रिस्ती समाजाला ज्ञानार्जन करणारे आर्चबिशप डोरिंग हे आज विस्मृतीत गेले असले तरी ‘निरोप्या’च्या रूपाने त्यांचे स्मारक त्यांच्या कळपाच्या भेटीस आजही दर महिन्याला नियमाने येत आहे.


( ख्रिस्ती मिशनरींचे योगदान- कामिल पारखे (वितरण सुगावा प्रकाशक) मधील एक प्रकरण )

Saturday, June 12, 2021

 

खाद्यसंस्कृतीवरून कुणी स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवू नये. आहार पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीचे वा समाजघटकाच्या संस्कृतीचे किंवा उच्चनीच पातळीचे मोजमाप होऊ नये!
'अक्षरनामा'  
https://www.aksharnama.com/client/article_detail/5230 
पडघम - सांस्कृतिक       
कामिल पारखे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 12 June 2021
  • पडघमसांस्कृतिकखाद्यसंस्कृतीFood CultureवशटमासेFishमटणMutton

शाळेत असताना वडील मला अनेकदा आमच्या दुकानाशेजारी असलेल्या ‘समाधान’ हॉटेलात घेऊन जात असत. तिथं आम्ही सकाळी बटाटावडा, पुरी-भाजी किंवा संध्याकाळी घावन खात असू. त्या हॉटेलचा तो गोलाकार गरमागरम बटाटावडा, लाल रंगाचा रस्सा, त्यावर बारीक चिरून टाकलेला कांदा आणि शेजारी लिंबूची कापलेली एक फोड. साधारणतः एका वेळी ताटात दोन बटाटेवडे असायचे आणि गिऱ्हाईकाने न मागता दुसऱ्यांदा रस्सा वाढण्याचा शिरस्ता असायचा. रस्स्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी काही जण बटाटेभजेही खात असत. घराबाहेरच्या खाद्यसंस्कृतीची मला झालेली ही पहिली ओळख. आजही त्या बटाटावड्याची आणि चमचमीत रश्श्याची चव माझ्या तोंडात रेंगाळत असते.

श्रीरामपुरातली सोमैया हायस्कूलशेजारची आमची बोरावके चाळ मिश्र जातीधर्मांची होती. तिच्या एका टोकाला बैठी पाच-सहा घरे होती. तिथले भाडेकरू ब्राह्मण, मारवाडी, माळी आणि एक मुसलमान कुटुंब होते (पेशाने तांबोळी असलेले). चाळीच्या मध्ये एकमजली इमारतीत स्वतः चाळमालक बोरावके, माळी, मारवाडी आणि गुजराती घरे होती. चाळीच्या दुसऱ्या टोकाला कुडाच्या असलेल्या चार घरांत दोन मुसलमान, एक मराठा आणि आमचे ख्रिस्ती कुटुंब होते. या चाळीच्या समोरच्या बाजूला स्वतःच्या मालकीच्या असलेल्या कुडाच्या घरांत पिठाची गिरणी चालवणारे एक मुसलमान कुटुंब, चार माळी कुटुंबे, एक गवळी आणि सुकी मासळी विकणारे एक कोमटी कुटुंब राहायचे.

वेगवेगळ्या जातीधर्मांच्या, सामाजिक-आर्थिक स्तर भिन्न असलेल्या या कुटुंबांची खाद्यसंस्कृतीही पूर्ण वेगळी होती, हे सांगायला नकोच. आमच्या एका बाजूचे आणि समोरचे शेजारी मुसलमान होते, बाकीचे शेजारी माळी आणि मराठा असल्याने आसपासची सर्वच घरे तशी मांसाहारी होती.

समोरच्या चव्हाण नावाच्या माळी घरात आणि आमच्या घरात कालवणाची, सुक्या भाज्यांची दुपारी आणि रात्री देवाणघेवाण चालू असायची. रविवारी, बुधवारी आणि शनिवारी ही देवाणघेवाण ठप्प व्हायची. कारण या दिवशी आमच्याकडे ‘मटण’ असायचे. (ग्रामीण भागात ‘मटण’ ही संज्ञा सर्वसामान्य नाम म्हणून वापरली जाते, जसे कोंबडीचे मटण, बकरीचे मटण इत्यादी.) “ख्रिस्ती लोक एक वेळ रविवारी चर्चमध्ये मिस्साला जाण्याचे टाळतील, मात्र त्या दिवशी त्यांच्या घरी मटणाचा बेत  कधीही चुकणार नाही’’, अशी एक जुनी म्हण आहे. 

तर या दिवसांत आमच्या घरात काय शिजत असायचे, हे शेजाऱ्यापाजाऱ्यांना माहीत असायचे, मात्र त्याबद्दल कधीही नाराजी किंवा नापसंती व्यक्त होत नसायची.

दिवाळीला समोरच्या आणि बाजूंच्या माळी-मराठ्यांच्या घरांतून आमच्याकडे आणि शेजारच्या मुसलमानांच्या घरी फराळाच्या पराती यायच्या. नाताळाला आमच्याकडून सगळ्या शेजाऱ्यांना गोड फराळ जायचा आणि रमझान ईदच्या दिवशी आम्हां सर्व शेजाऱ्यांकडे त्या तीन मुसलमान घरांतून शीर-कुर्म्याची भांडी पोहोचती व्हायची. त्या घरांत लग्न वा दुसऱ्या काही निमित्ताने जेवण दिले जायचे, तेव्हा बिर्याणी किंवा लाल रश्शाचे चमचमीत मटण कालवण चाखायला आसपासच्या घरांतली कितीतरी माणसे यायची. ‘मटण खावे तर मुसलमानांच्या हातचे’ असा कौतुकाचा बोलबाला असायचा. इतरांची आगळीवेगळी खाद्यसंस्कृती स्वीकारून सहजीवनाची ती पद्धत आजही कायम आहे. 

नगरपालिकेच्या खटोड शाळेत मी सहावीत असताना बळीराम नेरे हा माझा क्लासमेट माझ्या घरी राहायला आला. तो मराठा होता. त्याचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि आई एका खेड्यात सरकारी नोकरीत होती. तो घरात आल्यापासून ‘त्या’ तीन दिवशी त्याच्यासाठी वेगळे कालवण किंवा भाजी होऊ लागली. त्याच्याबरोबर माझीही त्या मटणाच्या कालवणावरची वासना उडाली. वर्षभराने तो आपल्या आईकडे राहायला गेला, तरी नंतर माझ्यासाठी ‘त्या’ ठराविक दिवशी दाळ किंवा काहीतरी खळगुट करावे लागायचे, ते अगदी मी दहावीनंतर घर सोडेपर्यंत. (या परिसरात शाकाहारी लोकांना ‘खळगुठे’ असेही म्हटले जायचे!) 

मी शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या मामाच्या गावी घोगरगावला एकदा मामेभाऊ शाहूबरोबर गेलो होतो. श्रीरामपूर तालुक्यात मुठेवाडगाव येथे उन्हाळ्यात पार कोरडी असलेली गोदावरी ओलांडून पार करून आम्ही दोघे भामाठाणला पोहोचलो. चालतचालत संध्याकाळी ऊसतोडणी कामगारांच्या तात्पुरत्या वस्तीवर गेलो. शेतावरची कामे आटोपल्यावर शाहूची थोरली बहीण, मालनबाई तिथे आपल्या नवऱ्या-मुलासह ऊसतोडणीच्या कामाला आपल्या बैलगाडीसह आली होती. त्या वस्तीवर सगळीकडे ऊसाच्या लांबलांब वाड्यांनी बांधलेल्या खोपट्या होत्या. त्यात थोड्याशा सामानासाठी, काही भांड्यांसाठी आणि इनमिन दोनतीन जणांना बसण्यासाठी जागा होती. स्वयंपाक तर बाहेर दगडांच्या चुलीवर व्हायचा.

शाहूला आणि मला पाहून मालनबाई हरखून गेली. आपल्या माहेरच्या पाहुण्यांना म्हणून तिने लागलीच खोपटीत दोरीवर वाळत टाकलेल्या चान्या घेतल्या, साफ केल्या आणि चुलीवरच्या उकळत्या पाण्यात शिजायला टाकल्या. दर चार-पाच दिवसांनंतर ऊसतोडणीची जागा बदल्यावर सगळे बिऱ्हाड बैलगाडीवर टाकून हिंडणारे ऊसतोडणी कामगार मीठ, मिरची आणि तेल याशिवाय किती वस्तू सोबत बाळगणार? खोपीत दोरीवर सुकवून ठेवलेले मांसाचे तुकडे म्हणजे चान्या. त्या ऐनवेळी कुणाचाही पाहुणचारासाठी उपयोगी पडतात. त्यांच्यासाठी चान्या हीच पक्वाने होती. त्या खायची ती माझी पहिली आणि शेवटचीच वेळ.

फादर होण्यासाठी उमेदवारी करण्यासाठी मी सातारा जिल्ह्यात कराडला फादर प्रभुधर यांच्या ‘स्नेहसदन’ आश्रमात राहून अकरावी केली. त्या संपूर्ण वर्षभराच्या काळात या आश्रमात योगासने शिकावी लागली. तिथे मांसाहार पूर्णतः वर्ज्य होता. इतका काळ - अगदी एक आठवडाभरही - मी कधीही शाकाहारी राहिलो नव्हतो.   

बारावीला गोव्यातल्या जेसुईट लोयोला हॉल पूर्व-नोव्हिशिएटमध्ये राहायला गेलो, तेथे कराडच्या अगदी उलट स्थिती. बुधवारच्या दुपारचा अपवाद सोडता वर्षभर दुपारी आणि रात्री फक्त मांसाहारी आणि तेसुद्धा केवळ बीफ असायचे. पोर्तुगीज बोलणारा आमचा मेस्ता फ्रान्सिस आठवड्याभर बीफची नारळ घालून केलेली घट्ट मसालेदार शाकुती, कटलेट्स, समोसे, चिली-फ्राय, रोस्ट असे इतके वेगवेगळे पदार्थ बनवायचा की, एक डिश आठवड्यात क्वचितच रिपिट व्हायची! हा बीफचा पुरवठा पणजी मार्केटमध्ये दर शुक्रवारी बंद असायचा, म्हणून गुरुवारीच नेहमीपेक्षा दुप्पट बीफ आणले जायचे.

त्या काळात भाकरी किंवा चपातीचे कधी दर्शन घडले नाही. सकाळी नाश्त्यासाठी कडक भाजलेले गोलगोल उंडो पाव आणि रात्री साधे पाव असा मेन्यू असायचा. त्या सत्तरच्या दशकात गोव्याला बीफचा पुरवठा बेळगावातून व्हायचा, आजही होतो. गेली अनेक वर्षं गोव्यात आणि कर्नाटकातही भाजपचे सरकार असले तरी यात काहीही बदल झालेला नाही.

महाराष्ट्रात पंधरा वर्षांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या पराभवानंतर भाजप-शिवसेनेचे सरकार २०१४ साली आले. या युतीच्या सरकारचा पहिला महत्त्वाचा निर्णय होता-मागील १९ वर्षे बासनात गुंडाळून ठेवलेला गोवंश हत्याबंदीचा ठराव राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा आणि मंजुरीनंतर तातडीने हा कायदा महाराष्ट्रात अमलात आणण्याचा. एक नवी खाद्यसंस्कृती प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक पाऊल होते. देशात केवळ गोमांस बाळगल्याच्या संशयाच्या कारणाने उत्तर भारतात ‘मॉब लिंचिंग’ होण्याच्या घटना यानंतरच सुरू झाल्या.  

यावरून एक अलीकडची घटना आठवली. गोव्यात सांकवाल येथे राहणाऱ्या बहिणीकडे जाण्यासाठी नावेलीजवळच्या बस स्टॉपजवळ उभा होते. शेजारीच एक पासरो म्हणजे छोटेसे किराणा दुकान होते. जवळच्या शाळेच्या मैदानावरून धावत एक विद्यार्थी आला आणि त्या दुकानदाराला म्हणाला, “अंकल, माका एक बीफ पॅटीस दी!” ते ऐकून मी चमकलोच, पण लगेच लक्षात आले की, मी आता गोव्यात आहे, महाराष्ट्रात नाही.

या घटनेनंतर काही महिन्यांनी गोव्यातून सिस्टरताई आली आणि आल्याआल्या मला म्हणाली, “मी खिमा आणला आहे. फ्रिजमध्ये लगेच ठेवून दे.” ते ऐकून मी विचारात पडलो, पण काही बोललो नाही. तो खिमा गोव्यातून महाराष्ट्रात आणणे हा कायद्यानुसार दारू आणण्यापेक्षाही भयंकर गुन्हा आहे, हे मी तिला सांगितले नाही. 

गोव्यातील आमच्या जेवणात नाताळ, ईस्टर तसेच सेंट इग्नेशियस लोयोला, सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या फेस्तांनिमित्त पोर्कपासून म्हणजे डुकराच्या मासांपासून केलेले सोरपोतेर, विंदालू, सॉसेजेस अशा पोर्तुगीज वळणाच्या डिशेस असायच्या. आठवड्यातून काही दिवस मासे आणि अंडी यांचाही रतीब असायचा.

किंग प्रॉन्स हा माशांचा एक प्रकार मला आवडत नसायचा. प्रॉन्स बिर्याणीतून मी ते प्रॉन्स ताटात वेगळे काढून ठेवायचो. हे लक्षात आल्यावर माझ्या शेजारी बसून मी वेगळ्या वाटीत काढून ठेवलेले ते किंग प्रॉन्स मटकावण्यासाठी इतर मुलांची स्पर्धा सुरू झाली. कारण फाईव्ह स्टार हॉटेलांत असलेल्या मागणीमुळे किंग प्रॉन्स अत्यंत महागडे असत, आजही यात बदल झालेला नाही. त्यानंतर किंग प्रॉन्स खाणे मी सुरू केले.

केंद्रात आणि गोव्यातही भाजप हा एकच पक्ष सत्तेवर असला तरी हा पक्ष गोव्यातील खाद्य आणि पेय संस्कृतींबाबतचे नैतिक किंवा कायदेशीर नियम आपली सत्ता असलेल्या इतर राज्यांत किंवा देशभर लागू करण्याचा विचारही कधी करणार नाही. गोव्यात अगदी मॉलमध्येही दारू विकली जाते आणि प्रत्येक मांसाहारी हॉटेलांत बसल्या बसल्या गिऱ्हाईकांपुढे काचेचे ग्लास ठेवले जातात, हे अनेकांनी अनुभवलेले असेलच.  

पत्रकार म्हणून नोकरीला लागल्यावर पणजीला सान्त इनेजपाशी असलेल्या ताळगावला मी राहत असताना माझ्या घरमालकाची म्हातारी आई वारली, तेव्हाची घटना आठवते. मयतीला लोक जमले होते. काही वेळानंतर आम्हा सर्वांच्या हातात फेणीचे ग्लास आणि खाण्यासाठी उकडलेले छोले देण्यात आले, तेव्हा मी थक्कच झालो. किरीस्तांव लोकांच्या घरी किंवा रस्त्यातल्या चौकापाशी असलेल्या क्रुसासमोर कुठल्याही कारणानिमित्त रोझरीची प्रार्थना आणि लदाईन (लितानी) असायची, तेव्हाही अल्तारासमोरच्या मेणबत्त्या विझवण्याआधीच फेणी किंवा उर्राकचे ग्लास आणि उकडलेल्या छोल्यांचे ताट फिरवले जाई. हळूहळू या प्रकारांची सवय झाल्यावर त्याचे आश्चर्य व वैषम्य वाटेनासे झाले. गोव्यात आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथेही ख्रिस्ती कुटुंबांतील लग्नांत मांसाहारी पदार्थ असतातच. पाहुणे मंडळींच्या जेवणाच्या प्रत्येक टेबलांवर काचेचे ग्लासही असतात.  

खाण्यावरून शरमिंदा होण्यासारखा एक खूप जुना प्रसंग आठवतो. कॉलेजची सुट्टी संपल्यावर श्रीरामपूरहून मी गोव्याला झेलम एक्सप्रेसने निघालो. १९७०च्या दशकाच्या त्या काळात मिरज ते वॉस्को द गामा या मार्गावर मिटरगेज रेल्वे होती. त्यामुळे ब्रॉडगेज रेल्वेमार्ग मिरजला संपल्यावर तेथून लोंढा-मार्गे वॉस्कोची मिटरगेज रेल्वे पकडावी लागे. या मार्गावर प्रवास केलेल्यांनी ‘दूधसागर धबधबा’ पाहिला असेलच. सह्याद्री घाटात अत्यंत संथ गतीने चालणाऱ्या या मीटरगेज रेल्वेबाबत जुन्या पिढीतील लोक अनेक गंमतीदार किस्से सांगत. जसे की, दूधसागर धबधब्यापाशी या चालत्या गाडीतून उतरून, छायाचित्र काढून, परत मागच्या डब्यात चढणे शक्य होते.

हा, तर या प्रवासासाठी आईने बाजरीच्या भाकरी आणि माझ्या आवडीची लाल मिरच्यांची सुकटाची चटणी कापड्यात बांधून दिली होती. गाडीने मिरज सोडल्यावर डब्यात वरच्या बर्थवर बसून रात्री नऊच्या दरम्यान मी त्या कापडाची गाठ सोडली, दोनतीन घास खाल्ले असतील तोच त्या डब्यातील अनेक प्रवाशांच्या एकापाठोपाठ सटासट शिंका सुरू झाल्या आणि एकच गोंधळ झाला. ‘कुणी वशट पदार्थ आणला?’ असे प्रश्न सुरू झाले. घाबरून मी गडबडीने ती सुकटाची चटणी झाकली. मात्र भूकेने भीतीवर मात केली आणि थोड्याथोड्या वेळाने एकेक घास घेत मी माझे जेवण संपवले. त्यानंतर सुकट, सुके बोंबील असे वशट खाद्यपदार्थ प्रवासात कधी आणायचे नाही, असा कानाला खडा लावला.   

पुणे श्रमिक पत्रकार संघ ( Pune Union of Working Journalists - PUWJ) आपल्या सात्त्विक आहाराच्या आग्रहाविषयी असाच प्रसिद्ध आहे. ऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या या संघटनेच्या कार्यकारिणीत १९४०च्या दशकात नथुराम गोडसे होता. नंतरच्या काळात ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी या संघटनेचे अध्यक्ष होते. (१९८०च्या दशकात मीसुद्धा या पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत होतो.) संघटनेच्या वार्षिक सभेच्या वेळी सर्व सदस्यांना भोजन दिले जाते. त्याचा मेन्यू वर्षानुवर्षे केवळ श्रीखंड-पुरी, आमरस, फदफदे असा ठेवून पत्रकार संघाने खाद्यसंस्कृतीबाबत आपले सोवळे कायम राखले आहे. इतरांच्या आवडीचा ‘तामसी आहार’ म्हणजे चिकन बिर्याणी किंवा किमान अंडा-करीचा बेत ठेवण्याचा काही सदस्यांचा आग्रह आजतागायत मान्य झालेला नाही.

याच्या अगदी उलट मुंबईतील ‘प्रेस क्लब’ची   (Mumbai Press Club) मानसिकता आहे! तिथं ‘व्हिजिटर’ म्हणून पाहुणचार घेतलेले मुंबईबाहेरचेही अनेक जण कौतुकाची भावना बाळगून असतात.

गोव्यातल्या ‘नवहिंद टाइम्स’ने ऐंशीच्या दशकात मला बल्गेरियात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी पाठवले होते. तेव्हा आम्हा ३० जणांच्या भारतीय तुकडीमध्ये दिल्ली दूरदर्शनमध्ये एक ज्येष्ठ अधिकारी होते. त्या दौऱ्यात मांसाहारी पदार्थांत पोर्क म्हणजे डुकराच्या मांसाचा समावेश असेल या भीतीने तीन महिन्यांच्या या काळात या गृहस्थाने साधे अंडा ऑम्लेटसुद्धा खाल्ले नव्हते!

पूर्ण शाकाहारी असलेले माझ्या परिचयातील एक जण कंपनीच्या कामानिमित्त चीनमध्ये शांघायला दोन महिने होते. तेथून परतून आज तीन वर्षे झाली तरी शांघाय नाव काढताच तिथे खाण्याचे झालेले हाल आठवून आजही त्यांना पोटात मळमळल्यासारखे होत असते.  

मुंबई-पुण्यातल्या इराणी हॉटेलांनी आपली स्वतःची वेगळी खाद्यसंस्कृती जपली होती. पुण्यातल्या डेक्कन जिमखान्यातले गरवारे पुलाजवळचे हॉटेल गुडलक आणि लकी रेस्टाँरंट ही इराणी हॉटेल्स देव आनंद, दिलीप कुमार वगैरे अभिनेत्यांची आवडती ठिकाणे होती. आता बंद झालेले लकी रेस्टाँरंट हे मस्काबन, चाय, खिमा पाव, चिकन मसाला, चिकन बिर्याणीसाठी प्रसिद्ध होते. नव्वदच्या दशकात आम्ही सडेफटिंग पत्रकारही तिथे बसायचो, तेव्हाही या अभिनेत्यांच्या नावांची तेथे हमखास उजळणी व्हायची.

नॉन-व्हेज समोसा आणि मस्काबन यामुळे पुणे कॅम्पातले हॉटेल ‘महानाझ’ खवय्यांचे आवडते होते. मी नोकरीला असलेल्या ‘इंडियन एक्सप्रेस’चे ऑफिस तेव्हा या ‘महानाझ हॉटेल’च्या समोरच्या अरोरा टॉवर्समध्ये होते. पुणे कॅम्पात अनवाणी पायाने हिंडल्यानंतर चित्रकार मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेन या हॉटेलमध्ये विसाव्यासाठी बसलेले मी पाहिले आहे. त्यांच्या अशा भेटीमुळे आम्हा पत्रकारांना हमखास एक सॉफ्ट स्टोरी मिळायची.  

हवेतल्या प्रवासातील खाद्य आणि पेय संस्कृतीची तर वेगळीच मजा असते. दहा वर्षांपूर्वी मुंबईतून पॅरिसच्या दिशेने आमच्या विमानाने उड्डाण केले आणि पंधरा-वीस मिनिटांतच ट्रे घेऊन आलेल्या एयर होस्टेसने मला विचारले- ‘काय घेणार तुम्ही?’ ट्रेकडे निरखून पाहत मी विचारले- ‘व्हॉट चॉइसेस आय हॅव्ह?’ तिने हसत म्हटले- ‘फ्रुट ज्यूस, वाईन, शॅम्पेन...’. ‘तर मग मी शॅम्पेन घेईन!’ मी लगेच म्हटले.

छोट्या आदितीने फ्रुट ज्यूसची ऑर्डर दिली. मात्र माझा उत्साहित झालेला चेहरा पाहून पत्नी, जॅकलीननेही शॅम्पेनची ऑर्डर दिली आणि तिचा ग्लासही माझ्यासमोर ठेवला.

मुंबई ते पॅरिस हा सहा तासांचा तसा कंटाळवाणा प्रवास मग अगदी मजेत गेला, हे सांगायलाच नको. 

ते तीन आठवडे फ्रान्समध्ये आणि इटलीमध्ये फिरताना विविध प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स आणि पेये यांचा आम्ही पुरेपूर आस्वाद घेतला. या वेगळ्या खाद्य आणि पेय संस्कृतींच्या देशांत वावरताना कधीही ‘होम सिक’ झाल्यासारखे वाटले नाही.      

‘व्हेन इन रोम, डू ऍज द रोमन्स डू’ ही म्हण रोममध्ये आणि युरोपातल्या इतर ठिकाणी सुट्टीवर असताना मी, जॅकलीनने आणि मुलगी आदितीने पुरेपूर अमलात आणली होती. तिथल्या एक युरोला मिळणाऱ्या बिनसाखरेच्या आणि बिनदुधाच्या काळ्या कॉफीची लवकरच आम्हाला सवय झाली. रोममध्ये असताना पास्ता आणि पिझ्झा आदितीने मनसोक्त खाल्ला.  

दोन वर्षांपूर्वी ‘सकाळ टाइम्स’च्या वतीने थायलंड येथे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या परिषदेत सहभागी झालो. भारतातले आम्ही सहा आणि जगभरातील सुमारे सत्तर पत्रकार त्या वेळी थायलंड सरकारचे पाहुणे म्हणून उपस्थित होतो. प्रवासाआधी थायलंडच्या मुंबईतील वकिलातीने माझ्या आहाराविषयी विचारणा केली, तेव्हा उपलब्ध तीन पर्यायांमध्ये मांसाहारी आणि शाकाहारी या नेहमीच्या दोन पर्यायांशिवाय ‘जैन पद्धती’चा तो तिसरा शाकाहारी पर्याय पाहून मी उडालो होतो! 

अशा भिन्न, तऱ्हेतऱ्हेच्या खाद्य आणि पेय संस्कृतीबद्दल खरे तर काही आक्षेपही नसावा. ज्याला जे खावे, प्यावेसे वाटेल त्याबद्दल आडकाठी नसावी. खाद्यसंस्कृतीनुसार कुणी स्वतःला, आपल्या समाजाला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवू नये. आहार पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीचे वा समाजघटकाच्या संस्कृतीचे किंवा उच्चनीच पातळीचे मोजमाप होऊ नये.

मात्र तसे होण्याऐवजी आजही आहारपद्धतीवरून नाके मुरडली जातात. हल्ली तर खाद्यसंस्कृतीनुसार शेजारी निवडला जातो. काही शहरांत त्यानुसार स्वतंत्र इमारती आणि राहण्याच्या कॉलनीही उभारल्या जात आहेत.

समुद्रातील मासे, आकाशात विहार करणारे पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, वनस्पती आणि फळफळावळ हे तुमचे अन्न आहे,’ असे ‘बायबल’मधील ‘उत्पत्ती’ या पहिल्या पुस्तकात देवाने मानवाला म्हटले आणि हे वचन आज्ञाधारकपणे मी पुरेपूर अमलात आणतो, असे मी गमतीने म्हणतो. गंमतीने यासाठीच की, ‘बायबल’मधले हे वचन शब्दशः स्वीकारल्यास हे विश्व मानवकेंद्रीत आहे, असे मान्य करून पर्यावरण किंवा इतर जीवसृष्टी गौण ठरू शकते.   

अर्थात कुणाला अन्न म्हणून केवळ वनस्पती आणि फळफळावळ पसंत असू शकेल, तर कुणाला प्राणी-पक्षी म्हणजे मांसाहार आवडीचा असेल. त्याशिवाय आहारनिवडीत भौगोलिक संदर्भ महत्त्वाचे असतात. थंड प्रदेशातील इस्किमोंना ताज्या भाजीपाल्याऐवजी मासे, रेनडिअरचे दूध आणि मांसावर गुजराण करावी लागते. भुईमुगाचे पीक होणाऱ्या परिसरात जेवणाच्या पदार्थांत शेंगदाण्याचा मुबलक वापर होतो आणि त्याच पद्धतीने कोकणात नारळाचा!

चंद्र किंवा मंगळासारख्या परग्रहांवर वसती निर्माण करण्याची आस बाळगणाऱ्या मानवाला तिथल्या परिस्थितीनुसार आपला आहार बदलावा लागणार आहेच! की, तिकडेही खाद्यसंस्कृतीबाबत आपण अशीच कडवी भूमिका कायम ठेवणार आहोत?  

Wednesday, January 20, 2021

`टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

 `टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. पत्रकारितेतील माझा मित्र अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती.
टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा. अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो.
तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यूज डेस्ककडे सोपवून झाल्यावर ''पान दोनसाठी एडिटिंग करण्यासाठी अजूनही काहीच स्टोऱ्या नाही'' असे आपले दोन्ही हात वर उंचावून उपसंपादक संजय पेंडसे याने मोठ्याने सांगितले. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता माझा तो मजकूर आतल्या पानासाठी नसून पान एकच्या अँकरची ती बातमी आहे असे तो म्हणाला.
''बातमीचा पहिला पॅरा वाचताच ती पान एकचे मॅटर आहे हे कळाले , इट इज अ पेज वन मटेरियल ! पण एडिट मिटिंगमध्ये काय होते ते पाहू,'' असे तो म्ह्टल्यावर पान दोनसाठी मी दुसरे मजकूर तयार करू लागलो.
पत्रकारितेत तोपर्यंत जवळजवळ मी एक तप घालवलेले असल्याने मी मनातल्या मनात संजय पेंडसेच्या न्यूज सेन्सबद्दल कौतुक केले.
आणि अखेर संजय म्हणाला होता तसेच झाले. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये दाखल झाल्यानंतर पान एकवर प्रसिद्ध झालेली माझी ती पहिली बातमी.
त्याकाळात टाइम्स ऑफ इंडियात डेस्कवर काम करणाऱ्या उपसंपादकाने व इतरांनी पान एकसाठी बायलाईनची बातमी लिहिल्यास उत्तेजनार्थ वाढिव दिडशे रुपये पगारासोबत मिळायचे. शिवाय फोटोसाठी पन्नास रुपये वेगळे ! या वाढिव मानधनाऐवजी टाइम्स ऑफ इंडिया'च्या पान एकवर बायलाईनची बातमी छापून येण्याचे अधिक अप्रूप होते.
काय होती ती पान एकची बातमी ? आणि त्या बातमीचा इंट्रो ?
Marathi monthly Niropya enters 100th year
Camil Parkhe,TNN | Dec 26, 2002, 10.37 PM IST
''पुणे: एका जर्मन जेसुईट फादरांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका आडवळणाच्या खेड्यात - राहुरीजवळच्या केंदळ -वळण या गावात - १९०३ साली सुरु केलेल्या मराठी मासिकाने 'निरोप्या'ने आज मराठी नियतकालिकांत एक वैशिष्ठपूर्ण स्थान मिळविले आहे. पुणे शहरातून प्रकाशित होत असलेले हे मासिक शतक पूर्ण केलेल्या मराठीतील काही अगदी मोजक्या नियतकालिकांपैकी आहे.
या मासिकाचे संस्थापक-संपादक फादर हेन्री डोरींग यांची नंतर पुण्याचे बिशप आणि काही काळ जपानमधील हिरोशिमा शहरात व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली होती.''
टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे आवृत्तीत २६ डिसेंबर २००२च्या अंकात म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी प्रसिद्ध झाली. टाइम्सच्या आर्किव्हमधून आजही ही बातमी वाचता येते.
या बातमीबरोबर बिशपमहोदयांचा अर्धा कॉलम रंगीत फोटोही छापण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाने पान एक आणि शेवटचे पान रंगीत छापण्यास त्यावेळी नुकतीच सुरुवात केली होती.
( माझ्या इतर बायलाईनच्या अनेक बातम्यांप्रमाणे याही बातमीचे कात्रण मी आजही जपून ठेवले आहे. इतरांच्या दृष्टीने ही जीर्ण झालेली कात्रणे तद्दन रद्दी असली तरी फ्लॅटच्या माळ्यावर मी ती ठेवली आहेत. )
वृत्तपत्रीय जगतात विविध पानांच्या पानांच्या वेगवेगळ्या ढंगात लिहिल्या जातात. त्यातही कुठली बातमी आपल्या वाचकांना आवडेल याचे काही खास निकष असतात. उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डे निमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात होणाऱ्या गुलाबाच्या उत्पादनाची आणि युरोपला निर्यात होणाऱ्या फुलांच्या मी दिलेल्या बातम्या दरवर्षी महाराष्ट्र हेराल्ड- नंतर सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकात कायम पान एकवर अँकर म्हणून वापरल्या जातात. या काळात दैनिकाचे संपादक बदलले तरी व्हॅलेंटाईन डे च्या विशिष्ट शैलीत लिहिलेल्या ह्या बातम्या पान एकवरच अँकरच्या जागा पटकावत असत !
टाइम्स ऑफ इंडिया'त त्या दिवशी पान एकवर छापून आलेल्या माझ्या त्या पहिल्या बायलाईनचे कारण म्हणजे जर्मन असलेल्या बिशप डोरींग यांचे मराठी पत्रकारितेतील आणि मराठी भाषेतील महत्त्वाचे योगदान.
'निरोप्या' या मासिकाने मराठीतल्या अजूनही हयात असलेल्या नियतकालिकांत अगदी वरचा क्रमांक मिळवलेला आहे. मराठी पत्रकारितेचा इतिहास १८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलेल्या `दर्पण' पासून सुरु होतो. त्यानंतर सुरु झालेली अनेक मराठी नियतकालिके अल्पजीवी ठरली. शतकायुषी असून आजही प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मराठी नियतकालिकांत १८८१ सालापासून लोकमान्य टिळकांच्या 'केसरी' चा समावेश होतो. मात्र यापैकी बहुतेक नियतकालिके ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरवर तग धरुन आहेत.
वजनाने नेहेमीपेक्षा अधिक जाडजुड असलेला डिसेंबरच्या नाताळ विशेषांकानंतर आता प्रसिद्ध झालेला निरोप्या' जानेवारी २०२१ चा अंक पाहायला हवा. रंगीत जाहिरातीची तब्बल बारा पाने असलेला एकुण ४४ पानांचा अंक पाहिला तर या मासिकाला वाचकांपासून मिळणाऱ्या प्रतिसादासंबंधी ठोकताळे बांधणे शक्य आहे.
स्थापनेपासून म्हणजे १९०३ पासून 'निरोप्या' हे मासिक सोसायटी ऑफ जिझस (जेसुईट्स) वा येशूसंघीय फादरांच्या संस्थेतर्फे चालविले जाते. पुण्याचे दुसरे बिशप म्हणून डोरींग यांची १९०७ साली नेमणूक झाल्यावर हे मासिक पुण्यातून प्रसिद्ध होऊ लागले. पोपमहाशयांना भेटण्यासाठी बिशप डोरींग रोमला गेले आणि पहिले महायुद्ध सुरु झाले. ते जर्मन असल्यामुळे ब्रिटिश भारतात त्यांचे परतणे अवघड झाले. कारण जर्मनी व इंग्लंड ही शत्रुराष्ट्रे होती. याकाळात डोरींग यांची जपानमध्ये हिरोशिमाचे आर्चबिशप पदावर व्हिकर अपोस्तोलिक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या अनुपस्थितीत `निरोप्या'चे प्रकाशन थांबले.
महायुद्धाच्या समाप्तीनंतर डोरींग आपल्या कर्मभूमीत पुण्याला १९२६ साली परतले. आर्चबिशप डोरींग यांनी याकाळात बंद पडलेल्या आणि आपले अपत्य असलेल्या ‘निरोप्या’ मासिकाचे १९२७ साली पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून आजतागायत ‘निरोप्या’चं प्रकाशन (अलिकडचा कोरोना काळाचा अपवाद वगळता) अखंडितपणे चालू आहे.
.
ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स लिखित महाकाव्य 'ख्रिस्तपुराण' हे मराठीतील पहिलेवहिले मुद्रित साहित्य. हे मराठी महाकाव्य पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्यात १६०४ साली रोमन लिपीत छापले गेले, कारण त्यावेळी देवनागरी छपाई साठी लागणारे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. या 'ख्रिस्तपुराणा'तील काही भाग रोमन लिपीतून देवनागरी लिपीत छापण्याचे श्रेय आर्चबिशप डोरींग यांच्याकडेच जाते.
मात्र संपूर्ण ख्रिस्तपुराण रोमन लिपीतून देवनागरीत आणण्यास १९५६ साल उजाडले. लिप्यांतराचे हे महत्त्वाचे काम अहमदनगरच्या प्राध्यापकशांताराम बंडेलू यांनी आणि पुण्याच्या य. गो. जोशींच्या प्रसाद प्रकाशनाने केले.
निवृत्त आर्चबिशप डोरींग यांचे निधन १९५१ साली वयाच्या ९४ व्या वर्षी झाले. त्यांची कबर वा समाधी पुण्यातील सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या अल्तारापाशी म्हणजे वेदीपाशी आजही आहे. चर्च किंवा कॅथेड्रल मध्ये समाधीचा हा मान हा फक्त बिशप, कार्डिनल अशा वरीष्ठ धर्माचार्यांनाच मिळतो.
त्यांच्या समाधीवरील शिलालेख आर्चबिशपांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीविषयी बोलतो. परंतु,`निरोप्या'चे संस्थापक-संपादक म्हणून अथवा मराठी पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाबद्द्ल ह्या शिलालेखात उल्लेख नाही.
मी लिहिलेल्या `ख्रिस्ती मिशनरीचे योगदान' या मराठी (सुगावा प्रकाशन ) आणि इंग्रजी (गुजरात साहित्य प्रकाश - २००३) या पुस्तकात आर्चबिशप हेन्री डोरींग यांच्यावर एक प्रकरण आहे.
( निरोप्या'विषयी मला विशेष आत्मियता असण्याचे एक कारण म्हणजे माझा पहिला लेख आणि पहिली बायलाईन याच मासिकात १९७० च्या दशकात मी श्रीरामपुरात शाळेत शिकत असताना प्रसिद्ध झाली. त्यावेळी पत्रकार म्हणून लिखाण हाच माझा व्यवसाय असेल याची कल्पनाही केली नव्हती. )