अशा निवडीची मी गेली अनेक वर्षे वाट पाहत होतो, तो योग आज तब्बल तीन दशकांनी आला.
सन १९९१-९२ ला या पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी मी अर्ज भरला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
त्याकाळात पत्रकार संघातले काही दुढ्ढाचार्य पत्रकार संघाचे पदाधिकारीपद आणि सदस्यपद इतरांना बहाल करत असत.
गोवा सोडून औरंगाबादमार्गे मी पुण्याला आलो होतो. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा - गुजचा - मी सरचिटणीस होतो, पत्रकारांच्या अनेक केसेस मी लढवल्या होत्या, ठाण्यात बच्छावत वेतन आयोगासमोर मी पत्रकारांची बाजू मांडली होती.
हाती लाल बावटे घेऊन, घोषणा देत पणजीत, दिल्लीत, कटक आणि श्रीनगर येथील वृत्तपत्र कामगारांच्या मोर्च्यांत मी सहभागी झालो होतो आणि नेतृत्वही केले होते
गुज सरचिटणीस म्हणून Indian Federation of Working Journalists- IFWJ- ने मला प्रशिक्षणासाठी बल्गेरिया आणि रशियाला पाठवले होते.
लोकमत टाइम्सला असताना औरंगाबाद श्रमिक पत्रकार संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत मी सरचिटणीसपदी निवडून आलो होतो.
तर पुण्यातल्या आमच्या इंडियन एक्सप्रेस ऑफिसात असाच एक सहकारी ऑफिसात आला आणि आपल्या दैनिकातर्फे त्याची सदस्यपदावर निवड झाली हे त्याने सांगितले, तेव्हा मी त्याच्याकडे असे चमकून पाहिले होते.
मग दुसऱ्या वर्षी माझ्यामुळे निवडणूक अटळ ठरली.
तर त्यावर्षी समोरचा उमेदवार खूप मताधिक्याने निवडून आला, ५२ विरुद्ध १३.
सलग दुसऱ्या वर्षी माझ्यामुळे पुन्हा पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पुन्हा निवडणुका झाल्या,
जवळजवळ सर्वच पदांसाठी.
महाराष्ट्र हेराल्डच्या गौरी आगट्ये- आठल्ये सरचिटणीसपदावर बिनविरोध निवडून आल्या.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या त्या पहिल्यावाहिल्या महिला सरचिटणीस.
त्याआधी महिलांनी केवळ चिटणीसपद भूषवले होते.
त्यावेळी केसरीचे मधुकर प्रभुदेसाई सकाळ पुरस्कृत महाराष्ट्र हेराल्डच्या मूर्तींचा पराभव करून निवडून आले.
त्यानंतर पत्रकार संघाच्या नियमित निवडणुका होऊ लागल्या त्या आजतागायत. हे माझे एक छोटेसे पण महत्त्वाचे योगदान.
मात्र गेले पस्तीस वर्षे एकाही महिलेची सरचिटणीसपदावर निवड झालेली नव्हती ही अभिमानाची गोष्ट नव्हती. .
नव्या सोळा सदस्यीय कार्यकारिणीत इतर केवळ एकच महिला आहे.
अध्यक्षपदानेसुद्धा महिला पत्रकारांना आतापर्यंत हुलकावणी दिली आहे.
नूतन अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव आणि इतर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
Camil Parkhe, July 29, 2024
No comments:
Post a Comment