Tuesday, September 3, 2024

 

आज त्याच पुस्तक प्रदर्शनाला तिसऱ्यांदा भेट दिली. पहिल्या दोन भेटी घाईघाईत होत्या. आज अगदी आरामात अनेक कक्षांतील पुस्तके दोनदातिनदा नजरेखाली घातली, बऱ्याच पुस्तकांतला मजकूर चाळला.
पुस्तक प्रदर्शनात नेहेमीचेच यशस्वी प्रकाशक कलाकार होते आणि नेहेमीचेच लेखक आणि त्यांची ती पुस्तके होती.
अशाप्रकारच्या लोकप्रिय पुस्तक प्रदर्शनांत वेगवेगळी चव असणाऱ्या बहुतांश वाचकांना आवडतील अशीच पुस्तके असतात. हे प्रदर्शन त्यास अपवाद नव्हते.
मी वेगवेगळ्या प्रकारची अनेक मराठी पुस्तके - चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य, विनोदी साहित्य , ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या - खूप आवडीने वाचल्या ते श्रीरामपुरात दहावीपर्यंत शिकत असताना.
तिथल्या नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयात हे सगळे वाचन झाले. त्यानंतर मी गोव्याला गेलो, तेथे मी इंग्रजी शिकलो आणि इंग्रजी साहित्याकडे आणि पत्रकारितेकडे वळलो ते आजतागायत.
आज या पुस्तक प्रदर्शनात दिडेक तास वावरताना मला ती माझ्या ओळखीचे अनेक साहित्यिक आणि पुस्तके भेटली.
वि. स. खांडेकर, साने गुरुजी, ग. दि. आणि व्यंकटेश माडगूळकर, शिवाजी सावंत, इरावती कर्वे, पुल देशपांडे, दुर्गा भागवत, व.पु. काळे, गो. नि दांडेकर, आचार्य अत्रे आणि धनंजय कीर .
ऐंशीच्या आणि नव्वदच्या दशकांत अनेक मराठी साहित्यिकांच्या गाजलेल्या कलाकृती मी वाचलेल्या नाहीत. पण त्या पुस्तकांची आणि साहित्यिकांची मला तोंडओळख आहे.
आजच्या प्रदर्शनात ही पुस्तके नजरेसमोर आली आणि त्यांत मी डोकावून पाहिलेसुद्धा. मात्र आज ही पुस्तके माझ्याकडून वाचली जातील कि नाही अशी शंका येऊन ती पुस्तके पुन्हा रॅकवर ठेवली.
काही नवी पुस्तके नजरेत भरली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे 'देवळांचा धर्म' हेच पुस्तक गेली अनेक वर्षे ठिकठिकाणी दिसायचे, आता त्यांचे ''माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र , 'दगलबाज शिवाजी' असे चकित करणारे शीर्षक असलेले पुस्तक आणि इतरही पुस्तके नव्याने बाजारात आली आहेत.
मला हवे असलेले प्रबोधनकारांनी लिहिलेले पंडिता रमाबाई यांचे चरित्र मात्र मला मिळाले नाही.
अशी अनेक चांगल्या दर्जाची असलेली मराठी पुस्तके विविध कारणांमुळे दुर्मिळ होत चालली आहेत. मागच्याच आठवड्यातील एक गोष्ट सांगतो.
नाशिक येथे १८३०च्या आणि १८४०च्या दशकांत मुलींच्या शाळा चालवणाऱ्या मिसेस कॅरोलिन फरार यांचे 'चमत्कारिक गोष्टी' हे अनुवादित पुस्तक फार लोकप्रिय झाले,
`The Ayah and Lady. An Indian Story' या Mary Martha Sherwood यांच्या पुस्तकाचा अनुवाद.
या मराठी पुस्तकाच्या अनेक आवृत्त्याही छापल्या गेल्या होत्या. मिशनरी शाळांत हे पाठ्यपुस्तक म्हणून शिकवले जायचे.
'चमत्कारिक गोष्टी' या पुस्तकाबाबत मी अनेक जाणकार व्यक्तींकडे चौकशी केली, तर या पुस्तकाचे नावदेखील त्यांनी ऐकले नव्हते !.
नरहर कुरुंदकर यांची अनेक पुस्तकेसुद्धा आता नव्याने प्रकाशित झाली आहेत. साने गुरुजी यांनी अनुवादित केलेली विल ड्युरांत यांचे 'पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास' हा ग्रंथसुद्धा एक नवी भर आहे.
लोकप्रिय स्वरूपाच्या पुस्तक प्रदर्शनांत ठराविक प्रकाशन संस्थाचाच सहभाग असतो. त्यामागे आर्थिक गणित असतेच.
विविध प्रकारच्या मराठी साहित्य संमेलनांत भरणाऱ्या आणि पुस्तक प्रदर्शनांत पुस्तकप्रेमी लोकांना मोठे घबाड मिळत असते.
यावेळी अ भा. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्लीत होणार आहे. तिथे याबाबाबत काय परिस्थिती असेल हे आताच सांगता येणार नाही.
Camil Parkhe, August

No comments:

Post a Comment