या चित्राचा संदर्भ काय आहे, हे कितीजण चटकन सांगू शकतील?
इतर कुठल्याही धर्मग्रंथांप्रमाणे बायबलमध्ये सुद्धा स्त्रियांना गौण किंवा नगण्य स्थान आहे. संपूर्ण बायबलमध्ये म्हणजे जुन्या आणि नव्या करारांत स्त्रियांची पात्रे क्वचितच आढळतात.
अनेकदा या पात्रांना स्वतःचा चेहेरा, नावगाव म्हणजे ओळखसुद्धा नसते. अमुक याची आई, तमुकची पत्नी, एलीया या संदेष्ट्याला ऐन दुष्काळात तेल आणि पीठ पुरवणाऱ्या स्त्रीची ओळखसुद्धा शेवटपर्यंत `एक गरीब विधवा' अशीच राहते.
नव्या करारात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आगमनानंतरच्या भागातसुद्धा काही मोजक्याच स्त्रियांची पात्रे येतात.
येशूची आई मारीया, सेंट जॉन द बॅप्टिस्टची आई एलिझाबेथ. मेरी माग्दालेन आणि कुकर्म करत असताना पकडलेली आणि त्यामुळे मॉब लिंचिंगची बळी होऊ शकणारी एक स्त्री येशूमुळे वाचते.
त्याचे कारण म्हणजे `तुमच्यापैकी जो कुणी निष्पाप असेल त्याने हिच्यावर पहिला धोंडा उचलावा' असा येशूचा त्या झुंडशाहीला सल्ला असतो.
येशूच्या बारा शिष्यांमध्ये एकही स्त्री नाही. त्याचप्रमाणे नव्या ख्रिस्ती मंडळींना पत्रे लिहून ख्रिस्ती धर्मतत्त्वांची मांडणी करणाऱ्या सेंट पॉल, सेंट पिटर वगैरे व्यक्तींमध्येही एकाही महिलेला जागा नाही.
`बायबलमधील स्त्रिया' या एकाच शिर्षकाची मराठीत अलीकडेच दोन नवी पुस्तके आली आहेत.
एक आहे सरोजिनी नीलकंठ साळवी यांनी लिहिलेले. (चेतक बुक्स, पुणे ) आणि दुसरे आहे डॉ. अनुपमा निरंजन उजगरे, वर्णमुद्रा प्रकाशनने प्रकाशित केलेले.
तर `या चित्रातील दोन महिला कोण आहेत ' या प्रश्नांचे उत्तर बायबल अगदी थोडेफार माहित असलेल्या व्यक्तीला अगदी सहज देता येईल. .
या दोघी बहिणी आहेत मारिया आणि मार्था. दोन प्रसंगांत या दोन बहिणींचा येशूच्या चरित्रात म्हणजे गॉस्पेलमध्ये होतो.
वरील चितारलेल्या प्रसंगाचे फादर फ्रान्सिस दिब्रिटोकृत `सुबोध बायबल'मध्ये खालील शब्दांत वर्णन आहे :
``प्रवास करीत असता येशू बेथानीला आला, तिथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले, तिला मारीया नावाची बहीण होती. ती प्रभूच्या चरणी बसून त्याची अमृतवाणी ऐकत होती.
स्वयंपाकघरात मार्थाला पाहुणचाराचे पुष्कळ काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली. ती येशूकडे येऊन त्याला म्हणाली "प्रभुजी, माझ्या बहिणीने कामाचा सगळा भार माझ्या एकटीवर टाकला आहे. ह्याचे आपल्याला काहीच वाटत नाही काय? मला मदत करायला तिला सांगा ना:"
प्रभुने तिला उत्तर दिले, ' मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीची आवश्यकता आहे. मारीयेने जे चांगले आहे, त्याची निवड केली आहे. ते तिच्यापासून हिरावून घेतले जाणार नाही.''
हे झाले या पोस्टमध्ये दिलेल्या या चित्राविषयी.
आता या चित्राच्या चित्रकर्तीविषयी.
भारतात आणि जगातही फार कमी संख्येने महिलांनी चित्रकलेत नाव कमावले आहे.
भारतातल्या पहिल्या काही चित्रकर्तींमध्ये मूळ गोव्याच्या असलेल्या अँजेला त्रिंदाद (१९०९-१९८०) यांचा समावेश होतो.
ब्रिटिशकाळात बंगाल स्कुल ऑफ आर्ट आणि मुंबई स्कुल ऑफ आर्ट या दोन कलाशाखा उगमास आल्या, त्यापैकी अँजेला त्रिंदाद या मुंबई स्कुल परंपरेतील.
मुंबईतल्या जेजे स्कूल ऑफ आर्टची स्थापना १८५७ ची.
मुंबईत जन्मलेल्या अँजेला यांनी भारतीय परंपरेतील म्हणजे भारतीय प्रतिमांचा वापर करुन ख्रिस्ती धर्मसंकल्पनांतील अनेक चित्रे रेखाटली.
हे चित्र यापैकी एक.
साधना बहुलकर यांनी लिहिलेल्या `बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार (१८५७-१९५०)' या पुस्तकाचे (राजहंस प्रकाशन, २०२१) मुखपृष्ठ आहे.
या पुस्तकात साधना बहुळकर यांनी अँजेला त्रिंदाद, अंबिका धुरंधर, दुर्गा भागवत यांच्या बहीण विमल भागवत गोडबोले, मारी हेंडरसन - टेंपल, मरदा नाखमन -आचार्य, अमृता शेरगील वगैरे महिला चित्रकारांच्या जीवन आणि चित्रकलाविषयी लिहिले आहे.
ख्रिस्ती धर्मपरंपरा आपल्या चित्रांत भारतीय प्रतिमांसह म्हणजे पूर्णतः भारतीय शैलीत आणणाऱ्या चित्रकार अँजेला त्रिंदाद यांचे फार मोठे योगदान आहे.
Camil Parkhe
No comments:
Post a Comment