Monday, May 12, 2025


आज दुपारी तीनच्या सुमारास कात्रजला होतो.

ऊन खूप होते आणि आमची सिटी बस सिग्नलला थांबली तोच सपकन चाबूक मारण्याचा आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेने सगळ्यांच्या नजर वळल्या.
एक लुकडा आणि कमरेपासून वर पार उघडाबंब असलेला तरुण आपल्या शरीराभोवती सफाईने चाबकाचे आसूड मारत उभ्या राहिलेल्या वाहनांमधून अनवाणी फिरत होता.
पीळ दिलेल्या त्या चाबकाचा स्वतःभोवती सपकन वार केल्यानंतर लगेचच एक हात लोकांसमोर पसरुन तो भीक मागत होता.
ऐन वर्दळीच्या ठिकाणी आणि सर्वच लोक सिग्नल बदलण्याकडे लक्ष ठेवून असल्याने त्या तरुणाला कुणीच पैसे देत नव्हते.
पंचविशीच्या आसपास असलेला तो तरुण त्याच्या आधीच्या पिढीच्या तुलनेत नक्कीच आधुनिक होता.
हा भीक मागण्याचा धंदा करणारे त्याचे वडील आणि आजोबा यांच्याप्रमाणे खांद्यापर्यंत रुळणारे त्याचे केस नव्हते.
कमरेभोवती विविध रंगांची परकरवजा कपडे नव्हते आणि पायात जाडजूड, वजनदार घुंगरुसुद्धा नव्हते.
सोबत डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून कमरेभोवती असणारी डोलकी वाजवणारी कुणीही महिला त्याच्यासोबत नव्हती.
त्याच्या कपाळावर, खांद्यांवर किंवा शरीराच्या कुठल्याही भागांवर कुंकू, हळद वा कुठलाही रंग फासलेला नव्हता.
तो पूर्णतः अशिक्षितही नसावा, निदान लिहिण्यावाचण्याइतके दोनतीन इयत्तापर्यंतचे त्याचे शिक्षण झालेले असणार.
मात्र गरिबीमुळे पुढे न शिकल्यामुळे तो आपल्या पिढीजात व्यवसायाकडे नाईलाजाने वळलेला असणार.
``कुठे आहोत आपण?''
उन्हात घामाघूम झालेल्या तरुणाकडे पाहत मी माझ्या शेजारच्या एका सहप्रवाशाला प्रश्न केला.
माझ्या प्रश्नाचा रोख न समजून त्याने प्रश्नार्थक चेहरा केला आणि त्याचवेळी हिरवा सिग्नल मिळाल्याने आमची बस पुढे ढळली.
Camil Parkhe May 5, 2025

No comments:

Post a Comment