भारतीय समाजव्यवस्थेत दलितांना किंवा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना पौरोहित्याचे अधिकार नसायचे, आजही नाहीतच.
नजिकच्या काळात हा अधिकार मिळण्याची धुसरही शक्यता नाही.
ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर मात्र या उपेक्षित समाजघटकांना धर्मगुरू होण्याचे आणि पर्यायाने धर्मग्रंथ वाचण्याचे, शिकवण्याचे अन पौरोहित्याचे इतर सर्व अधिकार मिळाले.
नगर जिल्ह्यातील राहुरीजवळच्या चिंचोळे गावचे जोसेफ मोन्तेरो हे १९३० साली कॅथोलिक धर्मगुरू बनले.
महाराष्ट्रात प्रोटेस्टंट पंथांत मात्र हे खूप आधीच घडले होते.
तिथे ब्राह्मण असलेल्या नगरचे रामकृष्ण विनायक मोडक, हरिपंत रामचंद्र खिस्ती, नारायण वामन टिळक, नारायणशास्त्री शेषाद्री, नीळकंठशास्त्री गोऱ्हे यांच्याबरोबरीने बहुजन समाजातील बाबा पद्मनजी, कृष्णाजी रत्नाजी सांगळे भास्करराव उजगरे वगैरेना 'रेव्हरंड' पदाची दीक्षा आधीच मिळाली होती.
वैजापूर तालुक्यातील माळीघोगरगाव येथे फादर जोसेफ मोन्तेरो यांचे १९७९ साली निधन झाले.
मराठवाड्यातील हे माळीघोगरगाव हे माझे आजोळ. तेथेच फादर मोन्तेरो यांची समाधी त्यांचे गुरु फ्रेंच फादर गुरियन जाकियरबाबा यांच्या समाधीशेजारी आहे.
संगमनेर येथील थॉमस भालेराव हे 1965 साली पहिले स्थानिक येशूसंघीय किंवा जेसुईट धर्मगुरू बनले.
हेच फादर भालेराव १९८९ साली या दलित समाजातील पहिले आणि एकमेव कॅथोलिक बिशप बनले.
नाशिक डायोसिसचे पहिले बिशप भालेराव यांचे २०१५ साली निधन झाले.
त्यांच्यानंतर इतर कुठलीही स्थानिक दलित व्यक्ती आजपर्यंत कॅथोलिक बिशप बनलेली नाही.
प्रोटेस्टंट पंथात मात्र आज महाराष्ट्रात अनेक दलित बिशप्स आहेत.
भारतातल्या ख्रिस्ती समाजात स्थानिक विविध जातीजमाती आहेत. त्यामध्ये उच्चवर्णीय आहेत तसेच दलित आणि आदिवासी लोकांचे प्रमाण खूप आहे.
अनेक दलित आणि आदिवासी ख्रिस्ती व्यक्ती आतापर्यंत बिशप बनल्या आहेत.
पूर्व भारतातील आदिवासीबहुल राज्यांतील अनुसूचित जमातीतील काही व्यक्ती आतापर्यंत कार्डिनल्स झालेल्या आहेत.
भारतात दक्षिणेतील काही राज्यांत कॅथोलिक बिशपांमध्ये अनेक दलितसुद्धा आहेत.
मात्र अलीकडच्या काळापर्यंत या कॅथोलिक दलित बिशपांमधून कार्डिनलपदावर कुणीही पोहोचले नव्हते.
पोप फ्रान्सिस यांनी २०२२ साली हैदराबादचे आर्चबिशप अँथनी पुला यांची कार्डिनलपदी नेमणूक केली आणि कॅथोलिक चर्चच्या इतिहासात नवा विक्रम घडला.
अँथनी पुला यांच्या रुपाने कॅथोलिक चर्चमध्ये पहिल्यांदाच एखादी दलित व्यक्ती कार्डिनल बनली होती. .
गेली अनेक शतके अस्पृश्यता आणि जातीभेद या प्रथा भारतीय समाजपद्धतीचा एक अविभाज्य भाग राहिल्या होत्या, आजही यात फारसा फरक पडलेला नाही.
असे असले तरी ख्रिस्ती धर्मात जातीभेद आणि सामाजिक उच्चनीचता या गोष्टींना अजिबात स्थान नसते.
त्यामुळे एखादा दलित धर्मगुरू, बिशप किंवा कार्डिनल बनले याची चर्चतर्फे कधीही चर्चा किंवा वाच्यता केली जात नाही, टिमकी वाजवणे, गाजावाजा करणे तर दूरच राहिले.
बिशप थॉमस भालेराव आणि कार्डिनल अँथनी पुला यांच्याबाबत सुद्धा असेच धोरण स्वीकारले गेले होते.
मी स्वतः याबाबत लिहिणे याच कारणासाठी टाळले होते.
भारतचे पहिले दलित राष्ट्रपती के आर नारायणन यांना स्वतःला दलित म्हणवून घेणे आवडत नसे.
कुणाला आवडेल?
बिशपपदावरचे पद म्हणजे कार्डिनल.
कॅथोलीक धर्मातील सर्वोच्च असलेले पोपपद रिक्त झाल्यानंतर जगभरातील कार्डिनल्स एकत्र येऊन आपल्यापैकी एकाची पोप म्हणून निवड करतात.
आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आणि पोपपद रिक्त झाले.
भारताच्या, चर्चच्या आणि जगाच्या इतिहासात आता पहिल्यादाच दलित समाजातील एक कार्डिनल अशा महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत आहे.
मात्र आता पोप पदाच्या निवडणुकीत कार्डिनल अँथनी पुला सहभागी होत असल्याने याबाबत प्रसार माध्यमांत चर्चा होणे साहजिकच आहे.
आफ्रिकन वंशाच्या धर्मगुरूंना बिशप आणि कार्डिनल्स पद देण्यात आले तेव्हाही अशीच चर्चा झाली होती.
भारतात सद्या सहा कार्डिनल्स आहेत. त्यापैकी वयाची ऐंशी पूर्ण न केलेले चार कार्डिनल पोपपदाच्या निवडणुकीत सहभागी होत आहेत,
त्यामध्ये गोव्याचे कार्डिनल फिलिप नेरी फेरावसुद्धा आहेत. इतर दोन कार्डिनल्स केरळमधील आहेत.
वयाची ऐंशी पूर्ण न केलेले जगभरातील १३३ कार्डिनल्स सात मे रोजी नूतन पोप निवडण्यासाठी स्वतःला ऐतिहासिक सिस्टाईन चॅपेलमध्ये कोंडून घेतील.
ते बाहेर येतील ते नव्या पोपची निवड करुनच.
ही निवडणूक किती काळ चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही.
एक दिवस, एक आठवडा किंवा अधिक काळ. मताधिक्य होईपर्यंत.
यावेळी युरोपऐवजी आशियन किंवा आफ्रिकन कार्डिनल पोपपदावर निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आशियन धर्मगुरु म्हणजे भारतीय कार्डिनल पोप झाले तर नक्कीच नवा इतिहास घडणार आहे.
किंवा दलित कार्डिनल पोप झाले तर?
त्यामुळेच पोपपदाच्या या निवडणुकीबद्दल संपूर्ण जगात खूप उत्कंठा आहे.
No comments:
Post a Comment