दारुच्या गुत्त्यांपासून ते थेट कुंटणखान्यांपर्यंत
चमकलात कि नाही.? हे वाचल्यानंतर मी सुद्धा असाच चमकलो होतो अन् उत्सुकतेने लगेच पुढे वाचायला घेतले होते.
फ्रेडरिक नोरोन्हा यांनी संपादित केलेल्या गोव्यातील पत्रकारांची आत्मकथने असलेल्या "...अँड रीड ऑल अगेन?" या पुस्तकातील हे पहिले प्रकरण आहे.
बहुधा लेखाच्या धक्कादायक शिर्षकामुळे या लेखाची या संग्रहात पहिल्या क्रमांकाचा लेख म्हणून निवड झाली होती.
पोर्तुगीज इंडिया किंवा गोव्याचे शेवटचे पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युएल सिल्वा यांच्याविषयी हा लेख आहे.
लॉर्ड लुईस माऊंटबॅटन हे ब्रिटिश इंडियाचे शेवटचे गव्हर्नर जनरल. सत्तांतर घडल्यानंतर भारतीय राज्यघटना अंमलात येईपर्यंत सी. राजगोपालाचारी यांची गव्हर्नर जनरल म्हणून निवड करण्यात आली होती.
कुठलाही हिंसाचार न होता ही प्रक्रिया झाली, अर्थात भारताची फाळणी झाल्यानंतर सीमाभागात ज्या हिंदू मुस्लीम दंगली उसळल्या त्या वेगळ्या संदर्भात होत्या.
गोव्याबाबत मात्र असे काही घडले नव्हते. गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश साडेचार शतके पोर्तुगीज वसाहतीचा भाग होता. भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले मात्र त्यानंतरसुद्धा गोवा पोर्तुगीज साम्राज्याचा एक भाग राहिला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा पोर्तुगीज राजवटीविरुद्ध चिमकुल्या गोव्यात मोठे उठाव असे झालेच नाही. ज्या काही चळवळी झाल्या तेव्हा पोर्तुगीज राजवटीने अशा नेत्यांना सरळसरळ तुरुंगात टाकले आणि लांब अशा लिस्बनच्या तुरुंगात त्यांना ठेवले.
आणि अचानक एके दिवशी भारतीय लष्कराने विविध बाजूंनी गोव्याला घेरले आणि एकदिड दिवसांत कुठलाही रक्तपात आणि हिंसाचार न होता गोवा भारतीय संघराज्याचा १९ डिसेंबर १९६१ रोजी एक अविभाज्य भाग बनला.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आंतरराष्ट्रीय परिणामांची पर्वा न करता गोव्यात लष्कराची धडक कारवाई केली होती.
गोव्यापासून लांब अंतरावर असलेल्या दमणमध्ये मात्र संपर्काच्या अभावी प्रतिकार आणि रक्तपात झाला होता.
त्याआधी काही वर्षांपूर्वी असेच गुजरातजवळ असलेल्या पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या एका तालुक्याचा आकार असलेला छोटासा दादरा नगर हवेली प्रदेश गाजावाजा न होता भारतात सामिल झाला होता.
कुठलाही प्रतिकार आणि रक्तपात न होता साडेचार शतकांची पोर्तुगीजांनी गोव्यातली सत्ता संपली होती.
हे असे कसे घडले?
याचे कारण म्हणजे त्यावेळचे पोर्तुगीज गव्हर्नर जनरल असलेल्या मॅन्युएल अंतोनियो व्हासालो ई सिल्वा यांनी लिस्बनचा प्रतिकाराचा आदेश धुडकावत आपल्या सैन्याला शस्त्र खाली ठेवत शरणागती स्वीकारण्यास सांगितले होते.
परिणामतः लिस्बनला गेल्यानंतर त्यांच्यावर कोर्ट मार्शल कारवाई करण्यात आली होती.
तर पोर्तुगीज इंडियाचे हे शेवटचे गव्हर्नर जनरल मॅन्युएल सिल्वा गोवामुक्तीनंतर अठरा वर्षानंतर भारतात आणि गोव्यात आले तेव्हा अत्यंत उत्साहाने त्यांचे स्वागत झाले.
माझे पत्रकार सहकारी असलेले धर्मानंद कामत तेव्हा १९७९ साली गोवा युनियन ऑफ जर्नलिस्टसचे (गुज) सरचिटणीस होते.
या गुजतर्फे सिल्वा साहेबांचा ' मिट द प्रेस ' कार्यक्रम झाला, त्याला दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांत चांगली प्रसिध्दी मिळाली.
झाले, दुसऱ्या दिवशी दक्षिण गोव्याचे माजी खासदार मुकुंद शिक्रे यांनी पत्रकार संघाने पोर्तुगीज माजी गव्हर्नर जनरलच्या केलेल्या सन्मानाबद्दल कडक शब्दांत नापसंती व्यक्त केली.
पोर्तुगालच्या ज्या माजी सत्ताधाऱ्यांने भारतीय लष्करासमोर सपशेल शरणागती पत्करली होती, त्याच्यासमोर गोव्यातील पत्रकारांनी आता लोटांगण घातले आहे, अशी शिक्रे यांनी टीका केली होती.
त्याला उत्तर म्हणून धर्मानंद कामत यांनी ठणकावून सांगितले.
"आम्ही पत्रकार लोक बॉर्डरलेस आहोत, आम्हाला सीमा आणि हद्द नसतात, आमचा दारुच्या गुत्त्यापासून थेट कुंटणखान्यापर्यंत संचार असतो. "
असे अनेक विविध विषयांवरील लेख या पुस्तकात आहेत. माझे दोन लेख त्यात आहेत.
परवा मडगावात झालेल्या कार्यक्रमात माझ्यासह इतर पत्रकार लेखकांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
No comments:
Post a Comment