कम्युनिस्ट राजवटींचा अस्तकाल आणि आजचा रशिया
सोमवार , २ जुलै, २०१८ goo.gl/kuQdq8 कामिल पारखे
सध्या फूटबॉल वर्ल्डकपमुळे पुन्हा एकदा प्रकाशात आलेला रशिया एकेकाळी साम्यवादी राष्ट्रांचा पुढारी होती. आज कम्युनिझम नाहीसा झालेल्या या देशाच्या १९८०च्या दशकातील आठवणी.
मॉस्कोच्या रेड स्केअर चौकात उणे बारा तापमानाचा अनुभव घेत आम्ही उभे होतो आणि आमची अनुवादक आणि गाईड आम्हाला त्या ऐतिहासिक स्थळाची माहिती देत होती. राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निवासस्थान कोठे आहे, आमच्यापैकी एका पत्रकाराने तिला मध्येच विचारले आणि आतापर्यंत उत्साहाने बोलणाऱ्या ती गाईड क्षणभर गप्पगारच झाली. बहुधा तिला परदेशी पर्यटकांकडून येणाऱ्या अशा प्रश्नांची सवय असावी. कारण ताबडतोब तिने मूळ प्रश्नाला बगल देत रेड स्केअरविषयी अधिक माहिती देण्यास सुरुवात केली.
ही घटना होती एप्रिल १९८६ मधील. कॉम्रेड मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी नुकतीच युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लीक किंवा यूएसएसआरच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हणून सूत्रे घेतली होते. त्यांनी सुरू केलेल्या ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईका या उदारमतवादी धोरणांची जगाला हळूहळू ओळख होत होती. त्या शीतयुद्धाच्या काळात अमेरिकाविरोधी गटाचे नेतृत्व रशियाकडे होते. व्हर्साव्ह करारावर सह्या करणारी इस्टर्न ब्लॉकमधील पूर्व जर्मनी, पोलंड, रोमानिया, झेकोस्लाव्हाकिया, हंगेरी, बल्गेरिया वगैरे राष्ट्रे रशियाच्या प्रभावाखाली होती. भारत अलिप्त राष्ट्रांचे नेतृत्व करत असला तरी रशियाच्या बाजूने झुकला होता. त्याकाळात भारतातील पत्रकारांसाठी या इस्टर्न ब्लॉक किंवा पूर्व युरोपातील राष्ट्रांत दरवर्षी पत्रकारितेचे पदविका अभ्यासक्रम आयोजित केले जात असत. इंडियन फेडरेशन ऑफ वर्किग जर्नलिस्ट्स तर्फे पत्रकारांची अभ्यासक्रमासाठी निवड केली जाई. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी सरचिटणीस होतो. त्यामुळे त्यावर्षी बल्गेरियात होणाऱ्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या भारतातील ३० पत्रकारांच्या तुकडीत माझा समावेश होता. बल्गेरियाला जाण्यापूर्वी रशियाला आम्ही धावती भेट देत होतो. त्यानिमित्त तेथील राजकीय, सामाजिक जीवनाचे दर्शन घडले.
मॉस्कोच्या या भेटीत व्लादिमीर लेनिनचे शरीर जतन केलेल्या स्मारकास- लेनिन मौसोलियमला - आम्ही भेट दिली. थ्री-पीस सूट, अर्धवर्तुळाकार टकलावरील उरलेले चापूनचोपून बसवलेले केस असा तो लेनिन शांत झोपला आहे असेच वाटले. त्या कडाक्याच्या थंडीतही स्मारकास भेट देणाऱ्या लोकांची रांग खूप लांब होती. स्मारकाच्या शेजारीच कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स, लेनिन, जोसेफ स्टॅलिन वगैरेंचे मोठे पुतळे होते. अत्यंत मोठया आकाराच्या त्या लाल चौकात वाहनांस मुळी परवानगीच नव्हती. अफूची गोळी असलेल्या धर्मावर बंदीच असल्यामुळे तेथील मोठमोठ्या चर्चचे पर्यटन वास्तूंत रूपांतर झाले होते. या चर्चमध्ये साठी-सत्तरी उलटलेल्या पुरुष- महिला भाविक आणि काळ्या झग्यातल्या आणि दाढी राखलेल्या ऑर्थोडॉक्स चर्चच्या धर्मगुरूंशिवाय कुणी दिसत नव्हते. रशियातील सामान्य माणसांकडे त्यावेळी भारताचे नाव काढले की इंदिरा गांधी आणि अभिनेते राज कपूर या दोनच व्यक्तीं त्यांच्या नजरेसमोर उभ्या राहत असत.
मॉस्कोच्या या भेटीत व्लादिमीर लेनिनचे शरीर जतन केलेल्या स्मारकास- लेनिन मौसोलियमला - आम्ही भेट दिली. थ्री-पीस सूट, अर्धवर्तुळाकार टकलावरील उरलेले चापूनचोपून बसवलेले केस असा तो लेनिन शांत झोपला आहे असेच वाटले. त्या कडाक्याच्या थंडीतही स्मारकास भेट देणाऱ्या लोकांची रांग खूप लांब होती. स्मारकाच्या शेजारीच कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स, लेनिन, जोसेफ स्टॅलिन वगैरेंचे मोठे पुतळे होते. अत्यंत मोठया आकाराच्या त्या लाल चौकात वाहनांस मुळी परवानगीच नव्हती. अफूची गोळी असलेल्या धर्मावर बंदीच असल्यामुळे तेथील मोठमोठ्या चर्चचे पर्यटन वास्तूंत रूपांतर झाले होते. या चर्चमध्ये साठी-सत्तरी उलटलेल्या पुरुष- महिला भाविक आणि काळ्या झग्यातल्या आणि दाढी राखलेल्या ऑर्थोडॉक्स चर्चच्या धर्मगुरूंशिवाय कुणी दिसत नव्हते. रशियातील सामान्य माणसांकडे त्यावेळी भारताचे नाव काढले की इंदिरा गांधी आणि अभिनेते राज कपूर या दोनच व्यक्तीं त्यांच्या नजरेसमोर उभ्या राहत असत.
मॉस्कोनंतर बल्गेरियात गेलो तेथे त्या देशाची राजधानी सोफिया आणि इतर अनेक शहरांना भेटी दिल्या. रशियाचे जवळजवळ मांडलिक देश असलेल्या पूर्व युरोपातील देशांतही लेनिनच्या धर्तीवर आपापल्या राष्ट्रपुरुषांचे देह जतन करण्याची टूम होती. मृतदेह जतन करण्याची प्रक्रिया अर्थातच रशियातच केली जाई. सोफिया येथेही बल्गेरियन कम्युनिस्ट क्रांतीचा प्रणेता जॉर्जी दिमित्रोव्ह यांचे शरीर असेच ठेवले होते. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त एक मे रोजी सोफिया येथे झालेल्या परेडला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्यावेळी मी भारावूनच गेलो होतो.
१९८०च्या त्या दशकात आणि त्याआधीच्या कालखंडात भारतात डाव्या चळवळीबाबत आणि कामगार युनियनबाबत सामान्य लोकांची, विचारवंतांची सहानुभूती असे. जवळजवळ सर्वच सरकारी खात्यांत आणि खासगी उद्योगकंपन्यांत कामगार युनियन्स असतच. कामगार संघटना स्थापन करणे हा कामगारांचा हक्क आहे याविषयी त्यावेळी दुमत नसे. कामगार चळवळीसाठी एक मे हा दिवस एका मोठा उत्सव असे. मला आठवते दरवर्षी एक मे रोजी कामगारदिनानिमित्त गोव्यात पणजीत, म्हापशात, मडगाव आणि वॉस्को येथे विविध डाव्या, उजव्या आणि सेंट्रिस्ट विचारसरणींच्या कामगार संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम आणि मोर्चे-फेऱ्यांचे आयोजन केले जात असे आणि दुसऱ्या दिवशी त्या घटनांचे सविस्तर वृत्तांकन आम्ही वृत्तपत्रांत छापत असू.
पुरोगामी किंवा डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना, ओपिनियन मेकर्सना त्याकाळात रशिया आणि पूर्व युरोपातील देशांची वारी करण्याची संधी मिळत असे, तेथील कम्युनिस्ट जीवनप्रणालीचा, तेथील तथाकथित प्रगतीचा वारेमाप प्रचार केला जाई. त्याकाळात कम्युनिस्ट विचारसरणींचा प्रचार करणारी पुस्तके, ग्रंथ विविध भाषांत अगदी नाममात्र किंमतीत वा फुकटात मिळत असे. त्यामुळेच मॅक्झिम गॉर्की यांच्या 'द मदर' या कादंबरीचे मराठी भाषांतर असलेले 'आई' हे हार्डबाऊंड छापलेले पुस्तक, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरे पुस्तके घरोघरी असायचीच. 'सोव्हिएत लँड' या शीर्षकाचे गुळगुळीत कागदांवर छापलेले एक रंगीत नियतकालिक जागोजागी दिसायचे.
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आघाडीवर असलेल्या कम्युनिस्ट देशांत प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबतीत बोंबच होती. जाहिरातबाजीमध्ये किंवा प्रोपोगांडामध्ये मात्र ही सर्व राष्ट्रे आघाडीवर होती. बल्गेरियात आम्ही दौऱ्यावर असताना विविध शहरात गेल्यावर तेथील अधिकारी, महापौर अशा आर्थिक, सामाजिक प्रगतीची पोपटपंची सुरू करत, त्यावेळी बल्गेरियाबाहेरच्या जगाचा अनुभव घेतलेला आमच्या एक अनुवादकाकडे माझे लक्ष असायचे. 'या जाहिरातबाजीत काहीच तथ्य नाही' असे तो आम्हाला नेहेमी खासगीत सांगत असे. मात्र रशियन आणि बल्गेरियन भाषा फारशी येत नसल्याने स्थानिक लोकांशी थेट संवाद साधून सत्य परिस्थिती जाणून घेणे शक्य नसायचे. मात्र एकदा बुर्गास शहरात असताना काही गोरीगोमटी आणि चेहेऱ्यावर लालभडक टिपके असलेली मुले-मुली आमच्या शर्टाला खेचून भीक मागू लागली तेव्हा आम्ही चकितच झालो होतो. त्याबद्दल स्पष्टीकरण पुरवताना त्या अनुवादकाची भंबेरी उडाली होती. ती मुले जिप्सी कुटुंबांतील होती आणि त्यांचे पुनर्वसन करणे कम्युनिस्ट बल्गेरियन सरकारला शक्य झाले नव्हते हे त्यावेळी आमच्या लक्षात आले.
रशियात आणि बल्गेरियाचा आम्ही दौरा करत असताना याकाळात म्हणजे १९८०च्या दशकाअखेरीस कम्युनिझमचा अस्तकाळ जवळ येतो आहे, या कम्युनिस्ट जगात मोठी सुनामी येणार आहे याची अंधुकशीही कल्पना कुणाला आली नव्हती. या दोनतीन वर्षांच्या काळात कम्युनिस्ट जगतात अनेक घटना वेगाने घडत गेल्या आणि कम्युनिस्ट राजवटींचा हा डोलारा डॉमिनो इफेक्ट प्रमाणे वेगाने खाली कोसळला.
जगभर पसरलेल्या कम्युनिझमच्या या पोलादी पडद्यास छिद्रे पडण्यास सुरुवात झाली ती पोलंड येथे कामगार नेते लेक वालेसा यांनी केलेल्या चळवळीमुळे. कम्युनिस्ट राजवट असलेल्या पोलंडमधील क्रॅकोव्हचे कार्डिनल कॅरोल जोसेफ वोजत्याल यांची रोममध्ये पोप जॉन पॉल दुसरे म्हणून निवड झाली आणि पोलंडमधील लोकशाही चळवळीने अधिक जोर घेतला. लेक वालेसा नंतर पोलंडचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यानंतर बर्लिनच्या भिंतीचा पाडाव झाला आणि इतरही अनेक कम्युनिस्ट राष्ट्रांत उठाव होऊन तेथेही लोकशाहीप्रधान राजकीय व्यवस्था प्रस्थापित झाल्या. रशियात मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी उदारमतवादी धोरण राबवल्यानंतर त्यांना भले नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले. मात्र त्यांच्या उदारीकरणाच्या धोरणाचा एका परिपाक म्हणून युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लीकचे विभाजन झाले. हुकूमशाहीच्या बळावर एकसंघ राहिलेल्या सोव्हिएत युनियनमधून पंधरा स्वतंत्र राष्ट्रे उदयास आली. कम्युनिझमचा पोलादी पडदा कोसळल्यानंतर या देशांतील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विषमतेच्या वास्तव्याचे पहिल्यांदाच संपूर्ण जगाला दर्शन घडले.
पूर्वाश्रमीच्या युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिकपैकी केवळ रशियाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली राजकीय ताकद प्रस्थापित केली आहे. कम्युनिस्ट राजवट लोप झाली असली तरी आता तेथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची एकाधिकारशाही आहे. रशियाच्या अध्यक्षपदी 'निवडून' येण्याची पुतीन यांची ही चौथी वेळ आहे.
वर्ल्ड फुटबॉल कप किंवा फिफाच्या निमित्ताने रशिया पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. एकेकाळी साम्यवादी देशांचा पुढारी असलेल्या रशियातच आज कम्युनिझम नाहीसा झाला आहे. सात दशकांच्या कम्युनिस्ट राजवटीत रशियातून धर्माचे पूर्ण उच्चाटन करणे शक्य झाले नाही. आज अनेक रशियन नागरिक चर्चमधील धार्मिक विधीस उपस्थित राहू लागले आहेत. सर्व जगभर नाताळ २५ डिसेंबरला साजरा आहोत असला तरी रशियात ऑर्थोडॉक्स चर्च सात जानेवारीस हा सण साजरा करते. पूर्वी केजीबी या गुप्तचर संघटनेचे अधिकारी असलेले राष्ट्राध्यक्ष पुतीन या ख्रिसमसच्या विधीला चर्चमध्ये आवर्जून हजर असतात. कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे चौकाचौकांतून हटविण्यात आली असली तरी जगातील पहिल्यावहिल्या कम्युनिस्ट क्रांतीचा नेता असलेल्या लेनिनचे शरीर रेड स्केअरमध्ये आजही जतन करून ठेवण्यात आले आहे. एके काळी हे स्मारक जगभरातील साम्यवादी जगासाठी एक तीर्थक्षेत्र होते. आजकाल लेनिनला वंदन करण्यासाठी तेथे पूर्वीसारखी लोकांची लांबलचक रांग नसते. या स्मारकापाशी रोडावलेली ही गर्दी गेल्या शतकभराच्या कालावधीत रशियात आणि कम्युनिस्ट जगतात झालेल्या स्थित्यंतराचे एक प्रतीकच आहे.
No comments:
Post a Comment