Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Sunday, June 28, 2026

 


ज्या व्यक्तीने भारतात मुंबईत आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया घातला, महाराष्ट्रात मराठी भाषेत पहिल्यांदाच पुस्तके छापली, मराठीतली आणि इंग्रजीतलीसुद्धा पहिली शालेय पाठ्यपुस्तके तयार केली त्या व्यक्तीची महाराष्ट्राला ओळखही असू नये, मागील दोनशे वर्षात या व्यक्तीचे - गॉर्डन हॉल यांचे - मराठीत एकही चरित्र लिहिले गेले नाही हे निश्चितच खेदजनक आहे.

गॉर्डन हॉल यांच्याआधीसुद्धा मराठी पुस्तकांची छपाई झाली होती, मात्र ती छपाई महाराष्ट्राबाहेर झाली होती.
मराठीतील पहिले मुद्रित पुस्तक फादर थॉमस स्टिफन्स यांचे `ख्रिस्तपुराण' रोमी लिपीत पोर्तुगीज गोव्यात १६१६ साली प्रकाशित झाले होते.
त्यानंतर विल्यम कॅरी यांनी डॅनिश वसाहतीत बंगालमधील सेरामपूर येथे संत मॅथ्यूकृत शुभवर्तमान १८०५ साली छापले होते.
मराठीच्या मायदेशी महाराष्ट्रात गॉर्डन हॉल यांनी पहिले मराठी पुस्तक लाकडी छापखान्यात छापले.
अमेरिकेतून येऊन १२ फेब्रुवारी १८१३ रोजी गॉर्डन हॉल यांनी मुंबई बंदरात पाऊल ठेवले.
त्यानंतर वर्षभरात त्यांनी आणि त्यांच्या सहकारी अमेरिकन मिशनरींनी मुंबईत मराठी आणि इंग्रजी शाळा सुरु केल्या आणि त्याद्वारे संपूर्ण देशात आधुनिक शिक्षणाचे एक नवे पर्व सुरु केले.
हे शिक्षण सर्व जातीधर्माच्या लोकांना, पुरुषांना आणि स्त्रियांना, सवर्णांना आणि अस्पृश्यांना खुले होते.
याच अमेरिकन मिशनरींनी देशातली पहिली मुलींची शाळा मुंबईत १८२४ साली सुरु केली
नाशिक परिसरात कॉलऱ्याच्या रुग्णांना गॉर्डन हॉल औषधोपचार करताना त्यांनाच कॉलऱ्याची लागण होऊन २० मार्च १८२६ रोजी सिन्नरजवळ दोडी दापूर येथे त्यांचे निधन झाले.
या महान व्यक्तीचे मराठीतले पहिलेवहिले चरित्र असलेल्या '`गॉर्डन हॉल - गाथा मिशनरी शौर्याची' पुस्तकाचे पिंपरी चिंचवड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात बुधवारी २५ मार्च रोजी प्रकाशित झाले.
``I cannot Turn Back The Adventures of Gordon Hall'' या जॉन क्रोझियर यांनी लिहिलेल्या या इंग्रजी पुस्तकाचा हरियाणामधील गुरुग्राम येथील कालेब इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक प्राध्यापक असलेल्या डॉ विश्वास वळवी यांनी अनुवाद आणि पुनर्लेखन केले आहे.
गॉर्डन हॉल यांच्या मराठी भूमीवरील सेवेचे आणि बलिदानाचे या द्विशताब्दी वर्षानिमित्त (1826- 2026) व्हाईटलाईट पब्लिकेशन्स, पुणे, आणि नॅशनल सेंटर फॉर अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, बेंगळुरू) यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
यावेळी बेंगळुरूच्या नॅशनल सेंटर फॉर अर्बन ट्रान्सफॉर्मेशनचे डॉ. अतुल यशवंतराव अघमकार, `शब्दसेवा' मासिकाचे संपादक अशोक आंग्रे, चरित्रलेखक डॉ विश्वास वळवी, पत्रकार कामिल पारखे आणि व्हाईटलाईट पब्लिकेशन्सचे जॉर्ज काळे यांची याप्रसंगी भाषणे झाली.
Camil Parkhe

Thursday, March 26, 2026


पेशवाई अखेरच्या टप्प्यात असताना आणि अव्वल इंग्रजी अमदानीच्या अगदी सुरुवातीच्या काळात भारतात इंग्रजी आणि मराठी शाळा स्थापन करून, मराठीतील पहिले पाठ्यपुस्तक लिहिण्याचा, आधुनिक शिक्षणपद्धतीची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान या अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल यांच्याकडे जातो.

केवळ ४१ वर्षे आयुष्य लाभलेल्या गॉर्डन हॉल यांचा महाराष्ट्रातील मिशनकार्याचा कालावधी अवघा बारा वर्षांचा होता.
मात्र या काळात ख्रिस्ती धर्माची पताका फडकावत त्यांनी येथील समाजाच्या सर्व घटकांना म्हणजे बहुजन, अस्पृश्य तसेच स्त्रियांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. अशा प्रकारे सार्वत्रिक शिक्षणाने भारतात समाजक्रांतीचे एक नवे पर्व सुरु केले.
गॉर्डन हॉल यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्ष अलीकडेच २० मार्च २०२६ पासून सुरु झाले आहे.
अमेरिकेतून निघालेल्या गलबतातून मुंबई बंदरात दिनांक १२ फेब्रुवारी १८१३ रोजी पाऊल ठेवलेल्या गॉर्डन हॉल आणि अमेरिकन मराठी मिशनच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच मराठी भाषा शिकणे सुरु केले आणि मग मुंबईत शाळाही सुरु केल्या.
हे मिशनरी भारतात आले तेव्हा येथील लिखाणा-वाचनाबाबत आणि एकूण मराठी साहित्याची स्थिती काय परिस्थिती होती याचे रेव्हरंड हेन्री जे ब्रूस यांनी पुढील शब्दांत वर्णन केले आहे:
``आमचे पहिले मिशनरी मुंबईत पोहोचले तेव्हा त्यांना दिसले कि स्थानिक लोकांनी तोपर्यंत पाश्चात्त्य संस्कृतीचा कसलाही प्रभाव अनुभवलेलाच नव्हता. मुंबईत एकही स्थानिक छापखाना नव्हता, तसेच कोणतेही स्थानिक नियतकालिकही अस्तित्वात नव्हते.
मराठी भाषेत जे थोडेफार साहित्य उपलब्ध होते, ते मुख्यतः पुराणे, महाभारत आणि इतर पवित्र ग्रंथांमधील कथांचे भाषांतर होते. त्यामध्ये राम, कृष्ण आणि इतर देवतांच्या कथा होत्या.
काही स्थानिक राजांच्या ऐतिहासिक आठवणी (चरित्रात्मक लेखन) देखील होत्या. हे तसेच पवित्र ग्रंथांवरील भाषांतरे बहुतांश काव्यरूपात लिहिलेले होते.
याशिवाय काही मूळ कविता होत्या. या सर्वांनी मिळून त्या काळातील साहित्याचा मोठा भाग बनवला होता. जशी पुस्तके कमी होती, तसेच वाचकही कमी होते.’’
आधुनिक काळातील या आद्य मिशनरींना मराठी भाषा शिकण्यात अनेक अडचणी आल्या. याचे कारण म्हणजे तोपर्यंत मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश तयार करण्यात आले नव्हते.
याविषयी रेव्हरंड ब्रूस यांनी लिहिले आहे :
``या मिशननरींना स्थानिक मराठी भाषा शिकण्यासाठी व्याकरणे आणि शब्दसंग्रह यांच्या स्वरूपात फारशी, किंबहुना काहीही मदत उपलब्ध नव्हती. एखादया फारसे अनुभव आणि कौशल्य नसलेल्या पंडितासोबत बसून त्यांना शब्दांचे अर्थ आणि वाक्यरचनेचे प्रकार याविषयी तोंडी मार्गदर्शन घ्यावे लागत असे. भाषेचे खरे नियम त्यांना केवळ दीर्घकालीन आणि संयमी तुलना व सामान्यीकरण यांच्या माध्यमातूनच समजू शकत असतात.’’
मिशनच्या सुरुवातीच्या नोंदींमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या शाळांविषयी वेगवेगळ्या कागदपत्रांत, अहवालांत माहिती आढळते. मुंबईत मिशनकार्य करण्याची परवानगी मिळाल्यानंतर गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांनी लगेचच इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या प्रकारच्या शाळा सुरू केल्या.
रेव्ह. सॅम्युएल बी. फेअरबँक यांनी गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांच्याबद्दल पुढील शब्दांत लिहिले आहे :
``गॉर्डन हॉल आणि सॅम्युअल नॉट यांना मुंबईत राहू दिले जाईल याबद्दल शाश्वती नसली त्यांनी मराठी शिकण्यास तातडीने सुरुवात केली. सन १८१४ च्या अखेरीपूर्वी त्यांनी एक शाळा सुरू केली. ‘’
मे १८१५ मध्ये या मिशनरींनी स्थानिक मुलांसाठी असलेल्या एका शाळेचा उल्लेख केला आहे. तीच पहिली आणि एकमेव शाळा होती.
त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या दिनदर्शिकेत असे नमूद आहे :-
“आमची शाळा हळूहळू वाढत आहे. सध्या त्यात सुमारे २५ मुले आहेत. ‘सुमारे’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांची उपस्थिती इतकी अनियमित आहे की ते कधीच एकाच वेळी सर्व उपस्थित नसतात.
आम्हाला या शिक्षणकार्यात मदत करु शकेल आणि शिकवण्याच्या मुख्य कामातून आम्हाला थोडाफार दिलासा देईल असा योग्य सहाय्यक लवकर मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
सध्या तरी आम्ही दररोज सुमारे पाच तास शाळेत घालवतो आणि हा वेळ आपापसांत वाटून घेतो.”
सन १८१५च्या वर्षाच्या अखेरीस हॉल आणि नॉट यांनी शाळेत दोन ब्राह्मण शिक्षकांची नेमणूक केली होती. एका दिनदर्शिकेत पुढीलप्रमाणे लिहिले आहे:
“पंचवीस मुलांची एक इंग्रजी शाळा आहे आणि ब्राह्मणांनी चालवलेल्या दोन स्थानिक शाळांत सुमारे ४० विद्यार्थी आहेत.”
पुढील वर्षात आणखी काही शाळा सुरू करण्यात आल्या. एका अहवालात नोंद आढळते कि मिशनरींच्या देखरेखीखालील शाळांमध्ये जवळपास ३०० मुलांना शिक्षण दिले जात होते. सन १८१८मध्ये ११ शाळांची माहिती देण्यात आली असून या शाळांत ६०० मुलांची नियमित उपस्थिती होती.
तीन वर्षांनी एकूण २५ शाळा सुरू होत्या; परंतु निधीअभावी त्यांना काही काळासाठी त्यांपैकी १० शाळा बंद कराव्या लागल्या. मात्र १८२३ मध्ये त्यांच्या एकूण २६ शाळा होत्या आणि त्यामध्ये १,४५० पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत होते.
या शाळांबद्दल पुढील एक नोंद आहे: :-
“आमच्या या शाळा आम्हाला अपेक्षित अशा नसल्या तरी त्या आम्हाला प्रोत्साहन आणि आशा देत आहेत. स्थानिक लोकसंख्येवर य शाळांचा प्रभाव जरी शांत आणि सहज वर्णन करता येणार नाही असा असला, तरी तो सतत, व्यापक आणि आमच्या मिशनच्या उद्दिष्टांसाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे.
आम्हाला स्थानिक लोकांकडून पुढीलप्रकारचे उद्गार ऐकायला मिळतात : ‘प्रौढ लोकांना दुसरा धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करता येत नाही; परंतु धार्मिक शाळांमध्ये शिकणारी मुले ख्रिस्ती होतील, आणि अशा प्रकारे शेवटी सर्व लोक ख्रिस्ती होतील.’
आम्ही या मताशी सहमत नसूनही, या शाळांना एक महत्त्वाचे साधन मानतो आणि आमच्या आजूबाजूला आणखी बऱ्याच शाळा सुरू करता याव्यात अशी आमची तीव्र इच्छा आहे.
आमच्या शेवटच्या बैठकीत आम्ही आणखी शाळांसाठी आलेल्या तेरा अर्जांचा विचार केला; पण साधनसामग्रीच्या अभावामुळे आम्हाला ते नाकारावे लागले.”
या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ११६ ज्यू मुलांचाही समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व शाळा मुंबईतच नव्हत्या; त्यांपैकी अनेक शाळा कोकणातील खेड्यांमध्ये होत्या.
कोकणात गॉर्डन हॉल नियमितपणे वारंवार दौरे करत आणि या शाळांना भेट देत असत.
आपण सुरु केलेल्या या शाळांत शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके हवीत म्हणून त्यांनी धार्मिक पुस्तकांबरोबरच पाठ्यपुस्तकेही लिहिली. छापखाने सुरु करुन या पुस्तकांची छपाई केली.
आपल्या धर्मप्रसाराचा एक भाग म्हणून गॉर्डन हॉल यांनी मराठीत अनेक पुस्तके लिहिली आणि छापली आहेत. ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांशिवाय अमेरिकन मिशनच्या शाळांसाठी हॉल यांनी तीन मराठी पाठ्यपुस्तके लिहिली आहेत.
आधुनिक शिक्षणपद्धतीतील मराठी भाषेतील ही पहिलीच पाठ्यपुस्तके.
गॉर्डन हॉत ` लेकरांची पहिली पोथी (First Book of Children) हे सोळा पानांचे पुस्तक १८१८ साली छापण्यात आले. अमेरिकन मिशन मालेमधील हे पहिल्या क्रमांकाचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक एका बाजूला बालबोधमध्ये व दुसऱ्या बाजूला मोडी लिपीत छापले होते.
या पुस्तकाच्या पन्नास आवृत्त्या तरी निघाल्या व या सर्व आवृत्या मिळून दहा लाख तरी प्रती सपल्या असतील, असा रे. ब्रूस यांचा अंदाज आहे. या पुस्तकाच्या १८२८ व १८२९ साली स्कॉटिश मिशनरींच्या कोकणातील बाणकोट मिशनने दोन आवृत्त्या काढल्या.
ट्रॅक्ट सोसायटीनेसुद्धां १८३०, १८३१, १८३२, १८३३, १८२४ १८३५ साली सहा आवृत्त्या काढल्या. पुढे १८३७, १८४१ व १८४४ मध्ये बालबोध व मोडी लिपीत हे पुस्तक प्रकाशित करण्यांत आले असे श्री. म. पिंगे यांनी `युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा’ या ग्रंथात नमूद केले आहे.
त्या दोघांनी १८१६ मध्ये बायबलच्या नव्या करारातील अनेक पुस्तके अनुवादित केली, मराठी भाषेत काही लघुपत्रके (ट्रॅक्ट्स) तयार केली.सन १८१७ मध्ये त्यांनी आठ पानांचे एक धर्मग्रंथावर आधारित पत्रक आणि संत मॅथ्यूच्या शुभवर्तमानावर लेखन छापले.
हॉल आणि न्यूवेल सॅम्युएल यांनी १८१८ च्या उत्तरार्धात कोकणात अनेक ठिकाणी प्रवास केले. त्यांनी समुद्रकिनाऱ्यालगत सुमारे शंभर मैलांपर्यंत असलेल्या शहरांना आणि गावांना भेटी दिल्या, तेथली माहिती गोळा केली, पुस्तके वाटली आणि संधी मिळेल तिथे सुवार्ता धर्मप्रचार केला.
फेअरबँक लिहितात कि हीच ती प्रारंभीची नोंद आहे जी मला त्यांच्या मिशनकार्याच्या तीन मुख्य विभागांबद्दल आढळते.
``प्रथम आले शिक्षण. दुसरे आले प्रचारकार्य आणि तिसरे म्हणजे मराठी भाषेत पवित्र शास्त्रांचे आणि ख्रिस्ती साहित्याचे लेखन, मुद्रण आणि प्रसार.''
चौथा महत्त्वाचा विभाग म्हणजे वैद्यकीय उपचार आणि औषधोपचार. अगदी सुरुवातीपासूनच आमच्या मिशनरींनी आपल्या गुरूचे म्हणजे येशू ख्रिस्ताचे अनुकरण करत आजारी लोकांचे उपचार केले.
याचे उदाहरण गॉर्डन हॉल यांच्या पुढील प्रसंगातून दिसते.''
गॉर्डन हॉल दिनांक १५ मार्च १८२६ रोजी नाशिक येथे पोहोचले. त्यांनी लगेचच धर्मप्रवचन सुरू केले आणि पुस्तके वाटण्याचे काम हाती घेतले.
त्या वेळी तेथे कॉलऱ्याची साथ होती. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या हॉल यांनी त्यांनी आजारी लोकांना औषधोपचार केला. काही काळाने त्यांच्याकडील पुस्तके आणि औषधे संपली.
दिनांक १८ मार्चला त्यांनी मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केला.
सिन्नरजवळ दोडी दापूर येथे त्यांनाही कॉलऱ्याची लागा झाली होती. तिथेच त्यांचे निधन झाले.
गॉर्डन हॉल यांचे निधन हे अमेरिकन मिशनला मोठा धक्का होता. मात्र त्यामुळे अमेरीकन मिशन बोर्डाचे येथील काम थांबले नाही. त्यानंतर अमेरीकेतून अनेक मिशनरी भारतात येत राहिले, धर्मप्रसाराबरोबरच येथे शिक्षणकार्य आणि सामाजिक कार्य करत राहिले.
हॉल यांच्या निधनानंतर पुढल्याच वर्षी म्हणजे १८२७ साली पहिल्या अमेरिकन अविवाहित महिला मिशनरीचे मुंबईत आगमन झाले.
या मिस सिंथिया फरार यांच्या अहिल्यानगर येथील तब्बल तीन दशकांच्या शिक्षणकार्याची आतापर्यंत आपल्याला ओळख झालेली आहेच.

Camil Parkhe March 25, 2026


Friday, December 6, 2024

नारायण वामन टिळक

काल `साधना' च्या बुक स्टॉलमध्ये एक तास घालवला. एक पुस्तक घ्यायचे मनात होते, पण निर्णय होत नव्हता.

नवनवी पुस्तके घेऊन घरात पडून राहतात, हातातल्या कामांमुळे वाचून होत नाहीत. हा नेहेमीचा अनुभव. शेवटी ते पुस्तक विकत घेऊन बॅगेत टाकले आणि प्रस्तावनेचा बराचसा भाग मेट्रोच्या परतीच्या प्रवासात वाचून काढला.

हे पुस्तक आहे सुधीर रसाळ लिखित` वाड्मयीन संस्कृती'.

पुस्तकाच्या शीर्षकाशी तसे मला काही देणेघेणे नाही, पुस्तक मी निवडले ते त्यातील नव्वद पानांच्या एका दीर्घ लेखामुळे.

ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांचा तर परिचय देण्याची गरज नाही. या पुस्तकातील ज्या दीर्घ लेखाने मला आकर्षित केले तो लेख नारायण वामन टिळक यांच्यावर आहे.

नारायन वामन टिळक हे मराठीतील पंचकवीमधले एक. लक्ष्मीबाई टिळकांच्या `स्मृतिचित्रां'तून आपण सर्वांना ते परिचित असतात,

पाठ्यपुस्तकांत असलेल्या `दया आणि शांती' `तू तर माझ्याही पुढे गेलीस!' अशा धड्यांतून आणि `केवढे हे क्रौर्य', `वनवासी फुल' अशा कवितांमुळे त्यांचे नाव खास लक्षात राहते.

`ख्रिस्ती मिशनरींचे योगदान' या माझ्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांत टिळकांचे अल्पचरित्र आहे.

पण याहून अधिक नारायण वामन टिळकांचे खूप काही भरीव योगदान आहे.

ख्रिस्ती धर्म. मराठी भाषा, भारतीय परंपरा आणि संस्कृती, इथल्या मातीतल्या संतांचे लिखाण या संदर्भात ना. वा. टिळकांनी भारतीय आणि विशेषतः मराठी ख्रिश्चनांना खूप काही दिले आहे.

टिळकांचे निधन झाले मुंबईत, ते ख्रिस्ती होते तरी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पार्थिवाचे दफन न होता मुंबईतच दहन झाले,

त्यांच्या अवशेषांना नंतर अहमदनगर इथल्या कबरस्थानात ठेवून तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली आहे.

`तुकानिर्मित सेतूवरुनी /
मीही आलो ख्रिस्ताचरणी //

अशी टिळकांची एक ओळ प्रसिद्ध आहे,

यावरून त्यांची वाटचाल आणि मराठी ख्रिस्ती समाजात रुढ केलेल्या अनेक परंपरांची कल्पना येऊ शकेल.

टिळकांची अनेक गायने आजही महाराष्ट्रातील चर्चेसमध्ये किबोर्ड, पेटी आणि तबल्याच्या सुरांत गायली जातात.

येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म पाश्चात्य नाही, पौर्वात्य आहे, हे टिळकांनी ठासून मांडले.

आम्ही ख्रिस्ती झालो म्हणजे या मातीत आणि देशात उपरे होत नाही हा त्यांचा सिद्धांत आजही मांडला जातो.

सुधीर रसाळ यांनी नारायण वामन टिळकांचा हा राष्ट्रवाद अन या मातीशी नाळ सांगणारा ख्रिस्ती धर्म आणि परंपरा याबाबत या दीर्घ लेखात विस्तृतपणे लिहिले आहे, ते हा लेख चाळताना लक्षात आले.

हा लेख मी अजून वाचलाही नाही.

मात्र आज सकाळीच लक्षात आले ६ डिसेंबर नारायण वामन टिळकांची जयंती. त्यामुळे या महान व्यक्तीविषयी काही शब्द लिहिण्याचा मोह आवरता आला नाही.

नारायन वामन टिळकांना अभिवादन !

Tuesday, September 3, 2024

 

आज त्याच पुस्तक प्रदर्शनाला तिसऱ्यांदा भेट दिली. पहिल्या दोन भेटी घाईघाईत होत्या. आज अगदी आरामात अनेक कक्षांतील पुस्तके दोनदातिनदा नजरेखाली घातली, बऱ्याच पुस्तकांतला मजकूर चाळला.
पुस्तक प्रदर्शनात नेहेमीचेच यशस्वी प्रकाशक कलाकार होते आणि नेहेमीचेच लेखक आणि त्यांची ती पुस्तके होती.
अशाप्रकारच्या लोकप्रिय पुस्तक प्रदर्शनांत वेगवेगळी चव असणाऱ्या बहुतांश वाचकांना आवडतील अशीच पुस्तके असतात. हे प्रदर्शन त्यास अपवाद नव्हते.
मी वेगवेगळ्या प्रकारची अनेक मराठी पुस्तके - चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य, विनोदी साहित्य , ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या - खूप आवडीने वाचल्या ते श्रीरामपुरात दहावीपर्यंत शिकत असताना.
तिथल्या नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयात हे सगळे वाचन झाले. त्यानंतर मी गोव्याला गेलो, तेथे मी इंग्रजी शिकलो आणि इंग्रजी साहित्याकडे आणि पत्रकारितेकडे वळलो ते आजतागायत.
आज या पुस्तक प्रदर्शनात दिडेक तास वावरताना मला ती माझ्या ओळखीचे अनेक साहित्यिक आणि पुस्तके भेटली.
वि. स. खांडेकर, साने गुरुजी, ग. दि. आणि व्यंकटेश माडगूळकर, शिवाजी सावंत, इरावती कर्वे, पुल देशपांडे, दुर्गा भागवत, व.पु. काळे, गो. नि दांडेकर, आचार्य अत्रे आणि धनंजय कीर .
ऐंशीच्या आणि नव्वदच्या दशकांत अनेक मराठी साहित्यिकांच्या गाजलेल्या कलाकृती मी वाचलेल्या नाहीत. पण त्या पुस्तकांची आणि साहित्यिकांची मला तोंडओळख आहे.
आजच्या प्रदर्शनात ही पुस्तके नजरेसमोर आली आणि त्यांत मी डोकावून पाहिलेसुद्धा. मात्र आज ही पुस्तके माझ्याकडून वाचली जातील कि नाही अशी शंका येऊन ती पुस्तके पुन्हा रॅकवर ठेवली.
काही नवी पुस्तके नजरेत भरली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे 'देवळांचा धर्म' हेच पुस्तक गेली अनेक वर्षे ठिकठिकाणी दिसायचे, आता त्यांचे ''माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र , 'दगलबाज शिवाजी' असे चकित करणारे शीर्षक असलेले पुस्तक आणि इतरही पुस्तके नव्याने बाजारात आली आहेत.
मला हवे असलेले प्रबोधनकारांनी लिहिलेले पंडिता रमाबाई यांचे चरित्र मात्र मला मिळाले नाही.
अशी अनेक चांगल्या दर्जाची असलेली मराठी पुस्तके विविध कारणांमुळे दुर्मिळ होत चालली आहेत. मागच्याच आठवड्यातील एक गोष्ट सांगतो.
नाशिक येथे १८३०च्या आणि १८४०च्या दशकांत मुलींच्या शाळा चालवणाऱ्या मिसेस कॅरोलिन फरार यांचे 'चमत्कारिक गोष्टी' हे अनुवादित पुस्तक फार लोकप्रिय झाले,
`The Ayah and Lady. An Indian Story' या Mary Martha Sherwood यांच्या पुस्तकाचा अनुवाद.
या मराठी पुस्तकाच्या अनेक आवृत्त्याही छापल्या गेल्या होत्या. मिशनरी शाळांत हे पाठ्यपुस्तक म्हणून शिकवले जायचे.
'चमत्कारिक गोष्टी' या पुस्तकाबाबत मी अनेक जाणकार व्यक्तींकडे चौकशी केली, तर या पुस्तकाचे नावदेखील त्यांनी ऐकले नव्हते !.
नरहर कुरुंदकर यांची अनेक पुस्तकेसुद्धा आता नव्याने प्रकाशित झाली आहेत. साने गुरुजी यांनी अनुवादित केलेली विल ड्युरांत यांचे 'पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास' हा ग्रंथसुद्धा एक नवी भर आहे.
लोकप्रिय स्वरूपाच्या पुस्तक प्रदर्शनांत ठराविक प्रकाशन संस्थाचाच सहभाग असतो. त्यामागे आर्थिक गणित असतेच.
विविध प्रकारच्या मराठी साहित्य संमेलनांत भरणाऱ्या आणि पुस्तक प्रदर्शनांत पुस्तकप्रेमी लोकांना मोठे घबाड मिळत असते.
यावेळी अ भा. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्लीत होणार आहे. तिथे याबाबाबत काय परिस्थिती असेल हे आताच सांगता येणार नाही.
Camil Parkhe, August

Tuesday, February 20, 2024

`ग्रंथकार संमेलन जोतीरावांचे ते ऐतिहासिक पत्र

आज अचानक हे पुस्तक समोर आले. दोनेक महिन्यापूर्वी कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनात विकत घेतले होते तेव्हापासून अगदी चाळलेसुध्दा नव्हते. आज काही पाने उलगडल्यानंतर हे वाक्य वाचले आणि थबकलो.

पुन्हा एकदा वाचून काढले आणि आजच हा संदर्भ वाचायला मिळावा याचे नवल वाटले.
पुस्तक रा. ना. (रामचंद्र नारायण) चव्हाण यांचे आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले. `विचार दर्शन' शिर्षकाचे.
त्यात `महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर' या शिर्षकाच्या प्रकरणात रानडे यांनी भरवलेल्या `ग्रंथकार संमेलनास' येण्यास जोतिबा फुले यांनी नकार दिला, त्याबाबत विवेचन आहे.

लेखक रा. ना. चव्हाण विचारतात : ``या ग्रंथकार सभेस पाठवलेल्या या पत्राचे पुढे काय झाले ? ''
मराठी वाङमयाचा इतिहास प्रसिद्ध झाला त्यात हे पत्र आले नाही.
दत्तो वामन पोतदार प्रभूतींना फुले यांचे हे पत्र दखलपात्र वाटले नाही. ''
चव्हाण पुढे लिहितात: ``दत्तो वामन पोतदार वाईत राहत होते, त्यांच्याशी मी बातचीत केली. त्यावेळी त्यांच्यात जोतिरावांबद्दल आदराचा अंशही आढळला नाही. ''
मग जोतीरावांचे ते ऐतिहासिक पत्र आजही कसे उपलब्ध आहे?
रानडे यांना लिहिलेल्या पत्राची प्रत जोतिबांनी अहमदनगर येथून ख्रिस्ती मिशनरी प्रसिद्ध करत असलेल्या `ज्ञानोदय' या नियतकालिकाकडे पाठवली.
संपादकांनी ती लगेचच म्हणजे ``११ जून १८८५ च्या अंकात प्रसिद्ध केली म्हणून आज अभ्यासकांना म. फुल्यांचे वरील पत्र उपलब्ध आहे. नाही तरी त्या पत्रात फक्त ब्रह्मद्वेष आणि ब्रह्मविरोधच मागील साहित्यिकांनी पाहिला,'' चव्हाण लिहितात.
महात्मा फुले यांच्याविषयी आणि त्यांनी दिलेले लेख `ज्ञानोदया'ने वेळोवेळी म्हणजे अगदी १८५२ पासून प्रसिद्ध केले आहे.
जोतिबांच्या शाळेतली विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिचा निबंध हे एक उदाहरण.
तत्कालीन मराठी वृत्तपत्रांचा याबाबत तेव्हाही आनंदीआनंदच होता.
जोतिबांविषयी विस्तृत मृत्युलेख याच नियतकालिकाने `ज्ञानोदया'ने छापला. केसरीने ही बातमी सरळसरळ दुर्लक्षित केली.
``समाजसुधारणेच्या इतिहासाचे महत्त्वाचे धागेदोरे व संदर्भ ज्ञानोदयामुळे आज उपलब्ध होतात'' असे रा. ना. चव्हाण यांनी म्हटले आहे.
तूर्त इतकेच
Camil Parkhe

Tuesday, July 18, 2023

 पुण्यात एका इंग्रजी वृत्तपत्रात नुकताच रुजू झालो होतो तेव्हाची गोष्ट. प्रा. दि. ब. देवधर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात, चाळीसच्या दशकात क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या आणि फर्ग्युसन कॉलेजचे माजी शिक्षक असलेल्या दिनकर बळवंत देवधर यांनी काही दिवसांपूर्वी शंभरी पूर्ण केली होती. योगायोगाने देवधर यांच्याप्रमाणेच शकुंतलाबाई परांजपे यांनाही त्याच वेळी ‘पद्मभूषण’ मिळाला होता. 

या दोन्ही पद्मभूषण पुरस्कारार्थींवर मी लेख लिहिले होते. त्या वेळी मला एक गोष्ट जाणवली की, ‘पद्मभूषण” मिळालेल्या प्रा. देवधर आणि शकुंतलाबाई परांजपे यांच्यामध्ये काही समान धागे होते. त्या दोघांनाही खूप वर्षांपूर्वी ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आले होते. मग आता त्यांना हा त्याहून वरच्या दर्जाचा पुरस्कार देण्याचे तात्कालिक कारण काय होते? 

देवधर यांनी अलीकडेच शंभरी ओलांडली होती. भारतात संतती नियमनाची चळवळ राबवणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांना मदत करणाऱ्या आणि त्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकात नियमितपणे लिहिणाऱ्या, माजी आमदार-खासदार असलेल्या शकुंतलाबाईंचीसुद्धा नव्वदीकडे वाटचाल चालू होती. 

या दोघांनाही त्यांच्या या दीर्घायुष्यानिमित्ताने हा सन्मान दिला जात होता हे स्पष्टच होते.

साहित्य अकादमी, ज्ञानपीठ आणि इतकेच नव्हे, तर नोबेल वगैरे पुरस्कार मात्र आजही फक्त हयात व्यक्तींनाच दिले जातात. पेन्शन चालू राहण्यासाठी संबंधित व्यक्तींना दरवर्षाच्या अखेरीस आपण जिवंत आहोत हे सिद्ध करणारा हयातीचा पुरावा दाखल करावा लागतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की मग नोबेल आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी ती व्यक्ती अपात्र ठरते. 

एखादा सन्मान वा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला देण्यामागचे (किंवा न देण्यामागचे) कारण शोधायचा प्रयत्न केल्यास अशी काही गमतीदार, अविश्वसनीय किंवा धक्कादायक माहिती मिळते. अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना नोबेल पुरस्कार मिळाला नाही, मात्र वर्णभेदाच्या संघर्षात अहिंसेचे साधन यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या अमेरिकेतील मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अगदी तरुण वयात मिळाला. 

वर्णभेदाच्या संघर्षात महत्त्वाचे योगदान देणारे दक्षिण आफ्रिकेतील नेते नेल्सन मंडेला आणि नुकतेच दिवंगत झालेले आर्चबिशप डेसमंड टुटू यांनाही ‘नोबेल’ने गौरवण्यात आले. दुसरीकडे, मानवतेवरचा कलंक असलेली अस्पृश्यता राज्यघटनेच्या माध्यमातून कायमची संपवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवालाही नोबेल मिळाला नाही.

वि. स. खांडेकर यांना त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर दोन वर्षांनी, वयाच्या ७८ व्या वर्षी खांडेकरांचे निधन झाले. याचा अर्थ वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत खांडेकरांना दीर्घायुष्य लाभले नसते तर मराठीतले पहिले ज्ञानपीठ मिळण्याचा सन्मान त्यांना लाभला नसता. 

खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा या कादंबरीची वाचनालयातील प्रत लगेच मिळवून मी ती अधाशीपणे वाचून काढली होती. इंग्रजी किंवा इतर भाषेतल्या कुठल्याही साहित्यकृतीला एखादा पुरस्कार मिळाला की त्या पुस्तकाकडे वाचकांचे लक्ष जाते. पुढे वर्षानुवर्षे त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघत असतात. उदाहरणार्थ, ‘टू किल अ मॉकिंग बर्ड’ हे पुस्तक माझ्या हातात पडले तेव्हा ते एक नावाजलेले पुस्तक असल्याचे मला आठवले. 

किती मराठी पुस्तकांबाबत असे म्हणता येईल? ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाल्यावरही खांडेकरांच्या या पुस्तकाच्या फार आवृत्त्या निघाल्या नाहीत. इतरही अनेक पुरस्कारप्राप्त मराठी पुस्तकांची बहुधा हीच कथा असेल.

वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांना १९६७ ते १९८१ या काळातील त्यांच्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ सन्मान मिळाला. ‘घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे,’ अशा अनेक आशयघन कविता लिहिणाऱ्या विंदा ऊर्फ गोविंद विनायक करंदीकर यांनी खूप वर्षांपूर्वी, म्हणजे ऐंशीच्या दशकातच ‘आपल्याकडे आता लिहिण्यासारखे नवीन असे काही नाही,’ असे जाहीरपणे सांगून लेखणी म्यान केली होती.  त्यांना वयाच्या ८५ व्या वर्षी २००३ चा ज्ञानपीठ पुरस्कार ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी देण्यात आला. विंदांची ही ‘ज्ञानपीठ’प्राप्त साहित्यकृती मात्र किती जणांनी वाचली असेल वा हे नाव ऐकले असेल याविषयी मला शंका आहे.

एखाद्या व्यक्तीला विशिष्ट निर्मितीसाठी पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने त्या व्यक्तीचे वा त्या कलाकृतीचे श्रेष्ठत्व ठरत नाही. तसे गृहीतही धरता कामा नये. उदाहरणार्थ, गेल्या शतकातील एक महान तत्त्वज्ञ असलेल्या, अपारंपरिक मते मांडणाऱ्या आणि युद्धविरोधी भूमिका घेऊन लोकप्रिय जनमताचा आणि शासनाचाही रोष पत्करणाऱ्या बर्ट्रांड रसेलला मिळालेला नोबेल पुरस्कार साहित्यातील होता!

भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेले ज्ञानपीठ पुरस्कार १९६५ पासून दिले जात आहेत. मराठी साहित्यातील दिग्गज असलेल्या अनेक साहित्यिकांना या पुरस्काराने हुलकावणी दिली आहे. 

वानगीदाखल विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, शांता शेळके, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर, मंगेश पाडगावकर, वसंत कानेटकर, जी. ए. कुलकर्णी, नारायण सुर्वे, वसंत बापट अशी कितीतरी नावे घेता येतील. 

विजय तेंडुलकर आणि नामदेव ढसाळ यांची नावे वगळून केवळ मराठी साहित्याचाच नव्हे, तर भारतीय साहित्याचाही इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. अशांना ज्ञानपीठ पुरस्कार का बरे दिला गेला नसेल? 

याचाच अर्थ इतर पुरस्कारांप्रमाणेच केवळ मेरिट म्हणजे उच्च दर्जाच नव्हे, तर इतरही अनेक गोष्टी साहित्य अकादमी किंवा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आवश्यक असतात. यामध्ये लॉबिंग प्रक्रिया, तांत्रिक आणि इतर बाबींचे पालन वगैरे अनेक गोष्टींचा समावेश असतो. 

साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यावर त्या साहित्यकृतीच्या पात्रतेबद्दल तांत्रिक मुद्द्यावर संशय निर्माण झाल्याने अत्यंत उद्विग मनाने जी. ए. कुलकर्णी यांनी आपला पुरस्कार परत केला होता, हे एक उदाहरण आहेच.

इतर भारतीय भाषांच्या तुलनेत मराठी साहित्याला फार कमी साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. याची कारणमीमांसा काही वर्षांपूर्वी दिल्लीत राहणाऱ्या आणि तेथील समीकरणांची पूर्ण जाणीव असलेल्या मराठीतील एका ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षकाने केली होती. दुसऱ्यांचे पाय ओढण्याचे प्रकार आणि पुरस्कारांसाठी लॉबिंग करण्यात अपयश अशी दोन मुख्य कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले होते. 

असे असले तरी ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्या न मिळाल्यामुळे कुठल्याही साहित्यिकाचे, त्यांच्या साहित्यकृतीचे मोल आणि योगदान वाढते अथवा कमी होते असे नाही. सातशे-आठशे वर्षांपूर्वीचे चक्रधर स्वामी आणि संत ज्ञानेश्वर यांचा तसेच सतराव्या शतकातील जन्माने ब्रिटिश असलेल्या, ‘ख्रिस्तपुराण’कार फादर थॉमस स्टिफन्स यांचा वारसा सांगणाऱ्या आणि आता अभिजात भाषेच्या दर्जासाठी प्रयत्न होत असलेल्या मराठीच्या समृद्धीसाठी काय केले जाते हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. 

हा दर्जा मिळाल्याने एखाद्या भाषेचे किंवा त्या भाषेतील साहित्यकृतींचे महत्त्व वाढते, असे थोडेच आहे? तरीही दरवर्षी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कागदी घोडे नाचवले जातात. 

मराठी अधिकाधिक वाचली जावी या भाषेत दर्जेदार, विपुल लिखाण व्हावे आणि त्यातून ही भाषा आणखी समृद्ध व्हावी यासाठी किती प्रयत्न केले जातात?

कामिल पारखे

Saturday, February 11, 2023

पत्रकारितेच्या इतिहासात पहिलेवहिले स्टिंग ऑपरेशन  गोपाळराव जोशी.. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास गोपाळराव जोशी हे नाव वगळून पूर्ण होऊच शकत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रात पदवी मिळवणाऱ्या, डॉक्टर होणाऱ्या हिंदुस्थानातल्या पहिल्या महिला आनंदीबाई जोशी यांचे पती म्हणून गोपाळराव जोशी ओळखले जात असले तरी ही त्यांची पूर्ण ओळख नाही. मात्र इतिहासात हे पात्र नकारात्मक दृष्टिकोनातून, त्यांच्या विविध अवगुणांवर बोट ठेवून रंगवले गेले आहे. एक इरसाल, विक्षिप्त, हेकेखोर व्यक्ती, आपल्या बायकोने शिकावं, डॉकटर व्हावं म्हणून त्यांचा खूप छळ करणारा नवरा, पुण्यातल्या आणि मुंबईतल्या भल्याभल्या लोकांना जेरीस आणणारा पण अत्यंत बुद्धिमान असणारा गोपाळराव जोशी अगदी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. वर उल्लेख केलेली अनेक स्वभाववैशिष्ट्ये गणपतरावांच्या जीवनातील विविध प्रसंगांतून दिसून येतात.

श्री ज. जोशी यांनी आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांच्या जीवनांवर लिहिलेली `आनंदी गोपाळ’ ही कादंबरी बरीच गाजली. `आनंदी गोपाळ' याच शीर्षकाचा एक सिनेमाही आला. अंजली किर्तने यांनीं लिहिलेल्या `आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व' या पुस्तकात आनंदीबाईंबरोबरच गोपाळरावांच्या चरित्राचीही ओळख होते. पंडिता रमाबाई यांनींही गोपाळरावांबद्दल लिहिलं आहे. इतिहासातले एव्हढं प्रसिद्ध आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व असलेल्या गोपाळरावांचे एकही चांगले छायाचित्र आज दुदैवानं उपलब्द नाही. एकच फोटो आहे तो अत्यंत दुःखद प्रसंगातला, आनंदीबाई यांच्या कलेवरासोबतचा.

मात्र गोपाळराव यांच्या एका वेगळ्याच कामगिरीकडे पुर्ण दुर्लक्ष झालं आहे. ती कामगिरी म्हणजे भारतीय पत्रकारितेच्या आणि नियतकालिकेच्या इतिहासात एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका त्यांनी बजावली.
गोपाळ विनायक जोशी यांची ही अभूतपूर्व कामगिरी म्हणजे भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात विसाव्या शतकाच्या अखेरीस त्यांनी अगदी ठरवून घडवून आणलेले एक स्टिंग ऑपरेशन. त्यांच्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये पुण्यातील विविध क्षेत्रांतील भलीभली, थोर मंडळी अलगदपणे अडकली. गोपाळरावांचे हे स्टिंग ऑपरेशन ग्रामण्य प्रकरण किंवा पंचहौद चहा प्रकरण म्हणून इतिहासात अधिक प्रसिद्ध आहे. मात्र या प्रकरणात गोपाळराव जोशी खलनायक म्हणून रंगवले जातात आणि नायकाची भुमिका जाते बळवंतराव उर्फ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे,
न. चि केळकर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळक यांच्या चरित्रात, रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या आत्मचरित्रात अशा त्या काळात लिहिलेल्या गेलेल्या अनेक ग्रंथांत या चहाच्या पेल्यांसंबंधीच्या वादळाविषयी विस्तृतपणे लिहिलं गेलं आहे.
`स्टिंग ऑपरेशन' या सदरात येणारे सर्व घटक गोपाळरावांच्या या उपद्व्यापात आहेत. ही सर्व घटना गोपाळरावांच्या तल्लख बुद्धीने एक विशिष्ट उद्देश ठेवून आणि खूप दिवस आधीच ठरवून घडवून आणली आहे. यावेळी पुण्यातील अनेक लोकांना पंचहौद चर्च मध्ये बोलावून, तिथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातल्या `पुणे वैभव' या वृत्तपत्रात हा सर्व वृत्तांत भरपूर रंगवून छापून आणला आहे. त्यानंतर या लोकांनी तिथं ख्रिश्चन लोकांच्या हातचा चहा पिऊन धर्मद्रोह केला असा आरोप करण्यात आला.
विशेष म्हणजे या स्टिंग ऑपरेशमध्ये या खळबळजनक वृत्ताचे श्रेय गोपाळरावांना देण्यात आलं आहे. या बातमीला गोपाळराव जोशी यांची बाय लाईन म्हणजे नाव आहे. अर्थात गोपाळराव त्यावेळी पूर्णवेळ पगारी बातमीदार नव्हते. त्याकाळी अशी पगारी नोकरी अपवादाने असणार कारण नियतकालिकांचे मालक संपादक एकतर हौशी किंवा ध्येयवादी असत.
ही बातमी पूर्ण तपशिलवार प्रसिद्ध झाल्यानंतर योग्य तो किंवा गोपाळरावांना अपेक्षित असलेला परिणाम लगेचच झाला. पुण्यातले समाजजीवन त्यामुळे पूर्ण ढवळून निघाले. त्यात मग इतर अनेकांनी आपली पोळी भाजून घेतली. या चहापानाच्या प्रकरणात कोणकोण अडकले होते याची नुसती यादी पाहिली तरी त्यावरून विविध क्षेत्रांत उडालेला धमाका लक्षात येईल. एकाद्या सुगरणीने खाद्यपदार्थांच्या चवीसाठी विविध घटकांचा वापर करावा तसे गोपाळरावांनी आपले डोके वापरून पुण्यातील सामाजिक, राजकीय, सनातनी, पुरोगामी अशा विविध क्षेत्रांतील लोकांचा या स्टिंग ऑपरेशन साठी भरणा केला होता.
या लोकांमध्ये देशातील एक प्रमुख राजकीय आणि सामाजिक नेते असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते, न्यायमूर्ती म गो रानडे होते, भारत सेवक समाजाचे संस्थापक आणि नंतर उदयास येणाऱ्या गांधीजींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वगैरेवगैरे.
या प्रकरणात मुख्य व्यक्ती आणि सर्वाधिक हानी पोहोचणारी व्यक्ती अर्थातच लोकमान्य टिळक होते. दीड दोन वर्षे या प्रकरणामुळे खूप लोकांना, खूप कुटुंबांना मनस्ताप सहन करावा लागला. पुण्यातल्या दोन विरुद्ध टोकांना असलेल्या लोकांनी या वेळी प्रतिस्पर्धी गटावर पुरता हल्ला करून या प्रकरणातली रंगत अनुभवली. दीर्घकाळ चाललेल्या या ग्रामण्य प्रकरणात लोकमान्य टिळकांना दोनदा प्रायश्वित घ्यावे लागले. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष करण्यासाठी आणि दोषी लोकांना शिक्षा सुनावण्यासाठी खुद्द शंकराचार्यांची मदत घेण्यात आली होती.
विशेष म्हणजे गोपाळराव जोशी यापैकी कुठल्याही गटांत मोडणारे नव्हते. या स्टिंग ऑपरेशनमुळे पत्रकार गोपाळराव जोशी यांचे एकमेव इप्सित साध्य झाले. हे उद्दिष्ट्य म्हणजे त्याकाळच्या पुणे शहरातील लोकांचा सनातनीपणा, सुधारक मंडळींची प्रत्यक्ष जीवनातील विसंगती उघडकीस आणणे.
हां, इथं सांगायलाच हवं, तर गोपाळराव जोशी हे भारतीय कुटुंब नियोजन चळवळीचे आद्य प्रवर्तक र. धो. कर्वे यांच्या सहकारी शकुंतला परांजपे यांचे चुलत आजोबा, सिने-दिग्दर्शिका सई परांजपे यांचे चुलत पणजोबा. शकुंतला परांजपे यांनी गोपाळराव जोशी यांचे व्यक्तिचित्र रेखाटलं आहे. `निवडक शकुंतला परांजपे' या पुस्तकात हा लेख आहे. या लेखात शकुंतलाबाई लिहितात:
”गोपाळरावांना ढोंग आणि दांभिकपणा बिलकुल खपत नसे. नाना सोंग करून दुसऱ्याचं ढोंग चव्हाट्यावर आणण्याची त्यांना फार खोड. पाणी शिंपडल्यानं माणूस बदलतं काय, असं म्हणून स्वारी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झाली आणि पुढल्या रविवारी प्रार्थनेच्या वेळी धोतर नेसून उघड्या पोटावर जानवे घालून चर्चमध्ये जाऊन बसली. तेव्हा तेथील पादऱ्यानं हळूच सुचवलं की, तुम्ही आता ख्रिस्ती झालात तेव्हा जानवं वगैरे काढून नीट पोशाख करावा. “जानवं घालू नये. असं बायबलमध्ये कुठं सांगितल आहे?” असा सवाल गोपाळरावांनी पादऱ्याला केला आणि लवकरच संगमात स्नान करून, आता माझी सर्व पाप धुऊन निघाली आणि मी पूर्ववत हिंदूच आहे, असा आधार धर्मग्रंथातून भटभिक्षुकांना दाखवला. ख्रिस्ती धर्माची टिंगल आणि हिंदू धर्माचीही टिंगलच!”
गोपाळरावांच्या अशा या व्यक्तिमत्वाला साजेसं असं हे स्टिंग ऑपरेशन आहे.
बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी `दर्पण' नियतकालिक सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाय रचला. महाराष्ट्र सरकारतर्फे ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून जातो. `दर्पण'च्या स्थापनेनंतर सहा दशकांनी - १४ ऑकटोबर १८९० रोजी - गोपाळराव जोशी यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं. अर्थात `स्टिंग ऑपरेशन’ हा पत्रकारितेत रूढ झालेला अलिकडचा शब्दप्रयोग.
गोपाळरावांच्या या स्टिंग ऑपरेशनविषयी माझा स्वतंत्र एक लेख आहे, `बदलती पत्रकारिता' या माझ्या पुस्तकात ते एक प्रकरण आहे.
भारताच्या इतिहासात काही वर्षांपूर्वी करण्यात आलेले काही स्टिंग ऑपरेशन्स खूप गाजले. भारतीय जनता पक्षाचे पहिले (आणि आतापर्यंतचे एकमेव ) दलित पक्षाध्यक्ष म्हणून गाजावाजा केलेले बंगारु लक्ष्मण हे लाच घेताना एका स्टिंग ऑपरेशनमध्ये लोकांनी २००१ साली पाहिले. त्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते आणि त्यामुळे पक्षाध्यक्षाची मुदत पूर्ण होण्याआधीच बंगारु यांना दरवाजा दाखवण्यात आला होता.
त्याच काळात जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाच्या नेत्या जया जेटली यांच्यासह इतरही स्टिंग ऑपरेशनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हे स्टिंग ऑपरेशन `तेहेलका डॉट कॉम’ या न्युज पोर्टलने केले होते.
लोकसभेचे अकरा सदस्य २००५ साली संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेताना अशाच एका स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडले गेले होते, त्यामध्ये भाजपचे सहा, बहुजन समता पार्टीचे तीन आणि काँग्रेसचा आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा प्रत्येकी एक खासदार होता.
अलिकडच्या काळात मात्र स्टिंग ऑपरेशन घडवून आणण्याचं धाडस कुणाही वृत्त एजन्सीनं वा पत्रकारानं केलं नाही.
गोपाळराव जोशी यांचे हे स्टिंग ऑपरेशन महाराष्ट्राच्या आणि भारतीय इतिहासात गाजलेले आणि सर्वपरिचित असले तरी भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात या प्रकरणाची साधी दखलही घेतली जात नाही. पत्रकारितेसाठी देशातील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांत सोडा, महाराष्ट्रातील आणि पुणे-मुंबईच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांतसुद्धा या देशातील पहिल्यावहिल्या सर्वाधिक गाजलेल्या स्टिंग ऑपरेशनविषयी शिकवले जात नाही.
गोपाळराव जोशी यांचे एकूण व्यक्तिमत्व अत्यंत वादग्रस्त असले तरी देशाच्या पत्रकारितेच्या इतिहासात पहिलेवहिले स्टिंग ऑपरेशन घडवून आणून समाजजीवनातील अनेक विसंगती चव्हाट्यावर आणण्याचे श्रेय त्यांना निश्चितच द्यावे लागेल.