हे तसं अगदी खाजगी संभाषण.. ..
हे तसं अगदी खाजगी संभाषण.. कालच झालेलं पण ते इथे शेअर करण्याचा मोह आवरता येईना ...म्हणून हा उपद्व्याप..
------
काल संध्याकाळी औषधाच्या दुकानात सेल्सवुमनशी बोलताना फोन वाजला म्हणून लगेच दुकानाबाहेर आलो..
"तुम्ही कामिल पारखे काय? " एका महिलेचा तिकडून प्रश्न आला..
"हो..""
मी अमुक अमुक... तुम्ही माझे नाव कधी ऐकले काय..?
नाव तसे पुर्णतः अपरिचित होते पण भिडेखातीर आणि समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून म्हटले "हो, हे नाव ऐकले आहे.. "
पत्रकार असल्याने अनोळखी नंबरचे विविध पीआरओंचे असे फोन सतत येत असतात..
"तुमचं वय काय?"
तो प्रश्न ऐकून मी गप्पगारच झालो.
काय उद्देश असू शकतो हा प्रश्र्न विचारण्यामागे ? आवाजावरुन पलीकडच्या व्यक्तिच्या वयाचा अंदाज तर येत नव्हता..पण विचार करायला फार वेळ नव्हता..
तरी लगेचच मी त्या प्रश्नाला खरे काय ते उत्तर दिले. खरं पाहिलं तर मी यावर काही तरी खरमरीत उत्तर द्यायला पाहिजे होतं असं आता वाटतं..
"हा, तर माझे वय तुमच्यापेक्षा जास्त आहे... . तुमची "बदलती पत्रकारिता" हे पुस्तक मी वाचले आहे..त्यात 'पत्रकारितेतील स्त्रिया' या प्रकरणात महाराष्ट्रातील इंग्रजी आणि मराठी पत्रकारितेतल्या काही मोजक्या पत्रकार महिलांचा तुम्ही उल्लेख केला आहे. त्या प्रकरणात तुम्ही माझा उल्लेख सरळसरळ टाळला आहे. असं का?"
मला काहीं बोलू न देता त्या पुढे बोलत राहिल्या
"मी तुमच्याआधी खूप वर्षापूर्वी पत्रकारितेत आले. अनेक मराठी दैनिकांत मोठया पदांवर मी काम केले आहे .पत्रकारिता या विषयावर मी विद्यापिठात शिकवले आहे.. माझी कितीतरी - विसेक- पुस्तकेही आहेत. तुम्ही माझं नाव ऐकलं असेलच...आणि मराठी महिला पत्रकारांवर लिहिताना तुम्ही माझ्या नावाचा साधा उल्लेखही करत नाही..?"
"ओ मॅडम. मी खरंच तुमचं नाव कधीच ऐकलं नव्हतं.. नाही तर नक्की तुमचा उल्लेख केला असता... तुमच्याशिवाय आणि काहीं ज्येष्ठ महिला पत्रकारांचाही उल्लेख राहिला आहे.. आता पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत मी तुमचा उल्लेख करेल.. मुद्दाम तुमचं नाव टाळलं नाही.."
"असं कसं म्हणता तुम्ही.. महिला पत्रकारितेवर तुम्ही लेखात, पुस्तकात लिहिता, तेव्हा पत्रकार आणि लेखक म्हणून या विषयाचा पूर्ण अभ्यास करणं माहिती करून घेणे हे तुमचं काम होतं..
"ओ मॅडम .माझ्या पत्रकारितेतील अनुभवावर हे पुस्तक आहे. माझ्या नजरेतली. मी अनुभवलेली पत्रकारिता या पुस्तकात आहे.. ते आत्मचरीत्र नाही. पण माझी व्यक्तिगत निरीक्षणे त्यात मी मांडली आहे..तो इतिहास तर मुळीच नाही आणि परिपूर्ण माहिती नाही. इतिहास लिहिण्याचा उद्देश नसल्याने मी ती माहिती गोळा केली नाही आणि त्यामुळे तुमचा आणि अनेकांचा उल्लेख त्यात नाही.."
"अहो असं कसं म्हणता तुम्ही...? पत्रकारितेवर लिहिलेल्या तुमच्या या पुस्तकाबद्दल मी वाचले, खूप ऐकले म्हणून मुद्दाम ते पुस्तक विकत घेतले आणि वाचले .. माझा त्यात साधा उल्लेखही नाही हे ऐकून मला धक्काच बसला.. म्हणून लगेच हा फोन करते आहे.."
"ओ मॅडम.. तुमचे म्हणणे मला पूर्ण मान्य आहे, पण मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. मला मराठी पत्रकारितेविषयी खरंच फार माहिती नाही. माझी सर्व नोकरी इंग्रजी दैनिकांतली .. मराठी पत्रकारितेशी माझा तसा लांबून संबंध आला. . शिवाय मी खूप वर्षे महाराष्ट्राबाहेर गोव्यात होतो.. नंतर महाराष्ट्रात ज्या मोजक्या शहरांत मी राहिलो फिरलो, त्या अनुभवावर हे पुस्तक आहे.. तुमच्या शहरातील पत्रकारितेविषयी मला फारशी माहितीही नाही...मी पत्रकारितेचा इतिहास लिहिलेला नाही..तसा दावा पण करत नाही... दुसरं म्हणजे हे पुस्तक विश्वकोश, encyclopedia नाही की ज्यात परिपूर्ण, अगदी अक्युरेट माहिती असायला हवी..''
पण मॅडम माझे म्हणणे ऐकून घ्यायलाच तयार नव्हत्या.
."अहो तुमचे हे पुस्तक सर्वदूर जाणार.. त्यात अशी अर्धवट अपुरी माहिती देणे योग्य आहे का...?
'ओ मॅडम. हे मराठी पुस्तक आहे ते असे 'सर्वदूर' कसे जाणार ..? ( बहिणाबाई म्हणतात तसं मानवी मन किती चंचल असतंं बघा.. इतक्या तापलेल्या, गंभीर संभाषणातसुध्दा 'ओ मॅडम' असं म्हणताना मला का कुणास ठाऊक ती ''दिदी, ओ दिदी" ही आता खूप प्रसिद्ध झालेली ती पूर्व समुद्र किनाऱ्यावरची ललकारीच सदा आठवायची...)
``अहो मॅडम, मराठी पुस्तकांची एक आवृत्ती किती प्रतींची असते आणि मराठी पुस्तके किती खपतात हे तुम्हाला माहिती आहे ना..? आणि मी म्हणजे काय डॉमिनिक लापियर, सलमान रश्दी, जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे किंवा गिरीश कुबेर आहे का की ज्यांच्या मांडणीची, पुस्तकाची सगळीकडे, `सर्वदूर'' चर्चा होणार आहे.. ? मी मुद्दामहून तुमचं नाव गाळलेलं नाही हे परत परत सांगतोय..."
"...आणि तुम्ही तुमच्या पुस्तकात तुमचा पत्ताही दिलेला नाही... तुमचा पत्ता मला द्या.. माझी सर्व पुस्तके आजच तुम्हाला पाठवून देते.. मग तुम्हाला कळेल मी कोण आहे ते !!"
"ओ मॅडम, पुस्तके वाचणे मी आता पूर्ण बंद केले आहे मागच्याच महिन्यात घरात असलेली कितीतरी - तीनचार पोते - वाचलेली अन् न वाचलेली आणि यापुढेही कधी वाचणारही नाही अशी इंग्रजी - मराठी पुस्तके मी रद्दीत दिली... नको, तुमची ती पुस्तके तुमच्याकडेच ठेवा...!"
त्या क्षणाला आमच्या दोघांपैकी नक्की कुणी फोन आधी कट केला ते आता आठवत नाही......
----
आणि माझ्या `बदलती पत्रकारिता' (सुगावा प्रकाशन, पुणे २०१९) या पुस्तकातील `पत्रकारितेतील महिला' या प्रकरणातील (१९९४च्या आसपास Indian Express मध्ये छापलेले) हे छायाचित्र
Camil Parkhe December 17, 2021
No comments:
Post a Comment