प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि न अनुभवलेल्या मराठी साहित्य संमेलनांच्या काही आठवणी…
‘अक्षरनामा’ पडघम - साहित्यिक
पु. ल. देशपांडे आणि दुर्गा भागवत
- Wed , 01 December 2021
आतापर्यंत खरे तर मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजेरी लावलेली नाही. ऐंशीच्या दशकात गोव्यात पणजीहून प्रसिध्द होणाऱ्या 'द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून आणि नंतर पुण्यात इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हेराल्ड - सकाळ टाइम्स या इंग्रजी दैनिकांचा बातमीदार या नात्याने मी काही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन किंवा समारोप कार्यक्रमाची भाषणे कव्हर करण्यासाठी मी हजर राहिलो. मराठी साहित्य संमेलनातली ही उपस्थिती असायची ते केवळ उद्घाटक आणि इतर मुख्य पाहुणे मराठी साहित्याशिवाय इतर काही महत्त्वाचे मुद्दे मांडतील त्याची बातमी करण्यासाठी.
विशेष म्हणजे या उद्घाटक किंवा मुख्य पाहुण्यांनी आम्हा इंग्रजी दैनिकांच्या वार्ताहरांना कधीही निराश केले नाही. मराठी भाषा आणि साहित्य याव्यतिरिक्त बातमी मूल्य असलेल्या इतर विषयांवर त्यांनी बोलल्यामुळे इंग्रजी दैनिकांच्या अमराठी वाचकांसाठी सुद्धा त्यांचे मत महत्त्वाचें ठरायचे.
एका कोकणी साहित्य संमेलनावे उद्घाटन म्हणुन मराठी लेखक `स्वामी’कार रणजित देसाई यांचे भाषण माझ्यासाठी असेच विस्मरणीय ठरले. त्यावेळी पणजीहून आम्हा बातमीदारांना संमेलनस्थळी घेऊन जाणाऱ्या कारमध्ये एक नामांकित, आदरणीय साहित्यिक व्हीआयपी व्यक्ती होती. मी पुढें ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो आणि मागच्या सीटवर मडगावहून प्रसिध्द होणाऱ्या दैनिक `राष्ट्रमत’चे बालाजी गावणेकर, 'नवप्रभा'चे गुरुदास पेडणेकर यांच्याबरोबर बाकिबाब म्हणजे प्रसिद्ध कवी बा. भ. (बाळकृष्ण भगवंत ) बोरकर बसले होते.
मानेपर्यंत रुळणारे केस आणि खांद्यावर घेतलेली शाल असे या कविवर्यांचे रूप आजही माझ्या नजरेसमोर कायम आहे. मुखदुर्बळतेमुळे म्हणा किंवा भिडेखातिर मी बोरकर यांच्याशी एक शब्दही बोललो नव्हतो. मात्र त्यांच्याबरोबरच्या गाडीतील प्रवासाची ती स्मरणीय घटना माझ्या मनात खोलवर उमटली आहे हे निश्चित.
त्यानंतर दक्षिण गोव्यात भरलेल्या दुसऱ्या एका कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यावेळच्या केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी केले, तो प्रसंग आजही आठवतो. त्यावेळी कर्नाटकात मंगळूर येथे राहणाऱ्या अल्वा यांचे कानडी ढंगाचे, उच्चाराचे कोकणी समजून घेताना आम्हा बातमीदारांची कशी त्रेधातिरपीट झाली होती ते आजही स्पष्ट आठवते. (कोकणी भाषा ही देवनागरी लिपीबरोबरच रोमन आणि कन्नड लिपींतही लिहिली जाते. सरकारी पारितोषके मात्र फक्त देवनागरी लिपीतल्या साहित्याला दिली जातात.)
मालवणला १९९४ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला बातमीदार म्हणून नाही तर एक ख्रिस्ती वाचक म्हणून मी हजर होतो. शिवसेनेचे स्थानिक नेते आणि आमदार नारायण राणे ऐनवेळी प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या विद्याभवन हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर नेल्सन मच्याडो यांनी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या साहित्य दिंडी नंतर संध्याकाळी राणेंच्या घरी जाऊन त्यांना संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची गळ घातली होती आणि ते लगेच राजी झाले होते.
``राजकारण्यांना साहित्य संमेलनात कशाला असा सन्मान द्यायचा?'' असा माझा नापसंतीचा सूर होता पण राणेंच्या उपस्थितीमुळे, त्यांच्याबरोबर आलेल्या फौजफाट्यामुळे, संमेलनाचा पुर्ण माहोल जो बदलला तो पाहून मग मी गप्पगार झालो.
शिवसेनेचे लढाऊ नेते अशी प्रतिमा असलेले नारायण राणे ख्रिस्ती समाजाच्या या मेळाव्यात काय मत मांडतील याबद्दलसुद्धा मी साशंक होतो. राणे यांच्या कोकणातील मतदारसंघात कॅथोलिक समाजाची संख्या लक्षणीय आहे. राणे यांच्या तिथल्या भाषणाने मात्र माझी निराशा केली नाही हे कबूल केले पाहिजे.
यावेळी संमेलनाध्यक्ष कवि निरंजन उजगरे होते. मराठी साहित्य संमेलने वाद झाल्याशिवाय गाजत नाहीत आणि आठवणीत राहत नाहीत. आपल्या भाषणात साहित्य संमेलनाध्यक्ष उजगरे यांनी ''दलित ख्रिस्ती' या शब्दप्रयोगाविषयी नापसंती व्यक्त केली आणि मग अशा वादाची ठिणगी पडलीच.
उजगरे यांची विधाने अशी होती:
"मध्यंतरी दलित ख्रिस्ती' चळवळ आणि त्यापाठोपाठ ' दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन' भरवण्यात आली. हा एकंदर प्रकारच अत्यंत चिंताजनक आहे. सर्व जातिजमातींमधून धर्मांतरीत झालेला ख्रिस्ती समाज ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने बांधला गेला आहे अशी आमची श्रद्धा असेल तर `दलित ख्रिस्ती' ही संकल्पना मान्य करता येणार नाही. पुन्हा एकदा अवमानित जगण्याकडे जाण्याची आमची मानसिक तयारी आहे का? अनुसूचित जातींना मिळणाऱ्या सवलतीसाठी आम्ही ' दलित ख्रिस्ती' ही पाटी गळ्यात अडकवणार का?"
झाले, या विधानामुळे उजगरे यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला. अलिकडेच, म्हणजे २०१८ ला दलित मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे ज्यांनी अध्यक्षपद भूषविले ते निरोप्या ' मासिकाचे संपादक फादर ज्यो गायकवाड या संमेलनात होते, कार्यकर्ते पौलस वाघमारे आणि माजी संमेनाध्यक्षा विजया पुणेकरसुध्दा होत्या.
काही दिवसांनी उजगरे यांनी आपले विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त केली होती.
तर या मालवणच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्थानिक मिलाग्रिस वर्चचे पॅरीश प्रीस्ट म्हणजे प्रमुख धर्मगुरु फादर ग्रॅब्रिएल डिसिल्वा होते. त्या तीन दिवसांच्या संमेलनात जेवणात मासळीचा मुबलक वापर असल्याने जमलेले रसिक आणि खवय्ये पाहुणेलोक या मालवणी पाहुणचाराबद्दल जाम खूष होते.
लातूर जिल्ह्यात उदगीर येथे भरलेल्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात मी पहिल्यांदा एक साहित्यिक म्हणून हजर होतो. हे संमेलन लक्षात राहिले ते त्यावेळी तेथे निर्माण झालेल्या तणावामुळे.
हे संमेलन ख्रिस्ती धर्मांतरासाठी भरण्यात आले आहे असा आरोप करुन ते संमेलन उधळून लावण्याची धमकी एका स्थानिक दलित समाजघटकाने दिली होती. त्यामुळे जमलेल्या आम्हा पाहुण्यांना धड भोजनाची सुध्दा व्यवस्था झाली नव्हती. शेवटच्या दिवशी तर आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या एका पाळकाने म्हणजे पास्टरने सर्व पाहुण्यांना नॉनव्हेज जेवण भरपेट देऊन सुभाष चांदोरीकर आणि इतर आयोजकांची अब्रू वाचवली होती.
श्रीरामपूर येथे अनुपमा डोंगरे - जोशी यांच्या अध्यक्षतेखाली २००७ साली झालेल्या नवव्या मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष जेसुईट फादर जेम्स शेळके यांनी मात्र पाहुण्यांची शाही बडदास्त राखली होती.
ही सर्व साहित्य संमेलने लक्षात राहिली आहेत ती अशा वेगवेगळया साहित्यविरहीत संदर्भांनी. या सर्व संमेलनांना मी उपस्थित असल्याने या साहित्य जत्रा आठवणीत राहिल्या.
मात्र काही मराठी साहित्य संमेलनांना थेट हजर नसतानाही ही संमेलने झाल्यापासून साडेचार दशकांचा कालावधी उलटल्यानंतरही आजही माझ्या मनात अगदी ताजी आहेत. ही संमेलने झाली त्यावेळीं म्हणजे सत्तरच्या दशकात मी शालेय विद्यार्थी होतो. तरीसुद्धा त्या संमेलनाआधी, संमेलनादरम्यान आणि संमेलन पश्चात झालेले कवित्व, वाद आणि घडामोडी मला आजही अगदी स्पष्ट आठवतात.
संमेलनात हजर नसतानासुद्धा माझ्या आठवणीत असलेली ही दोन मराठी साहित्य संमेलने म्हणजे इचलकरंजीत पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आणि त्यापाठोपाठ लगेच कराड येथे दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली ऐन आणीबाणीच्या काळात झालेले मराठी साहित्य संमेलन.
इचलकरंजीचे १९७४ सालचे संमेलन खास आठवते याचे कारण संमेलनाध्यक्ष पु.ल. देशपांडे. त्यात या संमेलनाची पन्नाशी पुर्ण झाली म्हणून साहित्य विश्वात खूप उत्साह होता. याकाळात मी शाळेत शिकत असलो तरी मी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली होती आणि तो वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता असे म्हटले तरी चालेल. याचे कारण म्हणजे त्याकाळात नव्यानेच साक्षर झालेली पहिली किंवा दुसरी पिढी नियतकालिके आणि मासिके भरपूर, अगदी पुरवून पुरवून वाचत असे. या दैनिकांना आणि इतर नियकालिकांसाठी ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने म्हणजे मोठी पर्वणीच होती. मला वाटते पुलंच्या अध्यक्षतेखाली भरलेले हे साहित्य संमेलन हे मराठी ग्रंथकारांचे पहिलेच मोठे गाजलेले संमेलन, मोठी साहित्य यात्रा असावी.
इचलकरंजीचे हे संमेलन होण्यापूर्वी कितीतरी दिवस आधी नियकालिकांची पानेच्या पाने आणि रकाने साहित्य संमेलना विषयीच्या मजकुराने भरली होती. संमेलनाध्यक्षकांचे संपूर्ण भाषण पान एकवरुन आतल्या पानावर आणि उद्घाटकांच्या भाषणाचा वृत्तान्त हा पान एक्वरची पहिली बातमी म्हणजे लीड न्युज होती. त्याशिवाय दैनिकांची इतर सर्व पाने संमेलना विषयीच्या बातम्यांनी भरलेली होती.
कराड येथील साहित्य संमेलन भरण्याआधीच त्याभोवती वादाचे ढग जमायला सुरुवात झाली होती. संमेलनाध्यक्षा होत्या विदुषी दुर्गा भागवत आणि यजमान किंवा स्वागताध्यक्ष होते कराडचे सुपुत्र आणि देशाचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे साहित्य संमेलन होणार होते त्यावेळचा काळ आणि परिस्थिती.
हा काळ होता पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशभर लादलेल्या आणीबाणीचा. देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे सर्व नेते त्यावेळी तुरुंगात होते. प्रसारमाध्यमांत सेन्सॉरशिप लागू होती.
आणीबाणी होती तरी कराड इथल्या साहित्य संमेलनातल्या सर्व बातम्या दैनिकांच्या आम्हा वाचकांपर्यंत पोहोचत होत्या. मावळते संमलनाध्यक्ष पु. ल. देशपांडे यांनी नव्या संमेलनाद्यक्षा दुर्गा भागवत यांच्याकडे सूत्रे सोपवतना केलेले भाषण, क्षणचित्रे वगैरे सर्व वृत्तांत यांनी वृत्तपत्रांची रकाने भरली होती.
"खूप वापर होत गेला तर मेलेल्या कातडीपासून बनवलेले वहाणसुध्दा कुरकुरायला लागते.," अशा आशयाचे या संमेलनात पुलंनी म्हटलेले आणि दैनिकांत वाचलेले एक वाक्य अजूनही मी विसरलेलो नाही.
कराड इथले हे मराठी साहित्य संमेलन हे या ग्रंथकारांच्या मेळाव्याच्या इतिहासातील अनेक कारणांनी आणि अर्थांनी आतापर्यंत सर्वांत गाजलेले आणि ऐतिहासिक संमेलन म्हणता येईल.
हे संमेलन पार पडल्यानंतरसुद्धा तिथले कवित्व लगेच संपले नाही. संमेलनानंतर लवकरच संमेलनाध्यक्षा दुर्गाबाईना अटक झाली आणि आणीबाणी शिथिल झाल्यावरच त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
त्यानंतर जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कराड येथील मावळते आणि नवीन असे दोन्ही संमेलनाध्यक्ष - पुल देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत - सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या विरोधात हिरीरीने उतरले आणि काँग्रेसचे निवडणुकीत पानिपत झाल्यावर दोघेही पडद्याआड झाले.
कराडचे हे गाजलेले आणि आताही बहुचर्चित असलेले हे साहित्य संमेलन मी संमेलनस्थळी न जाताही अशाप्रकारे वृत्तपत्रांच्या माध्यमातून अनुभवले.
योगायोगाने केवळ एक वर्षांतच जेसुईट ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी मी कराड येथेच आलो. तिथे टिळक हायस्कूलात अकरावीचे शिक्षण घेताना तिथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाची आठवण येणे साहजिकच होते. तेव्हा म्हणजे १९७६ ला आणीबाणी पर्व चालूच होते.
आजही पुण्याहून गोव्याला जाताना आणि तेथून परतताना कृष्णाकाठचे कराड लागतेच. त्या थांब्यावर असताना कराडमधला माझा तो एक वर्षाचा काळ आणि त्याआधीचे पुलंनी आणि दुर्गाबाईनी गाजवलेले ते ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन हमखास आठवते.
कराडचे ते साहित्य संमेलन मराठी सारस्वतांनीच नाही तर सर्व भारतीयांनी सदा स्मरणात ठेवावे असेच आहे.
आणीबाणीच्या काळात कराडचे साहित्य संमेलन होत होते त्यावेळी सुध्दा सर्वकाही अलबेल आहे असे मानणारे आणि सांगणारे लोक बहुसंख्य होते.
सद्याच्या विविध क्षेत्रांतील अनेक अर्थांनी भरकटलेल्या परिस्थितीत तर कराड येथील ते साहित्य संमेलन एखाद्या दिपगृहासारखे दिशा दाखवणारे झाले आहे. पुल देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या कणखर, परिणामांची पर्वा न करता राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावणाऱ्या, स्पष्टवक्त्या साहित्यिकांची कमतरता तर खूपच जाणवते आहे.
No comments:
Post a Comment