Wednesday, April 27, 2022

 मॉर्निंग वॉक निखळ निसर्गावरच ही पोस्ट

आज सकाळी श्रीधरनगर बागेत मॉर्निंग वॉकच्या कार्यक्रम पत्रिकेवरील सर्वच कार्यक्रम पूर्ण करता आले. असा योग नेहेमीच येत नाही. बागेत जातानाच कारमध्ये नेहेमी असलेली बॅडमिंटनची दोन रॅकेट्स आणि शटल कॉक घेऊन गेलो.
मी असा जामाजम्यानिशी जात असताना पाहून '' ''अहो तुमचे कुणी जोडीदार बागेत नाही'' असं एकजण मला म्हणालासुद्धा. पण म्हटले ``पाहू या, येईल कुणीतरी खेळायला. ''
अगदी तसंच झालं.
त्या सकाळच्या थंडीत थोडा वेळ उन्हात उभा राहून सुर्याकडे टक राहून पाहत राहिलो, नंतर थंडी जाईपर्यंत उभ्यानेच काही व्यायामप्रकार केले आणि बागेत थोडा पळून आलो. तोपर्यंत माझ्याबरोबर नेहेमी बॅडमिंटन खेळणाऱ्यांपैकी एक जोडीदार आला होता.
मस्तपैकी पंधरावीस मिनिटे खेळून झाले, अंग छानपैकी मोकळे झाले.
बॅडमिंटनची `मॅच’ अशी मी कधीच खेळत नाही, शिवाजीनगरच्या सकाळ टाइम्स वृत्तपत्रातले काम संपल्यावर आणि बॉसलोक ऑफिसातून घरी गेल्यावर संध्याकाळी उशिरा किंवा रात्री ऑफिसच्या मोकळ्या जागेत बॅडमिंटन करण्याचा माझा खूप वर्षे शिरस्ता होता. त्यावेळी असिम त्रिभुवन, ओंकार परांजपे, अनामिका अशा काही तरुण सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव काही वेळेस मॅचेस खेळाव्या लागायच्या. नाहीतर स्पर्धेसाठी म्हणून नाही तर निव्वळ निखळ आनंदासाठी खेळायचे हेच माझे नेहेमी धोरण असते.
गोव्यात मिरामारच्या धेम्पे कॉलेजात शिकताना आणि नंतर नवहिंद टाइम्समध्ये नोकरी करताना केवळ फ़ुटबाँल खेळायचो, युरोपात बल्गेरियात काही महिने पत्रकारितेच्या अभ्यासासाठी असताना तिथेही फ़ुटबाँलच खेळायचो. गेल्या काही वर्षांत माझी मुलगी आदिती आणि तिच्या कॉलनीतल्या मित्रमैत्रिणींमुळे बॅडमिंटन खेळायची आवड निर्माण झाली आणि आता केवळ हाच खेळाचा प्रकार मला आवडतो आणि झेपतो पण.
खेळून झाले आणि काही मिनिटातच शिट्टी झाली. कोरोनाकाळात हल्ली महापालिकेच्या बागा सकाळी दहाऐवजी नऊलाच बंद होतात. गेटबाहेर आलो तर दत्तमंदिरातून बाहेर येणारे दुसरे एक मित्र दिसले.
केंद्रिय उद्योग खात्यातून पंधरा वर्षांपूर्वी निवृत्त झालेले हे विजय देशपांडे सर मॉर्निग वॉकमध्ये मला साथ देत असतात. त्यांच्याबरोबर चालताना त्यांचे सरकारी कार्यालयातील घटनांचे आणि कामकाजाचे अनुभव ऐकत शरीराचा व्यायाम होतोच पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे खूप उच्च दर्जाची बौद्धिक मशागत होत असते.
दिल्लीत एकदा काही कागदपत्रे घेऊन पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटण्याची देशपांडेंना संधी मिळाली होती, बारामतीला महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या देशातील व्हिव्हिआयपींच्या उपस्थितीत पण साध्याच स्वरुपात झालेल्या लग्नासही निमंत्रित सरकारी अधिकारी म्हणून ते उपस्थित होते.
ऐन आणिबाणिच्या काळात देशपांडे नवी दिल्लीत होते, त्याकाळातल्या त्यांनी सांगितलेली ही एक आठवण. आणिबाणी लागू केल्यानंतर देशात एकदम कठोर शिस्तपर्व म्हणजे विनोबा भावे यांच्या शब्दांत `अनुशासन पर्व’ सुरु झाले.
दिल्लीतील नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वक्तशीरपणे म्हणजे सकाळी नऊ वाजता कार्यालयात हजर व्हावे असा एक आदेश काढण्यात आला होता. या आदेशाकडे बहुतेक सर्वच अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी याबाबत माहिती कळली. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊनंतर नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकची प्रमुख दरवाजे बंद करण्यात यावे, असा एक आदेश त्वरित काढण्यात आला. (त्याकाळात पंतप्रधान कार्यालय म्हणजे Prime Minister's Office किंवा PMO अस्तित्वात नव्हते).
या आदेशाची ताबडतोब कार्यवाही करण्यात मात्र एक अडचण होती. नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे प्रमुख दरवाजे गेली कित्येक वर्षे कधीही पूर्णतः बंद केले जात नसल्याने ते गंजले होते आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ते बंद करणे अशक्य होते. त्यावर आदेश आला की कुठल्याही परिस्थितीत ही प्रमुख दरवाजे सकाळी नऊनंतर बंद झालीच पाहिजे. यानंतर रात्रभर काम करून अखेरीस हे दरवाजे बंद आणि खुले होतील यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकचे सर्व प्रमुख दरवाजे सकाळी नऊनंतर बंद झाले आणि त्यानंतर येणाऱ्या विविध खात्यांच्या मुख्य सचिवांच्या, सचिवांच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या गाडया गेटबाहेरच रोखण्यात आल्या. देशाच्या इतिहासात प्रथमच त्या दिवशी अनेक मुख्य सचिव आणि सचिवांच्या नावावर 'उशिरा आल्याचा' शेरा नोंदविला गेला. त्यानंतर मात्र सर्व अधिकारी आणि इतर कर्मचारीवर्ग वेळेवर कार्यालयात येऊ लागला.
तर सांगायचे म्हणजे देशपांडे सर म्हणजे अशा अनेक समृद्ध आणि संपन्न अनुभवांची मोठी खाण आहे. आपल्या नोकरीच्या कारकिर्दीत देशांतील विविध राज्यांत तसेच महाराष्ट्रातील अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर अशा ठिकाणी काम करताना आलेल्या नोकरशाहीचे, नोकरशहांचे आणि राजकारणी व्यक्तींचे किस्से ते सांगत असतात कोल्हापुरात असताना त्यांचे पत्रकार मित्र प्रभाकर कुलकर्णी आणि राजारामबापू पाटील यांच्या अनेक आठवणी आणि किस्से ते अधूनमधून सांगत असतात.
अशा अनुभवसंपन्न व्यक्तीशी दररोज बोलण्याची संधी मिळणे हे आम्हा पत्रकारांसाठी किती अमुल्य संधी असते हे सांगायलाच नको. देशपांडे सरांच्या या बोलण्यातून मला आतापर्यंत वृत्तपत्रांतील बातमी आणि लेखांसाठी कितीतरी विषय मिळाले आहेत, यापुढच्या कितीतरी लिखाणासाठी त्यांनी बेगमी पुरवली आहे.
घरी आलो तेव्हा इमारतीखाली लिफ्टच्या शेजारी असलेल्या महापालिकेच्या नळाला अजून पाणी येते आहे हे पाहून धक्काच बसला.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेने धरणांत अपुरा पाणीसाठा आहे या कारणाखाली दिवसाआड एकवेळ फक्त संद्याकाळी पाणीपुरवठा सुरु केला त्यात नंतर अतिवृष्टी होऊन, भरलेल्या धरणांतून पाणी सोडण्याची वेळ येऊनही बदल केलेला नाही. मात्र आजकाल अनेकदा सकाळीही नळाने पाणीपुरवठा होतो हे अनेक लोकांच्या लक्षातही आलेले नाही.
मग काय, ताबडतोब घरात गेलो आणि दोन बादल्या आणि पाण्याचा मग घेऊन पुन्हा त्या नळाशी आलो. खूप दिवस इमारतीपाशी आणि रस्त्याला लागून असलेल्या रोपांना आणि झाडांना मी पाणी घातले नव्हते. इतर शेजारपाजारचे वृक्षमित्र रहिवाशी नियमितपणे या झाडांनां पाणी घालत असले तरी ते पाणी अपुरे आहे हे पारिजातकाच्या, कण्हेरी आणि इतर झाडांच्या वाळलेल्या पानांवरुन लक्षात येत होते. शिवाय हिवाळा संपत आल्याने, आंबा आणि इतर फळझाडांचा फळांचा मोसम जवळ येत असल्याने त्यांना वाढीव पाण्याची गरज होती
झाडांना पाणी घालणे सुरु केले आणि खूप वर्षांपूर्वी आमच्या कॉलनीतल्या वाहत्या कॅनालपाशी असलेल्या मोकळ्या जागेत मीच लावलेल्या या कडुनिंबाच्या, आंब्याच्या, सोनचाफ्याच्या झाडांकडे आणि तगर, सोनचाफा कण्हेर वगैरे फुलझाडांकडे मी गेली दोन वर्षे दुर्लक्ष केले याबद्दल वाईट वाटले.
यापैकी काही झाडांना पाणी साचण्यासाठी मग आळे केले, काही झाडांच्या मुळापाशी शेजारीच कुणी तरी आणून टाकलेली लाल पावटा माती पसरुन टाकली, पेरु आणि सिताफळाच्या झाडांच्या फांद्याची थोडी छाटणी केली. अजूनही महापालिकेच्या नळाला पाणी येत होते त्यामुळे किती वेळ या बागकामात मन रमले ते कळालेसुद्धा नाही.
सहज घड्याळाकडे पाहिले तर साडेअकरा वाजून गेले होते. नाश्त्याची वेळ कधीच टळून गेली होती.
पण मग मनाशीच म्हटले, चला, काही हरकत नाही, आता नाश्ता नकोच. दमणची पाहुणे मंडळी घरी असल्याने आज मिष्टानांचा बेत आहे. आज भरपूर खेळून, व्यायाम करुन झाला, बागकामाने जाम भूक लागलीय.
अगदी तीस-पस्तीस नाही तरी नेहेमीपेक्षा आज काही जास्तीच पुरणपोळ्या अगदी आरामात खाता येतील.

No comments:

Post a Comment