Wednesday, April 27, 2022

दौरे आणि चळवळ समाजजागृतीसाठी आवश्यक

मी लहानपणी श्रीरामपूरला शाळॆत शिकत असताना समाजवादी कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांनी महाराष्ट्रभर एक दौरा काढल्याचे आजही आठवते. दौऱ्याचे आयोजन एका विशेष कारणासाठी केले होते. राज्यातील किती गावांत विविध समाजघटकांसाठी - स्पष्टच लिहायचे झाल्यास विविध जातीजमातींसाठी - पिण्याच्या पाण्यासाठी किती आणि कशाप्रकारच्या सामायिक विहिरी आणि इतर सुविधा आहेत हे पाहण्यासाठी डॉ आढाव यांनी हा संशोधनदौरा हाती घेतला होता. यानंतर कुठल्याशा दैनिकात कि इतर नियतकालिकांत याविषयी डॉ बाबा आढाव यांनी 'एक गाव, एक पाणवठा' या शिर्षकाची एक लेखमालिका लिहिली. नंतर ही लेखमालिका पुस्तकरुपातही प्रसिद्ध झाली. ही घटना आहे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीची.

डॉ बाबा आढाव यांच्या या 'एक गाव, एक पाणवठा' संशोधनदौऱ्यात महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा सामायिक आहे कि नाही याबाबतचे वास्तव लोकांच्या समोर आले.
त्यानंतर शांतीलाल मुथ्था यांनी सामुदायिक विवाहासाठी असेच दौरे आणि चळवळ सुरु केली होती. काही समाजांत लग्नासाठी आणि हुंड्यासाठी मुलीच्या कुटुंबाच्या ऐपतीबाहेर खर्च करण्यासाठी प्रचंड दबाब येतो, त्यावर सामुदायिक विवाह हा एक प्रभावी उपाय आहे असे मुथ्था यांचे म्हणणे होते.

याच हेतूने त्यांनी १९८९साली महाराष्ट्राच्या काही भागांत म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश या प्रदेशांतील विविध शहरांत आणि गावांत सामुदायिक विवाहास उत्तेजन देण्यासाठी पदयात्रा काढली. यादरम्यान गोव्यातील माझे वास्तव्य आटोपून मी महाराष्ट्रात परतलो होतो, तेव्हा या पदयात्रेचे ठिकठिकाणी अगदी उत्साहाने स्वागत होत असल्याचे वृत्तपत्रांच्या बातम्यांतून दिसून येत होते. या दौऱ्यामुळेच शांतिलाल मुथ्था यांना मग `सामुदायिक विवाहाचे प्रणेते' ही एक उपाधी चिकटली.
मुथ्था यांच्या प्रेरणेने नंतर अनेक जाती आणि जमातींमधील आणि धर्मांतील नेत्यांनी मग आपापल्या समाजांसाठी सामुदायिक विवाहसोहोळे आयोजित सुरु केले
काँग्रेसचे मुंबईतील खासदार आणि चित्रपट अभिनेते सुनिल दत्त यांनी मुंबई ते पंजाबमधील अमृतसर येथपर्यंत १९८७ साली काढलेली शांती पदयात्रा अशीच त्यामागच्या उद्दात्त हेतूने गाजली. अमृतसर येथील सुवर्णमंदिरातले अतिरेकी बाहेर काढण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टार लष्करी कारवाईनंतर सुद्धा पंजाबमधले स्थिती पूर्वपदावर आलेली नव्हती.
पंजाबमधली ही स्थिती बदलून तेथे शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि दुःखी शीख समाजाच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी ही अडिचहजारहून अधिक किलोमिटर्सची पदयात्रा सुनिल दत्त यांनी सुरु केली होती. एकूण ७८ दिवस चाललेल्या या पदयात्रेत सुनिल दत्त यांच्या सोबत त्यांची मुलगी प्रिया दत्त याही होत्या.

समाजसेवक बाबा आमटे यांनी ऐंशीच्या दशकात ''भारत जोडो'' या नावाने देशभरचा दौरा सुरु केला होता. पणजी येथे `नवहिंद टाइम्स'चा बातमीदार म्हणून बाबा आमटे यांचा हा गोवा दौरा मी कव्हर केला होता, त्यावेळेस वृद्धत्त्वाकडे झुकलेले बाबा आमटे मणक्याच्या दुखण्याने त्रस्त होते तरीसुद्धा त्यांनी हा दौरा हाती घेतला होता हे विशेष होते.
जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी १९८३ साली केलेली कन्याकुमारी ते दिल्ली पदयात्रा अशीच खूप गाजली. `भारत यात्रा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पदयात्रेने चंद्रशेखर यांना देशभर एक नवी, स्वतंत्र ओळख मिळवून दिली.
भारतीय जनता पक्षाच्या लाल कृष्ण अडवाणी यांच्या देशभरच्या रथ यात्रेने तर देशाचा इतिहास घडवला हे कोण नाकारू शकेल?
काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना इतर पक्षांच्या मदतीने पदच्युत करुन शरद पवार मुख्यमंत्री बनले पण हे पद अल्पकाळाचे ठरले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आल्यानंतर आणि काँग्रेसचे सरकार आल्यावर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (समाजवादी) पक्षाचे नेते म्हणून शरद पवार स्वस्थ बसले नव्हते. त्याकाळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला होता, अगदी कब्बडीच्या स्पर्धा आयोजनातसुद्धा ते मागे राहिले नव्हते असे म्हणतात. शरद पवार यांच्या अशा या कष्टांचे फळ आणि परीणाम आपण सर्व जण आज पाहत आहोतच.
आजकाल मात्र असे दीर्घ परीश्रम आणि कष्टांचे दौरे राजकीय नेत्यांना सोसवत नाहीत असे दिसते. त्यामुळेच केवळ एखादया केंद्रस्थानी वा प्रकाशझोतात आलेल्या क्षेत्राला भोज्याप्रमाणे (भोंगा नव्हे ! ) भेट देऊन त्याद्वारे दीर्घकालीन दौऱ्याचे पुण्य आणि श्रेय उपटण्याचे मार्ग पत्करावे लागत आहेत.
अर्थात एव्हढ्या शॉर्टकटने जर त्यांचा अपेक्षित कार्यभाग उरकत असेल तर इतरांचीही त्याबद्दल हरकत नसावी.

No comments:

Post a Comment