सिल्व्हर ओक'
"हा कुठल्या फुलांचा सुगंध आहे...कुठले झाड ह्या फुलांचे?"
त्या दिवशी महापालिकेच्या बागेत एका जागी घुटमुटमुळत असलेल्या कोणा एकाने विचारले.
सकाळी फिरायला आलेलो मी त्यावेळी माझ्या दोन-तीन मित्रांबरोबर त्या व्यक्तीच्या समोरच होतो.
"हे इकडे सोन चाफ्याचं झाड आहे.. फुलं ती अगदी वरच्या फांद्यांवर आहेत.." मी लगेच तत्परतेने माहिती पुरवली.
माझे उत्तर ऐकून माझ्याबरोबर असलेले माझे मित्रही त्या सोनचाफ्याच्या त्या झाडाकडे, त्या पिवळयाधमक फुलांकडे जराशा विस्मयाने पाहू लागले.
''अरे खरंच कि. इतके दिवस माझ्याही लक्षात आले नाही हे फुलांचे झाड आणि फुलांचा हा सुगंध !'' माझ्याबरोबरचे एक ज्येष्ठ नागरीक म्हणाले.
''या मोठ्या बागेत इतके जुने सोनचाफ्याचे हे एकमेव झाड आहे. सुगंधित फुले खूप उंचावर असल्याने या झाडाचे अस्तित्व सुदैवाने सहसा कुणाच्या लक्षातही यात नाही आणि त्यामुळे ही फुले आणि इथला हा सुगंध सुरक्षित राहतो,'' मी म्हटलं.
ते तीनचार जण अजूनही सोनचाफ्याच्या त्या उंच झाडाकडे टक लावून पाहत होते. त्यामुळे सोनचाफ्याच्या झाडाविषयी अतिरिक्त माहिती देण्याचा मोह मला आवरला नाही.
`महापालिकेच्या बाग खात्याने काही वर्षांपूर्वी सोनचाफ्याची काही नवी झाडे या बागेत लावली आहेत. चला, दाखवतो मी तुम्हाला ही झाडे, दोनतीन वर्षांत या झाडांनाही फुलं यायला सुरुवात होईल.''
त्यानंतर बागेच्या इतर जागी काही वर्षांपूर्वी लावलेली आणि आता चांगले बाळसे धरलेली सोनचाफ्याची ती इतर झाडेही मी त्यांना दाखवली. सोनचाफ्याची झाडे कशी ओळखायची हेसुद्धा मी त्यांना सांगितले.
एव्हाना झाडे आणि फुलांविषयीची माझी माहिती ऐकून माझे दोन मित्र चकित झाले होते.
``अहो पण तुम्हाला या झाडांची आणि फुलांची खूप माहिती दिसते. मी या बागेत गेली कित्येक वर्षे येतोय पण झाडांची अशी नावे माहितच नाही.'' .
वयाने माझ्यापेक्षा मोठे असले आणि सरकारी नोकरीच्या निमित्त ते राज्याच्या विविध शहरांत आणि छोट्यामोठ्या गावांत राहिले होते तरी झाडे आणि फुलांची त्यांची माहिती खूप मर्यादित होती.
कडुनिंबाची, पिंपळाची, गुलमोहोराची आणि नारळाची अशी काही झाडे आणि गुलाब, मोगरा, फार झालं तर जाईजुई सजी थोडीफार फुले सोडली तर आपल्यापैकी बहुतेकांना इतर झाडांची, झुडुपांची आणि फुलांची माहितीच नसते.
मंडईत किंवा बाजारात गेल्यावरसुद्धा नेहेमी भाजी घेणाऱ्या पुरुषांना आणि अनेक बायांना मेथी, पालक, करडई, शेपू आणि इतर काही पाल्याभाज्यांची आणि कोबी, फ्लॉवर, टमाटे वगैरे फळभाज्यांची नावे माहित असतात. आंबटचुका, चवळी, चाकवत, डांगर, विविध प्रकारचे बिन्स किंवा वाल ही नावे अनेकांनी कधी ऐकलेली नसतात, त्यांची चव कशी माहित असणार? तसाच हा प्रकार.
तर त्या दिवशी बागेतल्या त्या ज्येष्ठ नागरिकाने माझ्या फुलांबाबतच्या आणि झाडांविषयीच्या माहितीविषयी कौतुक केले.
''तुम्हाला माहित आहे का येथे आपण रोज फिरतो या बागेत फणसाचे एक झाड आहे? कवठांच्या ओझ्याने वाकलेले एक झाड आहे? दररोज रात्री आपला मोहक सुगंध पसरविणारे रातराणीचे झाड आहे ? आणि साक्षात स्मुद्रमंथनातून बरे आलेले आणि नंतर सत्यभामाच्या हट्टामुळे स्वर्गातून पृथ्वीतलावर आलेले दररोज सकाळी सुगंधी फुलांचा सडा टाकणारे पारिजातक किंवा प्राजक्ताचे झाड आहे?''
``इथलं हे फणसाचं झाड मी सहसा कुणाला दाखवतही नाही, नाहीतर उन्हाळ्यात सगळे जण फांद्यांवर लोंबणाऱ्या फणसांकडे पाहत राहतील. मागच्या वर्षी
या झाडाला लागलेले छोटेसे दोन फणस काढण्याचा प्रयत्न एक बाई आणि तिची मुलगी करत होती. लांबूनच मला ते दिसले आणि मी मोठ्याने ओरडलो, ;; अरे अजून लहान आहेत ते फणस.. वॉचमनला सांगू का?'' दोघीजणी लगेच पळाल्या, नंतर लक्षात आले नवीनच आलेल्या वॉचमनची ती बायको आणि मुलगी होती. ''
माझे न थांबणारे ते भाषण ऐकून माझ्याबरोबरचे ते मित्र थक्क झाले त्यानंतर चारपाच मिनिटांतच ही सर्व झाडे, विशेषतः कवठाने वाकलेले ते झाड पाहून सगळे थक्क झाले. दररोज तिथे येऊन त्या कडक कवठांच्या फळांकडे त्यांचे कधी लक्षही नव्हते गेले.
`मात्र यात काहीच नवलाची गोष्ट नाही, आपण दररोज संध्याकाळी, रात्री घराबाहेर पडत असतो, किती वेळेस आपले सुर्याच्या मावळत्या लालभडक गोळ्याकडे लक्ष देऊन पाहतो? , किती वेळेस आपण उगवती चंद्रकोर, अष्टमीचा किंवा पौर्णिमेचा चंद्र न्याहाळत असतो? त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणिव नसते. तसेच हे पण आहे..''
मी त्यांच्याशी झाडाफुलांविषयी बोलत होतो ते खरे पण माझे मन कधीच या झाडाफुलांच्या कितीतरी आठवणींमध्ये रमले होते. इथली ही लांबसडक काड्यासारखी फुले असणारी उंचच उंच बुचाची झाडे मला हरेगावच्या संत तेरेजा स्कुलच्या बोर्डिंगची आठवण करुन देत होती. लालभडक, जांभळ्या आणि सफेद रंगांची बोगेनव्हेलची फुले मला नेहेमीच श्रीरामपूरच्या जर्मन हॉस्पिटलपाशी असलेल्या देवळातल्या मतमाऊलीच्या डोंगरापाशी घेऊन जातात. क्रोटॉनची कितीतरी रंगांची रोपटे मला गोव्यातल्या मिरामारच्या माझ्या पहिल्या चिमुकल्या बागेची आठवणी जागी करतात.
वड म्हटलं कि मला श्रीरामपूरपाशी गोंधवणीपासून तीनचार किलोमीटर असलेला आमच्या शाळेच्या सहलीचे ठिकाण असलेला तो बन आठवतो. तिथला तो महाकाय, पारंब्या सगळीकडे पसरत कितीतरी अंतरावर पसरलेला वटवृक्ष मला आजही उठतो, त्या वडाच्या अगदी मध्यभागी एका पिराची हिरव्या कापडाने झाकलेली कंबर होती.
औंदुंबर म्हटलं कि बालकविंची ती हुरहुर निर्माण करणारी कविता हमखास आठवते.
झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी
लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर
नव्वदच्या दशकात रशियात आणि बल्गेरियात वास्तव्यात असताना आणि अलिकडेच पुन्हा एकदा युरोपात सहलीवर असताना आणि दोन वर्षांपूर्वी थायलंडला असताना तिथली झाडे, त्या झाडांची पाने आणि फुले मी असेच अगदी नवलाने पाहत बसायचो.
चिंचवडमधल्या माझ्या इमारतीच्या आसपास आणि गच्चीवर शक्य होतील अशी ही बहुतेक झाडे आणि रोपटे मी लावली आहेत, याचे हे एक मुख्य कारण आहे. विशेष म्हणजे याची जाणीव मला अगदी अलिकडच्या काळात झाली. माझा भूतकाळ माझ्याबरोबर घेऊन उद्या येणाऱ्या नव्या पानांची, कळ्यांची आणि फुलांची वाट मी पाहत असतो.
बोलतबोलत बागेभोवतीच्या गोल रस्त्यांवरुन आमचा एक फेरा पूर्ण झाला होता आणि मला ते दुसरे एक उंच झाड दिसले.. ''आणि हे बघा हे आहे ...''
आणि मी एकदम गप्पगार झालो. मी पुरता ब्लँक झालो होतो,
माझ्या जिभेच्या अगदी टोकांवर असलेले त्या झाडाचे नावच मला आठवेना..
''अहो हल्ली हे झाड सगळीकडे दिसते, आमच्या इमारतीच्या शेजारीही दोन आहेत ही झाडं.. काय नाव ते..''
नंतर मला अचानक एक आठवले.. ``अहो हे झाड म्हणजे शरद पवारांच्या मुंबईतल्या बंगल्याचे नाव..मागे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सत्ता स्थापन करण्यासाठी होणारी चर्चा मातोश्री आणि शरद पवारांच्या या घरात व्हायची.. शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिष्टाई करण्यासाठी त्या दिवसांत या दोन निवासस्थानांत सारखे फेऱ्या मारत असायचे.. आठवले का शरद पवारांच्या घराचे ते नाव ? हे झाड त्याच नावाचे आहे..''
''म्हणजे तुम्हाला `सिल्व्हर ओक' म्हणायचे आहे का?;
राजकारणात खूप इंटरेस्ट असलेल्या त्यापैकी एकाने पट्कन म्हटले.
त्यांना एकदम आलिंगन द्यावे असे मला त्यावेळी वाटले.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केल्यावर मातोश्री, सिल्वर ओक आणि खासदार संजय राऊत अनेक दिवस एकदम प्रकाशझोतात आले होते.
`मातोश्री' हे निवासस्थान तर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून महाराष्ट्रात परिचयाचे होते, २०१९साली सत्तास्थापनाच्या वाटाघाटीच्या काळात आणि संजय राऊत यांच्या शिष्टाईमुळे शरद पवार यांचे मुंबईतील `सिल्व्हर ओक' हे निवासस्थानसुद्धा महाराष्ट्रभर आणि देशाच्या राजधानीतही सर्वपरिचित झाले.
अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात याच खासदार संजय राऊत यांच्यामुळे पेशवाईच्या काळातील विस्मृतीत गेलेले ते `साडेतीन शहाणे' म्हणजे नक्की कोण होते याचीही अनेकांना माहिती झाली.
No comments:
Post a Comment